नाते जन्मा जन्मांतरीचे - भाग ६
नाते जन्मा जन्मांतरीचे - भाग ६
आईचे वाक्य ऐकून अक्षय जरा गडबडला . मनात कुठेतरी जाणवले की हा विचार आपल्याला का अस्वस्थ करतोय ? रमाचे लग्न? ती दुसर्या कोणाची तरी बायको ? त्याला हा विचार झेपेना . किंबहुना हा विचार त्याने कधीच केला नव्हता . ती कायम आपल्याच बरोबर राहणार हे त्याने सोईस्करपणे गृहीत धरले होते. आपल्याला जे वाटते तेच रमाला वाटत असेल का ?
इकडे रमा ही अस्वस्थ होती . वासंतीचे बोलणे ऐकून तीही विचारात पडली. लग्न ? ह्याचा विचार तर आपण केलाच नाही . आजवरच आयुष्य शाळा, अभ्यास, अक्षयची मैत्री, त्याच्या अडचणी , आपल्या अडचणी ह्या भोवतीच फिरत होते . दुसरा कोणताच विचार मनात आलाच नाही.
हं फक्त त्यादिवशी जेंव्हा त्याच्या गळ्यात पडून ती रडली होती त्या दिवसापासून मनाचा एक कोपरा फक्त अक्षय साठी तिने राखून ठेवला होता.
वासंतीच्या त्या वाक्याने मात्र अक्षयचा त्या दृष्टीने विचार करायला आपसूकच चालना मिळाली होती.
वासंती हे बोलून तर गेली . पण आपण योग्य केले का ? हा विचार तिला स्वस्थ बसू देईना.
बाहेरच्या जगाची तिला कल्पना होती. हेच वय निसरडं आहे हे पण ती जाणून होत्या . आपली पोरं शहाणी आहेत ह्या बद्दल तिला पूर्ण विश्वास होता. पण त्यांचे मन आपल्याला कळले तर बरे ह्या विचाराने तिने शांत डोहात खडा टाकून पाहिला होता.
खरं म्हणजे वासंतीला रमा फार आवडायची . तिचे नीटनेटके राहणे , तिची अभ्यासू वृत्ती, कामातला टापटीपीतपणा , परिस्थिती आणि लोकांशी जुळवून घेण्याचा तिचा स्वभाव सारे सारे तिला आवडायचे. पण जोपर्यंत ती दोघेही स्वतः च्या पायावर उभी राहात नाही तोपर्यंत असा विचार करणेही अयोग्य होते. पण ती दोघे बाहेर कुठे गुंतण्यापेक्षा एकमेकांचा विचार करतील तर बरे असे तिला वाटले .
अक्षय नेहमीच सगळ्या गोष्टी आईशी मनमोकळेपणाने बोलत असे. पण का कुणास ठाऊक ह्या बाबतीत आईशी कसे बोलावे हे त्याला कळत नव्हते . सध्या आपण शांतच रहावे असे त्याने ठरविले . तसेही आपल्याला रमाचे मन अजून कुठे कळले आहे ?
परीक्षा जवळ आली आहे. आता आधी लगीन परीक्षेचे . असा विचार करून तो शांतपणे झोपेच्या आधीन झाला.
सकाळी लवकर उठून त्याने आपले वेळापत्रक बनविले आणि त्यानुसार तो जोमाने अभ्यासाला लागला. जितके शक्य होईल तितके रमाच्या समोर जायचे नाही असे त्याने ठरविले . नाहीतरी आता दोघांच्याही कॉलेजला प्रीपरेशन लिव्ह सुरू झाल्या होत्या . अभ्यास एके अभ्यास , बस दुसरा विचार नाही आता.
रमा घरचे काम आटोपून वासंती कडे आली. नेहमीप्रमाणे कामे करता करता ती अक्षयचा कानोसा घेत होती. बराच वेळ तो दिसला नाही आणि मग तिची तगमग सुरू झाली. कुठे गेला हा ? विचारू का काकूला ? योग्य राहील का असे विचारणे?
अचानक तिच्या लक्षात आले , अरे ह्यापूर्वी आपल्याला असे प्रश्न कधीच पडले नव्हते. अक्षय बद्दल आपण काकूंशी बिनधास्त बोलत होतो . आताच काय झाले आपल्याला ?
आपल्याच प्रश्नांचे उत्तर आपल्याला मिळत नाही म्हणून ती गोंधळून गेली होती.
आणि तिच्या चेहर्यावरचा गोंधळ पाहून वासंती गालातल्या गालात हसत होती.
शेवटी वासंतीनेच ह्यावर तोडगा काढला आणि म्हणाली , " रमा अग मी चहा करतेय, अक्षयला जरा आवाज देशील ? "
मग काय हवी असलेली संधी आपसूकच मिळाली तिला.
पण हे वासंती च्या लक्षात येऊ नये म्हणून ती उगीचच कामात बिझी आहोत असे दाखवत होती.
वासंतीला तिची गम्मत करावीशी वाटली . आवाजात जरा राग आल्याचा आव आणतं तिने म्हंटले , "अग जातेस ना ?"
बिचारी रमा ...
ती घाबरून म्हणाली , "हो हो काकू, हे काय मी निघालीच .."
आणि पळतच जाऊन तिने अक्षयला आवाज दिला.
तिची धांदल पाहून वासंतीला हसू आवरेना . त्यामुळे गोंधळलेली रमा विचारात पडली.
हे काय ? काय झाले काकूंना ? क्षणात रागावतात, क्षणात हसतात?
वासंती तिच्या जवळ येऊन म्हणाली, "अग , किती घाबरतेस ? मी काय वाघोबा आहे ? जरा गम्मत केली तर धांदरते ?"
अक्षयने आत येता येता नेमके शेवटचे वाक्य ऐकले आणि म्हणाला , " काय झाले ?"
आईने केलेली गम्मत त्याला सांगितली.
ह्म्म. बस येवढेच बोलून त्याने चहाचा कप उचलला आणि निमूट चालला गेला.
आई आणि रमा अवाक् होऊन पाहतच राहिल्या .
रमाचे डोळे पाण्याने डब्ब भरले . वासंतीला रमाच्या मनातली गोष्ट कळली पण तसे न दाखवता तिने हळूच रमाला जवळ घेतले आणि रमाने आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली .
(क्रमशः)

