STORYMIRROR

Jyoti gosavi

Classics Inspirational

3  

Jyoti gosavi

Classics Inspirational

राधा झाली दुर्गा

राधा झाली दुर्गा

8 mins
216

राधा! फुटपाथ वरती असणाऱ्या चुली वरती भाकरी थापत होती. कुणाचं तरी फर्निचर च काम चालू होतं,त्यांच्याकडून लाकडं मागून आणलेली होती. चांगले ढणा ढणा चूल पेटली होती..ज्वालांचा लाल पिवळा उजेड तिच्या तोंडावर पडला होता.

त्यात तीच सुरेख रुपडं, अजूनही छान वाटत होतं.

लग्न होऊन चांगली चार-पाच वर्ष झाली होती. आणि मराठवाड्याच्या कुठल्याशा खेडेगावातून पोट भरण्यासाठी हे लोक मुंबईला येऊन राहिले. आता ही "मुंबापुरी "नावाची मायानगरी, सगळ्यांनाच आपल्या पोटात सामावून घेते .त्यानुसार त्यांनी हळूहळू फुटपाथ वरती आपलं बस्तान बसवलं.

खरेतर राधा चा नवरा तिच्या मनासारखा नव्हताच.

पण आपल्या आई वडिलांनी लग्न करून दिले, म्हणून ती गप्प बसली.

तिच्या नवऱ्याचं नाव हिंमतराव,पण हिम्मत रावाच्या ऐवजी, लोक त्याला हिकमती राव म्हणत असत .

कारण त्याचे सगळे उद्योग असलेच चालू असत.

याची टोपी त्याला घाल, याची टोपी याला घाल आणि रोजच्या रोज दारू साठी पैसे मिळवायचा. बायकोला घरात एक पैसा देखील दाखवत नव्हता. एवढी गोरी पान देखणी राधा पण तिची रया गेली होती

लग्न झालं तेव्हा चांगली रसरसून भरलेली पोरगी, नवऱ्याच्या राज्यात पार चिपाड झाली. त्यात दोन पोरं पायाशी, आणि हा असला दारुडा नवरा. त्याच्यामुळे तिला जगणं फार असह्य झालं होतं तिला,पोरं असती तर कवाच जीव दिला असता. पण दोन पोरं पायात आहेत.

त्यांना आपण जन्माला घातलंय, बाप नाही घेत जबाबदारी, पण मला आई म्हणून घ्यायला पाहिजे. असा नेहमी ती स्वतःशी विचार करत होती, स्वतःचीच समजूत घालायची.

ती आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये दिवसभर धुणी भांडी करत असे.

शिवाय सगळ्याच मालकिणी काही हलकट नव्हत्या. काही चांगल्या देखील होत्या, तिच्या हिमतीची दाद देत असत. तिला अडले नडले थोडे फार पैसे देत असत, कधी कोणी नवीन साडी, स्वतःची जुनी साडी, स्वतःच्या पोरांचे तिच्या कच्च्या बच्च्यांना कपडे, कधी काही सणवार असेल, कोणाचा बर्थडे असेल, तर जेवण पण बांधून मिळायचं. त्याच्यामुळे ती आहे त्या परिस्थितीमध्ये देखील आनंदी होती .

आता फक्त पोरांसाठी जगायचं, नवऱ्याशी काही देणे घेणे नाही. असाच विचार ती करायची.

नवरा कधी तरी आठवड्यातून दोन-तीन वेळा त्याच्या बिगाऱ्याच्या कामावर जायचा. त्यात जे काही रोजच्या रोज पगार मिळायचा, त्यातला तो अगदी ऐंशी-नव्वद टक्के पगार दारुत वापरायचा. चढवणारे मित्र असतातच त्यांना घेऊन बारमध्ये जायचं आणि दारुडा असला तरी तो पण बायकोला घाबरत असायचा.

खरं राधा कधीच त्याच्याशी उलटा वाद-विवाद करत नव्हती.

परंतु तो बायकोला देखील घाबरून असायचा, पण दारूच्या नशेत कधी आल्यावर विनाकारण मारायचा.

काहीना काही खुसपट काढायचा, राधाची अंगकाठी लहानच होती. तिला त्याचा मार सोसायचा नाही. कधी मग ती फुटपाथ वरून पळून जायची, कधी पोरांना घेऊन पळायची, कधी एकटीच पळून जायची. आणि त्याचा राग शांत झाल्यावर खाऊन पिऊन तो झोपल्यानंतर मग ती फूटपाथवर यायची.

मग हा डाराडूर झोपल्यानंतर, तीच आणि पोरांचा खाणं व्हायच. अगदी नको जीव झाला होता..

त्यातच तिला तिसऱ्यांदा दिवस राहिले होते. खरंतर तिला तिसरं मूल नको होतं पण तिच्यावर ते लादलेलं होतं, पण काय कसं झालं ते कळलं नाही. दारू पिऊन आलेल्या नशेमध्ये, तो शारीरिक सुख ओरबाडून घ्यायचा. तिच्या मनाची तिच्या जीवाची कधीच पर्वा करायचा नाही .

असल्या जिण्या पेक्षा मेलेलं बरं! मग आपल्या पोरांचं काय होईल? हा तर लगेच दुसरी बायको घेऊन येईल,माझी पोर रस्त्यावर पडतील. त्यांचे हाल होतील,

रोजचा मार खाऊन ती कंटाळली होती. आणि एक दिवस रागाच्या तिरीमिरीत ती जवळ असणाऱ्या विहिरीपाशी गेली. सोबत मुलांनाही घेऊन गेली ,आधी दोन पोरं विहिरीत टाकून द्यायची, आणि मग आपण उडी मारायची असं तिने ठरवलं, अगदी मन घट्ट केलं.

विहिरीच्या कट्यावर चढली, लहान मुलगी राहीला पाण्यात फेकून देण्यासाठी तिने हात दिला, आणि तिला वर घेतलं .

मुलगी खूपच लहान होती, फार फार तर तीन वर्षाची असेल.

तिला काही कळतच नव्हतं, आईजवळ म्हणजे, सगळ्यात सुरक्षित, एवढं तिला माहीत होतं.

त्यामुळे तिला काही कळलंच नाही. ती आई बरोबर विहिरीच्या कठड्यावर चढली .आता पोरीला फेकणार, तेवढ्यात तिला एक आर्त किंकाळी आणि घुसमटलेले शब्द . शब्द ऐकू आले.

कोणी तरी कोणाच तरी तोंड दाबून धरले असं वाटत होतं .

ती किंचाळली किंचाळणारा आवाज स्रीचा होता .आणि त्याच बरोबर एक पुरुषी आवाज, ए! गप बस! "आवाज करू नको "नाहीतर उचलून या विहिरीत तुला टाकून देईन. या धमकीला पण तो आवाज घाबरला नाही.

तो आपला किंचाळत होता, आणि सुटका करण्याचा प्रयत्न करत होता.

राधा विहिरीच्या कठड्यावरून खाली उतरली, आणि कोण किंचाळते हे आसपास शोधू लागली. परत एकदा तसाच किंचाळण्याचा आवाज आला, आणि मग तिच्या लक्षात आलं हा आवाज पाण्याची मोटर बसवलेल्या आहे ना, त्या खोलीतून येत आहे .

पाण्याच्या मोटर साठी एक छोटीशी केबिन बाजूच्या सोसायटी ने केली होती. जेव्हा प्यायचं पाणी येत नाही, तेव्हा बोरिंगच पाणी वापरण्यासाठी या विहिरीला प्रयोजन केले, पण तिच्यात दिवस-रात्र काही वाचमन बसत नसायचा.

पाणी सोडायला जाई तेवढाच ,त्या मोटर च्या खोलीला आतून कडी घातली होती.

तिने धडा धडा त्या दरवाज्याला लाथा मारल्या. कोण आहे रे! आत मध्ये काय करतोय ?

असं ती दरडावून विचारत राहिली, आतल्या माणसाची पकड पोरी वरून ,थोडी ढिली झाली, आणि पोरगी झटकन दरवाजा उघडून बाहेर आली.

राधा तिच्याकडे बघतच राहिली. चौदा पंधरा वर्षाची परकरी पोर,

दिसायला सुंदर, गोरी, शेलाटी,कपाळावर गोंदल्याच्या खुणा,तिच्या अंगावरचा ब्लाउज फाटलेला, कपड्याची ओढाताण केलेली होती, तिला थोबाडीत मारले च्या खुणा पण होत्या.

आतल्या बाबा शी कुस्ती, झटापट करून स्वतःला सोडवताना, तिच्या कोपराला, हाताला खरचटले होते.

राधेने तिला जवळ घेतलं, तिच्या ओठातून आलेले रक्त आपल्या पदराने टिपलं.

काय झालं बाई तू कशी काय इकडे आलीस? कोणावर पण विश्वास ठेवू नये माणसाने.

अहो ताई! मी पाणी भरायला आले, पण रश्शी आणि कॅन विसरून आले. मग तेवढ्या साठी मला परत दोन मैल जावं लागलं असतं .

तेवढ्यात हा भाऊ इथे भेटला.

मला म्हणाला" मशीन मधून पाणी गळत असतं" तेथेच तुझा हंडा लाव ये ,

मी तुला हंडा भरून देतो म्हणून मी त्याच्या बरोबर त्या रूममध्ये आली.

पण हा भाव लई नालायक आहे.

दोघींचा एवढ संभाषण होत आहे ,तोपर्यंत आतला तो माणूस एकदम रागाने लालेलाल होऊन ओरडाआरडा करतच बाहेर आला.

कुठे जाशील जाऊन जाऊन? मी तुला आता पकडून उचलून घेऊन जाईल.

शारदाने त्या माणसाकडे बघितलं, आणि ती थंड पडली. एकदम निशब्द पणे एखाद्या पुतळ्या सारखी तशीच उभी राहिली.

काय बोलावं ते समजेना, तोंडातून शब्द फुटेना, कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून, तिचा नवरा हिम्मतराव होता..

आपल्या बायकोला बघून त्याच अजूनच डोकं फिरलं. म्हणजे ही आपल्या मागावर आली, असं त्याला वाटलं.

ए रांडे हो बाजूला! मोठी आली वाचवणारी,

तू  स्वतःला शहनशा मधली अभिताभ समजते का?

आतापर्यंत राधाचा असा समज होता. आपला नवरा दारुड्या आहे, पैसा कमवत नाही, सगळी कमाई आपल्या पिण्यामध्ये घालतो, आपल्याला देखील मारतो. पण आपला नवरा इतकी पण वाईट दुष्कृत्ये करत असेल हे तिला मान्य नव्हतं.

पण आज स्वतःच्या डोळ्यासमोर तिला दिसलं, तो निर्लज्जासारखा बाहेर येऊन, त्या पोरी वरती झडप घालू लागला.

तिला हाताने ओढून परत मशीन रूम मध्ये घेऊन चालला .

आता मात्र राधाच्या मस्तकात संतापाने स्फोट झाला.

कारभारी तिला सोडा,अहो अजून दहा एक वर्षाने आपली पोरगी पण वयात येईल. मग तिला कोणी काही केलं तर? चालेल का?

जा ग! मोठी आलीस मला ज्ञान शिकवणारी.

तुझ्या नादानं नाचायला मी काय बाईलवेडा आहे का? मला अशा छप्पन पोरी बाहेर मिळतात.

मग असेच शेण कशाला खाता?

अहो जो नवरा, बाईच्या नादाने नाचतो ना! त्याचं कल्याण होतं, बाई काय स्वतःसाठी कुठल्या गोष्टी करत नसते.

तुमचं घरदार सांभाळण्यासाठी मी दोन पैसे मागे टाकते, बचत करते, जो नवरा बायकोचा ऐकतो ना त्याचा संसार सुखाचा होतो.

जा ग निघ इथून, मोठी आली शहाणी!

जा घरला निघ, असे म्हणून त्या पोरीला तो पुन्हा ओढत मधे घेऊन चालला. , राधा आधी बघतच बसली ,काय करावं ते सुचेना ,

तिच्या डोळ्यासमोर ,तो त्या पोरीला आडवी पाडत होता. मग मात्र राधाचा संयम सुटला, तिने मागचा पुढचा विचार न करता, त्याच पंपिंग रूम मध्ये एक काठी उभी होती, चांगली मजबूत शिसवाची काठी होती.

तिने क्षणाचा विचार न करता ती काठी हातात घेतली आणि दणादण नवऱ्याच्या डोक्यात, अंगावरती फटके देऊ लागली.

असा पण आपल्याला कोण विरोध करेल,आणि ती आपली बायकोच करेल, हे त्याच्या स्वप्नात देखील नव्हतं .

आतापर्यंत ती निमुटपणे सगळे सहन करत आली होती. त्याला वाटलं आता ती गपचूप घराकडे जाईल, पण तिच डोकंच फिरलं होतं.

कधी नव्हे ते तीन, आज नवऱ्यावर हात उचलला, चांगलं! बडवून काढलं. एक काठीचा ठोका,त्याच्या डोक्यावर मारला.

त्याच्या डोक्यातून रक्ताची धार लागली .

ही मुलगी तर भेदरून सगळा प्रकार बघत बसलेली होती. आणि तिच्या दोन पोरांनी, कधीच घराकडे धूम ठोकली होती.

कुठे राहते ग, माय! तू

तिने त्या मुलीला पुसले. तिथून जवळच्या झोपडपट्टीत ती मुलगी राहत होती .बहुतेक सगळे लोक पाणी भरायला इकडेच यायची.

तिने त्या मुलीच्या ब्लाउज ची बटन वगैरे लावली, नसेल तिथे स्वतःच्या मंगळसूत्राच्या पीना काढून लावल्या. तिचे हातपाय केबिन मधल्या धुळीने माखले होते, ते स्वच्छ केले.

बाळा! तुझं नाव काय?

माझं नाव "नंदा"

तुझ्या घरला जा, आणि इथं काय घडलं ते कोणाला सांगू नको.

तुला काही झालं नाही ना? मग कोणाला सांगू नको बरं, नाहीतर, पोलिस या माणसाबरोबर तुला पण आत मध्ये घालतील.

उगाच परत नवऱ्याला आज घातला, तर मलाच सगळी लफडी निस्तरावी लागतील,म्हणून तिने मुलीला असे सांगितले.

 राधाने विहिरीतून पाणी काढून तिचा हंडा भरून दिला..

तो तिच्या डोईवर दिला .

ती गेली तेव्हा तिने कुठे मोकळा श्वास सोडला.

अहो धनी! तुम्हाला काही कळतं का हो !

आपल्या पोरी सारखी ती आहे.,

गप ग! पंतप्रधानणी! आली मोठी ज्ञान शिकवायला. तुझ्यामुळे माझ्या हातातलं सावज निसटलं .

मी तुला सोडणार नाही! असे म्हणून तो तिच्या अंगावर धावला.

तिने परत आपला जीव एकवटून हातातल्या काठीचे टोले त्याला ठेवून दिले. त्याच्या डोक्यातून रक्ताची धार चालू होती.

तो एका हाताने पुसत होता, आणि दारूच्या नशेत बडबडत होता.

गप रे मुडद्या! किती दिवस झाले, तुझा छळ सहन करते आहे. मला मारलं ते सहन केलं पण दुसर्‍या बाईला,पोरीला, बरबाद होऊ देणार नाही.

"तू नीच आहेस! लक्षात ठेव पुन्हा जर कुठे काही असं करताना दिसलं, तर मीच कंप्लेंट करून तुला पोलिसांकडे देईन..

बलात्काराच्या आरोपाखाली आयुष्यभराचा आत जाशील" असे म्हणून ती तोंड वळवून ,तरातरा आपल्या फूटपाथवर च्या घराकडे निघाली.

निघताना नवऱ्याला देखील हाताला धरुन फरपटत एका डॉक्टर कडे घेऊन गेली. .

"डॉक्टर साहेब याला टाके घाला ,त्याचं डोकं फुटलं आहे. दारू पिऊन आपटला, त्याचं डोकं फुटलं. राधाने नवऱ्याकडे रागारागाने बघत, डॉक्टरांना सांगितलं.

त्याला उपचार काय असेल तो करा आणि डॉक्टरची फी देऊन ती तिथून निघून गेली. कारण तिला आता त्याच्याबद्दल काही भावना वाटतच नव्हत्या.

पण यातून एक गोष्ट चांगली झाली. ती आत्महत्येच्या विचारापासून लांब गेली.

या असल्या, नालायक माणसाच्या पायात मी आणि माझ्या पोरांनी का? आता मी रडणार नाही तर लढणार आहे. का म्हणून जीव द्यायचा? तशीच धावत घरी गेली दोन्ही पोरं फुटपाथ वरती काचाकवड्या सारखा गेम खेळत होते ..

तिने झटकन दोघांना जवळ घेतले आणि तिच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या..

आज आपण काय केलं असतं? ती स्वतःलाच प्रश्न विचारू लागली आणि स्वतःलाच दोष देऊ लागली.

खूप झालं! बस झालं !आता इथून पुढे त्याचा मार खायचा नाही. तो अंगावर आला तर त्याला सरळ बडवून काढायचा ,आणि पोलिसात घ्यायचा.

याचा घट्ट निर्धार तिने केला होता.

बारक्या या तीन वर्षाच्या मुलीने,आई तू का रडते? असे विचारू लागली. तिने रडत रडत तिला जवळ घेतलं, म्हणली! "नाही ग बाळा" आता मी कधीच रडणार नाही. आपल्या डोक्यावरचं मृत्यूचं सावट दूर गेलं होतं.

हे शब्द काही तिला कळत नव्हते पण ती आपल्या आईच्या कुशीत शिरले आणि तिचे डोळे पुसु लागली तेव्हा तिला स्वतःबद्दल फारच वाईट वाटले. "अरे! तासाभरापूर्वी मी या पोरीला विहिरीत ढकलून देणार होती.

माझी एवढी सोन्यासारखी गोड पोरगी, मी अनाथ होऊ देणार नाही.

रस्तोरस्ती तिला भीक मागायला लागेल. ते मी करू देणार नाही.

आता मी खमकी झाले. पोराच्या आणि बापाच्या मध्ये एका भिंती सारखी उभी राहीन. स्वतःच्या निर्णयावर तिला खूप समाधान वाटले. आता ती राधेची दुर्गा झाली होती.

साक्षात प्रेमाचे प्रतिक असलेली राधा आता दुर्गा झाली होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics