Pandit Warade

Drama Inspirational

4.4  

Pandit Warade

Drama Inspirational

पुन्हा एकदा संशयकल्लोळ

पुन्हा एकदा संशयकल्लोळ

9 mins
9K


    पंकज आणि सुनंदा! सुंदर, सालस जोडी. त्यांचं लग्न म्हटलं तर "लव्ह मॅरेज",

म्हटलं तर " अरेंज मॅरेज". कारण सुनंदा ही पंकजच्या मामाचीच मुलगी. लहानपणा पासून पाहिलेली, सोबत खेळलेली, जीवात जीव गुंतलेली. 'हीच मुलगी पत्नी म्हणून जीवनात यावी' अस पंकजच्या मनानं पक्कं ठरवलेलं. सुनंदानंही अगदी पतीपत्नीचं नातं कळायला लागल्यापासून पंकजलाच पती म्हणून मनापासून वरलेलं. खानदानी घराण्यातले दोघेही, संस्कारात वाढलेले असल्यामुळे एकांतात बसून, हातात हात घेऊन, जीवनभर एकत्र राहण्याच्या आणाभाका घेणं हा प्रकार करण्याची त्यांना आवश्यकताच नव्हती. दोघांची नजरानजर झाली, सलज्ज नजरेनं एकमेकांना पाहिलं, नजरेची भाषा समजली, अन् पक्कं झालं. अशा वेळी तिथं शंकाकुशंका, आणा, शपथा, वचने, प्रतिज्ञा, यांची आवश्यकताच काय? दोघांनीही एकमेकांना स्वीकारलं होतं. उरलं होतं केवळ रीतसर लग्नाची बोलणी होणं.

      कालांतराने दोघांच्याही पालकांनी एकमेकांना भेटून लग्नाची बोलणी केली. आपसातच नातं जुळवायचं तेव्हा देण्याघेण्याचा प्रश्न येतोच कुठे? सारं काही ठरल्याप्रमाणे रीतसर झालं. सुयोग्य वेळ बघून दोघांचे लग्न झालं. म्हणून ते एक प्रकारे "अरेंज मॅरेज".

    दोघेही एकमेकांना अनुरूप होतेच, शिवाय त्यांचे एकमेकांवर मनापासून प्रेमही होते. त्यामुळे त्यांचा संसार अगदी आनंदात सुरू झाला. कुठे कुरबुर असण्याचं कारण नव्हतं. त्यांची संसारवेल सुखात वाढत होती. यथावकाश त्यांच्या संसारवेलीवर एक सुंदर फुलही उमललं. छोटीसी, प्यारीसी, नन्हीसी एक परी त्यांच्या घरात आली. माहेरी जाऊन सुनंदानं एका कन्यारत्नाला जन्म दिला.

   सुनंदा माहेरी गेल्यावर पंकजला एकटेपण खात होतं, तिची आठवण बेचैन करत होती. रात्र रात्र झोप गायब व्हायची. सहकारी शिक्षक आणि विद्यार्थ्यांसोबत दिवस कसा तरी निघून जायचा, पण रात्र...? रात्र मात्र युगायुगाची व्हायची. घर खायला उठायचं. त्याच्या संस्कारी मनं हे प्रसंग शब्दबद्ध करायला सुरुवात केली. त्या प्रसंगांना अनुसरून कथा, कविता लिहायला लागला. हृदयातून निघालेल्या शब्दरूपी भावना वाचणाऱ्यांच्या हृदयाला भिडू लागल्या. त्याचं ते लिखाण सर्वांना आवडायला लागलं, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये जायला लागलं, परीक्षकांच्या मनाचा ठाव घेऊ लागलं.

     पंकजला सुनंदाच्या विरह इष्टापत्ती ठरला. त्याच्यातला साहित्यिक जागा झाला. जेव्हा जेव्हा जे जे सुचेल ते कागदावर लिहून ठेवायला लागला. खिशात कागदाचे चिठोरे वाढायला लागले. निवांत वेळ मिळेल तेव्हा ते चिठोरे बाहेर यायचे, शब्दांची सुयोग्य अशी गुंफण व्हायची अन् त्यातून एखादी सुरस कथा किंवा कविता तयार व्हायची. एकंदरीत एकटेपणाचा दुखण्यावर त्याला चांगला उपाय सापडला होता. दिवस अगदी मजेत जाऊ लागले.

     इकडे सुनंदा देखील अगदीच मजेत होती. आई वडिलांची लाडकी होती. घरात कशाचीच कमतरता नव्हती. तिच्या पाठच्या भावा नंतर पहिल्यांदाच तिच्या मुलीच्या रूपानं लहान मूल त्या घरात खेळत होतं. घरात सगळे सदस्य आनंदात होते. सुनंदाला भेटायला, मुलीला पहायला येणाऱ्या पाहुण्यांची वर्दळ वाढली. अशातच एक दिवस सुनंदाची मैत्रीण 'किरण' तिला भेटायला आली.

      खूप दिवसानंतर भेट झाली होती. खूप वेळ दोघींनी गप्पा मारल्या. आपापल्या संसारातील अनुभवांची देवाणघेवाण झाली. सुखदुःख सांगून मने मोकळी केलीत. किरणने तिच्या जीवनातला एक दुःखद अनुभव आपल्या जिवलग मैत्रिणी जवळ वयक्त केला. किरणच्या माहेरपणात तिचा विरह तिच्या पतीला सहन झाला नाही. मित्रांच्या संगतीनं दारूचे व्यसन लागले होते, नको नको त्या गोष्टी घडू लागल्या होत्या. त्यातून सावरणे फार कठीण गेले होते.

     

     मानवी मन फार विचित्र असतं, नको तिथं घुसतं, नको असलेलं उकरून काढतं, नसलेलंही हुडकायला लागतं, सुखाचा विपरीत अर्थ काढून दुःखाने कष्टी होतं. तसच काहीसं सुनंदाच्या बाबतीत झालं. ती किरणच्या अनुभवांना स्वतःच्या संसाराशी ताडून पहायला लागली. पंकजला आपला विरह सहन होत असेल का? त्याची अवस्था किरणांच्या पतीसारखी तर होणार नाही ना? 'मन चिंती ते वैरी ना चिंती. ' नको नको त्या गोष्टी नजरेसमोर दिसायला लागल्या होत्या. तिने पंकजकडे जाण्यासाठी वडिलांजवळ आग्रह धरला. वडिलांना घेऊन सुनंदा पंकजकडे आली.

     सुनंदा बाळाला घेऊन आली परंतु त्याचवेळी पंकजच्या शाळेच्या परीक्षा सुरु होत्या.धावपळीचे दिवस होते.एक आदर्श शिक्षक म्हणून त्याचा बोलबाला होता. अर्थातच त्या आदर्शाच्या जबाबदारीने त्याला अडकवलेले होते. त्यामुळे सुनंदाला अपेक्षित प्रतिसाद तो देऊ शकला नाही. सुनंदा आणि बाळ येण्याचा आनंदही तो व्यक्त करू शकला नाही. मिळेल तेवढा वेळ त्या दोघांसाठी काढावा या हेतूने बाळाला मांडीवर घेतले. तेवढ्यात एक फोन आला अन् "आलोच" म्हणून तो निघूनही गेला. तिला त्याचं हे वागणं खटकलं. तिला किरणची घटना आठवली. चिंतेनं तिला ग्रासलं.

   संशयाचा कावीळ झाला कि, सगळं जग पिवळं दिसायला लागतं, तसं सुनंदाचं झालं. 'खरंच पंकज आपल्या पासून दूर तर गेला नसेल ना?' ती विचार करायला लागली. कसे तरी दोन घास पोटात ढकलून ती बाळाला घेऊन आडवी झाली.

    शाळेतील काम आटोपून पंकज उशीरा घरी आला. बाळाला मांडीवर घेऊन सुनंदाशी मनमोकळ्या गप्पा करू असं ठरवलेल्या पंकजचा नाईलाज झाला. तो तसाच झोपला. सात आठ दिवस असंच झालं. त्याला रोजच उशीर व्हायला लागला. तो घरी येऊन जेवायला बसायचा, तोच एक फोन यायचा अन् 'आलोच' म्हणत तो नोघून जायचा. एक दिवस असाच फोन आला अन् त्याने फोन घेतला. "आलोच" म्हणत तो कपडे बदलून निघालासुद्धा. मात्र फोन घरीच विसरला. त्याला उशीर लागला म्हणून पुन्हा एक कॉल आला तेव्हा फोन घरी विसरल्याचे तिच्या लक्षात आले. फोन रिसिव्ह करेपर्यंत कट झाला होता. मात्र कुणाचा फोन आहे ते बघावं म्हणून तिनं 'कॉल लॉग' बघितला, त्यात नाव होतं, " हेमा".

    झालं! तिचा संशय आणखी बळावला. तिची झोप उडाली. डोळ्याला डोळा लागेना, उगाचच ती फोन हातात घेऊन कॉल लॉग चेक करू लागली. रोज तो ज्या ज्या वेळी घरून बाहेर जायचा, त्या त्या वेळी "हेमा' चा फोन आलेला असायचा असे तिच्या लक्षात आले. 'कोण असावी ही हेमा?' ती विचार करत पडलेली असतांनाच तो आला. तिला जागे असलेले पाहून म्हणाला,

  " अरे व्वा! आज झोपली नाहीस?"

   "कशी झोपणार? तुम्ही रात्रीचा दिवस करताय अन् मी झोपा काढंत बसू होय?" सुनंदा.

   "अगं, तुला जागून चालणार नाही, स्वतःबरोबर बाळाचीही काळजी घ्यायची आहे." पंकज.

   "म्हणून तर मला डोळ्यात तेल घालून जागं रहायला हवंय". तिचं खोचक बोलणं.

   "बरं! बरं! ठिकाय, झोपा आता, रात्र खूप झालीय. मला सकाळी लवकर जायचं आहे." सुनंदाच्या बोलण्यातली खोच ना समजून पंकज बोलला.

   ती मात्र मौनच राहिली.

    "ठिकाय! शुभ रात्री!!" म्हणत त्याने सुनंदाचा निरोप घेतला अन् अंथरुणात शिरून क्षणातच झोपीही गेला.

  सुनंदाला मात्र झोप येत नव्हती. ही 'हेमा' कोण असावी? या एकच प्रश्नानं तिला भंडावून सोडलं होतं, अस्वस्थ केलं होतं. केव्हातरी रात्री तिला झोप लागली.

     रात्री उशीरा झोपल्यामुळे सुनंदाला सकाळी लवकर जाग आली नाही. ती उठली तेव्हा पंकज तयारी करून ऑफिसला निघून गेलेला होता. मनातल्या मनात तिचा संशय आणखीच बळावत चालला होता. कुणाजवळ तरी मन मोकळं करावं म्हणून तिनं किरणला फोन केला. जेव्हा जेव्हा बेचैन वाटायचं तेव्हा तेव्हा ती किरणला फोन करायची, मन मोकळं करायची. आजही अगदी मनमोकळेपणानं तिनं मनातली शंका किरणजवळ व्यक्त केली. किरणनेही तिला सावधानतेचा इशारा दिला. सकाळ संध्याकाळ दोन्ही मैत्रिणी आपापल्या संसारातील सुखदुःख एकमेकींजवळ व्यक्त करू लागल्या. त्याचा परिणाम सुनंदाच्या वागण्यावर व्हायला लागला. मनमोकळी सुनंदा घुम्यासारखी मौन राहू लागली. पंकजशी बोलतांना मोजकं, जेवढ्यास तेवढंच बोलू लागली.

    एक दिवस कपडे धुवायला काढतांना एक चिट्ठी पंकजचा खिशात सापडली. चिठ्ठी कशाची ? सुनंदाच्या दृष्टीने पंकजच्या कृष्णकृत्याचा पुरावाच जणू तिच्या हाती लागला होता. काय होते त्या चिट्ठीत? ........

      चिट्ठीत लिहिले होते......

  "प्रिय पुष्पास,

तुला पाहिले कि सारे जग सुंदर दिसते. साऱ्या सृष्टीचा सुगंध तू आहेस. माझ्या जीवनात तुझ्यामुळेच सुगंध आहे. तुझ्या सुंदर रंगानं साऱ्या सृष्टीला रंगीन बनवलं आहे. तुझ्या दर्शनानं मनाला कसं अगदी प्रसन्न वाटतं. तुझ्या सान्निध्यात जीवनाचा परमोच्च आनंद मिळतो, परमोच्च सुख मिळतं. तुझ्या जवळ बसलं कि,जगाचं अस्तित्व विसरायला होतं. कध्धी कध्धीच उठू नये, जगाचे भान राहू नये, तुझा सुगंध, तुझे सौंदर्य मनमुराद लुटावे. केवळ आणि केवळ तुझ्या जवळच सुखाचे चार क्षण मिळू शकतात याची जाणीव तू भेटल्या पासून मला होऊ लागलीय. भरशील का माझ्या जीवनात सुखाचा परिमळ?

    .....तुझाच दर्शनाभिलाषी

                       पंकज

   सुनंदाला खात्री व्हायला लागली कि, तिचा पंकज तिच्यापासून सूर जातोय. ती तिची व्यथा किरणजवळ व्यक्त करु लागली. उदास उदास राहू लागली. किरण सोबत बोलून ती थोडीसी फ्रेश व्हायची तेवढंच.

     सुनंदाची उदासी पंकजला खटकू लागली होती. अशातच एक दिवस सुनंदा काही कामात असतांना तिचा फोन वाजला. पंकज जवळच असल्यामुळे साहजिकच फोनकडे नजर गेली. 'किरण' चा फोन होता. हा कोण किरण असावा? तो विचारात पडला. विचलित झालेला पंकज फोन उचल पर्यंत फोन कट झाला. त्या फोनने पंकजच्याही मनात संशयाचा किडा सोडला होता. दोघांच्या जीवनात अशांतता निर्माण करून फोन शांत झाला होता.

     संशयाचे भूत सुखी संसाराची धूळधाण करण्यासाठीच असतं जणू. सारासार विवेक बुद्धीवर भ्रमाचा पडदा टाकून ते धुमाकूळ घालत असतं. ज्यांची विवेक बुद्धी प्रगल्भ आहे अशाच व्यक्ती या धुमकुळातून वाचू शकतात. सर्वसामान्य व्यक्ती मात्र भरडून निघतात. सुनंदाच्या फोन मधील किरण आणि पंकजचा फोन मधील हेमा या दोन भूतांनी दोघांच्या सुखी संसारात बिब्बा घातला. त्या दोघांमधली दरी वाढत गेली.

     कुठलेही भांडण नसतांना ते दोघेही मौन राहू लागले. एकमेकांशी संवाद न केल्याने दोघेही घटस्फोटाच्या विचारा पर्यंत पोहोचले.

     शेवटचे पाऊल उचलण्या पूर्वी आपल्या जिवलग मैत्रिणीचा सल्ला घ्यावा म्हणून सुनंदानं किरणला फोन लावला. मनातलं सारं सांगितलं, अगदी घटस्फोटाचा विचार मनात घोळतोय हेही सांगितलं. किरणनं सारं काही शांत चित्तानं ऐकून घेतलं. घटस्फोटाचा विचार ऐकून मात्र किरण गडबडली. "फोनवर सगळंच बोलता येत नाही, मी येतेय. तोवर कुठलंही आततायी पाऊल उचलू नकोस. मी येई पर्यंत स्वस्थ बस. त्रागा करून घेऊ नकोस. मी आल्यावर बघू काय करायचे ते" असं म्हणून तिनं फोन बंद केला.

   'कसंही करून दोघांत समेट व्हायलाच हवा. दोघंही सुशिक्षित, सुसंस्कृत आहेत. तरीही असं का व्हावं? काय कारण असावं?' असा विचार करत किरणनं सुनंदाला फोन लावला आणि ' मी येत आहे' असा निरोपही देऊन टाकला.

   किरण! जिवाभावाची मैत्रीण भेटायला येत आहे म्हटल्यावर सुनंदाची कळी खुलली. ती घर नीट नेटकं करायला लागली. मनात नसतांना सुद्धा ती पंकजशी बोलली. "माझी जिवलग मैत्रीण येतीय, आज तरी लवकर घरी या" म्हणाली. पंकजनेही होकार दिला.

    ठरल्या प्रमाणे सायंकाळी किरण सुनंदाच्या दारात हजर होती. तेवढ्यात पंकज सुद्धा नेमक्यावेळी घरी पोहोचला. पंकजला अन् किरणला सुनंदानं सोबतच घरात घेतलं. हातपाय धुवायला बाथरूम मध्ये पाणी काढलं. दोघंही फ्रेश होऊन हॉल मध्ये येऊन बसले. चहा नाष्टा झाला. सुनंदा दोघांची ओळख करून देऊ लागली,

    "किरण, हे माझे मिस्टर! पंकज ! तुझे भावोजी!! अन् पंकज, हि माझी जिवलग मैत्रीण, किरण".

    'किरण'? पंकज दचकला. किरण पुरुष नसून स्त्री आहे तर? बापरे केवढा मोठा अनर्थ होणार होता. हा पुरुष समजून आपण केवढा गैरसमज करून घेतला होता.' शिक्षक असल्यामुळे पंकजला लगेच साऱ्या गोष्टींचा उलगडा झाला होता.

      इकडे पंकजला बघितल्यानंतर हा काही गैरकृत्य करु शकेल असं किरणला पटेनासं झालं. काहीतरी गडबड असल्याचा तर्क तिने काढला.

     दोघींनी मिळून स्वयंपाक केला. सर्वजण जेवायला बसले. जेवण सुरु असतांनाच पंकजचा फोन वाजला. 'आज परीक्षेचे काम तर उरलेले नव्हते मग फोन कशासाठी?' त्याने फोन रिसिव्ह केला अन् बोलायला लागला.

   " हॅलो! सर पंकज बोलतोय! अजून काही बाकी राहिलंय का सर? तसं असेल तर मी सकाळी लवकर येऊन उरकून घेतो. आज जरा पाहुणे आलेय घरी."

     किरणनं बघितलं होतं, फोन 'हेमा' नावाच्या व्यक्तीचा होता. तिला उत्सुकता होती, ती लक्षपूर्वक ऐकत होती.

     " अहो, पंकज सर, अभिनंदन करण्यासाठी फोन केलाय. पुढील साहित्यिक वाटचालीस माझ्यातर्फे आणि स्टाफ तर्फे हार्दिक शुभेच्छा तुम्हाला" पलीकडून आवाज आला.

   "अभिनंदन? कशासाठी सर?" पंकज.

   "अहो विसरलात का? उत्कृष्ट पत्रलेखनाचा पुरस्कार मिळालाय तुम्हाला, तुमच्या त्या 'प्रिय पुष्पास'या पत्रा बद्दल."

    "धन्यवाद सर!!" पंकज.

     दोघींनीही त्यांच्यातला हा संवाद ऐकलं होता. किरणला थोडासा उलगडा होऊ लागला होता. तिने पंकजला सहज एक प्रश्न केला,

     "भाऊजी, 'प्रिय पुष्पास' ही काय भानगड आहे? आणि ही फोनवरची हेमा कोण? मला काही कळेल का? माफ करा! तसं तर मला तुमच्या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप करण्याचा काही एक अधिकार नसतांना थोडं धारिष्ट्य करतेय".

  हे ऐकताच पंकज मोठयाने हसायला लागला. "अच्छा! तर असं आहे होय? अहो, 'हेमा' म्हणजे कुणी एखादी सुंदर ललना नसून ते आमचे हेडमास्तर आहेत. त्यांचा नंबर सेव्ह करतांना शॉर्टफॉर्म मध्ये हेमा नावाने सेव्ह केला आहे. म्हणून आमच्या मॅडमचा गैरसमज झालेला दिसतोय" त्याचा खुलासा.

    "आणि पुष्पा?" किरणचा प्रश्न.

    " अहो एक पत्रलेखन स्पर्धा होती. फुलास उद्देशून पत्र लिहायचे होते. अन् पत्र लिहितांना मायना लिहिला होता, ' प्रिय पुष्पास' म्हणजे 'प्रिय फुलास'. तुमचा पायगुण फारच भारी दिसतोय. माझ्या त्या पत्रलेखनास पारितोषिक मिळाले आहे". पंकजने सविस्तर खुलासा केला.

  " अगं किरण, खरच तुझा पायगुण खूपच चांगला. तू आलीस म्हणून साऱ्या गोष्टींचा उलगडा झाला. फार मोठा भूकंप होता होता राहीला." इति सुनंदा.

    "आणि बरं का तुमच्या नावानेही फार मोठा घोळ केला होता. रोज हिच्या फोन वर तुमचा कॉल यायचा अन् ही तासनतास तुमच्याशी बोलत बसायची. मी ज्यावेळी तिच्या फोनवर तुमचं 'किरण' नांव बघितलं, तेव्हा मला वाटलं ही कुण्यातरी किरण नावाच्या मित्रालाच बोलतेय."- पंकज.

   "अरे, तुम्ही दोघेही सुशिक्षित, सुसंस्कृत आहात. एकमेकांशी संवाद न करता मनोमन गैरसमज करून बसलात. संशयाने बाधित होऊन सुखी संसाराचा बट्ट्याबोळ करून घेत होतात तुम्ही. स्वतःचा अहम् सोडून जर आपापसात संवाद साधला असता तर ही वेळ आलीच नसती. असो! यापुढे लक्षात ठेवा, आपापसात संवाद ठेवा, कुठेही समस्या वाटली तर आपापसात चर्चा करून सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि हो कुठल्याही परिस्थितीत संशयाच्या भूताला मनात प्रवेश करू देऊ नका." किरणचा अति मोलाचा सल्ला ऐकून दोघे मुकाट्याने एकमेकांकडे पहात नजरेनेच एकमेकांची माफी मागत होते. मनातून किरणला धन्यवाद देत होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama