त्या पाऊसरात्री
त्या पाऊसरात्री
उन्हाळ्याची सुट्टी , हवेशीर संध्याकाळ आणि सगळ्या भावंडांचे एकत्र असणे म्हणजे दुग्धशर्करायोग!! सागर, निशा, धनंजय, पलक, मधुकर, गणेश, रेवती असे सगळे यंदाही सुट्टी लागल्याबरोबर गावी आले होते. नुकत्याच त्यांच्या दहावी-बारावीच्या परीक्षा संपल्या होत्या. ऑफिसमुळे कोणाचेच आई-बाबा घरी नसायचे मग प्रत्येकाने घरी बसून कंटाळण्यापेक्षा इथे येणे त्यांना सगळ्यांना आवडायचे. दिवसभर गावाकडचे खेळ, आजीला वाळवणे, लोणचे करायला मदत करणे आणि करता करता खाणे असा सगळा दिवस जायचा आणि सायंकाळी झाली की, रोज गावात कुठेतरी भटकायला निघायचे हे सप्तसुर!!
गावाच्या वेशीवर असणाऱ्या डोंगरावर एका सनसेट पॉईंटची बांधणी चालू असल्याचे गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुट्टीत आले की सगळे बघत होते. गावी आल्या आल्या त्यांना कळले की गुढीपाडव्याला त्याचे उद्घाटन झाले आहे. मग काय !! सगळ्यांनी आज तिकडे जाण्याचे ठरवले. आजीची इच्छा नव्हती फारशी. कारण गावातल्या काही वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एका सुपर स्पेशालिटी दवाखान्याचे शवगृह सोडले तर त्या टेकडीकडून येताना रस्त्यात फारसे काही नव्हते. त्या रस्त्यावर थोडीफार वर्दळ दिसायची ती फार तर दुपारी चार वाजेपर्यंत; नंतर तिथे फारसे कोणी भटकत नसे. त्यामुळे आजीला काळजी वाटत होती. पण ऐकतील तर पोरं कसली! हो-नाही करत सायंकाळी निघाले सगळे. सोबत खाऊ दिलेलाच होता आजीने. साडेपाचला निघून रमत-गमत सगळे टेकडीवर पोहोचले. सगळा परिसर फिरले. त्यांना तो परिसर इतका आवडला की सूर्यास्त झाल्यानंतर सुद्धा बराच वेळ सगळे तिथे रमले. अंधार कधी पडला याचा त्यांना पत्ताच लागला नाही.
अचानक जोरदार ढग गडगडू लागले. काही चिन्ह नसताना कसे हे तर त्यांना पण उमगले नाही. पण उशीर झालाय आणि आता घरी जाऊन आजी रागावणार इतके मात्र जाणवले. पटापट पाऊले टाकत सगळे निघाले. टेकडी उतरून काही अंतर पार झाले असेल नसेल तोच पाऊस सुरू झाला. आधीच अमावस्या आणि त्यात दाटून आलेले ढग यामुळे रोज असावी त्यापेक्षा आज जास्तच भयाण शांतता होती. या सगळ्याची कमी होती म्हणून की काय, पण 'दुष्काळात तेराव्या महिन्यासारखे' पाऊस सुरु झाल्यावर लाईटसुद्धा गेले. आता तर गुडूप अंधार झाला सगळीकडे. निशा, पलक आणि रेवती तर खुपच घाबरून गेल्या. तरीही झपझप पाऊले टाकत राहिले सगळे. थोडे अंतर चालून आल्यावर त्यांना रस्त्याच्या एका बाजूला लाईट चालू दिसला. सगळा गाव अंधारात बुडालेला असताना तो चमकणारा लाईट बघून त्यांना जरा हायसे वाटले. इतक्या प्रचंड पावसात जाण्यापेक्षा आपण इथेच थांबावे असे त्यांना वाटले. तिथे कोण आहे ते बघून त्यांना विचारून मग थांबू असे म्हणून मधुकर पुढे गेला. तो तिथे पोहचतो न पोहोचतो तोच तिथली चालू असलेली एकुलती एक ट्यूब बंद पडायला लागली.
"कोणी आहे का?" मधुने हाक मारली.
काहीच प्रतिसाद आला नाही. थोडी वाट बघून तो आत डोकावला. तिथे बाहेरच्यापेक्षा खुप थंड वातावरण होते आणि गुडूप अंधार!! त्याच्या डोक्यात ट्यूब पेटली की हे नक्कीच शवगृह असावे. बाहेरची ट्यूब अजूनही लपलप करत होती.
"कोणी आहे का?" मधुने पुन्हा हाक मारली. बाहेरच्या चालुबंद होणाऱ्या ट्यूबच्या प्रकाशात त्याला काहीतरी हालचाल जाणवली. कोणीतरी येत असावे असे वाटले खरे! एव्हाना आतल्या गारव्याने त्याला थंडी भरून आली होती. तो बाहेर जाऊन उभा राहिला. बिचारे बाकीचे पोरं पावसात भिजत किती वेळ थांबणार!! ते पण तिथे येऊन थांबलेले त्याला आता दिसले. पुन्हा काहीवेळ गेला तरी कोणी बाहेर आलेच नाही. कडाडणाऱ्या लखलखीत विजा आणि धो धो कोसळणाऱ्या पावसात आजूबाजूला असणारा अंधार यामुळे वातावरण फार भीतीदायक वाटत होते. आधीच घाबरलेल्या निशा, पलक आणि रेवतीला धनंजय आणि सागर भुताच्या गोष्टी सांगून अजूनच घाबरवू लागले. पण मधुकरचे या सगळीकडे लक्ष नव्हते. थोडावेळापूर्वी आतून कोणी बाहेर येत असल्याचे त्याला जाणवले होते पण कोणी आले का नाही हे त्याला कळत नव्हते. सागर आणि धनंजयचा धिंगाणा ऐकून तरी यायला हवे होते ना! त्याच्या मनात न जाणो का शंकेची पाल चुकचुकली.
इकडे मुलींना घाबरवण्यात सागर आणि धनंजय इतके गुंतले होते की त्यांना मधुकरच्या या मनस्थितीची जाणीवदेखील नव्हती आणि अचानक.... अचानक जोरात ओरडण्याचा आवाज आला. अंगावर सरसरून काटा आणणारा!! काय झाले कोणालाच काही कळेना... पण आवाज मधुकरचा होता हे मात्र त्यांनी ओळखले. गणेश लगेच आवाजाच्या दिशेने धावत गेला. पाठोपाठ बाकीचे आलेच. पाहतात तर काय!! मधुकर भीतीने बोबडी वळून जमिनीवर पडला होता. जिवाच्या आकांताने तो उठण्याचा प्रयत्न करत होता पण भीतीने इतका थरथरत होता की त्याला स्वतःचा तोल सावरत नव्हता. गणेशने त्याला पटकन पुढे होऊन उठायला मदत केली. काय झालं विचारायच्या आत त्याला समोर जे दिसल ते उत्तर द्यायला पुरेसे होते. समोर होता एक प्रचंड धिप्पाड माणूस, ज्याच्या पायाला प्लास्टर होते, हात बँडेजमध्ये गुंडाळलेला होता, कपाळाला झालेल्या विक्राळ जखमेचे रक्त त्याच्या संपूर्ण चेहऱ्यावर ओघळून सुकलेले होते. आणि त्या लपलप करणाऱ्या ट्यूबच्या प्रकाशात तर ते अतिभयंकर दिसत होते. आणि त्याच्या ओठांच्या दोन्ही बाजूने जबड्यातून बाहेर आलेले आरक्त दात त्याच्या रक्तपिपासू मनोकामनेचे संकेत द्यायला पुरेसे होते. ते बघून मुलीही जोरात किंचाळल्या.
"मधू .....मधू , पsssssळ" गणेशने मधुकरला भानावर आणले. आणि सगळे पळत सुटले. त्या शवगृहाच्या गेटजवळ पोहोचेपर्यंत ती अक्राळ-विक्राळ चित्रकृती त्याचा पाठलाग करत मागे येत होती हे त्यांना जाणवत होते. पण एकानेही मागे वळून बघण्याची हिम्मत केली नाही. जीव मुठीत घेऊन सगळे पळत होते. आजी का नकार देत असावी हे त्यांना बहुधा आता कळले असावे. धावत धावत ते रस्त्यावर आले पण तरीही त्यांना थांबायचे भान नव्हते. डोक्यावर धो धो कोसळणारा पाऊस, गुडूप अंधार आणि त्यातून घाबरवायला सज्जपणे कार्यरत असलेल्या कडाडणाऱ्या विजा यांनाच साथीदार मानून पोरं धावत होती. पण मधूला या सगळ्याचा इतका धसका बसला होता की तो काहीवेळाने पळतापळता पडला आणि बेशुद्ध झाला. मुलांचे नशीब जरा बरे होते की ते हॉस्पिटलच्या जवळ होते. त्यांनी लगेच मधूला तिथे नेले. घडला प्रकार सांगण्याची सुद्धा त्यांना भीती वाटत होती. त्यांनी फक्त घरी फोन करून आपण सुरक्षित असल्याचे कळवले. पाऊस मी म्हणत होता; त्यामुळे आजी आजोबांना येणे शक्य नव्हते. आणि पोरे इतकी गंगारली होती की एकही घरी जायची हिम्मत करू शकत नव्हता. शेवटी मधूसोबत सगळे रात्रभर तिथेच थांबले. रात्री उशिरा त्यांना झोप लागली.
"चहा...." सकाळी सव्वासहा-साडेसहा झाले असतील तोच आवाज आला. आणि सगळ्यांना जाग आली. वॉर्डबॉय चहाची ट्रॉली घेऊन उभा होता. त्याचा चेहरा पाहिलेला वाटत होता. मधू निरखून बघत विचार करत होता.
"न...न....न....नको आम्हाला" तो जोरात ओरडला.
गणेशलाही तत्काळ ओळखू आले की हा तर रात्री आपण शवगृहात पाहिला तो... पण हा इथेही आला आपल्या मागे मागे! त्याला आश्चर्ययुक्त भीती वाटली.
तसा तो माणूस शांतपणे हसला. आणि बोलू लागला.
" हो, मलाच पाहिलं तुम्ही काल रात्री. पण घाबरू नका मी काही भूत नाही, तुमच्यासारखाच जिवंत माणूस आहे."
मुले अजूनही भूत बघितल्यासारखे त्याच्याकडे बघत होते. मग त्याने खिशातून रात्रीचे ते आरक्त दात काढून दाखवले आणि पुढे सांगू लागला.
"गेल्या काही दिवसात मृतदेहांची चोरी होण्याचे प्रकार घडत होते. अवयवांच्या तस्करीसाठी त्यांची चोरी केली जाते. आणि हे काम गावतलीच टोळी करतेय. त्यांच्यावर वचक बसावा म्हणून हे असे प्रकार करतोय." वॉर्डबॉय सांगत होता.
तो पुढे म्हणाला, "कालही मला आधी वाटलं की तेच लोक आलेले आहेत, त्यामुळे मी अचानक असा आलो. माझा तुम्हाला मुद्दाम घाबरवायचा काहीही उद्देश नव्हता. सकाळी ड्युटी संपल्यावर दवाखान्यात सही करायला आलो तेव्हा नर्सकडून तुमच्या अवस्थेबद्दल कळले म्हणून तडक तुम्हाला भेटायला आलो. तुमच्या मनातला धसका दूर व्हावा म्हणून मी हे सांगितलं, पण तुम्ही हे गावात नका बरे कोणाला सांगू! नाहीतर आटोक्यात आलेली तस्करी टोळी पुन्हा निर्भीडपणे सक्रिय व्हायची !!" हे ऐकून भीतीची जागा आता एका निखळ हास्याने घेताली आणि चहा घेता घेता सगळे आणखी किस्से ऐकण्यात रमले.

