न हरवता गवसते जेव्हा
न हरवता गवसते जेव्हा
५ सप्टेंबर ... माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वाढदिवसाच्या अवचित्त्याने साजरा केला जाणारा शिक्षक दिन ! सप्टेंबर महिना सुरू झाला की हे वेध लागतातच. शाळेत त्यादिवशी येणारे नवे नवे छोटे एकदिवसीय शिक्षक, कधी त्यांची शिकवताना उडणारी तारांबळ, एखाद्या शिक्षक बनून आलेल्या दादा किंवा ताईने घेतलेला छानसा तास इथून आठवणींची आगगाडी निघते ती अगदी आपण असे छोटे शिक्षक झालो होतो त्या आठवणींच्या स्टेशन पर्यंत पटापट येऊन पोहोचते... समाजाच्या निर्माणकर्त्याचे आपल्यावर असणारे ऋण व्यक्त करण्यासाठी केले जाणारे हे छोटेसे निमित्त! आणि या निमित्ताने आजच्या एखाद्या आदर्श पुरस्कार मिळालेल्या शिक्षकाला अचानक त्याच्या मनातले आदर्श शिक्षक अनेक वर्षांनी भेटावे म्हणजे जणू दुग्धशर्करा योगच!
सांगायचं कारण म्हणजे, काल पेपर मध्ये वाचण्यात आले की आमच्या शाळेतल्या गणिताच्या शिक्षकांना यंदाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालाय! त्रिकोणमितीच्या आगमनाने आयुष्याचे तीन-तेरा वाजण्याच्या काळात ज्यांनी 'गणित म्हणजे गम्मत गाणी , सूत्रे त्यांची सप्त तराणी' असा नवीन सूर आळवायला शिकवले ते हेच शिक्षक!! सायंकाळीच त्यांना शुभेच्छा द्याव्या म्हणून घर गाठले. पण सर... ते नव्हतेच, थोड्या वेळाने आले, काही वेगळ्याच उत्साहात, आल्या आल्या भरभरून बोलू लागले... आणि मी निशब्दपणे ऐकत राहिले, माझ्या शिक्षकाला त्याच्या आतील पुन्हा गवसलेल्या शिक्षकाचे मनोगत....
"खरं सांगू, आज मी खूप खुष आहे... त्यापेक्षा जास्त खरं तर मी खूप भाग्यवान समजतोय स्वतःला, या जाहीर झालेल्या पुरस्कारामुळे नाही बरं ! तर आज मला पाठीवर मिळालेल्या आशीर्वादाच्या थापेमुळे. कोणाला सांगितले तर खोटंसुद्धा वाटेल... पण योगायोग म्हणत असावेत ते कदाचित यालाच! काही कामानिमित्त दुपारी बँकेत गेलो होतो... माझ्या मागे एक वयस्क आजोबा आपल्या नातवासोबत माझ्या मागे उभे होते. मी फारसे मागे लक्ष नव्हते दिले. अचानक कानावर आवाज आला... 'अरे लबाड्या... पळू नकोस इकडेतिकडे हरवाशील बरं' तो अरे लबाड्या फारच जवळचा शब्द वाटला... अनेक वर्षांनी कानावर पडलेला, पण अजूनही त्याची ढब तशीच होती... फक्त आवाज काहीसा कातर झालेला होता इतकंच! ते... ते माझे लेले सर होते! मला निमिषार्धात ते ओळखू आले, मी मागे वळून पाहिले. अजूनही पांढरा शुभ्र लेहेंगा आणि डोक्यावरची गांधीटोपीची त्याची ऐट तशीच होती. फक्त वयोमानाने हातातल्या वेताच्या छडीचे सागवानी काठीत रूपांतर झाले होते इतकेच! पण बोटांची तिच्यावर असणारी पकड... ती अजूनही तशीच होती. त्या हातातल्या काठीचे फटके कायम आमच्या शाळेचा फळाच खायचा! आमच्या पैकी कोणीही ते खाल्लेले स्मरणात नाहीत. अतिशय प्रेमळ होते लेले सर! मी तिथेच सारे विसरून त्यांच्या पाया पडलो. अनेक वर्षांनी गाठ झाली, पण त्यांनी देखील मला लगेच ओळखले. बँकेतले काम पटकन आटोपून आम्ही दोघे निघालो.
जवळच होते त्यांचे घर...मोठ्या आग्रहाने त्यांनी मला घरी नेले. मला पुन्हा एकदा सातवीत गेल्यासारखे वाटत होते. मी तेव्हा पहिल्यांदा शिक्षक झालो होतो (तोच...शिक्षक दिनाचा लुटुपटूचा शिक्षक) आणि पहिल्यांदा त्या भूमिकेची असणारी जबाबदारी, अदब याचा छोटासा अनुभव घेतला होता. लेले सरांसारखे शिकवायचे असे ठरवून गेलो होतो वर्गात... आणि त्या नंतर जणू ध्यासच घेतला शिक्षक होण्याचा. शाळेतल्या प्रत्येक मुलासाठी शिक्षक म्हणजे जणू आदर्शाचा एक विश्वकोश असतो. आमच्यासाठी लेले सर अगदी तसेच होते, आजतागायत आहेत. मघाशी म्हटलो तसा अंगात पांढराशुभ्र लेहेंगा, डोक्यावर गांधी टोपी आणि हातात वेताची काठी घेऊन यायचे सर वर्गात. माझे शालेय शिक्षण गावीच झाले. पाचवीला आम्ही पंचक्रोशीच्या शाळेत गेलो. मी नेहमीच या शाळेबद्दल,इथल्या शिक्षाकांबद्दल माझा मोठ्या भावांकडून आणि मित्रांकडून ऐकत आलेलो होतो. मुख्याध्यापकांपासून ते नाना शिपाई पर्यंतचा सर्व स्टाफ ओळखीचाच होता. शाळेत शिकत असताना बऱ्यापैकी सर्वांनाच गणित हा सर्वात कठीण विषय वाटत असतो. असा कठीण ,भयंकर ,भीतीदायक विषय शिकवणारे शिक्षक म्हणजे आमचे लेले सर. हे आमच्या शाळेतील कार्यक्षम आणि सक्रिय असे शिक्षक होते ज्याला आपण 'हाडाचे शिक्षक' म्हणतो ना तसे! एक शिक्षक म्हणून ते गणित हा विषय फार आवडीने, सोपा करून शिकवत असत. त्यामुळेच मला गणिताची कधी भीती वाटली नाही. लेले सरांचा अभ्यासक्रम नेहमी परीक्षेच्या किमान २ आठवड्यापूर्वी शिकवून व्हायचा आणि त्यानंतर सुरु व्हायचं उजळणी सत्र. या २ आठवडे उजळणी सत्रामधे आमच्या खेळण्यावर बंदी असायची. त्यात भर म्हणजे सर शेजारच्या गावचे असल्यामुळे रोज फेरफटका मारायचे गावातून. त्यामुळे एक आदरयुक्त भीती होती मनात. पण सरांचं शिकवण आणि उजळणी सत्र याच फलित म्हणजे मला नेहमी गणितात पैकीच्या पैकी गुण पडायचे,मग ती घटक चाचणी असो किंवा सत्र परीक्षा असो. 'ग - गणिताचा आणि गणित विषय गमतीचा' हे त्यांच्या शिकवण्यामुळे पटायचं.
माझ्या शिक्षक विशेषतः गणिताचा शिक्षक होण्यामागे सरांचा वाटा सिंहाचा आहे. "सकाळीच तुला आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याचे वाचले, नाव काढलेस बाळा शाळेचे, खूप खूप अभिमान वाटला मला." सरांच्या बोलण्याने माझी विचारांची साखळी किंचित मोडली. काहीच सुचत नव्हते, अजूनही सरांना आपण इतके स्पष्ट लक्षात होतो हे ऐकून खूप समाधान वाटले, हळूच मी त्यांच्या पायाशी बसलो. खूप भरून आले होते मन, त्यांचेही डोळे भरून आले. जेव्हा मी शिक्षक होण्याचा निर्णय घेतला होता तेव्हादेखील मी असाच त्यांच्या पायाशी बसलो होतो. आजही स्पष्ट आठवतात तेव्हाचे सरांनी दिलेले ते बाळकडू. सर सांगत होते, 'विद् म्हणजे जाणणे, जो खूप जाणतो तो विद्वान. शिक्षक इतर बाबतीत विद्वान असो वा नसो आपल्याला जे शिकवायचे आहे त्या विषयात तो विद्वान असलाच पाहिजे. आपल्या विषयाच्या अनुषंगाने नवनीवन ज्ञान मिळवून, विभिन्न शैक्षणिक साहित्याचा अवलंब करून आपले ज्ञान विद्यार्थ्यांना दिलेच पाहिजे. आपली तासिका प्रसन्न चित्ताने शिकविण्यासाठी खर्च करशील तर नक्कीच विद्यार्थीप्रिय शिक्षक होशील. या उमलत्या कळ्यांमधील आंतरिक शक्तींचा स्फुल्लिंग शिक्षकांनी चेतविला पाहिजे, आणि विद्यार्थीमय झाल्याशिवाय हे साधत नाही. चांगला विद्यार्थीनिष्ठ शिक्षक हा सहवासातून, संवादातून, आचरणातून, चारित्र्यातून मनाची श्रीमंती असलेला कर्तबगार विद्यार्थी घडवू शकतो. शिक्षण प्रक्रियेत शिक्षक व विद्यार्थी हे दोन महत्त्वपूर्ण घटक असून त्यांचा एकमेकांवर सतत परिणाम होत असतो. शिक्षकांच्या विचारातील सकारात्मकता, आशावाद, मुलांना जगण्याचे बळ देतो. शिक्षणाचं सौंदर्य शिक्षकात लपलेलं असतं. कारण विषयातली रुची निर्माण होणं सर्वस्वी त्याच्या अध्यापन शैलीवर अवलंबून असते.'
आज याच मौल्यावान शब्दांमुळे, एक 'शिक्षकप्रिय विदयार्थी' 'विद्यार्थिप्रिय शिक्षक' बनून त्याच्या शिक्षकांच्या चरणाशी लीन झाला होता. सेवानिवृत्तीनंतर सर आपल्या मुलाकडे राहायला गेले इतकेच कळले होते, पण गेल्या अनेक वर्षात काहीही संपर्क होऊ शकला नव्हता. आणि आज त्यांच्याकडून घेतलेल्या बाळकडूने मी यशोशिखर सर करत असताना त्यांचे अचानक मला भेटणे याच्याइतके भाग्याचे आणि आनंदाचे दुसरे काय असणार! मन इतके भरून आले होते, की शब्द त्यात विरघळून जात होते. मी सरांना माझ्या आजतागायतच्या संपूर्ण प्रवासविषयी सांगितले. नकळत मी बोलता बोलता सद्य परिस्थिती, विद्यार्थ्यांची शिक्षकांकडे आणि शिक्षणाकडे बघण्याची बदलत असलेली मानसिकता यावर भाष्य, खरे तर निषेध व्यक्त करू लागलो. या क्षणी सरांनी जे सांगितले त्यामुळे 'गुरुः साक्षात परब्रह्म' का असतो याचे उत्तर मला सहज मिळाले. लेले सर अत्यंत शांतपणे सांगू लागले, 'आजचे युग हे संगणकाचे युग आहे. कुठलेही नवे प्रभावी शिक्षण हे माहिती व तंत्राधिष्ठीत आहे. त्यामुळे आजच्या शाळांमधून परिक्षार्थी तयार करण्यापेक्षा खरे ज्ञानाकांक्षी, विवेकनिष्ठ प्रयोगवीर तयार होण्यासाठी शाळेला साक्षात प्रयोगशाळेचे स्वरूप द्या. काळानुसार शाळांचे आणि अध्यापन तंत्राचे स्वरूप अद्ययावत करा. जेव्हा विद्यार्थ्यांचे कुतूहल शैक्षणिक प्रासादामध्ये शमू लागते, तेव्हा नकळत त्याची शिक्षणाविषयी, शिक्षकांविषयीची ओढ आणि निष्ठा वाढीस लागते. शिक्षकांचे वक्तीमत्व जेवढे प्रभावी, परिणामकारक, ज्ञान समृद्ध असेल तेवढे ते विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असते. आजची आव्हाने आणि भविष्यातील समस्या यांना सामारे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे हे शिक्षकांनी आपले ध्येय समजले पाहिजे. शिक्षकांनी मुळात स्वतःला घडविण्याची, उत्तुंगतेची आस प्रथम ठेवली पाहिजे. कारण स्वतःमधील उणिवा जाणीवपूर्वक दूर करणारा शिक्षकच आपले अध्यापनाचे कार्य अधिक प्रभावी, रंजक आणि सुलभपणे करू शकतो' लेले सरांकडून आजही मी त्याच निरागासतेने बाळकडू घेत होतो. शिक्षकाने कालसुसंगत असावे हे ते केवळ सांगत नव्हते, तर त्याच्या बोलण्यातून, दिल्या जाणाऱ्या उदाहरणांतून 'बोले तैसा चाले' याचे मला प्रत्यंतर येत होते. आज जणू नव्याने मी माझ्याच लाडक्या लेले सरांना भेटतोय की काय असे मला वाटून गेले... तिथून बाहेर पडताना, पुन्हा नव्याने बाळकडू घेऊन मला एका नव्या पर्वसाठी सज्ज झालो... लेले सरांमध्ये नव्याने गवसलेल्या शिक्षकाला माझ्या अंतरंगात रुजवत नवी वाट चालू लागलो.
