एज इज जस्ट अ नंबर
एज इज जस्ट अ नंबर
टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात सुमतीताई एक एक पायरी चढत होत्या. चढल्या जाणाऱ्या प्रत्येक पायरीसोबत टाळ्यांचा आवाज वाढतच होता आणि गेल्या पाच सहा वर्षांचा काळ एखाद्या फास्ट फॉरवर्ड फिल्मसारखा त्यांच्या डोळ्यांसमोरून जात होता. डोळ्यांच्या कडा अत्यानंदाने पाणावल्या होत्या आणि मन निःशब्द झाले होते. स्टेजवरून त्यांना दिसत होती गर्दी कौतुकाने त्यांच्याकडे बघणारी... टाळ्यांच्या प्रचंड आवाजात त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारी. आजवर कधीही वाटले नव्हते इतके आज मन समाधानाने भरलेले वाटत होते त्यांना... वयाच्या विशीचा उत्साह त्यांना 'नाच आनंदाने' अस सांगत होता. कारण विशी उलटून काही फार काळ गेला नव्हता.
जेमतेम तीस वर्षांपूर्वीची गोष्ट!! तेव्हा अशीच हातात बी. ए.ची डिग्री पडली आणि गळ्यात वरमाला !! आयुष्य एका क्षणात वेगळ्या वळणावर गेले आणि अनेक वळण वाटा सुमातीताई आपल्या अहोंसवे चालू लागल्या. एम. डी. मेडीसिन होते ते. पण आपल्या व्यस्त जीवनशैलीमध्ये सुमतीताईंना वेळ द्यायला चुकायचे नाहीत. खरं म्हणजे कुशाग्र बुध्दीच्या सुमतीला पुढे शिकण्याची इच्छा होती. पण वरमाला गळ्यात पडली आणि सुहासरावांच्या संसारात ती अशी काही गुरफटली की आपल्या इच्छेचा तिला स्वतःच्या नकळत विसर पडला.
आधी पत्नी, सून आणि मग सारा आणि सम्यकची आई होऊन जबाबदारी ती सांभाळू लागली. सोनसळी दिवस येत होते तसेच जातही होते. सुमती सगळ्यांचीच लाडकी होती. सासूबाईंनी तिच्या अनेक कलागुणांना शक्य तितका वाव देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे एम. ए च्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छेची तिला आठवणही येत नव्हती. कालांतराने मुले मोठी झाली. आपल्या डॉक्टर बाबांच्या पाऊलवाटेने चालण्याचा त्यांनी साहजिक निर्णय घेतला. आणि एका आदर्श आई व पत्नीप्रमाणे सुमती ताईंनी मुलांना खंबीर पाठिंबा दिला. उत्तम गुणांनी दोन्ही मुले पास झाली, आपल्या बाबांचे दोन्ही हात झाली. छानपैकी इस्त्री करून घडी घातलेल्या सुंदर रेशमी साडीसारखी आयुष्याची घडी बसली होती. सुहासराव आता स्वेच्छानिवृत्तीचा विचार करत होते. त्यांचा डोलारा सांभाळायला मुले आता सक्षम झाली होती. तेव्हा आता आपला पूर्ण वेळ आपल्या पत्नीला द्यावा असे त्यांना वाटत होते. तसे त्यांनी एक दिवस आपल्या मुलांना बोलून दाखवले. मुलांची या गोष्टीला अर्थातच काही हरकत नव्हती. सुमती ताईंच्या संस्काराचे खत मिळालेली रोपटी होती ती!! आज कल्पवृक्ष होऊन आपल्या आई बाबांना सावली द्यायला सक्षम होती. ठरल्याप्रमाणे मग आपल्या वाढदिवशी सुहासरावांनी आपल्या खांद्यावरून जबाबदारीचे ओझे उतरवले आणि थोडे थोडे सारा आणि सम्यकच्या खांद्यावर दिले. दुसऱ्यादिवशीपासून काय काय करायचे याचे सगळे प्लॅन त्यांच्या मनात तयार होते.
रात्री जेवण झाल्यावर ते शांतपणे आपल्या खोलीत पुस्तक वाचत बसले होते. मागची कामे आवरून सुमतीताई खोलीत आल्या. त्यांनी खोलीचे दार उघडले आणि अचानक त्यांच्या अंगावर फुल पाकळ्यांचा पाऊस पडला. त्या क्षणभर गांगरल्या, दुसऱ्या क्षणी लाजल्या...
"काय हे ? शोभत का या वयात? मुलांनी पाहिले तर हसतील तुम्हाला..." लांबून त्यांच्याकडे बघून हसत असणाऱ्या नवऱ्याला त्या लटके रागवल्या.
"अगं, प्रेम व्यक्त करायला वय कशाला हवं? आणि मुलांचं म्हणशील तर ही तयारी त्यांनीच केली, मला फक्त तुझी धांदल बघायला इथे ठेवलं" ते ऐकून तर सुमतीताई अजूनच लाजल्या.
"अग!! अशी काय लाजतेस, तुला शोभत वाटतं या वयात असं लाजणं?" सुहसराव त्यांना चिडवून म्हणाले.
"तुमचं आपलं काहीतरीच, सवय नाही मला तुमच्या अश्या वागण्याची!! हे जरा वेगळच आहे... पण छान आहे." त्या पुन्हा थोड्या लाजल्या. काही क्षण शांततेत गेले.
"सुमती, आज मला तुझ्याशी खूप खूप बोलायचं आहे. मन मोकळं करायचं आहे. आपलं लग्न झालं ना अगदी तेव्हापासूनचं... खरं सांगू तर मी आणि माझा अभ्यास या पलीकडे कधी मी पाहिलेच नाही. मी डॉक्टर व्हावं म्हणून बाबा जीवापाड कष्ट करून पैसे मिळवत होते, त्यामुळे उत्तम गुणांनी पास होऊन त्यांच्या कष्टाच चीज करावं या पलीकडे मला कधीच दुसरं काही सुचलं नाही. त्यामुळे आपलं लग्न झाल्यावर अश्या गोष्टीमधूनही प्रेम व्यक्त होऊ शकत हे मला कळायचे नाही. तुझ्या हळव्या भावना कदाचित त्या वयात माझ्याकडून नकळत कुस्करल्या गेल्या असतील, पण तू एका शब्दानेही कधी मला बोलली नाहीस. आनंदाने मला, माझ्या घराच्याना आपलंसं केलंस, माझा संसार अगदी गोष्टीत सांगतात ना तसा गुण्या गोविंदाने केला. कामाच्या गडबडीत मी खूपदा तुला वेळ देऊ शकलो नाही, पण म्हणून तू कधी कुरकुर केली नाहीस, त्यामुळे मला माझ्या कामात पूर्ण समरस होता आलं आणि हा डोलारा उभा करता आला... खरंच सुमती, अबोलपणे किती महत्वपूर्ण वाटा उचललास तू माझ्या यशाचा!!!" सुहासरावांचे मन बोलता बोलता भरून आले होते.
आपण काय केलंय आता पर्यंत याचा कधीही विचार न केलेल्या सुमतीताई सुहासरावांच्या या भावपूर्ण शब्दांनी निःशब्द झाल्या. पुढे काय बोलवे ते त्यांना सुचेना. त्यांचेही मन हळवे झाले, डोळ्याच्या कडा समाधानाने पाणावल्या. सुहासराव पुढे म्हणाले,
"पण आता बस, माझा इथून पुढचा वेळ सगळा तुझा, आता तू सांगशील तस मी करत जाणार. सुमती... तुला एक सांगू, मला खरं म्हणजे फार मनापासून वाटत होत की तू लग्नानंतर पुढे शिकावं, मी त्यात पुढाकार घ्यायला कमी पडलो. मला माफ कर!" आता मात्र सुमती ताईंनी त्यांना रोखले.
"माफी का मागताय? अहो जे दिले आहे तुम्ही मला त्यात कधी काही कमी नव्हते... आणि मुळात माझ्या आवडी निवडी माझे छंद जोपासण्यात मी खूष होते, त्यात तुमचा आणि आपल्या घरच्यांचा पाठिंबा होता. त्यामुळे मला कधी कसली कमी नव्हती. पण एक सांगू, आता तुमचा सगळा वेळ माझा असेल हे ऐकून बाई मला फारच आनंद झालाय, आपण खरंच रोज छान छान काहीतरी करत जाऊ. आयुष्याच्या पूर्वार्धात ज्या गोष्टी सुटल्या त्या आता करू... आवडेल मला तुमच्यासोबत पुन्हा विशीतली सुमती व्हायला." सुमती ताईंचे शेवटचे वाक्य ऐकून सुहासराव खळखळून हसले.
"तर मग सुमतीबाई.... घेणार का आता एम. ए ला एडमिशन??" विशितली राहिलेली ही अजून एक गोष्ट आता पूर्ण करा... मग पीएचडी करा, आणि तुमच्याही नावापुढे डॉक्टर लावा..." इतके बोलून सुहास रावांना पुन्हा हसू आले.
"काहीपण काय??"सुमती ताई ही त्या हसण्यात सामील झाल्या.
"अगं खरंच, वयाचा विचार करू नकोस, एज इज जस्ट अ नंबर!" नंतर रात्री उशिरापर्यंत त्या दोघांच्या गप्पा चालू होत्या.
सकाळी रोजच्या सवयीप्रमाणे उठून सुमतीताई फिरायला निघून गेल्या. पण आज त्यांनी सुहास रावांना हाक मारली नाही. अनेक दिवसांनी, खरं तर वर्षांनी त्यांच्या आयुष्यात असा निवांत दिवस आला होता. त्यामुळे त्यांना न उठवणे त्यांना योग्य वाटले. त्या फिरायला जाऊन आल्या, मुलांना जायचे होते त्यामुळे त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट बनवला. आणि मुले गेल्यावर स्वतःचा आणि अहोंचा ब्रेकफास्ट झाकून ठेवून त्या पेपर वाचत बसल्या. कधीही उशिरात उशिरा सातच्या पुढे अंथरुणात न दिसणारे डॉक्टर आज दहा वाजले तरी उठले नव्हते. शेवटी अजून तासभर वाट बघून सुमतीताई त्यांना हाक मारायला गेल्या. आधी त्यांनी लांबून हाक मारली पण डॉक्टरांकडून काहीच प्रतिसाद आला नाही. म्हणून त्या जवळ जाऊन उठवू लागल्या. कूस घेऊन पडलेल्या सुहासरावांना सुमती ताईंनी हलवले पण त्यांना जागच येईना, त्यांनी थोडे जोरात हलवले आणि त्यांना जाणवले की आता ही झोप कधीच जाग न येण्यासाठी लागली होती. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या जोरात ओरडल्या अन् धाडकन जमिनीवर कोसळल्या. घरातल्या नोकर माणसांनी आवाज ऐकून त्याच्या खोलीकडे धाव घेतली. सुमतीताई जवळ जवळ बेशुद्ध झाल्या होत्या. कोणीतरी त्यांच्या मुलांना फोन केला, येताना ते अँब्युलन्स घेऊन आले. पण नियतीने आपला डाव केव्हाच साधलेला होता. आपल्याच सुसज्ज दवाखान्यातील एकाही वैद्यकीय सुविधेचा लाभ घेऊ न देता नियतीने डॉक्टराना नेले होते आपल्या सोबत... अनंताच्या प्रवासाला! सुमती ताईवर ही प्रचंड वीज कोसळली होती. पुढची वाट त्यांना दिसेनाशी झाली होती. त्या समूळ हदरल्या होत्या. अनेक दिवस गेले तरी त्या या धक्क्यातून सावरू शकत नव्हत्या स्वतःला. मुले आपापल्या कामाला लागली होती. नाही म्हंटले तरी बाबांच्या मार्गदर्शनाशिवाय त्यांचा डोलारा आता त्यांना सावरायचा होता. ती जबाबदारी चोखपणे पार पाडण्यात ते व्यस्त झाले होते. त्यामुळे सुमती ताईंना एकटेपणा जास्त जाणवत होता.
एक एक दिवस करत वर्ष सरले. दरम्यान वयात आलेल्या साराचे सुयोग्य स्थळ बघून त्यांनी लग्न लावण्याचे ठरवले. त्या दृष्टीने स्थळे बघणे सुरू झाले. त्या निमित्ताने त्यादेखील हळू हळू सावरू लागल्या. एक दिवस कपाट आवरताना त्यांना एक जुनी फाईल सापडली. सहज त्यांनी चाळून पहिली तर त्यात त्यांची शैक्षणिक कागदपत्रे होती. पहिलीपासून तर पदवीपर्यंतचा काळ त्यांच्या डोळ्यांसमोरून गेला. आयुष्य कुठून कुठे घेऊन आले.... लग्न, मुले, संसार... सुहासराव!! त्यांच्या आठवणीने सुमातीचे मन गलबलून आले. त्यांच्याशी त्या रात्री मारलेल्या गप्पा आठवल्या. सुहासरवांचा शब्द नि शब्द त्यांच्या कानात घुमू लागला. त्यांनी काहीतरी मनाशी ठरवून फाईल बंद केली आणि मुलांची वाट बघू लागल्या.
"मला पोस्ट ग्राज्युएशन करण्याची इच्छा आहे...." रात्री जेवताना अचानक सुमती ताई मुलांना म्हणाल्या. काही काळ शांतता पसरली. आई नक्की काय म्हणतेय ते मुलांच्या कानापासून मेंदूपर्यंत पोहोचायला वेळ लागला असावा.
"काहीच हरकत नाही" केवळ तीन शब्दात साराने पाठिंबा दिला. सम्यकही अर्थात तयार झाला. आई एकटेपणात जगेल त्यात पेक्षा तिने स्वतःला आवडेल तिथे गुंतवणे काय वाईट? त्यामुळे दोघांनी सहमती दर्शवली.
पुढच्याच आठवड्यात ते दोघे युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन चौकशी करून आले आणि डॉक्युमेंटेशनच्या तयारीला लागले. सुमती ताईंचे दिवस आता एडमिशनची वाट बघण्यात जाऊ लागले.
"सुमती, वयाचा विचार करू नकोस, एज इज जस्ट अ नंबर!" सुहासरवांचे शब्द आठवत त्यांनी वर्गात पाऊल टाकले. खरं म्हणजे वयाच्या या टप्प्यावर पुन्हा शिक्षणाला सुरुवात करताना सुमती ताई एखाद्या बालवाडी मध्ये पहिल्याच दिवशी जाणाऱ्या मुलासारख्या हिरमुसल्या होत्या. ज्या लेकरांना बोट पकडून त्यांनी शाळेत सोडलं, ती लेकरं त्यांना कॉलेजला सोडायला आली होती. त्या दिवशी रात्री जेवणाच्या टेबलवर उत्साहाला उधाण आले होते. विशितल्या एखाद्या मुलीप्रमाणे सुमती ताई कॉलेजक्या गमती जमती सांगत होत्या. उद्याचा दिवस जगण्याचे जणू त्यांना ध्येय मिळाले होते. सम्यक आणि साराला ते पाहून समाधान वाटले. सुमती ताई आता घर सांभाळून कॉलेज करू लागल्या. घरी येऊन अभ्यास करू लागल्या. पहिले सेमीस्टर संपले सुमती ताईंना उत्तम गुण मिळाले. दुसरे सेमीस्टर सुरू झाले आणि काही दिवसात संपूर्ण जगाला साथीच्या रोगाने वेधले. भारतही त्यातून सुटला नाही. पंतप्रधानांनी संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर केले. देशभरातील लाखो डॉक्टर चोवीस तास लोकांना या रोगापासून वाढवण्यात जुंपले. सम्यक आणि साराही त्याला अपवाद नव्हती. सुरुवातीचे काही महिने फार कंटाळवाणे गेले. अर्थात सुमती ताईंकडे करायला अनेक गोष्टी असल्या तरी कॉलेज नसल्याचे शल्य त्यांना बोचत होते. काही काळाने online पद्धतीनें शाळा कॉलेज सुरू करायला परवानगी मिळाली. पुन्हा एकदा सुमती ताई हिरमुसल्या. कारण त्यांचा आणि तंत्रज्ञानाचा संबंध केवळ कामापुरताच असायचा...त्यामुळे आता आपल्याला कसं जमणार ऑनलाईन कॉलेज करायला हा प्रश्न त्यांना त्रास देऊ लागला. मुलेही जनसेवेत व्यस्त असल्याने त्यांना त्रास देणेही ही सुमती ताईंना योग्य वाटेना.
एक दिवस दुपारचे जेवण करून सुमती ताईंनी गादीला पाठ टेकली आणि इतक्यात सारा आली. अचानक!! ती कधी तिची घरी येण्याची वेळ नसायची, निदान त्या साथीच्या काळात तरी नाही. डॉक्टर गेले त्या नंतरच्या काळात कधी कधी यायची. पण सध्या नव्हती येत.
"आज काय झाले असावे?" सुमती ताईंना प्रश्न पडला.
तिने पटकन अंघोळ केली , फ्रेश झाली आणि पुन्हा कुठेतरी गेली. तब्बल चार तासांनी ती परत आली ते हातात एक नवाकोरा लॅपटॉप घेऊन!!
"आई, हे घे तुझं कॉलेज..." सुमती ताईंच्या हातात लॅपटॉप ठेवत ती म्हणाली.
"अगं, मला कुठे येत यातलं काही, घेण्याआधी एकदा विचारायच तरी... " सुमती ताई घाई घाई म्हणाल्या.
"नाही येत तर शिकशील, आम्ही दोघे आहोत की शिकवायला काही अडलं तुला तर... "
"अगं पण..."
"आई, वयाच्या या टप्प्यावर तू पुढे शिकण्याचा विचार केलास, तर तुझ्यासाठी हे शिकणे काय अवघड आहे, खेळणं आहे ग हे, जितका त्याच्याशी खेळशील तितकं तेच तुला शिकवेल आणि तू शिकत जाशील..." सारा त्यांना आधार देत म्हणाली.
सुमती ताईंनादेखील तिचे म्हणणे पटले. हो नाही करत त्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा स्वीकार करायला तयार झाल्या. आणि त्यांचे कॉलेज पुन्हा सुरू झाले. हळू हळू त्या लॅपटॉप कुशलपणे हाताळू लागल्या. काही काळात त्याची एक सेमिस्टर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच पार पडली. लेकीने दिलेला आत्मविश्वास घेऊन त्यांनी ती उत्तम गुणांनी पास केली. आता एकच सेमीस्टर उरले होते. त्याच दरम्यान साराचे लग्नही ठरले. मग काय !! एकीकडे कॉलेज, दुसरीकडे लग्नाची तयारी अशी तारेवरची कसरत सुरू झाली सुमती ताईंची.
दिवसभर लग्नाची तयारी आणि रात्रीचा अभ्यास असं रोजच घडू लागलं. थाटामाटात साराचे लग्न पार पडले. आणि सुमती ताईंची परिक्षादेखील तोंडावर आली होती. आता त्या जोमाने अभ्यासाला लागल्या. परीक्षा सुरू झाली तेव्हा सारा माहेरी आली. आई तिच्या परीक्षेच्या काळात जशी तिची ठेप ठेवायची तशी यावेळीही तिने आईची ठेप ठेवली. सुमती ताईंची अभ्यासाची बैठक चांगली होती. खरं तर त्यांना लग्नाच्या गडबडीत फारसा वेळ मिळाला नव्हता अभ्यासाला. त्यामुळे त्या परीक्षेच्या काळात फार टेन्शनमध्ये होत्या. परीक्षा झाली. दोन-तीन महिन्यानी एक दिवस त्यांना कॉलेजमधून फोन आला. परीक्षेचा निकाल लागला होता. आणि सुमती ताई पास झाल्या नव्हत्या तर विद्यापीठात पहिल्या आल्या होत्या. आणि लवकरच त्यांना सत्कारासाठी विद्यापीठात बोलावले जाणार होते. सुमती ताईंचा आपल्या कानांवर तर विश्र्वासच बसेना. आणि तो दिवस आला जेव्हा त्या सत्करासाठी आपल्या दोन्ही मुले आणि जावयासोबत विद्यापीठात आल्या होत्या.
टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात सुमतीताई एक एक पायरी चढत होत्या. चढल्या जाणाऱ्या प्रत्येक पायरीसोबत टाळ्यांचा आवाज वाढतच होता आणि गेल्या पाच सहा वर्षांचा काळ एखाद्या फास्ट फॉरवर्ड फिल्मसारखा त्यांच्या डोळ्यांसमोरून जात होता. डोळ्यांच्या कडा अत्यानंदाने पाणावल्या होत्या आणि मन निःशब्द झाले होते. स्टेजवरून त्यांना दिसत होती गर्दी कौतुकाने त्यांच्याकडे बघणारी... टाळ्यांच्या प्रचंड आवाजात त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारी. आजवर कधीही वाटले नव्हते इतके आज मन समाधानाने भरलेले वाटत होते त्यांना... आणि कानात केवळ सुहास रावांचे शब्द ऐकू येत होते ..."पीएचडी करा, आणि तुमच्याही नावापुढे डॉक्टर लावा... वयाचा विचार करू नकोस कारण एज इज जस्ट अ नंबर!"
