नाते जन्मा जन्मांतरीचे - भाग ७
नाते जन्मा जन्मांतरीचे - भाग ७
अक्षय निघून तर गेला पण त्याला आपल्या कृतीची आता लाज वाटू लागली होती. आजवर तो कधीही रमाशी असा वागला नव्हता. त्याचे अभ्यासात ही मन रमेना .
थोडा अभ्यास आणि थोडा विचारांचा गोंधळ ह्यात त्याने कसाबसा एक तास घालवला . पण नंतर त्याचे मन घायकुतीला आले. अभ्यासाचा पसारा कसाबसा आवरून तो स्वयंपाकघराकडे निघाला.
तिथे त्याला आई डब्बे भरताना दिसली . रमाचा कुठे मागमूस ही दिसेना. तो तिथेच घुटमळत राहिला .
आई त्याला म्हणाली , "काय रे , काय शोधतोय? काही हवे का ? "
नाही . काहीच नकोय . ....अक्षय म्हणाला . पण त्याची नजर भिरभिर रमाला शोधत होती.
शेवटी न राहवून त्याने विचारले , "आई , रमा नाही दिसत कुठे ?"
तिचे डोके दुखत होते म्हणून ती गेली घरी.
मी निघाले रे , डबे द्यायला . असे म्हणत आई निघूनही गेली.
अक्षयला आता आपल्या वागण्याचा खूप राग येत होता. रमाशी आपण फारच वाईट वागलो याचा राहून राहून पश्चाताप होत होता. पण उपाय सापडत नव्हता.
तो तसाच किती तरी वेळ बसला राहिला. आई परत आलेली सुद्धा त्याच्या लक्षात आले नाही . आईने हलवून त्याची तंद्री भंग केली तेंव्हा तो जागा झाला.
आई , मी आज रमाशी फारच वाईट वागलो का ग ? सॉरी ग . तिला मुळीच हर्ट करायचा माझा हेतू नव्हता. पण कालच्या तुझ्या वाक्याने मी पार भांबावून गेलो. रमा लग्न करून दुसरीकडे जाईल हा विचारही मी कधी केला नव्हता.
तिच्यापासून दूर राहावे लागेल तर आतापासूनच त्याची सवय करावी हा विचार करून मी तो प्रयत्न करून पाहिला .
पण हा विचारही मला सहन होत नाही. काय करू मी ?
आई ने त्याच्या मोकळेपणावर हळूच हसत त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला त्यामुळे त्याला अजूनच गहिवरून येऊ लागले . आईच्या कंबरेला घट्ट पकडून त्याने आपल्यासाठी अश्रूंना वाटत करून दिली.
वासंतीला जे समजून घ्यायचे होते ते समजले होते. ती त्याला शांत होण्याची वाट पाहात उभी राहिली.
थोड्या वेळात तो शांत झाला . वासंतीने त्याला आपल्या समोर बसविले . ती म्हणाली , "अक्षय , बघ, आज ना उद्या तुझे लग्न हा विषय उद्भवणारच आहे. राधाच्या भविष्याची काहीच खात्री सध्या तरी देता येत नाही.
राधाची जबाबदारी स्वीकार करणारी मुलगी इतर कुठे सापडेल याची काय शाश्वती ?
रमा फार शहाणी मुलगी आहे . तिच्याही मनात कुठेतरी तू आहेस हे मला जाणवतेय. लहानपणापासून आपल्या पाहण्यातली मुलगी आहे ती.
तुमच्या दोघांच्याही मनात काय आहे हे मला जाणून घ्यायचे होते आणि बाहेर तुम्ही इतर कोणात गुंतू नये ह्यासाठीच मी हा विषय मुद्दाम छेडला होता.
अट मात्र अशी आहे, आत्ता तुम्ही दोघांनीही फक्त अभ्यास करायचा , आपल्या पायावर उभे राहायचे आणि योग्य वेळ आली की मग लग्न करायचे.
मी उद्याच तिच्या आईबाबांशी ह्या बाबतीत बोलणार आहे. म्हणजे तिचे बाबा तिच्या लग्नाची घाई करणार नाही.
आता अक्षय बराच शांत झाला होता. रमा आणि मुख्य म्हणजे आईचे मन त्याला कळले होते .
उद्या रमा भेटली की तिला आधी सॉरी म्हणायचे. त्याचे मन लगेच पुढे धावू लागले .
वासंतीला ही आता बरेच मोकळे वाटू लागले होते. आपण योग्य वेळी योग्य पाऊल उचलले याची तिला खात्री पटली .
आता दोघांनाही उद्याची सकाळ केंव्हा होते ह्याची तगमग लागली होती .
तिकडे रमा यंत्रवत सगळी कामे आटोपून लवकर झोपायला निघून गेली. पण खूप प्रयत्न करूनही झोप लागत नव्हती. अक्षयची बिलकूल आठवण काढायची नाही असे ती आपल्या मनाला सारखे बजावत होती. पण घडत वेगळेच होते . त्याची मूर्ती अजून अजून डोळ्यासमोर उभी राहात होती.
उद्या सकाळी लवकर जाऊन भराभर कामे आटोपू आणि त्याला न भेटताच लगेचच कॉलेजला निघून जाऊ असे तिने स्वतःशीच ठरवले.
दुसरे मन लगेचच बंड करून उठले . एव्हडे काय घडले त्यात न भेटण्या सारखे ? मित्र आहे ना तो , त्याला समजून घेतले की सगळे प्रश्न आपोआप मीटतील .
ह्या द्वंद्वात कितीतरी वेळ ती झोपू शकली नाही .
स्वतःशीच भांडत भांडत उशिरा केंव्हा तरी तिचा डोळा लागला.

