दिवाळी राज्या राज्यातील
दिवाळी राज्या राज्यातील
दिवाळी म्हणजे प्रकाश पर्वाचा उत्सव .
रश्मिमन्तं समुद्यन्तं देवासुरैः नमस्कृतम् ।
पूजयस्व विवस्वन्तं भास्करं भुवनेश्वरम् ।।
असे म्हणत सूर्योपासना करणे , हा मनुष्याच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला . प्रकाशाचा , समृध्दीचा अक्षय ठेवा असणाऱ्या हिरण्यगर्भाला अर्घ्य अर्पण करणे , ही उज्ज्वल परंपरा निर्माण झाली .
पण सूर्याच्या गैरहजेरीत कोण प्रकाश देईल जगताला ? हा प्रश्न जेंव्हा निर्माण झाला , तेंव्हा एक छोटीशी पणती पुढे येऊन म्हणाली , माझ्या कुवतीनुसार मी देईन प्रकाश ! मग माणसाने ह्या पणतीचीही पूजा करायला सुरुवात केली .
' दीपेन हरते ध्वान्तं , दीपज्योति नमोस्तुते ।'
उत्साहपूर्ण माणूस एवढ्यावरच थांबला नाही . त्याने दीपोत्सवच सुरु केला .
आनंद ...! प्रकाशाचा आनंद !
एकः दीपः प्रज्वलतु उत्साहस्य
एकः तु समृध्देः , एकः आशायाः ।
एकः शान्तेः च , एकः शौर्यस्य धैर्यस्य वा
पञ्चदीपेन वर्धयामः तेजः जीवनस्य ।।
ह्या प्रकाशपर्वाच्या हार्दिक शुभेच्छा !
दिवाळी म्हंटली की भारतातील प्रत्येक राज्य उत्साहाने हा सण साजरा करतो. फक्त पद्धत वेगळी असते. चला पाहूया वेगवेगळया राज्यात कशी मनवतात दिवाळी .
वसुबारस
महाराष्ट्रातील दिवाळीची सुरवात होते वसुबारसने.
आपला देश कृषी प्रधान देश आहे. शेतीच्या कामात बहुमोल सहभाग देणार्या गाय, बैल ह्यांच्या प्रति भारतीय नेहमीच कृतज्ञ असतात. वसुबारस म्हणजेच गोवत्सद्वादशी. समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो, अशी मान्यता आहे. वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन (द्रव्य), त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी.
भारतीय संस्कृतीप्रमाणे गायीला फार महत्त्व आहे. तिला माताही म्हणतात. ती सात्त्विक असल्याने सर्वांनी या पूजनाद्वारे तिच्या सात्त्विक गुणांचा स्वीकार करावा, असे म्हटले जाते. सत्त्वगुणी, म्हणजेच आपल्या सहवासाने दुसर्याला पावन करणार्या, आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणार्या, आपले अंग-प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणार्या, शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिकत्व आणणार्या, शेतीला उपयुक्त अशा बैलांना जन्म देणार्या गोमातेचे या दिवशी पूजन करतात. ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण, संवर्धन होऊन तिला पूज्यभाव देऊन तिचे पूजन होते, त्या ठिकाणी ती व्यक्ती, तो समाज, ते राष्ट्र भरभराटीस आल्याशिवाय राहत नाही. अशा गोमातेचे प्रथम तिच्या वत्सासहित पूजन करून दीपोत्सवाला सुरवात होते.
दुसरा दिवस धनत्रयोदशी .
या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यु टळतो असा समज आहे.
आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे पूजन करतात. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते.
नरकचतुर्दशी : ह्या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता . नरक म्हणजे वाईट , घाण विचार . त्याचा नायनाट करायचा . पणत्या लावून आनंदोत्सव साजरा करायचा .
लक्ष्मीपूजन : सर्व घर पणत्या लावून उजळून टाकायचे . घरा सकट मनातला अंधार नाहीसा करत अष्ट लक्ष्मीला प्रसन्न करायचे .
बलिप्रतिपदा : विष्णुने वामनावतार धारण करून बळीराजाला पाताळात पाठविले . त्या बटूरूपाची पूजा करतात . आजच्या दिवशी मुली आपल्या वडीलांना आणि बायका आपल्या पतीला ओवाळतात. त्यांच्या निरामय आयुष्यासाठी प्रार्थना करतात .
भाऊबीज : बहीण भावाच्या नात्याला सुदृढता आणणारा हा दिवस. ह्या दिवशी अविरत कामात मग्न असलेला यमराज वेळात वेळ काढून यमीच्या म्हणजे आपल्या बहिणी च्या घरी ओवाळून घेण्या साठी आला होता अशी एक दंतकथा आहे . भाऊ नसलेली बहीण चंद्राला भाऊ मानून ओवाळते.
एकंदरीतच सूर्य , चंद्र , धरणी माता , गाय वासरू ह्या निसर्गदत्त देणग्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण . अंधारावर प्रकाशाने मात करत हा सण मनवला जातो.
महाराष्ट्राच्या उत्तरेकडील प्रांतांत पौर्णिमेनंतरच्या दिवसापासून पुढचा महिना सुरू होतो, त्यामुळे जेव्हा महाराष्ट्रात, कर्नाटकात आणि आंध्र प्रदेशात आश्विन महिन्याचा कृष्ण पक्ष चालू असतो, तेव्हा या प्रांतांत तो कार्तिक महिन्याचा कृष्ण पक्ष असतो.
गुजरात
गुजरात आणि महाराष्ट्रात साधारणपणे सारख्याच पद्धती आहेत. वेगळेपणा असा नसतो फार .....
पण पाडव्याच्या दिवशी व्यापारी वर्ग फायनान्शियल न्यू इयर साजरे करतात. त्या अनुषंगाने चोपडा - पूजनचे (खातेवहि) महत्व आहे. नवा वर्ष नि वधायी (दिवाळी शुभेच्छा) असे म्हणत एकमेकांच्या घरी जातात आणि शुभेच्छा देतात.
बाकी फराळात चकली लाडू हे पदार्थ असतात पण चोराफळी आणि मठीया या दोन पदार्थाना विशेष महत्त्व देतात .
आपल्या सारख्याच रांगोळ्या काढतात परंतु नवीन वर्षाच्या स्वागताला म्हणून ते मोर असलेली विशिष्ट रांगोळी काढणे महत्त्वाचे मानतात .
बाकी लक्ष्मीपूजन , भाऊबीज आपल्या सारखीच साजरी करतात .
राजस्थान
राजस्थानी लोक दिवाळीचा संबंध राम वनवासातून परत आला, त्या मंगल घटनेशी जोडतात. काही ठिकाणी लंकादहनाचा देखावा उभा करून त्यातून शोभेची दारू उडवतात.
मांजरीला लक्ष्मी मानून तिचे कौतुक करतात. तिने कितीही त्रास दिला तरी तिला मारत नाहीत.
दिवाळीतल्या चतुर्दशीला रूपचौदस म्हणतात. त्या दिवशी ब्राह्मण व वैश्य स्त्रिया सूर्योदयापूर्वी स्नान करून विशेष शृंगार करतात.
संध्याकाळी मुली मस्तकावर 'घुड्ल्या' घेऊन घरोघर फिरतात. घुडल्या म्हणजे सच्छिद्र घडा असतो व त्यात दिवा लावलेला असतो.
अमावास्येला लक्ष्मीपूजन फार थाटाने करतात.
प्रतिपदेला खेंखरा म्हणतात. त्या दिवशी गोवर्धन पूजा व अन्नकूट करतात.
याच्या दुसऱ्या दिवशी राजदरबारी व घरोघरी दौतीची व लेखणीची पूजा होते.
पंजाब
पंजाबातील लोक रामराज्याभिषेकाच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिवाळीची दीपोत्सव करतात.
तिथले शीख लोक अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या स्थापनेचा स्मृतीदिन म्हणून हा सण पाळतात.
सहावे गुरू हर गोविंद सिंह जी यांची मुघलांच्या कैदेतून या दिवशी सुटका झाल्याने शीख बांधव दिवाळीचा दिवस उत्साहाने साजरा करतात.
हरियाणा
दिव्यांची आरास करतात, मुलांचे दारुकाम असते.
लक्ष्मीपूजन हा दिवाळीतील मुख्य कार्यक्रम असतो.
उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशमधील डोंगराळ भागातले लोक दिवाळीच्या दिवशी गायींची पूजा करतात व रात्री गावाच्या सीमेवर जाऊन मशालींच्या प्रकाशात नाचतात. काही लोक कुबेराची पूजा करतात, तर काही लोक देवीची पूजा करून तूपभात व साखर खातात.
नेपाळ
तिहार म्हणजे दिपावली.
पहिला दिवस : काग तिहार (कावळ्याची पूजा)
दूसरा : कुकुर तिहार (कुत्रा पूजा)
तीसरा : गाई पूजा आणि लक्ष्मी पूजा
चाैथा ; गोवर्धन पूजा
पाचवा : भाई टीका (भाऊबिज)
नेपाळमधील लक्ष्मीपूजन
नेपाळमध्ये दिवाळीच्या दिवसात द्यूतक्रीडेला विशेष महत्त्व आहे. नेपाळी लोक लक्ष्मीपूजन तर करतातच, पण शिवाय कुत्रे, गायी, बैल यांचीही पूजा करतात.
गोवा
गोव्यातील दिवाळी सामुदायिक आतिथ्याची असते. शेजारी पाजारी एकत्र जमून प्रत्येकाकडे जातात आणि दूधगुळाच्या पोह्यांचा फराळ करतात.
गोव्यातील विविध गावांमध्ये आणि शहरी भागात नरकासुर राक्षसाचे पुतळे तयार करून त्यांचे दहन करण्याची स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. हे दिवाळीचे आकर्षण मानले जाते.
दक्षिण भारत
दक्षिण भारतात या दिवशी सूर्योदयापूर्वी केलेले स्नान गंगास्नानाइतके पवित्र मानले जाते. तमिळनाडूमध्येही काही लोक नरकचतुर्दशीला सूर्योदयापूर्वी दोनदा स्नान करतात.
आंध्र प्रदेशातील लोक घरासमोर एक मचाण बांधून त्यावर पणत्या लावतात व स्त्रिया त्याच्यावर बसून रात्रभर लक्ष्मीच्या स्वागताची गाणी गातात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रेड्यांच्या टकरी लावतात.
अशी ही दिन दिन दिवाळी . सण एक, साजऱ्या करण्याच्या पद्धती अनेक. आपसातील प्रेम, संबंध सुदृढ करण्याचा सण. विविधतेतील एकता दर्शविण्याचा सण.
खरं म्हणजे हा बळीराजाचा सण. पावसाळा संपून शेतात धान्य सुखाने डोलत असतं आणि त्याबरोबर बळीराजा पण सुखावत असतो . धरित्री मातेने दिलेल्या दानाने त्याच्या ही खिशात चार पैसे खुळखुळत असतात. ह्या ऋतुत बाजारात नव्याने आलेल्या पिकाचा पूजा साहित्यात ( धणे , जीरे, कापूस ) उपयोग करून समस्त लोक धरती मातेचे ऋणी आहोत हे व्यक्त करण्याचा सण.
ही दिवाळी आपल्या सर्वांना भरभराटीची जाओ
