Pratibha Tarabadkar

Fantasy Thriller

4.5  

Pratibha Tarabadkar

Fantasy Thriller

फॅंटम आणि जंगलातील रहस्य

फॅंटम आणि जंगलातील रहस्य

4 mins
286


 फॅंटमने आपल्या 'बगालिया' देशाचा दौरा करण्याचे ठरविले आणि तो तयारीला लागला.तसा फॅंटम नेहमीच आपल्या देशाचा दौरा करून आपले प्रजाजन... माणसं, प्राणी, पक्षी,वृक्ष वेली समाधानी, आनंदी आहेत ना याची खातरजमा करून घेत असे.त्याचे आपल्या प्रजेवर आत्यंतिक प्रेम असल्याने त्यांचे हित जपण्यासाठी तो दक्ष होता.


 आफ्रिकेतील इतर देशांमध्ये पाश्चिमात्य सुधारणांचे वारे वाहू लागले आणि त्यामुळे त्यांच्या देशांचा चेहरामोहराच बदलून गेला. आकाशाला भिडणाऱ्या डेरेदार वृक्षांची बेसुमार कत्तल करून त्या जागी गगनचुंबी इमारती, मोबाईल टॉवर्स उभे राहिले होते त्यामुळे त्या वृक्षांवर वसती करून राहिलेले पक्षी आणि त्यांच्या सान्निध्यात रहाणारे प्राणी यांनी भयभीत होऊन फॅंटमच्या बगालिया देशात आश्रय घेतला .मात्र इतर आफ्रिकी देशांमधील माणसांना त्याचा ना खेद ना खंत.त्या जमातींनी आपली संस्कृती विसरून पाश्चिमात्य रीतीरिवाज आत्मसात केले आणि त्यातच ते धन्यता मानू लागले.

 

फॅंटमने शीळ घातली तशी त्याचा अश्व 'हिरो' आणि लांडगा 'डेव्हिल'आणि 'फार्का'बहिरीससाणा त्याच्यासमोर हजर झाले.तसेच त्याचा पिग्मी वंशाचा बालमित्र आणि बगालिया देशाचा मुख्यमंत्री 'गुरान'हा देखील हातातील काम टाकून लगबगीने फॅंटमजवळ आला.'आपल्याला देशाची पाहणी करण्यासाठी उद्याच निघावे लागेल.गुरान, मी गेलो तर तुला काही अडचण तर येणार नाही ना?'गुरानने नकारार्थी मान हलविली.'अगदी निश्चिंतपणे जा फॅंटम, मी इथली काळजी घेईन.'गुरानने फॅंटमला आश्वस्त केले.फॅंटमला आपल्या या बालमित्राबद्दल प्रेम दाटून आले.'ओह् गुरान,तू इथली काळजी घेतोस म्हणूनच मी निश्चिंत होऊन बाहेर जाऊ शकतो.'

 

गुरानने ढोल वाजवून फॅंटम उद्यापासून देशाच्या दौऱ्यावर निघाला आहे असा संदेश पुढच्या गावात पाठवला.आता ती माणसं आपल्या ढोलांद्वारे पुढील वस्तीकडे हा निरोप पाठवतील.ते पुढच्या गावात हा संदेश... असं करत पूर्ण बगालिया देशात हा संदेश पोहोचेल. फॅंटम 'हिरो'आणि 'डेव्हिल'ला घेऊन 'बगाला'नदीवर निघाला.तिघेही नदीत यथेच्छ पोहले आणि ताजेतवाने होऊन 'कवटी गुहेत'परतले तेव्हा सूर्य मावळायला आला होता.उद्या पहाटेच कूच करायचे होते.बगालिया देश विस्तीर्ण होता त्यामुळे भरपूर प्रवास करायचा होता.'फार्का बहिरी ससाणा 'प्रवासात दिशा दाखवणार होता त्यामुळे तो 'कवटी गुहेच्या' समोरील वृक्षावर कधीचाच येऊन बसला होता.


 फॅंटमचा 'बगालिया'देश अतिशय प्रचंड असून त्यात अती पर्जन्यशील प्रदेश होता तसेच तुरळक पावसाचा प्रदेश ही होता.कुठे घनदाट जंगल होते तर कुठे कुठे नुसतीच बोरी बाभळी सारखी काटेरी झुडूपे होती. पहाटे पक्ष्यांचे मंजूळ कूजन सुरु झाले तशी फॅंटम उठला.स्वतःचे आवरून झाल्यावर 'कवटी गुहेच्या' बाहेर येऊन त्याने शीळ घालताच हिरो आणि डेव्हिल हजर झाले. फांदीवर फार्का त्यांची प्रतीक्षा करीत होताच आता जंगलात तो त्यांचा वाटाड्या म्हणून काम करणार होता.गुरान थोड्या अंतरापर्यंत त्यांना पोहोचवायला आला आणि परत गेला.आता थोडे दिवस देशाची धुरा तोच सांभाळणार होता.

 गुरानचा निरोप घेऊन सर्वजण मार्गस्थ झाले.


फॅंटम हिरोवर स्वार होऊन आजूबाजूच्या प्रदेशाचे निरीक्षण करीत होता तर डेव्हिल मार्गात काही धोका नाही ना याची खात्री करून घेत होता.बराच वेळ वाटचाल करत ते 'उलुंगारा'नदीकाठी आले.नदीच्या विस्तीर्ण आणि खोल पात्रात पाणघोडे डुंबत होते तर काठावरील घनदाट वृक्षांच्या छायेत महाकाय मगरी आ वासून निवांत पडल्या होत्या.या प्राण्यांना टाळून फॅंटम नदीच्या उथळ पात्राकडे गेला.सर्वचजण तहानेले झाले होते.सर्वांनी पोटभर पाणी प्यायले आणि परतण्यासाठी वळले आणि फॅंटमचे डोळे विस्फारले.नदीकाठच्या ओल्या मातीत चक्क माणसांच्या बुटांचे ठसे उमटले होते.एव्हढ्या निबिड जंगलात बूट घालून कोण आले असेल बरं? फॅंटम अस्वस्थ झाला.त्याने आपला मोर्चा नदीकाठी रहाणाऱ्या 'उलुंगा'जमातीच्या वस्तीकडे वळवला. अती पर्जन्य क्षेत्रातील ‌असल्याने दलदलीची जमीन होती त्यामुळे 'उलुंगा'जमातीचे लोक उंच झाडांवर बांबूच्या झोपड्या बांधून रहात होते.त्या उंचावरील घराकडे जाण्यासाठी जंगलातील मजबूत वेली विणून त्यांच्या पायऱ्या तयार केलेल्या होत्या.


 फॅंटम उलुंगा जमातीच्या प्रमुखाच्या,'पेंबे'च्या झोपडीखाली आला आणि त्याने खुणेची शीळ घातली.ती शीळ ऐकताच उलुंगा प्रमुख पेंबे वेलींच्या पायऱ्या झपझप उतरुन खाली आला आणि त्याने 'उर्रर्रर्रर्र'अशी आरोळी ठोकली.पाहुण्यांचे स्वागत ते अशा प्रकारे करीत.त्याने 'ब्वाना,तुमचे आमच्या गावात स्वागत आहे'असे म्हटले.'ब्वाना'हा शब्द फॅंटम च्या बागालिया देशात 'महाराज'या अर्थाने वापरला जात असे.उलुंगा प्रमुखाच्या आरोळीने आसपासच्या झाडांवरील घरांमधून पटापट माणसे वेलींच्या शिडीवरुन खाली उतरु लागली व थोड्याच वेळात ती जागा चेहरे रंगविलेल्या,अंगावर लज्जारक्षणापुरत्या झाडांच्या साली गुंडाळलेल्या माणसांनी भरून गेली.सर्वांनी 'उर्रर्रर्रर्र'असा एका सुरात गजर केला तशी वृक्षांवर वसती करून असलेल्या पक्ष्यांनी घाबरून एकच कलकलाट केला.माकडे चित्कार करु लागली.'ब्वाना'आम्ही तुमची आतुरतेने वाट पहात होतो.कालपासून ढोलांच्या संदेशाने आम्हाला इतका आनंद झाला होता म्हणून सांगू'उलुंगा प्रमुख पेंबेच्या बोलण्यावर आपण सहमत आहोत असे दाखविण्यासाठी इतरांनी उड्या मारुन आनंद दर्शविला.त्या आपल्यावर निर्व्याज प्रेम करणाऱ्या आपल्या प्रजाजनांविषयी फॅंटमचे मन अपार प्रेमाने भरुन गेले.'तुम्हाला काही त्रास नाही ना?'फॅंटमने विचारले.सर्वांनी नकारार्थी मान हलविली.'तुम्हाला पायात असं घालणारी माणसं दिसली होती का?'स्वतःच्या पायातील बुटांकडे निर्देश करीत फॅंटमने विचारले कारण उलुंगा जमातीची माणसं अनवाणी रहात.'नाही ब्वाना, अशी माणसं आम्ही पाहिली नाहीत.'सर्वांनी एका सुरात सांगितले.'कोणी उलुंगारा नदीवर गेले नाही का?'फॅंटमच्या प्रश्नावर उलुंगाप्रमुख पेंबे मान हलवित म्हणाला,'ब्वाना, मध्यंतरी पावसाचा जोर इतका वाढला होता की आम्ही घरातून खाली उतरलोच नाही.'

 

उलुंगांनी केलेला पाहुणचार स्वीकारुन फॅंटम पुढच्या प्रवासाला निघाला.हिरो आणि डेव्हिल विश्रांती मिळाल्याने ताजेतवाने झाले होते.हिरोवर स्वार होऊन फार्का दाखवेल त्या मार्गाने फॅंटम वाटचाल करीत होता.अंधार पडायच्या आत त्याला पुढील मुक्कामाला पोहोचायचे होते.त्याने इशारा करताच हिरो वाऱ्याच्या वेगाने दौडू लागला.आकाशात फार्का आणि बरोबर डेव्हिल अशी फॅंटमची स्वारी पुढच्या मुक्कामाला पोहोचेपर्यंत फॅंटमच्या मनातून ते ओल्या मातीत उमटलेले बुटांचे ठसे जाईनात.आपल्या देशात, इतक्या दुर्गम भागात बुटांचे ठसे कुठून आले?: क्रमशः


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy