एक पत्र चहासाठी
एक पत्र चहासाठी
प्रिय चहा,
आज थोडेसे तुझ्याविषयी...
हे तुला वेगळे सांगायला नकोच की जगातल्या अनेकांची तू नित्य दैनंदिनी आहेस... मित्रांच्या कट्ट्याची तूच खरी ओळख आहेस. अरे, 'पेश्शssल' नाव तुझ्यामुळेच तर फेमस आहे!! कधी तू होतोस सांकव, मनात साठलेल्या विचारांच्या गर्दीला लेखणीवाटे वहीशी जोडणारा ! तर कधी असतोस एक तल्लफ, थकल्या-भागल्या जीवाला क्षणात जी करते ताजातावाना. तू आहेस शायरी, उत्कट भावनेसारख्या आधनाच्या पाण्यात रंगलेली. तुझी आणि साखरेची जोडी प्रत्येकाच्या दिवसाला चढवते गोडी... चपाती मारते जेव्हा तुझ्यात डुबकी लगेच होते ती कोणा कष्टकऱ्यांची न्याहारी ! गरीब असो वा असो श्रीमंत कोणी... प्रत्येकाच्या जिभेला तुझी चव प्यारी, सांगशील का कधी काय आहे तुझ्या या यशाची गुरुकिल्ली ?
कधी तुळस आणि आलं सोबत घेऊन होतोस तू सर्दीची दवा तर कधी चर्चेचे कारण बनून होतोस विरोधी पक्षांमधला दुवा ! कांदापोह्यानंतरचा बऱ्याचदा तू डिसीजन मेकर असतोस, किंवा कटिंगच्या निमित्ताने झालेली सल्ला-मसलत असतोस. चिंब-भिजल्या पावसात ऊब देणारी वाफ तू असतोस, गरमागरम कांदाभज्यांच्या साथीला तुझा एक घोटही पुरेसा असतो.
प्रिय चहा...
तुला ठराविक वेळ अशी म्हणून नसतेच, पण वेळेला मात्र तुझी गरज भासतेच ! कित्येकांचा अर्धा थकवा तर केवळ तुझे नाव घेताच जातो, आणि बाकी अर्ध्यासाठी तू तर हजरच असतोस ! म्हणून प्रत्येकाला वाटतो हवाहवासा, अमृततुल्य असा तुझा एकच प्याला...
