Manda Khandare

Drama Romance

2.0  

Manda Khandare

Drama Romance

फिरुनी नवी जन्मेन मी

फिरुनी नवी जन्मेन मी

8 mins
811


आपणा सर्वांच्या आयुष्यात एक स्वप्न उराशी बाळगून नव्या पहाटेची सुरूवात होते आणि रात्र संपता संपता त्याच स्वप्नांची पूर्तता किंवा त्या दिशेने वाटचाल तरी होते... आणि पुन्हा नव्याने मन हलके करून त्यात नवीन स्वप्न बघण्याची उमेद निर्माण होते.


'अपेक्षा जगण्याची 

आस उद्याची

श्वासात उमेद

नव्याने जन्मण्याची’


नीताच्या जीवनातही रोजच अशी पहाट होत होती आणि अशीच रात्रही होत होती. तरीही ती नवी उमेद कशी मिळविते कोण जाणे. सहा वर्षांची मुलगी, नख-शिखांत दारूत बुडालेला व चांगली बापजाद्यांची सावकारी व पैसा दारू जुगारात बर्बाद केलेला व्यसनाधीन नवरा अजित, यांचे पालन-पोषण तिच्याच भरोशावर होते.


नीता स्वभावाने खूप शांत आणि सोशीक स्त्री होती. उलटून बोलणे किंवा प्रतिकार करणे हे जणू तिला ठावूकच नव्हते. ती स्मिताताईकडे स्वयंपाक आणि त्यांच्या दीड वर्षांच्या मुलीला सांभाळण्याचे काम करायची. स्मिताताई कॉलेजला प्राध्यापिका होत्या. नीता सकाळी दहा वाजता यायची आणि दुपारी स्मिताताई घरी आल्या की मग घरी यायची.


एक दिवस घाबरीघुबरी नीता कडक उन्हात अनवाणी स्मिताताईकडे आली... तिच्या नवऱ्याला, अजितला, म्हणे रक्ताची उलटी झाली होती. तब्येत जास्त खराब आहे, डॉक्टरकडे न्यायचे आहे म्हणून काही पैसे मागायला आली होती. स्मिताताई ने तिला दोन हजार रुपये दिले. ती ताबडतोब नवऱ्याला घेऊन हॉस्पिटलला गेली. डॉक्टरने त्याला अॅडमिट व्हायला सांगितले. नीताने त्याला ते दोन हजार रुपये देत म्हटले की, "तुम्ही काळजी नका करू, मी लागले तर ताईंकडून घेऊन येईल. तुम्ही बरे व्हा आधी डॉक्टर म्हणतात ते ऐका जरा...”


ते पैसे बघून दारूड्या अजितची नियत फिरली. तिच्या हातून ते पैसे हिसकावून घेत तो म्हणाला, "मी ठीक आहे, मला काहीही झालेले नाही. डॉक्टर उगाच काहीतरी बोलत असतात., तू घरी जा...” असे म्हणत तिच्या हाताला धरून ओढतच तिला बाहेर आणले आणि धक्का देऊन म्हणाला, “तू चुपचाप घरी जा, मी येतो नंतर, मला काही काम आहे...” असे म्हणत तो भरा भरा निघून गेला. तिला माहित होते आता तो पुन्हा पैसे घेऊन दारू पिण्याकरिता गेला आहे. 

दुसऱ्या दिवशी सकाळी ती स्मिताताईकडे कामाला गेली तर तिला बघून त्यांचाच जीव गळ्याशी आला. तिला धरून त्यांनी सोफ्यावर बसवले.


"काय गं हे, किती लागले आहे तुला, कुठे अॅक्सिडेंट वगैरे झाला का तुझा? काय झाले बोल ना...” नीता एकदम रडायला लागली आणि कालचा प्रसंग सांगितला. रात्री घरी येऊन अजितने खूप मारले होते तिला.


स्मिताताई म्हणाल्या "सोड ना त्याला एकदाची, किती सहन करशील, किती मार खाशील आणखी त्याचा. दोन शब्द कधी तो तुझ्याबरोबर प्रेमाने बोलत नाही, का राहते तू त्याच्याबरोबर? नवरा म्हणून काही आधार आहे का तुला त्याचा. दे ना सोडून त्याला..." स्मिताताई खूप चिडल्या होत्या.


”ताई तुमचे बरोबरच आहे पण पोर आहेत पदरात, माहेरचा खूप भक्कम असा आधार नाही आणि एकदम असे सोडवत नाही. घरचा लांडगा बाहेरच्या कुत्र्यांपासून वाचवितो कमीत कमी... थोडी पोर मोठी झाली की नक्कीच होईल मोकळी या जाचातून...” पण नियतीला काही औरच काही दिवसातच नीताचा नवरा दारूच्या अति सेवनाने मरण पावला.


पंधरा दिवसांनी नीता पूर्ववत कामालाही आली. तिने स्वतःला लवकर सावरले व तिचा एकमेव आधार म्हणजे तिच्या आईला तिने भावाकडून बोलावून घेतले.

काही दिवसांनी स्मिताताईकडे त्यांच्या मिस्टरांचे वकील मित्र जेवायला येणार होते. नीताच्या मदतीने स्मिताताईंनी दुपारी जेवणाचे सर्व तयार करून घेतले.


"ताई मी येते घरून, सर्व झालेच आहे, तेव्हा तुमचे जेवण होईपर्यंत मी येतेच." असे म्हणून ती निघाली आणि तेवढ्यात दारावराची बेल वाजली, तिनेच दार उघडले, समोर पांढरा शर्ट आणि काळा वकिली कोट, फ्रेंच कट दाढी असलेला पस्तीशीतला तरुण उभा होता. "ताई येते मी" असे म्हणून ती त्या तरुणा जवळून जात, भराभरा निघून गेली. तो मात्र तिथेच उभा राहून तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिला. स्मिताने पुढे येऊन विचारले, “काय झाले भाऊजी...”


तेव्हा त्याने अळखळत विचारले "वहिनी, ही... आता... गेलेली... नीता आहे ना? नीता चौधरी...”


”हो.. .नीताच तर आहे...”


”ओहहह... नीता... वहिनी तिला आवाज द्या ना, ती परत हरवून जाईल... वहिनी...”


स्मिता ताई म्हणाल्या, “अहो, हो... हो... थांबा जरा... ती नीताच आहे पण तुमची नीता कशी ती? तुम्ही आधी आत या बसा, येईल नीता परत इथे."


सोफ्यावर बसत गौरवने सांगितले, “वहिनी, या... या... नीताला मी कुठे कुठे नाही शोधले... आणि आजपर्यंत शोधतच होतो. गेली सात-आठ वर्ष झालीत नुसता भटकतो आहे मी नीताच्या शोधात, मला केवळ एकदा कुणी सांगावे... की नीता ठीक आहे, सुखी आहे, दुःखाने पाठ सोडली आता तिची, ती आनंदात आहे, तर मीही तिचा विचार करणे थांबवले असते, तिला शोधणे थांबवले असते. पण तिचा काही पत्ताच लागत नव्हता आणि बघा ना आज तुमच्याकडे येऊन माझी शोध मोहीम संपली. माझी नीता मला दिसली.”


स्मिताने मधेच टोकत म्हटले, “पण तिच्या दुःखाने तिची पाठ सोडली नाही भाऊजी अजून...!”


त्याने आश्चर्याने स्मिताकडे बघत विचारले... "म्हणजे..? म्हणजे काय वहिनी? काय झाले?” गौरवच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. तो व्याकूळ झाला होता, नीताच्या आयुष्यात असे काय झाले ज्याने ती आजही दुःखी आहे. "सांगा ना वहिनी काय झाले?”


स्मिताने त्यांना पाणी दिले, “भाऊजी आधी तुम्ही सांगा तुम्ही नीताला कुठे भेटलात, कसे ओळखता तुम्ही तिला...”


गौरवने सांगण्यास सुरूवात केली... नीता आणि मी एकाच कॉलेजमधे होतो. ती बारावीला होती आणि मी दोन वर्ष तिला सीनियर होतो. कॉलेजमधे एक प्रोग्राम होता, त्यासाठी स्वागतगीत गाण्यासाठी नीताचे नाव पुढे आले होते पण नीता गायला तयार होत नव्हती आणि दुसरे कुणी तिच्यासारखे गोड गळ्याचे कॉलेजमधे नव्हते. मी चॅलेंज घेतले की मी गाण्यासाठी तिलाच तयार करून दाखवेन म्हणून. मग काय, मी रोज तिच्या विनवण्या करीत होतो. ती दिसेल तिथे तिला प्लीज म्हणत होतो पण ती काहीच बोलायची नाही. मी तिची वाट बघायला लागलो, ती दिसली नाही की मी तिला शोधत होतो. खूप कासावीस व्हायचे मला ती दिसली नाही की. हळू हळू मला ती खूप आवडायला लागली होती व मी तिच्यात गुंतत चाललो होतो. हे मला कळत होते पण ती मात्र काहीच बोलत नव्हती. तिचे डोळे मला कधी कधी खूप लाल आणि सुजलेले दिसायचे. मी खूप प्रयत्न करत होतो तिच्याबरोबर बोलण्याचा, तिला जाणून घेण्याचा पण मला निराशाच हाती लागायची. तिचा अबोला मला वेडावून सोडत होता. मी सतत तिचा विचार करायला लागलो होतो. 

एक दिवस माझ्या मित्राने सांगितले की नीताचा लहान भाऊ आमच्याच कॉलेजच्या मागच्या शाळेत शिकतो. म्हणून आम्ही त्याला भेटलो, तेव्हा कळले... तिचे वडील खूप व्यसनी आहेत. घरदार विकून झालेय, कर्जाचा डोंगर आहे, रोज दारू पिऊन धिंगाणे घालतात आणि बायको व दोन्ही भावा-बहिणीला रात्र “भर घराबाहेर काढतात. तिच्या आईला रोज मारतात तर कधीकधी तिलाही.

ती दोघेही रात्रभर दारात बसुन असतात. आळीपाळीने ती व तिची आई भावाला मांडीवर झोपवत असतात, रडत असतात. खूप कळवळलो मी तेव्हा, मनात खोलवर खुप टोचल्यागात झाले. तिचा चेहरा डोळ्यापुढे आला. ते मृण्मयी डोळे, आणि त्यातले ते अफाट, अथांग, खोल दुःख सागराला आणि त्या आकाशाला क्षमा मागायला भाग पाडतील असे ते तिच्या डोळ्यात दिसत होते. मी तिच्यावर प्रेम करत होतो, पण तिच्या दुःखाची, परिस्थितीची जाण होताच माझ्या मनात तिच्याविषयी खूप आदर वाढला व मी अजूनच जीवापाड तिच्यावर प्रेम करायला लागलो. 

दुसऱ्या दिवशी तिला कळले, आम्ही तिच्या भावाला भेटलो ते. ती माझ्या समोर आली आणि हात जोड़त म्हणाली, "प्लीज यानंतर माझ्या भावाला भेटण्याचे आणि आणखी काही जाणून घेण्याचे प्रयत्न करू नका. मी गाणे म्हणायला तयार आहे, पण ते केवळ या अटीवर की तुम्ही यानंतर माझ्याबरोबर कधीच बोलयाचा प्रयत्न करणार नाही. मला माझ्या दु:खात कुणीही सहभागी नको आहे...” असे म्हणून ती निघाली. मी तिच्या मागेच गेलो, आणि म्हटले, “ठीक आहे सर्व मान्य आहे, पण ज्या दिवशी मला तू अशी जास्त दु:खी आणि हे... हे... तुझे डोळे असे लाल आणि सुजलेले दिसतील त्या दिवशी मात्र....(खिशातून एक् चॉकलेट काढत तिच्या पुढे हात केला) हे चॉकलेट तुला घ्यावे लागेल, हे घेतले की समजेन तू सहभागी करून घेतले आहेस आपल्या दु:खात. वाटल्यास मी तुझ्यासमोर कधीच येणार नाही.” तिने सर्व एकले आणि निघून गेली ती तशीच काहीही न बोलता. तेव्हापासून मी केवळ तिच्यासाठी कॉलेजमधे जात होतो आणि माझे चॉकलेट तिच्यापर्यंत मी कसेही पोहचवत होतो. तिच्यासमोर न जाता... पण अचानक तिचे कॉलेजमधे येणे बंद झाले. चार-पाच दिवस खूप वाट बघितली. आणि नंतर तिच्या घरचा पत्ता काढला. 

नंतर समजले की कुठल्या एका सावकाराच्या दारुड्या घटस्फ़ोटीत व वयाने 12 वर्षे मोठ्या मुलाशी तिच्या दारुड्या बापाने जबरदस्ती तिचे लग्न लावून दिले व स्वतःची कर्जफेड करून घेतली...

माझ्या पायाखालची जमीन सरकली. काय करावे मला कळत नव्हते. बारावीची परीक्षा जवळ आली होती. मला वाटले ती परीक्षा द्यायला नक्की येईल, मी रोज तिच्या घरासमोरून चकरा मारत होतो. माझा नित्यनियम झाला होता, कॉलेजला जाताना आणि येताना तिच्या घराजवळ थांबत होतो मी. मला अपेक्षा होती ती येईल एक दिवस पण ती आलीच नाही. तिच्या घराशेजारील काकूंनी एक दिवस सांगितले की, तिचे बाबा आले होते रात्री आणि त्यांनी सांगितले की नीताचे लग्न झाले व ती आता या गावी राहात नाही. तिच्या मनाविरुद्ध झाले आहे हे कळत होते मला. मी एक पक्का विचार केला तिला शोधेनच म्हणून... तेव्हापासून तिला शोधतोच आहे मी... आणि आज् दिसली ती, माझी नीता...” गौरवच्या डोळ्यातील पाणी त्याच्या खऱ्या प्रेमाची साक्ष देत होते. दुरून कुठून तरी त्यावेळी गाण्याचे बोल ऐकू आले...


कितीदा नव्याने तुला आठवावे

डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे

कितीदा झुरावे तुझ्याच साठी

कितीदा म्हणू मी तुझे गीत ओठी


स्मिताने सांगितले... “होय भाऊजी ही तुमचीच नीता आहे. तिनेही असेच काहीसे सांगितले होते मला. गावी गेल्यावर तिचा भाऊ घरून पळून गेला होता. मेहनत मजुरी करून शिकला, छोटीशी नोकरी करतोय, आईला सांभाळतोय. पण त्याच्या बायकोला त्याने बहिणीचे काही करणे आवडत नाही म्हणून त्याच्याही मर्यादा आहेतच... वडील तर तिचे आयुष्य खराब करून लगेचच वारले.”


स्मिताताईने सर्व सांगितले नीता बद्दल... इतक्यात दाराची बेल वाजली. नीता आली असेल, स्मिताने म्हटले... गौरव एकदम उभा राहिला. ओठांवर हसू आणि डोळ्यात आनंदाश्रू होते, काय करावे नी काय नको असे त्याला झाले होते. कसे सामोरे जावे तिला काहीच कळत नव्हते त्याला..!! त्याच्या हातावर त्यानेच बाळासाठी आणलेले चॉकलेट ठेवत स्मिताताई म्हणाल्या, “घ्या भाऊजी द्या तिला, ती ओळखेन तुम्हाला... जा...”


गौरवने दार उघडले, नीताने एक नजर त्याच्याकडे बघितले आणि सरळ आत किचनमधे जायला निघाली. गौरवला आजही ती तशीच दिसली जशी कॉलेजमधे पहिल्यांदा तिला बघितले होते. त्याच्यासाठी मधला काळ कधी आलाच नाही असे त्या क्षणात त्याला वाटले..


त्याने लगेच मागे जाऊन तिला आवाज दिला... “ए नीता...”


आवाज कानी येताच नीता थांबली. कानी आलेला आवाज कुठे आणि कधी ऐकला आठवू लागली. ती मागे वळली. गौरवने हातातील चॉकलेट तिच्या पुढे करत म्हटले, “आजही मला तू तशीच दुःखी दिसते आहेस, आज तरी मला तुझ्या दु:खात सहभागी करून घे... शपथ सांगतो यानंतर मी तुला असे चॉकलेट देण्याची वेळच येऊ देणार नाही. तुझी आणि तुझ्या मुलीची जबाबदारी ही आता माझी आहे.”


नीताने पाणी भरलेल्या डोळ्यांनी स्मिताताईकडे बघितले. त्यांच्या डोळ्यात पाणी होते आणि नजरेत होकार... त्यांनाही आनंदाश्रू कूठे आवरले होते. गौरवच्या मिठीत ढसाढसा रडतांना पण खूप आनंदी नीताला बघताना..

 

एकाच या जन्मी जणू

फिरुनी नवी जन्मेन मी...


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama