नाते जन्मजन्मांतरीचे - भाग ३
नाते जन्मजन्मांतरीचे - भाग ३
अक्षयची आई घरातून बाहेर पडली आणि रमा कडे गेली . पहाते तर काय रमाची आई गुडघ्यात डोके खुपसून मुळूमुळू रडत बसली होती. आणि तिचे बाबा मान खाली घालून बसले होते. त्यांच्यासमोर बसून एक माणूस त्यांना अद्वातद्वा बोलत होता . तिच्या चार बहिणी आईच्या पाठीमागे लपून मुसमुसत होत्या.
एकंदरीत त्यांच्या बोलण्यातून वासंतीला घडलेल्या घटनेचा अंदाज आला. त्यांनी लगेच पर्स मधून २००० रुपये काढले आणि त्या माणसाच्या हातावर ठेवले . पैसे हातात पडताच त्या माणसाने काढता पाय घेतला.
तो माणूस जाताच रमाच्या वडीलांनी तिच्या पायावर डोके ठेवले. घाबरून मागे सरकत त्या म्हणाल्या,
"हे बघा भाऊजी , असे काहीतरी विचित्र वागू नका. मी केवळ शेजारधर्म म्हणून मदतीचा हात पुढे केला. मी कोणी करोडपती नाही. केंव्हा ना केंव्हा मी ही हे पैसे परत मागणारच. "
अशी उधारी करत बसण्यापेक्षा मी एक उपाय सुचवते पटतोय का पहा . रमाला माझ्या कडे खानावळीच्या कामात मदत करायला पाठवा. अर्थातच तिच्या कामाचा मोबदला मी तिला देणारच . त्यातूनच अगदी छोटी रक्कम मी कापून घेऊन माझे पैसे मी वापस घेणारच.
एव्हडेच बोलून वासंती थोडी शांत बसली. त्या दोघांच्या चेहर्यावरील भाव वाचण्याचा ती प्रयत्न करू लागली .
दोन मिनिट शांततेत गेल्यावर तिच्या बाबांनी हा प्रस्ताव मान्य केला.
पण, वासंतीने पुन्हा बोलायला सुरवात केली, माझी एक अट आहे.
सकाळी ८ ते १० रमा मला मदत करेल, त्यानंतर ती कॉलेज ला जाईल. २ वाजता ती आली की ४ वाजेपर्यंत तिचा अभ्यास आटोपून ती ७ वाजेपर्यंत मला पुन्हा मदत करेल . तिला स्कॉलरशिप मिळणारच आहे त्यामुळे तिच्या शिक्षणाचा खर्च तुमच्यावर पडणारच नाही. समजा काही खर्च करावाच लागला तर मी मदत करीन अर्थातच तिच्या पगारातून पैसे मी कापून घेईन .
ही अट मान्य असेल तरच मी रमाला कामावर ठेवायला तयार आहे.
रमाच्या बाबांना आता थोडा थोडा राग येत होता. पण येणार्या लक्ष्मीला ते पाठ फिरवू इच्छित नव्हते. म्हणून त्यांनी नाईलाजाने होकार दिला .
त्यांचा होकार मिळताच वेळ न घालवता अक्षयची आई पटकन उठली आणि तिने घरचा रस्ता धरला . तिला भीती वाटली की चुकून होकाराचे नकारात रूपांतर व्हायला नको.
इकडे रमा आणि अक्षय चिंतेत बसले होते. आई केंव्हा येते इकडेच त्या दोघांचे लक्ष लागले होते. त्यामुळे ते एकमेकांशी फारसे बोलत सुद्धा नव्हते .
आईला दारात पाहताच दोघेही धावत समोर आले . धापा टाकत वासंती धप्पकन खुर्चीत बसली . अक्षयने धावत जाऊन पाणी आणले. हळुहळू पाण्याचे घोट घेत घेत तिने घडलेली सगळी हकिकत दोघांनाही सांगितली. दोघांचे चेहरे हर्षभरीत झाले.
रमा म्हणाली , "काकू खूप खूप धन्यवाद. मी केव्हापासून यायला लागु ? "
वासंती म्हणाली, "अग, धन्यवाद कशासाठी? आणि हो अगदी उद्यापासूनच कामाला सुरवात करायची ."
पहिल्यांदा तुझ्या कॉलेजच्या अॅडमिशनचे पहा. उद्या सगळी कागदपत्रे , फोटो, झेरॉक्स कॉपी वैगरे सर्व तयार ठेव . फॉर्म भर ....
वासंती तिला भराभर सूचना देत होती आणि ती लहान मुलीसारखी मान डोलवत होती .
थोडासा श्वास घेऊन वासंती तिला म्हणाली , " हे बघ , सध्या तरी तुला हे सगळे माहिती आहे हे दर्शवू नकोस . पुढे मागे मग मी बोलीन . आता तू घरी जा."
रमाने वासंतीला नमस्कार केला आणि ती झपाट्याने आपल्या घराकडे निघाली . भविष्याची सुरेख स्वप्ने आता तिला पाहता येणार होती. त्या स्वप्नात मधेच तिला अक्षय डोकावताना दिसला आणि तिचा चेहरा गोरामोरा झाला .
सगळ्या घटना इतक्या झपाट्याने घडल्या की अक्षय किंकर्तव्यमूढ होऊन विचार करत बसला.
आईच्या आवाजाने तो भानावर आला.
आई :- तू काय ठरविले आहेस ? कुठे अॅडमिशन घेणार आहे तू ?
अक्षय :- आई , मी आजच्या घटनेने इतका गोंधळलो आहे की माझी बुद्धी थिजून गेली आहे . उद्या मी तुला सगळे व्यवस्थित सांगतो.
त्याच्या म्हणण्यावर वासंतीने मान डोलावली आणि संध्याकाळच्या जेवण्याच्या तयारीला लागली. तिला ही आता ह्या सगळ्यातून थोडी विश्रांती हवी होती.
अक्षय पुन्हा विचारात गढला . वडीलांच्या अचानक मृत्यूमुळे तो अकाली मोठा झाला होता . सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करण्याची सवय त्याला लागली होती.
सध्या तरी बारावी सायन्स घेऊनच करायचे त्याने ठरविले . बाकीच्या कोर्सची बारकाईने चौकशी करून मग आपली दिशा ठरवायची असे त्याने ठरविले . आता त्याला शांत वाटू लागले . आणि तेंव्हाच हळूच रमा त्याच्या मनात डोकावला. त्याच्याही नकळत त्याच्या ओठावर हास्याची लकेर उमटली....
(क्रमशः)

