SAMPADA DESHPANDE

Drama Romance

4.0  

SAMPADA DESHPANDE

Drama Romance

परतून पुन्हा तिथे...

परतून पुन्हा तिथे...

3 mins
218


मनोहर नाईक म्हणजेच अण्णा आज त्यांच्या मित्रांच्या भाषेत जगातला सर्वात सुखी माणूस. अविवाहित, चांगल्या पगाराची सरकारी नोकरी, आज ते साठ वर्षाचे होते. रिटायर आयुष्य जगत होते. सुरुवातीपासूनच त्यांना समाजसेवेची आवड होती. मग रिटायर झाल्यावर ते अशा काही समाजसेवी संस्थांमध्ये काम करत होते. संसाराचे पाश नव्हते. त्यामुळे पूर्णवेळ ते आपल्या आवडत्या कामासाठी देऊ शकत होते. अण्णा स्वतःला फार भाग्यवान समजत. असेच एकदा  ते काम करत असलेल्या एका संस्थेतून त्यांना एका कार्यक्रमाचं निमंत्रण आलं. कर्तबगार समाजसेवी महिलांचा सत्कार होणार होता. महिला दिनाच्या निमित्ताने. जायला त्यांना जरा उशीरच झाला होता. कार्यक्रम आधीच सुरु झाला होता. सत्काराचा कार्यक्रम चालू झाला. आण्णा फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून बघत होते. इतक्यात निवेदिकेने नाव घेतलं," आता महत्वाचा पुरस्कार ज्यांनी आपल्या आयुष्यातली ३५ वर्ष समाजसेवेला दिलेली आहेत. गरजू अनाथ मुलांसाठी ज्यांनी आपलं आयुष्य वाहून घेतलं अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या 'अम्मी' झरीना मुकादम यांना lifetime achievement अवॉर्ड देत आहोत." टाळ्यांच्या गजरात त्या व्यासपीठावर आल्या. त्यांना पाहताच अण्णा चमकले. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

 

मनोहर आणि त्याचे कुटुंब अलिबागमध्ये राहायला आले. मनोहर त्यावेळी १० वर्षाचा होता. शेजारीच झरिनाचं कुटुंब राहत होतं. दोन्ही कुटुंबाची चांगली मैत्री होती. झरीना आणि मनोहर एका वयाचे असल्याने त्यांची छान मैत्री झाली. दोघेही एकाच शाळेत जायचे. हळूहळू नकळतपणे दोघांच्यात मैत्रीपेक्षा जास्त जवळीक निर्माण होऊ लागली होती. हळू हळू त्या जवळीकीचं प्रेमात रूपांतर झालं. त्या दोघांनी एकत्र जगण्यामरण्याच्या शपथा घेतल्या.  मग ही गोष्ट घरी समजली आणि खूप मोठा गहजब माजला. झरिनाचे आई-वडील खूप चिडले. त्यांनी तिला खूप मारझोड केली. मनोहरच्या घरीही वेगळी परिस्थती नव्हती. त्यांनीही खूप विरोध केला. पण झरीना आणि मनोहर त्यांच्या निश्चयावर ठाम होते. सर्वांच्या विरोधातही ते भेटत राहिले. मग मात्र मनोहरच्या वडिलांनी त्यांची बदली करून घेतली. आईने मनोहरला जर त्या मुलीला भेटलास तर जीव देईन अशी धमकी दिली. इकडे झरिनाचे जबरदस्ती लग्न ठरवले. ही गोष्ट मनोहरला समजली. त्याला हे सांगण्यात आले की, झरीना तिच्या मर्जीने हे लग्न करते आहे.  मग तो त्याच्या कुटुंबासोबत मुंबईला निघून आला.


झरीनाची जागा त्याच्या आयुष्यात कोणीही घेऊ शकले नाही. घरच्यांनी खूप समजावूनही तो अविवाहित राहिला. कधी कधी त्याला झरीनाची आठवण येत असे. ती कुठे असेल? ती कशी असेल? तिच्या पती आणि मुलांसोबत ती सुखात असेल... तिला आपली आठवणही नसेल. असे वाटून उगाच तो दुःखी होत असे. अण्णा या सगळ्या आठवणीत हरवले होते. इतक्यात समोरून, "ए! मन्या..." अशी हाक आली. समोर झरीना उभी होती. अजूनही तितकीच सुंदर आणि टवटवीत दिसत होती. अण्णांना तिच्या नवऱ्याचा हेवा वाटला. "चल कॉफी घेऊया." ती पूर्वीच्याच बिनधास्तपणे म्हणाली. ते कॉफी घेत बसले.


तिनेच बोलायला सुरवात केली, "काय करतोस रे मन्या? आता रिटायर झाला असशील ना? बायको? मुले?" ती पूर्वीसारखीच बडबडी होती.


"बायको? मुले? लग्नच केलं नाही तर कुठची बायको आणि कुठची मुले? तुझं सांग तुझा नवरा? मुले?" अण्णा म्हणाले.


"नवरा? मुले? लग्नच केलं नाही तर कुठचा नवरा आणि कुठची मुले?" ती त्यांच्याच टोनमध्ये बोलली. क्षणभर दोघे एकमेकांकडे बघत राहिले आणि दोघांच्या चेहऱ्यावर स्मित आले.


मग ती म्हणाली, "तुला सांगू मन्या? कोणावर प्रेमच करावंसं वाटलं नाही. जसं आपलं प्रेम असफल झालं आपण एकत्र येऊ शकलो नाही तशी प्रेम करायची इच्छाच गेली."


अण्णांनी तिच्या हात पकडला, "झारा! कोण म्हणतं आपलं प्रेम असफल झालं? उलट आपल्याइतकं सफल प्रेम कोणाचेच नसेल. आज ४५ वर्षांनीही आपण एकमेकांसाठी एकटे राहिलो. एकमेकांची वाट पाहत राहिलो. यासारखं सफल प्रेम ते काय असेल? आणि तुला वाटत असेल की आपलं लग्न झालं नाही आपल्या तर आज आपल्याला कोण अडवतंय? चल फिरून परत तिथेच जाऊया. आपल्या आयुष्यातली उरलेली वर्ष एकत्र घालवूया."


झारा तिच्या मन्यानी तिला लाडाने ठेवलेलं नाव... ते ऐकून ती सुखावली. आई-वडिलांनी ठरवलेल्या मुलाशी तिने लग्न केलं नाही. रागाने ती मुंबईत निघून आली. एका समाजसेवी संस्थेत काम करू लागली. काही वर्षात ती त्या संस्थेची सर्वेसर्वा झाली. सर्वांची लाडकी 'अम्मी' झाली. हा प्रवास सहजसोपा नव्हता. अनेक संकटांतून ती तावून सुलाखून निघाली होती. आज मन्याची लग्नाची मागणी ऐकून ती चकित झाली होती.


"अगं झारा असं काय करतेस? मी वचन देतो की तुला खूप सुखात ठेवीन आता नकार देऊ नकोस हं! नाहीतर मला वाईट वाटेल." तिला २० वर्षाचा बालिश मन्या आठवला. त्याच्याकडे बघून ती गोड हसली. तिचा होकार त्याला समजला होता. आयुष्य परत फिरून तिथे आले होते…


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama