नाते जन्मा जन्मांतरीचे : भाग ९
नाते जन्मा जन्मांतरीचे : भाग ९
वासंतीने जणू तोफ गोळाच टाकला असे त्या दोघांच्या चेहर्याकडे पाहून वाटत होते. शेवटी वासंतीनेच त्या शांततेचा भंग केला .
काय म्हणणे आहे तुमचे यावर ? माझा विचार पटला नसेल तर तसेही स्पष्ट सांगा. मी कुठलीच जबरदस्ती करणार नाही.
हिम्मत करून रमाची आई म्हणाली , "पण रमाचा विचार तर घ्यावा लागेल ना ?"
अवश्य घ्या . अगदी आजच आणि आत्ता सांगा असे माझे म्हणणेच नाही . तुम्ही हवा तेवढा वेळ घ्या आणि मग कळवा . होकार असो वा नकार कळवा मात्र नक्की. मलाही आता निघणे भाग आहे . .. . असे म्हणत वासंती उठली आणि घराकडे निघाली.
आता घरी काय परिस्थिती आहे ह्याचा विचार करतच ती घरात शिरली. तिथे सगळे सुरळीत चालू आहे हे पाहून तिने समाधानाचा सुस्कारा सोडला.
रमाचा हसरा चेहरा आणि अक्षयचा तणावरहित चेहरा पाहून तिला हायसे वाटू लागले.
दोघांनाही काहीच न विचारता ती कामाला लागली. रमा ही भराभर कामे आटोपत होती. थोड्याच वेळात ती फ्रेश होऊन आली आणि "काकू मी येते ग......" म्हणत कॉलेजला जायला निघाली .
वासंतीने हसून तिला टाटा केला .
आता तिने अक्षय कडे आपला मोर्चा वळविला. त्याच्या तोंडून तिला सगळे ऐकायचे होते. आईला पाहताच तो प्रसन्नपणे हसला आणि तिने काही विचारण्याआधी सगळी घटना अथपासून इति पर्यंत तिला सांगून टाकली.
दुसर्या दिवशी सकाळीच रमाचे आई-बाबा अक्षय कडे आले आणि वासंतीच्या प्रस्तावाला मान्यता दिली.
नियती आता अक्षय-रमा वर खुष होती . त्या दोघांची झोळी भाग्यकारक घटनांनी भरण्यासाठी ती उत्सुक होती.
त्यानंतर कालचक्र इतक्या वेगाने फिरले की अक्षय आणि रमाला कोणत्याच गोष्टींचा विचार करायला वेळ नाही मिळाला . एका उत्कृष्ट हॉटेल मॅनेजमेन्ट कॉलेज मध्ये त्याला अॅडमिशन मिळाली . उत्कृष्ट शेफ म्हणून त्याने नाव कमावले. आईच्या सीक्रेट टिप्स नेहमीच त्याच्या कामी येत होत्या . रमाचा टापटीपीतपणा त्याच्या पथ्यावरच पडला. तो स्वतः मधुरभाषी असल्यामुळे तो सगळ्यांचाच आवडता विद्यार्थी आणि प्रिय मित्र बनला .
घरीही तो आई आणि रमाला वेगवेगळे पदार्थ शिकवीत होता. खानावळीत ते पदार्थ ग्राहकांसाठी बनवत होता. त्यामुळे ग्राहकांची संख्या वाढत होती . कोणती भाजी कशी कापायची, कशी वाढायची, ह्याची सगळी प्रॅक्टिस त्याला घरी करता येत होती.
म्हणता म्हणता दोघेही ग्रॅज्युएट झाले. अक्षयच्या मेहनतीमुळे खानावळीचे रूपांतर छोटेखानी पण पॉश हॉटेल मध्ये झाले होते . सगळेच पदार्थ घरगुती पद्धतीने केल्या जात होते. पदार्थांना घरच्या जेवणाची चव होती. त्यामुळे त्याने आपल्या हॉटेलचे नाव होमली- होमली ठेवले.
आता हाताशी चार पैसे खुळखुळायला लागले होते . आईनेही ह्यापूर्वी गाठीशी पैसे जमवून ठेवले होते. राधाच्या ऑपरेशनसाठी ते खर्च करायचे ठरविले. उत्तमातल्या उत्तम डॉक्टर शोधून अक्षय आणि वासंती ने तीही जबाबदारी व्यवस्थित पार पाडली. राधा आता बर्यापैकी सावरली होती .
एकमेकांच्या उन्नतीसाठी झटणारे रमा-अक्षय एकमेकांच्या प्रेमातही आकंठ बुडालेले होते. एक चांगला मुहूर्त पाहून वासंतीने त्यांचे रजिस्टर्ड लग्न लावून दिले . लग्नाच्या वेळी फक्त राधा , वासंती अक्षय कडून तर रमा कडून तिचे आईवडील आणि चौघी बहिणी इतकेच मंडळी होती.
अक्षयने आपल्या आणि रमाच्या मित्र मंडळीना होमली- होमली मधेच सुंदर पार्टी दिली.
इतक्या कठीण प्रसंगात , एकमेकाना साथ देत , एकमेकांच्या भावनांना जपत हे प्रेमी युगुल एकदाचे लग्नाच्या बेडीत अडकले.
लग्नाच्या पहिल्याच रात्री अक्षयने रमाला आश्चर्याचा धक्का दिला. त्याच्या मित्राच्या ओळखीने त्याने पुण्यात एक हॉटेल विकत घेतले होते.
तिथले बांधकाम पूर्ण झाले होते. आणि चार दिवसानंतर आई आणि रमाच्या हस्ते उद्घाटन होणार होते. होमली- होमली ची दुसरी ब्रँच.
रमा खूप खुश होती. अक्षय सारखा प्रेमळ, हुशार , कर्तबगार नवरा मिळाल्यावर अजून काय हवे होते.
तिने मनोमन देवाचे आभार मानले.
अक्षयला तर आभाळ ठेंगणे झाले होते. रमा त्याच्या आयुष्यात जणू लक्ष्मीच्या पावलानी आली होती. मागचे कष्टाचे दिवस लोपले होते. आता उंच भरारी घ्यायची , त्याने मनोमन निश्चय केला .
सुंदर भविष्याची स्वप्ने पहात, एकमेकांना जन्मोजन्मी साथ देण्याच्या आणा भाका देत ही प्रेमी युगुल एकमेकांच्या कुशीत विसावले
(क्रमशः)

