नाते जन्मजन्मांतरीचे - भाग १
नाते जन्मजन्मांतरीचे - भाग १
"होमली होमली" मोठ्या दिमाखात सोनेरी अक्षरात अक्षय काळेच्या ऑफिसच्या दारावरची पाटी चमकत होती. आजच नव्याने उद्घाटन झालेल्या आपल्या ऑफिसकडे तो केंव्हा पासून अभिमानाने पहात उभा होता .
पहिले पुणे, मग हैदराबाद , त्यानंतर कलकत्ता आणि आता भारताची आर्थिक राजधानी मुंबईत त्याने पाऊल रोवले होते . ही जागा मिळवताना त्याला जीवाचा काय आटापिटा करावा लागला होता हे त्यालाच माहीती होते.
मागच्या सगळ्या घटना त्याच्या डोळ्या समोरून झरझर सरकू लागल्या .
आई - वासंती, बाबा-श्रीधर , तो आणि लहान बहीण राधा असे छोटेसे चौकोनी कुटुंब. बाबा भंडारा येथे एका फर्म मधे क्लार्क होते . खूप भरमसाठ पगार नसला तरी ते जे कमावून आणत , त्यात चौघांचे व्यवस्थित लालनपालन होत असे .
अक्षय सुरवातीपासूनच अभ्यासू वृत्तीचा होता . पहिला नंबर त्याने कधीच सोडला नव्हता . बाबांचा प्रामाणिकपणा आणि आईचा समजूतदार, मायाळू स्वभाव ही त्याला मिळालेली देवदत्त देणगी होती. त्यामुळे तो आजूबाजूच्या सर्वांचांच लाडका होता .
त्यांच्या घराच्या बाजूलाच एक भुरे काकांचे कुटुंब राहत होते. भुरे काका, भावना काकू, काकांची आई कमला आजी आणि त्यांच्या पाच मुली . आजीला नातू हवा होता , नव्हे त्यांचा हट्टच होता मुलगा हवाच . त्यापायी कुटुंबाचा विस्तार फारच मोठा झाला होता.
आजी नातू नातू करत दिवंगत झाल्या .
एकापाठोपाठच्या बाळंतपणामुळे भावना काकूंची तब्येत तोळामासा झालेली. महिन्यातून तीन चार वेळा तरी डॉक्टरची फेरी चालूच असायची .
त्यामुळे काकांचा पगार आणि खर्च ह्यांचे नेहमीच व्यस्त प्रमाण राहत गेले. खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी ते नेहमीच कुठून ना कुठून हात उसने पैसे घेत रहात. एकाचे कर्ज फेडण्यासाठी पुन्हा दुसर्या कडून कर्ज - ही न संपणारी मालिका , वाढते खर्च , वाढत्या जबाबदार्या ह्या सर्वानी कावलेल्या काकानी नकळतपणे दारूचा सहारा घेतला.
त्यामुळे काका - काकूंचे भांडणे विकोपाला जाऊ लागली . मुली भेदरून जायच्या. मोठी रमा , लक्ष्मी , स्वरा, स्वधा आणि धाकटी सुधा एकमेकींना चिटकून कोपर्यात थरथरत उभ्या राहत.
अक्षय आणि रमा एकाच शाळेत एकाच वर्गात होते . रमा आणि तो बरोबरच शाळेत जात. रमाच्या घरच्या परिस्थितीची अक्षयला पूर्ण जाणीव होती . त्यामुळे शाळेतून येता जाता तो रमा कडून अभ्यास करून घेत असे . रमा हुशार होती . अक्षयच्या मदतीमुळे ती ही वर्गात पहिल्या पाचात येत असे.
अक्षयच्या परोपकारी स्वभावामुळे रमा नेहमीच ऋणी राहत होती तर रमाच्या साध्या, मितभाषी स्वभावामुळे अक्षयला ती भारी आवडायची .
लहानपणीच त्यांच्या मैत्रीची गाठ पक्की बांधल्या गेली होती.
नियतीला सर्वच गोष्टी सुरळीतपणे चालू असलेल्या कसे बघवेल?
अक्षय आठवीत होता आणि राधा - त्याची लहान बहीण जेमतेम दोन वर्षाची . राधा अजून स्पष्ट बोलायलाही शिकली नव्हती. खेळता खेळता अंगणात गेली . उड्या मारता मारता तोल जाऊन पडली.
अंगणातील अणकुचीदार गिट्टीमुळे डोक्याला खोलवर खोक पडली. रक्ताची मोठी धारच लागली . राधाला धड उठता ही येईना आणि बोलताही येईना. त्यामुळे बराच वेळ ती तशीच पडली राहिली .
थोड्या वेळाने कामात मग्न असलेली आई मुलीला शोधत बाहेर आली आणि राधाला रक्ताच्या थारोळ्यात पाहून जोरजोराने मदतीसाठी ओरडा करू लागली.
त्यावेळी राधाचे बाबा ऑफिस मध्ये तर अक्षय शाळेत गेला होता. शेजाऱ्यांच्या मदतीने आईने राधाला जवळच्याच डॉक्टरांकडे नेले. बरेच रक्त वाहून गेल्यामुळे ती बेशुद्धावस्थेत गेली होती.
डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले आणि तिला पुढच्या उपचारासाठी नागपूरला मोठ्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्याचा सल्ला दिला. घाबरलेल्या वासंतीने तिथूनच श्रीधरला फोन करून सविस्तर माहिती दिली .
श्रीधर धावत पळत डॉक्टर कडे आला . तातडीने त्याने नागपूरला जायची तयारी केली . अक्षयला अर्ध्यातुनच शाळेतून येऊन जावे लागले.
पंधरा दिवसांच्या प्रदीर्घ उपचारानंतर डॉक्टरांना राधाला वाचवण्यात यश मिळाले. पण उपचार उशिरा मिळाल्यामुळे राधाची दृष्टी अधू झाली होती आणि मेंदूलाही धक्का पोहोचल्यामुळे ती कितपत सामान्य जीवन जगू शकेल ह्यात डॉक्टरांना शंका होती .
हसत्या खेळत्या घराला कोणाची दृष्ट लागली ? ह्या घटनेमुळे अक्षयच्या बाबांनी धसका घेतला आणि सहा महिन्यांत इहलोकीची यात्रा संपविली.
अक्षय नकळतपणे मोठा झाला . दुःखाने पिचलेली आई , भविष्य हरवलेली बहीण ह्यांचा सांभाळ कसा करायचा ह्या विचाराने तो अस्वस्थ झाला . साठवलेल्या गंगाजळीला गळती लागली. तासनतास तो विचारात गढलेला राहू लागला.
त्याच्या ह्या अडचणीच्या वेळी रमा धावून आली. ती परोपरीने अक्षयची समजूत काढत असे . त्याला जबाबदारी निभावण्यासाठी अभ्यास करण्याची किती गरज आहे हे जाणवून देत असे.
हळूहळू वासंती ही दुःखातून सावरू लागली होती. मुलांना मोठे करण्यासाठी हातपाय हलविणे भाग आहे हे तिला कळून चुकले होते.
अशा एकट्या गृहिणीला उभे राहण्यासाठी स्वयंपाक घराने नेहमीच साथ दिली आहे. वासंतीने हेच केले . सुगरण तर ती होतीच . आता पडलेल्या जबाबदारीने तिला अजूनच नीटनेटके बनवले. तिने घरगुती खानावळ चालू केली.
एक एक म्हणता म्हणता हळूहळू तिचा जम बसू लागला. अक्षय ही तिला जमेल तशी मदत करू लागला. अडीअडचणीला रमा हातभार लावत असे.
रमा आणि अक्षय अभ्यास जोमाने करत होती . एकमेकांच्या कामात मदतही करत होती. एकमेकांच्या भावंडांना सांभाळत होती. आणि एकमेकात नकळतपणे गुंतत होती.
(क्रमशः)

