संध्याछाया भिवविती हृदया : २
संध्याछाया भिवविती हृदया : २
आता सुखदेव च्या मनात तिची फिरकी घेण्याचे आले. तो म्हणाला , "पाहतो , आई - बाबांचा विचार घ्यावा लागेल. त्यांना तर लांब केसांची , सणवार सांभाळणारी , साडी नेसणारी मुलगी सून म्हणून हवी आहे ".
ती खुदकन हसली . सुख, मी तुझे मत विचारले . आई - बाबांचे नाही.
सुखदेव थोडा ओशाळला.
ह्म्म हिच्या पुढे आपले काहीच चालणार नाही. आपली बाजू सावरत तो म्हणाला , "अग पण मी हो म्हणालो आणि त्यांनी नकार दिला तर ? "
"चल लाव पैज , तुझे आई-बाबा मला नाही म्हणणार नाही".
सुखदेव तिचा आत्मविश्वास पाहून थक्क झाला .
आता नकाराचा काही प्रश्नच नव्हता. त्याचा होकार पदरात पाडून घेऊनच नयन शांत झाली.
तसेही सुखदेवला तिला नकार द्यायचाच नव्हता . त्याने तिथूनच आईला फोन लावला आणि आपला होकार कळविला .
नयन चल आता दर्शनाला फोन लाव. तिला आपण सरप्राईज देऊ. .....सुखदेव म्हणाला .
नयनला ते फारसे रुचले नाही. पण ती सुखदेवच्या होकार ने इतकी सुखावली होती की आत्ता तो जे म्हणेल ते ऐकण्याची तिची तयारी होती .
तिने लगेच दर्शनाला फोन केला .
दर्शु , अग लवकर आपल्या नेहमीच्या हॉटेल मध्ये लगेच ये. तुझ्यासाठी एक मोठ्ठ सरप्राईज आहे. लवकर ये .
तिचा उत्तेजित स्वर ऐकून दर्शना म्हणाली, " अग, हो , हो येते . पण त्यासाठी तुला फोन तर ठेवावा लागेल ना ? "
ठेवते ग...पण तू लवकर ये . बाय... म्हणत नयन ने फोन ठेवला.
आता तिलाही दर्शनाला केंव्हा ही गोष्ट सांगते असे झाले होते. आणि तिला अचानक जाणवले अरे आपण आई बाबांना काहीच कळवले नाही . ते आपल्या फोनची वाट पहात असतील.
सुखदेवला ती म्हणाली , " एक मिनिट हं, मी आईला फोन लावते. ..."
तिने फोन लावला आणि पुढच्याच क्षणी आईने फोन उचलला आणि म्हणाली ,
"काय ग नयु , किती वाट पहायला लावते ? भेटली का तू त्या मुलाला ? कसा वाटला तुला ?
तुझे केंव्हा लग्न ठरते असे झालेय मला .
उगीच काहीतरी बारीकसारीक खोड्या काढू नकोस त्या मुलात .
फोटो वरून तर खूपच स्मार्ट वाटत होता.
शिकला सवरलेला आहे , लठ्ठ पगाराची नोकरी आहे .
फॉरेन मध्ये राहूनही निर्व्यसनी आहे, असे त्या गोखले काकूंनी निर्वाळा दिला आहे. त्यांचा दूरचा नातेवाईकच आहे तो......"
आईने तिला बोलायची एकही संधी न देता प्रश्नांची सरबत्ती चालू केली.
शेवटी नयन म्हणाली , " आई , मला बोलू देते का ? की ठेऊ फोन?.."
आणि आईची सरबत्ती थांबली.
"अग फोन नको ठेऊ . हं सांग तू , काय झाले ते ?"
आईने संधी देताच नयन उत्साहाने बोलली, " आई माझे लग्न ठरले ..."
दोन मिनिटे तिच्या आईला काहीच बोध झाला नाही. जेंव्हा तिच्या लक्षात आले की नयन काय म्हणतेय तेंव्हा जवळपास ती किंचाळली, " अग काय बोलतेस तू ? "
आई, आई, जरा शांत हो तू . ऐक अकोल्याला आपल्या शेजारी पांडे राहात होते आठवताय का तुला ?
हो . त्यांचा मुलगा आणि तू फार मस्ती करायचे . मला तेंव्हा फार राग यायचा तुमच्या दोघांचा . अग पण त्यांचे काय इथे ?
अग तोच सुखदेव पांडे आहे हा .
अगबाई हो का ? त्याच्या प्रोफाईल वर फक्त सुख पांडे लिहिले होते त्यामुळे लक्षात नाही आले माझ्या .
बर पण तुमचे सगळे बोलणे झाले का ? पुन्हा तुझी भुणभुण नकोय मला. जे काही विचारायचे असेल ते आत्ताच बोलून घे .
हो ग आई. मी होस्टेल वर पोहोचली की करते तुला फोन. आत्ता दर्शु आली की मग आम्ही दोघी बरोबरच निघू.
एक सुस्कारा सोडून आईने फोन ठेवला .
नयन ने फोन ठेवत दाराकडे पाहिले आणि तिच्या तोंडावर हास्य फुलले . दारातून दर्शना येत होती.
सुख , बघ कोण आलय ? तिने नजरेनीच दर्शना येत असलेली दाखवले.
सुखदेवनी वळून पाहिले . एक गौरांगना , दाट लांब केसांचा शेपटा वेळावत येत होती. तो स्थिर नजरेनी तिकडेच पहात होता.
नयन ते पाहून जरा गडबडली.
तोवर दर्शना तिथे पोहोचली. नयनने घाईघाईने सुखदेवची ओळख तिचा होणारा नवरा म्हणून करून दिली.
दर्शना हात पुढे करत म्हणाली , हॅलो सुखदेव .
तिचे ते वाक्य ऐकताच नयन आणि सुखदेव दोघेही अवाक् झाले. कारण नयनने अजून त्याचे नाव सांगितलेच नव्हते .
त्यांना तसेच सोडून तिने वेटर ला आवाज दिला.
(क्रमशः)
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

