संध्याछाया भिवविती हृदया : ५
संध्याछाया भिवविती हृदया : ५
मागच्या भागात काय घडले ....
"सुख , तू तुझ्याबद्दल काहीच नाही सांगणार ? "
मजेत शीळ वाजवत तो म्हणाला , " मॅडम , घड्याळ पहा. भूक पण लागलीय . उद्याची सकाळ फक्त तुझी आणि माझी . उद्या सुट्टी टाक . सकाळी ७.३० वाजता येतो तुला घ्यायला. तेंव्हा बोलुया . १२-१२.३० पर्यंत मी निघेन मुंबईला जायला . माझेही आई बाबा वाट पहात असतील....
आता पुढे...
इतक्या पोटभर गप्पा झाल्या होत्या की नयनला जेवायची इच्छा नव्हती. फक्त सुखदेवच्या इच्छेखातर तिने मान डोलावली.
सुखदेवने विचारले , "नॉनव्हेज खातेस का तू ?"
" ना ना , मी कधीच त्याचा विचारही नाही करत . तू खातोस काय?"
"अग , मी फॉरेन मध्ये राहूनही कधीच नॉनव्हेज नाही खाल्ले की अपेयपान नाही केले "
त्याच्या ह्या वाक्यावर नयन अजूनच खुष झाली.
म्हणजे अजूनही आपल्या आवडीनिवडी सारख्याच आहेत. तिने मनोमन नोंद केली.
सूप मध्ये हॉट अँड सोअर वन बाय टु, स्टार्टर मध्ये क्रीस्पी कॉर्न, मेन कोर्स मध्ये रानी पालक, बटर पराठा , दाल तडका, जिरा राइस .
तो ऑर्डर देत होता आणि ती खुश होत होती.
ती म्हणाली, " सुख , आयुष्य खूप सुंदर आणि सोप आहे. एकमेकांच्या आवडीनिवडी जुळायला हव्या फक्त."
हं, तर तुला माझ्याबद्दल जाणून घ्यायचे आहे ना ?
बाबांची बदली मुंबईला झाली आणि माझे आयुष्यच बदलून गेले. इथल्या सारखे शांत आयुष्य नव्हते तिथे . प्रत्येक जण कशाच्या ना कशाच्या मागे धावत होता. सुरवातीला गांगरलो मी . पण सवयीने त्या गर्दीचाच एक भाग झालो.
तिथल्या वातावरणाशी समरस होताना इथले आयुष्य विसरत गेलो. तिथल्या शाळा, मित्र , प्रत्येकाची वेगळी विचारसरणी, सगळ्या गोष्टी आत्मसात करू लागलो.
लोकलच्या गर्दीत सराईतपणे प्रवास करू लागलो . काही तरी साध्य करण्यासाठी शिकायचे असा विचार करायला शिकलो. इथे टिकून राहायचे असेल तर अव्वल स्थान कोणाकडे जाऊ द्यायचे नाही .
केवळ अभ्यासच नाही तर इतर कॉम्पिटिशन मधेही पुढेच राहणे आवश्यक आहे हे कळले मला. आणि माझ्याही नकळत मी जिद्दीने अभ्यासाला लागलो , निरनिराळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षिसे मिळत लागलो.
माझ्या कष्टाची नोंद बाबांच्या मनात झाली होती. तेंव्हाच त्यांनी ठरवून टाकले मला इंजिनीअरिंगला टाकायचे. मी आठवी नववीत असतानाच त्यांनी जास्तीचे कष्ट करून माझ्या शिक्षणासाठी पैसे साठवायला सुरवात केली होती .
मला ते सतत प्रोत्साहन देत असे . मला उत्तमोत्तम क्लासेस लावून द्यायची त्यांची तयारी होती. माझ्या खाण्या पिण्याकडे सुद्धा ते जातीने लक्ष देत असे.
ह्या सगळ्यात माझा लहान भाऊ सुदेव कडे नाही म्हंटले तरी दुर्लक्ष होत होते. मी नववीत असताना तो पाचवीत होता.
अभ्यासापेक्षा त्याचे खेळण्यात जास्त लक्ष होते . तो माझ्यापेक्षा खर म्हणजे खूप हुशार होता. तो उत्तम चेस खेळायचा. त्यात त्याने खूप सारे मेडल्स पण मिळवले होते. पण अभ्यासात त्याचे मन जास्त रमत नसे. दर निकालाच्या दिवशी तो बाबांचे बोलणे खात असे.
तो दहावी कसाबसा पास झाला. पण त्याच वर्षी त्याने चेस मध्ये आणि बास्केट बॉल मध्ये स्टेट लेव्हलला गोल्ड मेडल मिळविले. अनेक दैनिक पेपर त्याच्या कौतुकाने भरून गेले.
पण बाबांना ह्यापेक्षाही त्याने अभ्यासात लक्ष घालावे असेच वाटत होते.
ह्या वरून त्या दोघात सतत खटके उडत असत . एक दिवस सगळे काही नाकारून तो घर सोडून निघून गेला.
आम्ही त्याचा खूप शोध घेतला पण त्याचा काहीच ठावठिकाणा लागला नाही.
ह्या घटनेने आई खूप हादरून गेली. बाबा खुप आजारी पडले. तेंव्हा मी अमेरिकेतील चांगल्या युनिव्हर्सिटीत एम. एस. साठी अॅडमिशन मिळावी म्हणून धडपडत होतो.
पण ह्या घटनेचा माझ्याही अभ्यासावर परिणाम झालाच होता. त्यात आईबाबांच्या तब्येतीची काळजी होतीच.
पण नशीब जोरावर होते . मला छान युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळाला.
आईबाबांना अशा अवस्थेत सोडून जायचे जीवावर येत होते आणि तिकडे उज्ज्वल भविष्याची हाक ऐकू येत होती .
माझ्या जीवाची घालमेल आई बाबांनी समजून घेतली . मोठ्या मनानी त्यांनी मला जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. भानावर येत त्यांनी आपल्या स्वतःला सांभाळले.
मीही त्यांना परत येण्याचे आणि वेळोवेळी फोन करीनच असे वचन दिले . आजवर मी हे वचन कसोशीने पाळले .
तिथल्या अनेक प्रलोभनाला मी माझ्यापासून दूर ठेवले. बाबांकडून गरज पडल्याशिवाय मी पैसे शक्यतोवर मागवत नव्हतो.
वीकेंडला जे काम मिळेल ते करून पैसा जमवत होतो. तेवढ्यातच आपला खर्च भागवायचा प्रयत्न करत होतो. आणि उरलेल्या सगळ्या वेळात खूप अभ्यास करत होतो.
माझ्या ह्या कष्टाला खूप चांगले फळ मिळाले. खूप छान कंपनीत मला शिक्षण होता होताच ऑफर मिळाली.
मागच्याच वर्षी मी आई बाबांना घेऊन गेलो होतो . त्यांना युरोप फिरवून आणला. ते खुष रहायचा प्रयत्न करतात , पण सुदेवची आठवण आली की नाराज होतात .
बाबा ह्या बाबतीत स्वतःलाच दोषी मानतात.
तुझ्याकडून माझी एकच अपेक्षा राहील की कोणत्याच बाबतीत त्यांना दुखवू नको. बाकी सर्व सुख मी तुझ्या पदरात टाकीन.
त्याचे बोलणे शांतपणे ऐकत असलेल्या नयनने काहीच न बोलता त्याच्या हातावर हलकेच थोपटले.
बोलण्याच्या नादात जेवण कधी संपले हे दोघांच्याही लक्षात आले नाही. घड्याळाकडे पहात सुखदेव म्हणाला ,"चला मॅडम उशीर होतोय , तुम्हाला आत येऊ नाही देणार होस्टेलवाले..."
लगबगीने उठत नयन म्हणाली, " चल बाबा लवकर. "
उद्याच्या भेटीच्या आणाभाकाची देवाण घेवाण करत दोघांनीही आनंदाने एकमेकांचा निरोप घेतला.
पाहूया उद्याची भेट या प्रेमात पडलेल्या युगुलाची पुढच्या भागात...
........ क्रमशः

