फासे
फासे


आज जोशांच्या घरी आनंदाचे वातावरण!! मीनलचा भावी नवरा मयुरेश, त्याचे आई, वडील आज दिल्लीला जोशांकडे आले. पत्रिका बघणे, पसंती सगळे online झाले असल्याने आता साखरपुड्याचीच तयारी चाललेली.
"अगं मीनल, आता नाश्तापाणी झालंय. तू आणि मयूरेश आपल्या सोनारकाकांकडे जाऊन मयूरेशसाठी अंगठी पसंत करुन ठेवा..." विमलताई म्हणाल्या.
"अगं मीनल, माझ्याकडे बऱ्याच अंगठ्या झाल्यात. ही ठेव तुझ्याजवळ. तुझीही अंगठी पसंत करुन ठेव..." मयूरेशची आई म्हणाली. सासूबाईंनी लेकीवर पूर्ण विश्वास दाखवल्याने विमलताई खूप खूश झाल्या.
मीनल व मयूरेश बाहेर पडले. मयूरेशनीच खरं तर तिला बोलतं करायचं पण तो गप्पगप्पच!! मीनलला वाटले, हा मुंबईहून दिल्लीला परक्या ठिकाणी आलेला. एकदम काय बोलावे नसेल सुचत!! आपण बोलूया!! सध्याचे रीलीज झालेले गाण्यांचे अल्बम फेसबुकवरच्या, व्हाॅटसअपवरच्या बातम्या, गाणी कितीतरी विषय काढून झाले. तो गुळमुळीत, साधकबाधक उत्तरे देत होता, पण मनापासून काही त्याची कळी खुलली नाहीये, हे मीनलच्या लक्षात आले.
त्यांच्या नेहमीच्या सोनारकाकांच्या दुकानात दोघे आले. त्यांनी जोशींचे जावई आले म्हणून पाणी, चहा, बिस्कीटे सगळे काही दिले. त्यांनी त्याच्या मापाच्या वेगवेगळ्या डिझाईन्सच्या अंगठ्या दाखवल्या, पण मयुरेशला एकही अंगठी पसंत पडेना. मीनल हिरमुसली. "ताई तुमच्यासाठी दाखवू का अंगठ्या..." सोनारकाका म्हणाले.
त्यांना मधेच आडवून मयूरेश म्हणाला, "आम्ही आणलीय मुंबईहून."
मीनल चपापली. यांनी आणली असती तर, आईंनी ही अंगठी कशाला दिली असती माझ्याकडे? पण मौनं सर्वार्थ साधनम् म्हणून तिने गप्प बसणेच पसंत केले.
"आपण बागेत जाऊया का?"
मयूरेशच्या प्रश्नावर हिरमुसलेली मीनल जरा खूष झाली.
"हो, बदामी बागेत जाऊ या..."
दोघेही बागेत आले. बाकावर बसल्याबसल्याच मयूरेशने सिगारेट शिलगावली. आपल्याबरोबर एक मुलगी आहे. तिला विचारण्याचे सौजन्यही त्याने दाखवले नाही. मीनल तर त्या वासानेच नाराज झाली. कसे होणार आपले? हा विचारही तिच्या मनाला स्पर्शून गेला.
मयूरेश म्हणाला, "मला तुमच्याशी महत्त्वाचे बोलायचेय..."
मीनल एकदम हबकून गेली.
"काय?" असा उदगार अभावितपणे तिच्या मुखातून बाहेर पडला.
"माझे आमच्या ऑफिसमधल्या मुलीवर प्रेम आहे. ती हिंदू धर्माची नाही, म्हणून माझ्या आई-वडीलांना पसंत नाही."
मीनल अवाक् झाली. असे काही ऐकायला लागेल असे तिला वाटलेच नव्हते.
"माझ्या आई-वडीलांना तुम्ही पसंत आहात. आमची देण्याघेण्याची काही अट नाही म्हटल्यावर, येताना साखरपुडा करुनच येऊ, अशा विचाराने ते इथे आले आहेत."
मीनल उदासपणे, "आता काय?"
"तुम्ही आता तुमचे एका मुलावर प्रेम आहे असे सांगा, म्हणजे हे लग्न आपोआपच मोडेल..." मयूरेश म्हणाला.
मीनल अंतर्बाह्य हादरली.
"अहो पण माझे कोणावरच प्रेम नाही, तर मी काय सांगू?"
"आम्ही लगेचच निघतो आहोत. तुम्हाला कोणी काही विचारणार नाही. चला आपण घरी जाऊ..." मयूरेश.
मीनल पुतळ्यासारखी चालू लागली. तिच्या सर्व संवेदनाच जणू गोठल्या होत्या. सालस, गुणी मीनल!! तिला साधे, सरळ आयुष्य माहिती. दुनिया अशी असते हे तिला प्रथमच कळले.
घरी आल्यावर सगळ्यांनी त्यांचे हसून स्वागत केले.
"अंगठी खरेदी झाली का? दाखवा बरं..."असे मयूरेशच्या आईने विचारल्यावर मीनल थेट बाथरुमकडे गेली.
"मयूरेश घेतली का अंगठी?"
विमलताईंनी विचारताच, मयूरेश चिडक्या स्वराने म्हणाला, "विचारा तुमच्या लेकीलाच!! तिचे एका मुलावर प्रेम आहे. तिनेच बाहेर गेल्यावर सांगितले मला. आई बाबा चला. फुकट इतका लांबचा प्रवास घडला आपल्याला."
मयूरेशचे आई-वडील अवाक् झाले. त्यांना धक्काच बसला. त्यापेक्षाही हादरले मीनलचे आई-वडील!! सालस, गुणी मुलगी आपली. तिचे कोणावर प्रेम होते, तर आपल्याला कसे सांगितले नाही तिने? या लोकांना एवढा लांबचा प्रवास करुन का यायला लावले?
मीनल बाथरुममधून रडतच बाहेर आली. इतका वेळ दाबलेला आवेग आता बाहेर पडत होता. तिला शांत करुन विमलताईंनी मीनलला सर्वांच्या समोर उभे केले.
"मीनल हे म्हणतात, तू त्यांना सांगितलेस तुझे एका मुलावर प्रेम आहे म्हणून..."
"आई, नाही गं, मी असे काहीही सांगितले नाही. उलट यांनीच मला यांचे ऑफिसमधल्या एका मुलीवर प्रेम आहे असे सांगितले. ही घ्या तुम्ही दिलेली अंगठी..."
"चोर तो चोर वर शिरजोर!! खोटं बोलतीय तुमची मुलगी..."
आता अवघड झाले होते.
विमलताई म्हणाल्या, "माझा माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे. माझ्या डोक्यावर हात ठेवून ती कधीही खोटं बोलणार नाही. तुम्ही दोघेही वयस्कर आहात. लांबचा प्रवास आहे. पोळी भाजीचा डबा घेऊन आपण निघावे हेच योग्य."
माणुसकी म्हणून दिलेला पोळी भाजीचा डबा घेऊन ते गेल्यावर, विमलताईंनी मीनलला जवळ घेतले.
विमलताई म्हणाल्या, "मीनल, तुझे स्वप्न भंगले. तुला वाईट वाटणे अगदी साहजिकच आहे, पण तुझ्या आयुष्याचे वाईट होण्यापेक्षा, झाले ते फार चांगले झाले. काहीतरी चांगले होण्यासाठी काहीतरी वाईट घडत असतं. ही परमेश्वरी कृपाच समजायची!!