नाते जन्मा जन्मांतरीचे - भाग ८
नाते जन्मा जन्मांतरीचे - भाग ८
उद्याच्या सकाळ साठी तिघांचे तीन निश्चय होते.
वासंतीला रमा कडे जायचे होते . रमाला अक्षय कडे जाऊन भराभर कामे आटोपून त्याला चुकवायचे होते. अक्षय ला रमाला भेटून तिला सॉरी म्हणायचे होते.
अखेर उद्याचा दिवस उगवलाच. वासंतीने रमा साठी आज जरा जास्त कामं काढून ठेवली. सकाळीच लवकर आन्हिके आटोपून आधी देवळात आणि नंतर रमा कडे जायचे हे ठरवून ती लगबगीने घराबाहेर पडली.
रमा ही सकाळी लवकर उठली . लक्ष्मीला उठवले तिने आणि मला अभ्यास करायचा आहे त्यामुळे मी फक्त पोळ्या करून जाणार आहे , उरलेली कामे तू आटोपून घे . घाईघाईने तिने चटचट कामे आटोपली. बॅग उचलली आणि अक्षय कडे गेली.
घरात एकदम शांतता पाहून तिला जरा आश्चर्य वाटले. तिने पटकन स्वयंपाकघराकडे मोर्चा वळविला. जास्तीची कामे पाहून ती जरा नाराजच झाली. पण घरात शांतता पाहून ती निर्धास्त झाली आणि कामाला लागली.
सवयीने तिने अक्षय साठी चहा केला आणि कालचा प्रसंग विसरून तिने त्याला आवाज दिला. अक्षय जणू ह्याच क्षणाची वाट पहात होता.
तिच्या हाकेसरशी तो स्वयंपाक घरात हजर झाला. तिच्या हातातून चहाचा कप घेताना त्याने तिला हळूच सॉरी म्हंटले. आपल्याच तंद्रीत कामे करता करता तिने चमकून त्याच्याकडे पाहिले. आणि तिच्या मग लक्षात आले , अरे आपण तर ह्याला न भेटता, न बोलता निघून जाणार होतो.
तिला स्वतः चाच राग आला. त्याच्याकडे एक रागाचा कटाक्ष टाकून ती आपल्याच कामात गुंग असल्याचे नाटक करत राहिली.
अक्षय ला समजेना हिने ऐकले की नाही ऐकले ?
ऐक ना रमा , सॉरी ग. मी जरा काल वेड्यासारखं वागलो तुझ्याशी . माफ कर ना . माझी चूक माझ्या लक्षात जरा उशीराच आली. पण तू प्लीज रागवू नकोस ना.
त्याच्या एक एक शब्दागणिक रमाचे मन हेलकावे खाऊ लागले होते. पण त्याला तसे दिसू द्यायचे नव्हते म्हणून ती पाठमोरी उभी राहून आपले काम करत राहीली.
रमा , प्लीज... त्याचा केविलवाणा स्वर ऐकला आणि रमाचा धीर सुटला .
ती तशीच वळून धावतच त्याच्या समोर येऊन उभी राहिली आणि म्हणाली, "बस ना आता . किती वेळा सॉरी म्हणशील ? मी नाही रागावले तुझ्यावर . पण पुन्हा असा नाही वागणार ना? मी तुझ्याशिवाय बिलकुल नाही राहू शकणार. मला वचन दे तुझ्या आयुष्यात माझ्याशिवाय कुणीही असणारं नाही . जर असे काही असेल तर आत्ताच सांग. मी खूप खूप दूर चालली जाईन तुझ्यापासून आत्ताच . कधीच दिसणार नाही मग मी .....
तिचे असे टोकाचे बोलणे ऐकून अक्षय गडबडून गेला .
नको ना ग असे बोलू. वचन देतो तुला. तुझ्याशिवाय मी कोणाचाही विचार करूच शकत नाही . पण रमा माझ्यावर खूप जबाबदार्या आहेत. त्या निभावण्यासाठी मला आधी स्वतः च्या पायावर उभे राहणे भाग आहे. तोपर्यंत माझी वाट पाहशील ना ?
अक्षय जबाबदारी तर माझ्यावर पण आहे. मलाही ती पूर्ण करायची आहे. त्यामुळे तू असा विचार करूच नको. आपण एकत्रितपणे आपल्या जबाबदार्या पूर्ण करू. एकमेकांचा हात कधीही सोडायचा नाही.
सध्या आपण आपला अभ्यास, उद्योग ह्यावरच लक्ष केंद्रित करू . खूप मोठे होऊ. पक्कं प्रॉमीस ... असे म्हणत रमाने हात पुढे केला. हर्षभरीत झालेल्या अक्षयने अलगद तिच्या हातावर हात ठेवला. दोघांनाही आज नव्याने एकमेकांची ओळख होत होती.
कितीतरी वेळ ते शांतपणे तसेच हातावर हात ठेवून उभे होते. रमाच आधी भानावर आली आणि तिने हळूच आपला हात काढून घेतला.
जा तू आता अभ्यास करायला अक्षय. तो चहा ठंडा झालाय , परत गरम करून आणते. असे म्हणून ती काहीच घडले नाही अशा थाटात स्वयंपाकघरात निघून गेली.
अक्षय ही भानावर आला आणि खूप समाधानाने अभ्यास करायला निघून गेला .
वासंती देव दर्शन करून रमा च्या घरी गेली . मागच्या वेळे पेक्षा आज घरातील वातावरण खूपच छान होते. लक्ष्मी आणि तिची आई भावना घरातील कामे आटोपून नुकतेच बाहेरच्या खोलीत येऊन बसल्या होत्या . धाकट्या दोघी अभ्यास करत बसल्या होत्या. तिचे बाबा गप्पा मारत मारत पेपर वाचत बसले होते.
वासंतीचे आगतस्वागत त्यांनी प्रसन्न चेहर्याने केले . इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. आणि अक्षयच्या आईने मूळ विषयाला हात घातला.
आपली मुले आता मोठी झालीत. बारावीची परीक्षा झाली की ते दुसर्या कॉलेज मध्ये जातील . तिथे कोण्या अनोळख्या मुलामुलींच्या सानिध्यात राहतील . कदाचित गुंततील दुसर्या कुणात. त्यापेक्षा आपणच मोठ्यानी त्या दोघांचे लग्न ठरवून ठेवले तर कसे राहील ? दोघेही अनुरूप आहेत एकदुसर्याला . शिवाय त्यांच्या मनात ही हेच आहे असे मला जाणवले.
दोघे स्वतः च्या पायावर उभे झाले की मग लग्न करू त्यांचे.
मला किंवा अक्षयला तुमच्या कडून रमा व्यतिरिक्त काहीही नको आहे. विचार करा आणि कळवा तसे.
भुरे काका काकू अवाक होऊन वासंती कडे पाहत होती.

