एक धागा सुखाचा!
एक धागा सुखाचा!
दिवाळी जवळ आली होती. तुटपुंज्या खर्चात सण साजरा करावा म्हणून त्याची बायको आटापिटा करत होती. तिच्या उत्साही , कष्टाळू स्वभावाचे त्याला फार अप्रूप वाटे. त्याचे नाव हरि, आणि ती लक्ष्मी! अगदी नावाप्रमाणे होती ती! आयुष्यात आली त्या दिवसापासून शुक्ल पक्षातल्या चंद्रासारखी रोज कलेकलेने त्याची भरभराट होत होती. घरात ओसंडून पैसा वाहात नसला तरी खाऊन पिऊन दोघे सुखी होते. संसारवेलीला सौंदर्य बहार करणारी छोटीशी मुलगी होती दोघांची. तिच्या बाललीला बघणे हाच काय तो त्यांचा विरंगुळा असे. तिला सुशिक्षित आणि स्वयंपूर्ण बनवणे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते. कितीही कष्ट पडले तरी मुलीसाठी ते सहन करण्याची त्यांची तयारी होती. तिची पहिलीच दिवाळी होती. त्यामुळे शक्य तितकी थाटामाटात ती त्यांना साजरी करायची होती. अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली होती आता दिवाळी, त्यामुळे आज तरी खरेदीला जाणे आवश्यक होते. लक्ष्मीने सकाळी उठल्याउठल्या आठवण दिली.
सायंकाळी लवकर येतो मग खरेदीला जाऊ असे सांगून तो जरा लवकर कामासाठी बाहेर पडला. त्याने रोजच्यासारखी स्वच्छ कपड्याने आपली रिक्षा पुसली. 'जय हरि विठ्ठल!' म्हणत त्याने दिवसाला सुरुवात केली. रोजच्या रिक्षास्टॅण्डवर जाऊन उभा राहिला. गेल्या दहा वर्षांपासून त्याचा हाच शिरस्ता होता. हजारो माणसे पहिलीत त्याने या काळात! कधी जीवाची मुंबई करायला येणारी तर कधी या माणसांनी गच्च भरलेल्या जागेतून स्वतःची सुटका करून घेऊ पाहणारी. निवांतपणे आलेले ग्राहक विरळेच. प्रत्येक जण घडाळ्याच्या काट्याला बांधलेला असे. त्याच बंधनाच्या धाकात काही क्षण हरिच्या रिक्षेतून प्रवास करता करता विसावणारे... प्रत्येकाला सुखरूपपणे अपेक्षित स्थळी नेऊन सोडण्याचे काम हरी मनापासून करत असे. आता तर दिवाळी आली होती. मुळात चोवीस तास प्रफुल्लित असलेल्या मुंबापुरीत नवा उत्साह संचारला होता. रिक्षास्टॅन्डवर पोहोचताच मागून आवाज आला, "रिक्षा भाड्याने मिळेल? दिवसभरासाठी हवीय"
प्रश्न ऐकताच त्याच्या मनात आनंदाची एक लकेर उमटली आणि भीतीचीही! त्याने मागे वळून पाहिले, शुभ्र झब्बा-पायजमा घातलेला, साधारण चाळीशीचा एक माणूस खांद्यावर शबनम लटकवून उभा होता. त्याच्या ओठांवर मंद स्मित होते आणि चेहऱ्यावर तेज. त्याच्या नजरेत आपुलकी होती. हरिच्या दिवसभराच्या मीटरनुसार जो भाव होईल तो द्यायला तो तयार झाला. वरून शंभर रुपये देण्याचेही कबूल केले त्याने. हो-नाही करत हरि तयार झाला त्याला घेऊन जायला. मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जायचे होते त्याला, संबंध दिवस लागणार होता जवळपास! एवढे मोठे गिऱ्हाइक बोहोनीलाच मिळत असेल तर नाही कोण म्हणणार? पण हरीच्या मनात मात्र विचारांचे मोहोळ उठले होते आणि भीतीने पोटात मोठ्ठा खड्डा पडला होता. कारणही तसेच होते.
रिक्षा सुरू झाल्याबरोबर त्या माणसाच्या गप्पा सुरु झाल्या. फारच बोलका होता तो! घरी कोण कोण असते हरीच्या इथपासून त्याने चौकशी सुरू केली. त्याच्या बोलण्यावरून असे जाणवत होते की पूर्वी मुंबईत बराच काळ वास्तव्य केले असावे त्याने. हरि तसा मुळात अबोल स्वभावाचा! त्यात गिऱ्हाईकाशी बोलणे त्याला अजून ठाऊकच नव्हते. पण या माणसाच्या सततच्या बडबडीने त्यालाही काहीसे बोलते केले. जुजबी उत्तरे देऊन तो गप्प बसत होता. मनात विचार चालू होते. 'हा आपल्याला फसवणार तर नाही ना? पैसे देईल ना सगळे? मोठे गिऱ्हाईक समजून घेतले आणि काल सारखे पुन्हा तोंडघशी पडलो तर नाही परवडणार आज' हरि आपल्याच तंद्रीत रिक्षा चालवत होता. बिचारा अजूनही संभ्रमातच होता. कारण काल घडलेला प्रसंगच तसा होता. काल कामावर आल्या आल्या त्याला असेच मोठे गिऱ्हाईक मिळाले होते. बघून श्रीमंत घरचा वाटत होता. त्याने लांब लांब पर्यंत फिरवले. एका ठिकाणी गाडी थांबवायला लावली. दोन मिनिटात येतो असे सांगून तो गेला.... तर परत आलाच नाही. पुढचा जवळपास तासभर हरी त्याची वाट पाहत होता. चौकशी केल्यावर आसपासच्या लोकांनी त्याला निघून जाण्याचा सल्ला दिला. बिचारा हरि फार फार हिरमुसला. आपण फसवले गेलो आहोत या जाणिवेने त्याला खूप दुःख झाले. दहा वर्षांपासून रिक्षाचालक असणाऱ्या हरिसोबत असे कधीच घडले नव्हते. ऐन दिवाळीच्या आधी हातावर पोट असणाऱ्या माणसाला अशा प्रसंगाला सामोरे जाणे फार क्लेशदायक असते. बिचारा तसाच नवे गिऱ्हाईक शोधायला निघाला. सकाळचा धंदा गेला, इंधनाचे नुकसान झाले ते वेगळे! रात्री परतल्यावर त्याला जेवणही गेले नाही. राहून राहून त्याला वाटले... एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे... जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे...
" गाणी सुंदर लावली आहेस, जरा आवाज वाढवा ना त्याचा, मलाही ऐकू येतील" त्या माणसाने मागणी केली.
'वाढवा!' हरि अचंबितच झाला. एक तर त्याला बऱ्याचदा कोणीही सहज एकेरीच हाक मारत असे. दुसरे म्हणजे त्याने लावलेल्या गाण्यांना अशी प्रतिक्रिया क्वचितच मिळे, सहसा बंद करायला लावले जाई किंवा बदलायला. कारण जुनी गाणी आता कोणालाही आवडत नाहीत. हरिने आवाज वाढवला.
"व्वा!! आताशा अशी गाणी ऐकायला सुद्धा मिळत नाहीत हो!" तो माणूस अतिशय आनंदी होऊन म्हणाला. पण हरिचे त्याकडे लक्षच नव्हते. गाण्याच्या लयीसोबत तो पुन्हा विचारात गढून गेला होता. आपल्या सचोटीने केलेल्या कामाची जणू देव परीक्षा बघतोय की काय असे त्याला वाटत होते. खरे तर जन्मापासून त्याच्याच कृपाछायेत होता तो! आई-वडील म्हणजे काय हे त्याला कधी ठाऊक नव्हते. अनाथालयात वाढला, माणसाने माणूस म्हणून प्रत्येकाशी वागावे हीच शिकवण आश्रमात अप्पांकडून त्याला मिळाली. बारावी पर्यंतचे शिक्षणही मिळाले. वयाची अठरा वर्षे ओलांडताच त्याने अप्पांवरील भार कमी करण्याचे ठरवले. एक रिक्षा भाड्याने घेतली आणि ती चालवून कमाई करू लागला. नशिबाने रिक्षा मालकही प्रेमळ होता. कष्टाळू हरिच्या या सचोटीचे चीज न व्हावे तरच नवल होते! पुढचे तीन-चार वर्षे अशीच गेली. पैसे जमवून त्याने स्वतःची रिक्षा घेतली. दरम्यानच्या काळात त्याची लक्ष्मीशी भेट झाली. लक्ष्मी त्याच्या रिक्षा मालकाची मुलगी होती. खरे तर हरिने स्वतःची रिक्षा घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा मालकाने स्वतःहून लक्ष्मीसाठी त्याच्यापुढे प्रस्ताव ठेवला. अप्पांच्या परवानगीने आणि लक्ष्मीच्या संमतीने दोघांचा विवाह संपन्न झाला. लक्ष्मी खरोखरच लक्ष्मीसारखी त्याच्या आयुष्यात आली. ती मनापासून निगुतीने त्याचा संसार करत होती. त्यामुळे लवकरच छोटेसे का असेना पण दोघांनी स्वतःचे घर घेतले. आणि यंदा तर त्यांच्या लाडक्या लेकीची पहिली दिवाळी होती! तिच्या आठवणीने हरीच्या ओठावर स्मित उमलले.
"थांबा, थांबा थांबा!! इथे जरा थांबा" हरि भानावर आला.
"आलोच मी दोन मिनिटात" आता त्याच्या पोटात पुन्हा खड्डा पडला. पण यौ काहीच बोलला नाही. मनातल्या मनात विठ्ठलइच्छा असे म्हणून थांबला. तो माणूस उतरला. समोर असलेल्या मिठाईच्या दुकानात गेला. आणि पाच मिनिटात परत आला. एव्हाना दुपारचा एक वाजत आला होता. "पुढच्या वळणावर एक हॉटेल आहे, तिथे मला उतरावा" तो माणूस पुन्हा रिक्षात बसता बसता बोलला. निमुटपणे हरि निघाला. त्या माणसाने सांगितले त्या ठिकाणी त्याने गाडी थांबवली आणि मीटर चेक करू लागला. "अहो अजून मला पुढे जायचे आहे, तुम्हीच सोडणार आहात मला. पण सकाळपासून माझ्यासाठी फिरताय, या जरा चार घास खाऊया." हे वाक्य ऐकून हरि आवाक झाला.
"नाही साहेब, मी डब्बा आणलाय... तुम्ही जाऊन या, मी इथेच खाईल" हरि विनम्रपणे बोलला.
पण त्या माणसाने अतिशय आग्रहाने आणि आदराने त्याला नेलेच. त्याला आपल्या बरोबरीने खायला बसवले. आग्रहाने खाऊ घातले. त्याचा डब्बाही हौसेने त्याच्या सोबत खाल्ला. हरिला आजचाही अनुभव पहिल्यांदाच आला. गेल्या दहा वर्षात ग्राहकांकडून त्याला इतके आदरातिथ्य कधी म्हणजे कधी मिळाले नव्हते. फार फार समाधान वाटत होते आज हरिला. जेवण करून झाल्यावर आणखी काही कामे उरकली आणि पुन्हा सकाळी निघाले त्याच ठिकाणी त्याने त्या माणसाला सोडले. उतरल्याबरोबर न जाणो का पण त्याने हरिला मिठी मारली. दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. आणि इतके कमी होते की काय म्हणून पिशवीतून फराळाचे एक पाकीट काढून त्याच्या हातात ठेवले. लेकीच्या पहिल्या दिवाळीचा खाऊ म्हणून ! हे बघून हरिचे डोळे अगदी डबडबून गेले. गेल्या चोवीस तासात त्याने किती विरुद्ध मानसिकतेचा अनुभव घेतला होता. कृतज्ञतेने तो पुन्हा रिक्षात बसला. आणि घराकडे निघाला. पुन्हा त्याच्या एकदा त्याच्या मनातून आलेले स्वर स्पिकर मधूनही उमटले...
"जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे...
या वस्त्राते विणतो कोण?
एकसारखी नसती दोन...
कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकऱ्याचे...
एक धागा सुखाचा..."
