रागिणी
रागिणी


आठवीपासूनची मैत्री, संजना आणि रागिणीची. संजना मामाच्या गावी शिकायला होते. तिथेच मैत्री झाली.एकाच बेंचवर बसायचे, एका डब्यात जेवायचे. सुट्टी दिवशी अभ्यास करण्यासाठी एकमेकींच्या घरी जायचं. अभ्यासात तशी ती जेमतेमच. स्वभावाने खूप छान, पण जरा तापट होती. दोघी खूप मजा मस्ती करायची. चिंच, बोरे, आंबा यांच्या हंगामात सगळ्यांच्या नजरा चुकवून पाडायला जायचं. भांडायचं पण खूप.. अबोला धरायचा.. नंतर पुन्हा कट्टीबट्टी करायची. मैत्री हळूहळू घट्ट होत गेली.
मैत्री होती निर्मळ पाण्यासारखी...
खळखळणाऱ्या झऱ्यासारखी...
मंजुळ स्वराच्या पाव्यासारखी...
अंधारात लुकलकणाऱ्या काजव्यासारखी...
सतत प्रकशित...
दहावीची परीक्षा सुरू झाली. पेपर संपले.
पेपर झाल्यावर संजना तिच्या आई-बाबाकडे गेली.
पुन्हा दोघींची लवकर भेट झाली नाही.
कधी मामाच्या गावी गेली तर आवर्जून रागिणी ला भेटायला जायची.
दहावीचा निकाल लागला. ती नापास झाली पुढे शिकली नाही. आईला घरी आणि शेतात मदत करू लागली. बाकीच्या मैत्रिणीपण पुढे शिक्षण घेत होत्या. ती मात्र...
शाळेतून घरी राहिल्याने लवकरच तिला लग्नाच्या मांडवात उभे राहावे लागले. लग्न झालं, नवरा पण तिला साजेसा, छान संसारात रमली. गोंडस बाळाची आई पण झाली. खूप खुश होती. पण... नियतीला तिचे सुख बघवलं नाही...
उन्हाळ्यात माहेरी आली होती यात्रेसाठी नवरा आणि बाळाला घेऊन. नवरा तलाव बघायला गेला होता. आणि तिथेच घात झाला. पाय घसरला आणि तो तलावात पडला. बुडून त्याचा मृत्यु झाला.
दुःखी झाली होती खूप. पण बाळासाठी दुःख बाजूला सारून जगू लागली. सासू-सासरे खूप प्रेमळ होते. बाळाला घेऊन त्यांच्यासोबत राहू लागली.आता ती तिच्या सासू अन बाळसोबत राहत असे. दोघी गाव सोडून शहरात गेल्या. तिथे त्यांनी एक खोली भाड्याने घेतली होती. सासू चार घरातील धुणीभांडी करू लागली.
अर्थातच,
शिक्षण कमी असल्यामुळे तिला काही काम मिळत नव्हते. ती पण धुणीभांडी करू लागली. सासू आणि सून मिळाली ती काम करीत आणि जीवन जगत. बाळाला सांभाळत होती.
रागिणचे बाळ आता मोठा आहे. शिक्षण घेत आहे. ती तशीच खंबीरपणे उभी आहे. खरंच सलाम आहे, तिच्या या कर्तृत्वाला, तिच्या जिद्दीला, तिच्या खंबीरपणाला, तिच्या सहनशीलतेला.