Shila Ambhure

Romance

3.3  

Shila Ambhure

Romance

प्रेमाचे कुलूप (भाग 2)

प्रेमाचे कुलूप (भाग 2)

11 mins
1.5K





शेजारच्या कामतकाकुंकडे त्यांच्या दूरच्या नात्यातील एक देखणा, रुबाबदार तरुण नोकरीच्या निमित्ताने राहायला आला. दिलीप त्याचं नाव. पाहताक्षणीच राही त्याच्या प्रेमात पडली.आपलं हे मनातलं गोड गुपित कुणालाही कळू नये आणि दिलीपही आपल्या प्रेमात पडावा यासाठी तिने गावाबाहेरच्या तळ्याजवळील जोडझाडाला असलेल्या तारेच्या कुंपणाला एक हृदयाच्या आकाराचे कुलूप अडकवले. कुलूप ओढून पक्के लागल्याची खात्री केली आणि किल्ली तळ्याच्या पाण्यात दूर फेकून दिली. डोळे बंद करून काही तरी पुटपुटले आणि हसतच घराकडे परतली. हे जोडझाड म्हणजे दोन वेगवेगळी खोडे एकमेकांना आलिंगन देणारे प्रेमीयुगुल आहेत अशी तरुणवर्गात मान्यता होती. जे कोणी इथे येऊन कुंपणाला कुलूप लावून किल्ली फेकतील त्यांचे प्रेम नक्की यशस्वी होतेच अशी आख्यायिका होती. आज हेच काम पूर्ण करून राही समाधानी मनाने वाट चालत होती. सोबतीला होती दिलीपच्या प्रेमाची स्वप्ने.

          राही घरी परतली तेव्हा शेजारच्या काकुंच्या अंगणात दिलीप उभाच होता. राहीने त्याच्याकडे त्याला नकळत पाहिले. बोलके डोळे ,धारदार नाक,आखिव बांधा ,गोरा रंग तिनं चटकन डोळ्यांत सामावून घेतला आणि घाईने घरात निघून गेली. आज ती खुप आनंदात होती . त्याच भरात तिने घरातली सारी कामेआटोपली.इटक्यात दारावर टकटक झाली. बाहेर येऊन पाहते तर काय!!!!!

काकू दिलिपसह आल्या होत्या आणि आईशी गप्पा मारत होत्या. आईने बसूनच राहीला चहा आणायला सांगितले. तिने गॅसवर चहा ठेवला आणि पडद्याच्या मागून दिलिपला न्याहाळू लागली. चहा उकळल्याचा वास आला नि राही परत स्वयंपाक घरात वळाली.

चहाचे कप भरून ती बाहेर आली . काकूने तिला जवळ बसवले आणि आपल्या भाच्याची - दिलीपची ओळख करून दिली.

"राही, हा दिलीप. माझ्या दूरच्या बहिणीचा मुलगा.आता इथेच राहणार आहे . आपल्या गावातील बँकेत त्याला साहेबाची नोकरी लागली आहे . "

तेवढ्यात दिलीप'नमस्कार' म्हणालादेखील.

राहीने वर न बघताच मान हलवली.

"अगं, नुसतीच काय मान हलवते. तो नवीन आहे या गावात . त्याला सगळ्यांची, गावाची ओळख करून देण्याची जवाबदारी तुझी" असे म्हणून काकू जायला निघाल्या. पाठोपाठ दिलीपही निघाला . पायात चप्पल घालताना त्याची अन् राहीची नजराजर झाली. राही लाजेने चूर झाली. रात्री दिलीपच्याच विचारात केव्हा झोप लागली ते राहीला समजलेही नाही.

         दुसऱ्या दिवशी सकाळी देवपूजेसाठी फुले आणायला राही कामतांच्या अंगणात गेली . तिथे दिलीप पेपर वाचत बसलेला होता. ती दिसताच दिलीप तिला hello म्हणाला. त्याचा तो गोड आवाज ऐकून राही पुरती भान हरवली अन् तिची फुलांची परडी हातातून निसटली. दिलीपने परडी उचलली आणि फुले तोडायला तिला मदतही केली. घरी आली तरी त्याच्या परफ्यूमचा वास तिच्या मनात दरवळत राहीला. 

          त्याच्याच विचारात तिने आवराआवर केली अन् आईला सांगून कॉलेजात जायला निघाली. 


"राही, अगं थांब जराशी."

काकूचा आवाज आला तशी राही थांबली. मागे वळून पाहिले तर दिलीप आणि त्या दोघेजण उभे होते. काकू बोलू लागल्या.

" अगं , कॉलेजात जायला निघालीस तर दिलीपला सोबत येऊ दे. तो नवीन आहे तर जाताजाता त्याला गाव दाखव , रस्त्यांची ओळख करून दे . त्याची बँक तुझ्या कॉलेजजवळच आहे तेव्हा तीही दाखवून दे."

" अगं बाई , उशीर होतोय मला ", असे म्हणून कामतकाकू घरात गेल्या.

         ' आंधळा मागतो एक अन्....' अशी अवस्था राहीची झाली पण तिला काय बोलावे ते सूचेना . ती त्याच्याकडे चोरून चोरून बघत होती पण बोलायची हिम्मत होत नव्हती. तो मात्र अगदी बिनधास्त चालत होता. शेवटी न राहवून त्यानेच बोलायला सुरुवात केली. प्राथमिक विचारपुस होईपर्यंत राहीचे कॉलेज आले . तिने बोटानेच हाकेच्या अंतरावर असलेली बैंक दाखवली. पाच वाजता कॉलेज सूटेल एवढे तिने स्वतःहुन सांगितले आणि गेली. 

            दिलीपने तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे जरावेळ पाहिले अन् तोही बँकेत पोहचला . त्याचा आजचा पहिला दिवस असल्याने त्याने फक्त माहिती करून घेतली आणि निवांत बसला . त्याच्या डोळ्यासमोर राहीची मूर्ती उभी राहिली . शहरातल्या मेकअप फासलेल्या मुलींपेक्षा साधी राही दिलिपला फार आवडली. तिचा तो लाजरा , स्वभाव ,तिरप्या नजरेने पाहणे , केसांत लावलेला गुलाब , लांबसडक ,काळीभोर , पाठीवर खेळणारी वेणी सारखे त्याला आठवत होते. 

        पाच कधी वाजताय याची तो वाट पाहू लागला आणि एकदाचे घडयाळाने पाचाचे ठोके दिले . तसा बॅग खांद्याला अडकवून , सर्वांचा निरोप घेऊन दिलीप बँकेतून बाहेर पडला . दुरुनच तो रस्त्यावर राही कुठे दिसते का ते शोधू लागला . तर राही मैत्रिणीसवे चालताना दिसली. त्याने वेग वाढवला आणि तिच्यापर्यंत पोहचला . 'राही'असा आवाज दिलीपने दिला तशी राही थांबली.मनातून ती खुश झाली होती पण मैत्रीण सोबत असल्यामुळे तिने तसे दाखवले नाही. नवीन मुलाला पाहून मैत्रीण शीलाने काय समजायचे ते समजून घेतले आणि तिने काढता पाय घेतला .

          सकाळपेक्षा राही जरा मोकळी झाली होती . स्वतःहून बोलत होती,प्रश्न विचारत होती. दिलीप तर मनमिळाऊ होताच पण राहीचे असे खुलून बोलने त्याला जास्तच भावले. गप्पामध्ये घर कधी आले हे दोघांनाही समजले नाही. 

          दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आटपून दिलीप राहीची वाट बघत रस्त्यात उभा होता. ती आली तशी दोघेजण चालू लागली. राहीला मनोमन आनंद झाला होता पण मैत्रिणी चिडवतील याची भीती वाटत होती. वर्गात बसल्यावरही तिचे लक्ष लागेना . दिलीपची छबी सारखी नजरेसमोर येत होती . कॉलेज कधी संपतेय याची वाट ती बघत होती. पाच वाजून गेले होते. पण दिलीप अजून आला नव्हता . राही एका बाजूला थांबून सारखे सारखे रस्त्याकडे बघत होती. शीलाही निघून गेली होती. साडे पाच वाजत आले तसा दिलीप घाईने येताना राहीला दिसला. तो काय विचार करेल म्हणून राही संथ गतीने चालू लागली. तिला पाहून दिलीप जरा धावतच तिच्यापर्यंत येऊन पोहचला आणि सोबतीने चालू लागला.


"उदया रविवार आहे . बँकेला सुट्टी आहे . तुलाही कॉलेजला सुट्टी असेल ना? की काही एक्सट्रा लेक्चर आहे ? दिलीपने विचारले.


"नाही" राही एवढेच बोलली.


"ठीक आहे. तर मग उदया तू मला गावातील फिरण्यासारखी ठिकाण दाखवायचीस." दिलीपने प्रस्ताव मांडला .


यालाही राहीने मानेनेच होकार दिला.


"Ok .done. उदया सकाळी 10:00 वाजता मी तुला बोलवायला घरी येतो. तू तयार रहा." एवढे बोलून तोंडाने शीळ घालित आणि मग गाणे गुणगुणत दिलीप चालू लागला .


त्याचा हा बिंदास स्वभाव राहीला फारच आवडला.


      ठरल्याप्रमाणे रविवारी सकाळी बरोबर 10 वाजता दिलीप राहीच्या घरी हजर. " काकू , आज मी गाव फिरायला जाणार आहे . राहीला सोबत नेऊ का?" असे म्हणून त्याने काकूना नमस्कार करतच विचारले. राहीच्या आईनेही लगेच होकार दिला . आतून राही त्यांचे बोलणे ऐकत होती. तिला तर आनंदाच्या उकळ्या फूटत होत्या.


" राही, चल लवकर .उशीर होतोय."दिलीपने मोठ्याने आवाज दिला.


"आई , मी जरा जाऊन येते गं ," म्हणून राहीने पर्स अडकवली आणि दिलिपसह चालू लागली . 


सर्वात आधी तिने दिलिपला गावातले गणपती मंदिर दाखवले. मग मंदिराच्या बाजूला असलेली बाग दाखवली. बागेत बसून बराच वेळ गप्पा मारल्यावर राही दिलिपला तळ्याकडे घेऊन गेली. हिरवीगार झाडी, पक्ष्यांचा मंजुळ कलरव,पाण्यावर उठणारे तरंग पाहून दिलिपला ही जागा मनापासून आवडली. सभोवार नजर फिरविताना त्याचे जोडझाडाकडे आणि कुलुपांकडे गेले. त्याने विचारायच्या आधीच राही आख्यायिका सांगून मोकळी झाली होती. जेव्हा ती सांगत होती तेव्हा ती हरवल्यागत , कुलुपाकडे ( तिने लावलेल्या) बघत होती अन् दिलीप तिला ,तिच्या वाऱ्यावर उडणाऱ्या काळ्याभोर बटांकडे भान हरवून बघत होता.

          पाहता पाहता एक महीना कसा लोटला ते समजले नाही. आज दिलीपचा पहिला पगार झाला होता. दुपारी 2 वाजताच तो ऑफिसातून बाहेर पडला .तालुक्याला जाऊन मावशी-काका,काका-काकू,राही या सर्वांसाठी त्याने भेटवस्तू खरेदी केल्या. त्याला परतायला बराच उशीर झाला होता.इकडे राही कॉलेजबाहेर त्याची वाट बघत उभी होती. पण तो आलाच नाही. ती खट्टू होऊन चालायला लागली. काय झाले असेल, कुठे गेला असेल दिलीप ,मला का नाही सांगितले कुठे जाणार ते असे अनेक प्रश्न डोक्यात गोंधळ घालित होते. घरी आल्यावरही तिचे कशात लक्ष लागेना. आईने जेवायला बोलावले तर मला भूक नाही असे सांगून राही खोलीत निघून गेली.

         जरा वेळाने हॉलमधून गप्पांचा आणि हसण्याचा आवाज आला तशी राही उठून बाहेर आली. बघते तर काय समोर काका, काकू ,दिलीप आलेले होते. टेबलावर काही भेटवस्तू होत्या. 


"अगं ,बरं नाही का तुला?आई सांगत होती की तू जेवली नाहीस म्हणून." काकू बोलत होत्या.


"तसे काही नाही .काकू,आज जरा जास्त अभ्यास केला न म्हणून जरा थकवा आला."


"बरं, हे घे. हा पेढा खा . दिलीपचा आज पहिला पगार झालाय . " काकूने राहीला पेढा भरवला. " दिलीप ,तू कोणासाठी काय - काय आणलेस ते देऊन टाक पाहू." असे बोलून काकूने आइसक्रीम खायला सुरुवात केली. 


      दिलीपने दोन्ही काकांसाठी शर्ट -पॅंट पीस आणि मावशी-काकूसाठी साड्या आणल्या होत्या. आता एकटी राही बाकी होती . तिलाही उत्कंठा लागली की दिलीपने तिच्यासाठी काय आणले असेल. दिलीप उठून तिच्याजवळ गेला आणि एक बॉक्स उघडून दाखवला . आत एक फिकट आकाशी रंगाचा सलवार कमीज होता. राहीच्या डोळ्यांत पाहून 'आवडला का' असे हळू आवाजात विचारुन दिलीप परत जागेवर जाऊन बसला. सगळे जण आइस्क्रीम खाऊन झाल्यावर झोपायल निघून गेले. राही नवीन ड्रेसवर हात फिरवत , स्वप्न रंगवत , स्वतःशीच हसत झोपी गेली .  


           काल दिलीप तिला न सांगताच तालुक्याला गेला होता . म्हणून राही चिडली होती. 'दखवतेच्' असे म्हणून राही आज एक तास अगोदरच कॉलेजात निघून गेली. सवयीप्रमाणे अंगणात उभे राहून तो राहीची वाट पाहू लागला पण राही आलीच नाही. उशीर होवू लागला म्हणून तो तिच्या घरी आला तर राही आज लवकर गेल्याचे काकूने सांगितले. दिलिपला खात्री होती की राही कालचा वचपा काढतेय. वेळ झालेला पाहून दिलीप जरा वेगानेच चालू लागला. आज राहीला न बघता न बोलता त्याला बँकेत यावे लागले. त्याला उगाचच काहीतरी हरवल्यासारखे वाटू लागले आणि कालच्या वागण्याचा पश्चाताप होऊ लागला . जाताना राहीला भेटून माफी मागू असे ठरवून दिलीप कामाला लागला. पण त्याचे कामात मुळीच लक्ष लागेना. अर्ध्या दिवसाची रजा टाकून दिलीप राहीच्या कॉलेजात आला. विचारपुस करून तो राहीच्या वर्गापर्यन्त  येऊन पोहचला. मॅडमला विचारुन त्याने राहीला वर्गाबाहेर बोलावले. तो आल्याचे बघून राहीला खुप आनंद झाला पण चेहऱ्यावर तो अजिबात दिसू न देता ती बागेत बाकावर बसली. कुठलाही विचार न करता दिलीपने तिचा हात हातात घेतला आणि sorry म्हणाला. 

" राही, अगं, तुला दुखवायचा माझा हेतू नव्हता गं. फक्त तुला surprise द्यायचे म्हणून मी न सांगता तालुक्याला गेलो. तू एवढी नाराज होशील, असे मला वाटले नव्हते गं," एवढे बोलून तो थांबला आणि तिच्या उत्तराची वाट पाहू लागला.

      त्याचा तो पहिला स्पर्श राहीला धुंद करून गेला. ती भान हरपली. आपण राहीला आवडतोय हे दिलीपच्या लक्षात आले आणि तोही मनोमन आनंदला. दिलीपने हात सोडला तेव्हा राही भानावर आली नि काहीच न बोलता लाजत वर्गाकडे पळाली.

      दिवस मजेत जात होते. हा देखील महीना सरला . दिलीपचा पगार झाला . आजही त्याने काही ठरवले होते पण मागिल खेपेची आठवण ठेऊन तो दुपारच्या वेळी कॉलेजात आला नि 'तालुक्याला जातोय , यायलस उशीर होईल'असे सांगून निघून गेला. 

दिलीपचे आजचे वागणे पाहून राही सुखावली. 

        रात्री त्याच्या येण्याची वाट बघत राही अंगणात बसली होती.इतक्यात तिच्याजवळ एक दुचाकी येऊन थांबली. दुचाकीस्वाराने हेलमेट घातले होते त्यामुळे राही काही ओळखू शकली नाही. ती अपरिचित नजरेने त्या इसमाकडे पाहू लागली. तो इसम तसाच सरळ घरात जायला निघाला . राही त्याचामागे ' अहो ,अहो असे बोलत जात होती.पण तो इसम कामत काकुंच्या घराकडे जात होता .त्याने पाहिले की कामतांच्या घराला कुलूप . काय झाले असेल हे विचारण्यासाठी त्याने डोक्यावरचे हेलमेट काढले. तेव्हा राहीचा जीव भांड्यात पडला. तिने सांगितले की काकूची मावशी वारली म्हणून काकाकाकू दोघेजण पुण्याला गेलेत आणि तीन चार दिवस तरी येणार नाहीत. दिलिपला वाईट वाटले . तो तसाच राहीच्या घराकडे वळला. राहीच्या आई बाबांना नमस्कार करून गाडीचे पेढे दिले. काकूने राहीला नव्या गाडीची पूजा करायला सांगितले. नंतर दिलीपसाठी जेवणाचे ताट वाढायला सांगून काकू झोपायला निघून गेल्या .

        दिलिपला ताट वाढून राही तिथेच बसली . दुःखाची बातमी ऐकून दिलीपची भुकमोड झाली होती . न जेवताच तो उठला आणि अंगणात आला. राहीने त्याला आग्रह केला नाही. राहीने गरमागरम कॉफी बनवली आणि दोघेजण अंगणात बसून कॉफी पिऊ लागले . अगदी निःशब्द .जरा वेळाने दिलीप जायला निघाला तशी राहीने घराची चाबी दिली. नवी गाडी तिथेच ठेऊन दिलीप झोपायला गेला. राही देखील जरा नाराज होती. दिलीपच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती बघत होती. तो घरात गेला , दारही लावून घेतले तरी राही तिथेच उभी राहून लाइट कधी बंद करतोय याची वाट बघत होती.

      बराच वेळ झाला तरी लाइट सुरूच होते. किती वेळ अंगणात , अंधारात उभी राहणार असे स्वतःशीच बोलून राही तिच्या खोलीत गेली. तिलाही रात्रभर काही झोप लागली नाही .

        दुसऱ्या दिवशी सकाळी काकुंचे अंगण झाडावे म्हणून ती तिकडे गेली तर आतून भांड्यांचा आवाज येत होता .तिने घरात जाऊन बघितले तर दिलीप स्वयंपाकाची तयारी करताना दिसला. रात्री पुरेशी झोप न मिळाल्यामुळे डोळे जड दिसत होते. तिची चाहूल लागताच दिलीपने तिला नाश्ता खायला बसवलेच. ती नको नको म्हणत असतानाही त्याने तिला बळेच पोहे भरवले. आज परत एकदा तो परिसस्पर्श राहीला झाला अन् ती मोहरुन गेली.

        रोजच्या वेळेप्रमाणे दोघे निघाले .दोघांनाही एकदुसऱ्याची मने समजली होती , एकमेकांची काळजी घेत होती पण कुणीही स्पष्ट बोलत नव्हते.

         तीन चार दिवसासाठी गेलेले काकाकाकू आठ दिवसांनी परतले. तोपर्यन्त दिलीप राहीच्या घरीच राहीला होता. या आठ दिवसांच्या काळात राहीने दिलीपची आवड निवड जाणून घेतली आणि जपलीही. तिला समजून चुकले की दिलीप तिला आवडायला लागला अन् तिचे त्याच्यावर प्रेम जडले होते.

         काका काकूच्या पुण्याला जाण्यामुळे नवीन गाडी तशीच उभी होती .ते परत आल्यावर दिलीपने तिला पुसून काढले आणि सर्वाना एकदा एकदा मंदिरात दर्शनाला नेऊन आणले अगदी राहीला सुद्धा. आता रोज राहीसोबत गाडीवर जाता येईल या विचाराने दिलीप मनातून खुश झाला होता. दुसऱ्या दिवशी नव्या गाडीवर बसून तो राही यायची वाट बघू लागला . बराच वेळ झाला तरी ती आली नाही म्हणून तिला बोलावन्यासाठी तो घरी गेला . राहीने त्याला सांगितले की तिचे कॉलेज आजपासून नाही आणि परवा दिवशी तिची परीक्षा आहे . हे ऐकून दिलीप नाराज झाला . राहीसोबत फिरता येणार नाही म्हणून जरा उदास झाला. जायला निघणार तोच एक मस्त आयडिया त्याला सुचली. त्याने राहीच्या परिक्षेविषयी सारी माहिती मिळवली.

       परीक्षेचा दिवस उजाडला .दिलीपने आधीच काकाकाकूची परवानगी मिळवली होती. राहीला परिक्षेसाठी तालुक्याला जावे लागणार होते. त्यासाठी दिलीप दुचाकी घेऊन अगदी सज्ज होता. सर्वांचे आशीर्वाद घेऊन राही दिलीपच्या गाडीवर बसली आणि दोघेजण निघाले. गाडी गावाबाहेर आली तसे दोघांचे संभाषण सुरु झाले. बोलता बोलता दिलीपने सांगितले की परीक्षा होईपर्यंत तो राहीला रोज सोबत आणनार आणि यासाठी त्याने बँकेतून सुट्टी घेतली आहे.हे ऐकून राही लाजली अन् एका अनोख्या जगात हरवली.

इतक्यात खड्डा आला तशी ती पुढे दिलीपच्या 

अंगावर पडल्यासारखी झाली. दिलीप तिला sorry म्हणाला. तिने कसेबसे स्वतःला सावरले. गाडी आदळणार याची काळजी दिलीप घेऊ लागला. 

       आज राहीचा शेवटचा पेपर होता . तोही संपला. परत येताना एके ठिकाणी दिलीपने गाडी थांबवली. त्याने राहीसाठी बांगड्या विकत घेतल्या आणि स्वतः साठी कुलूप घेतले.गाडी सुरु झाली पण आज राही जरा उदास वाटत होती. दिलीपने कारण विचारुनही तिने काही सांगितले नाही .तिला माहीत होते की उद्यापासून दिलीपचा सहवास तिला मिळणार नाही. 

        काही दिवस असेच निघून गेले . दिलीप काही तरी निमित्त शोधून राहीकडे यायचा, गप्पा मारायचा. पण त्याने कधी थांग लागू दिला नाही की तो राहीच्या प्रेमात पडलाय. अशातच रविवार आला . कारण शोधून त्याने राहीला गाठले. नेहमीप्रमाणे काकूची परवानगी घेऊन तो राहीला तळ्याकडे घेऊन फिरायला घेऊन गेला. राहीने आज तोच आकाशी रंगाचा ड्रेस घातला होता आणि हातात दिलीपने घेतलेल्या बांगड्या.जणू आज ती दिलीपविषयी तिचे प्रेम जाहिर करणार होती.

       तळ्याच्या काठी झाडाखाली बसून दोघांनी बराच वेळ गप्पा मारल्या . परीक्षा संपल्यावर आज पहिल्यांदाच दोघेजन एवढा जास्त वेळ मनसोक्त बोलत होते. थोड्या वेळाने दिलीपने मुद्दाम जोड़झाडाचा अन् कुलपाचा विषय काढला.मोठे धाडस करून राहीला ' तुझे कुणावर प्रेम आहे का ?'विचारले. तेव्हा राहीने लाजून , खाली गवताकडे बघूनच मानेनेच होकार दिला. 


" मग तू देखील कुलूप अडकवले असशील तारेला ?" दिलीपने विचारले .


 याही प्रश्नाला राहीने होकार दिला.


"कोणते आहे तुझे कुलूप?" दिलीपचा प्रश्न


राही दिलिपला तिचे प्रेमाचे कुलूप दाखवणार की ती दचकली, क्षणभर थबकली अन् हर्षभराने दिलीपच्या मिठीत शिरली. कारण तिच्या कुलुपालाच आज एका दुसऱ्या कुलुपाने तारेत कायमचेच अडकवून ठेवले होते.ते कुलूप होते तालुक्याच्या परीक्षेच्या शेवटच्या दिवशी दिलीपने विकत घेतलेले. ती दोन्ही कुलुपे आज एकमेकांत तारेसकट घट्ट अडकली होती .

       राहीचे धडधडणारे काळीज त्याला स्पष्ट जाणवत होते. दिलीपीने तिला तशीच घडीभर मिठीत ठेवले.हृदयाची धडधड जरा शांत झाल्यावर पुन्हा तिला त्याने विचारले की हे कुलूप तिने कोणासाठी लावले आहे? राहीने त्याच्या डोळ्यांत पाहिले अन् उत्तर म्हणून अधिकच मिठीत शिरली. तिचे हे शब्दाविना उत्तर द्यायची भाषा दिलिपला समजली आणि त्याने मिठी घट्ट केली.

        बाजूच्या जोडझाडावर दोन पक्षी कधी पिलांना तर कधी एकमेकांना प्रेमाने घास भरवत होती.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

      एक प्रेमकथा माझी

     शीला अम्भुरे बिनगे

          (साद)

      परतुर, जालना



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance