मृत्यूची विहीर
मृत्यूची विहीर


इनामदार परिवार ... रोकडी गावचे सधन आणि प्रतिष्टीत कुटुंबापैकी एक होते. घरचे कर्ता पुरुष आणि गावचे सरपंच शांताराम इनामदार आणि त्याची पत्नी संगीता इनामदार .. ह्यांना तीन मुले होती. राकेश, कुशल आणि राज पैकी राकेश चे लग्न रागिणी सोबत झाले होते आणि त्यांना एक आठ वर्षाचा मुलगा होता ज्याचे नाव ओम होते. पूर्ण आणि सुखी कुटुंब होते. पण त्या कुटुंबाला कोणाची तरी नजर लागली आणि एका मागोमाग एक असे दोन आत्महत्या घराच्या मागच्या विहिरी मध्ये रात्रीच्या वेळी झाल्या त्यामध्ये पहिला ओम चा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला आणि त्याचा बरोबर महिन्याभराने ओम चे वडील राकेश चा मृतदेह पाण्यावर तरंगत होता. त्यांनी आत्महत्या केली कि त्यांना मारले गेले ह्याचा तपास पोलीस आपल्यापरीने करत होते. सुखी कुटुंब अचानक दुःखात लोटले गेले. घरात शोककळा पसरली एकसाथ दोन मृत्यू आणि ते सुद्धा महिन्याभरात ह्यापेक्षा जास्त दुःख काय असणार. शांताराम मनाने पूर्ण खचून गेले होते. त्यांनी बोलणे बंद केले होते आपल्या खोलीमध्ये जास्त वेळ ते राहत होते. त्यांना कुशल ने समजावले.
" आबा जे झाले ते काय आपण बदलू शकत नाही.झाले त्याचे दुःख मला पण आहे पण काय करणार . तुम्ही असे खचून गेला तर आम्ही कोणाकडे पाहायचे?" कुशल म्हणाला आणि त्याचे बोलणे शांताराम ह्यांना पटले. ते पूर्वी सारखे वागू लागले गावात लक्ष देऊ लागले. एका संद्याकाळी ते गावात फेर फटका मारायला जातो असे सांगून निघाले आणि संमोहित केल्या सारखे घराच्या मागे असलेल्या विहिरी कडे निघाले. शांताराम ह्यांना काहीच समजत नव्हते ते काय करत होते. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले आणि स्वतःशी हसून त्या विहिरीच्या कट्यावर उभे राहिले आणि खाली वाकून पाहिले. विहिरीतील पाणी काळेभोर दिसत होते त्यांनी उडी मारली तसे पाण्यात काही तरी पडल्याचा आवाज आला म्ह्णून संगीता पळत विहिरीच्या दिशने धावल्या तर त्याकडे शांताराम पाण्यामध्ये गटांगळ्या खात होते. संगीता ह्यांनी जोर जोरात आवाज देऊन कुशलला बोलावले सुदैवाने कुशल घरीच होता. कुशल आवाजाच्या दिशेने पळाला आणि घराच्या मागे असलेल्या विहिरीच्या दिशने पहिले तर त्याची आई विहिरीत वाकून त्याला आवाज देत होती. कुशल पळत त्या विहिरीजवळ आला आणि त्याने वाकून पहिले तर शांताराम गटांगळ्या खात होते. त्याने बाजूला असलेला दोरखंड पाण्यात टाकला आणि शांतारामला तो पकडायला सांगितला. त्याचा साहाय्याने त्याने शांताराम ला बाहेर काढले आणि बाहेर निघताच कुशल शांताराम वर चिडून म्हणाला,
" आबा, तुम्हाला काही समजते कि नाही. ह्या विहिरीजवळ तुमचे काय काम होते. इकडे कशाला आलात तुम्ही ते पण संध्याकाळी... आता मी घरी नसतो तर काय झाले माहित आहे. स्वतःचा नाही आमचा तरी विचार करा. कशाला उडी मारली पाण्यात..."
" मी मारली नाही मला कोणी तरी धक्का दिला मी तर बाहेर जात होतो. इकडे कसा आलो मला नाही माहित मला शुद्ध आली तेव्हा मी विहिरीच्या कट्यावर उभा होतो आणि मागून कोणी तरी मला धक्का दिला."
" काय? कोणी दिला?" कुशल ने विचारले.
" ते तुला माहित आहे?" शांताराम एक वेगळ्या भसाड्या स्वरात म्हणाले आणि बेशुद्ध झाले.
डॉक्टर आले आणि तपासून त्यांनी सांगितले "भीतीने त्यांची शुद्ध हरपली आहे त्यांना आराम करू द्या ते ठीक होतील."
डॉक्टर गेले आणि कुशल विचार करू लागला .. "आबांना धक्का दिला कोणी आणि नंतर तो आवाज कोणाचा..."
वेळ वाया न घालवता त्याने गावातील पंडिताला घरी बोलावले आणि विहिरीजवळ शांती करण्यास सांगितले जेणे करून तिकडे जी काही वाईट शक्ती असेल ती निघून जाईल. पंडित आले आणि त्यांनी शांती करण्यास सुरु केली.
त्यांनी काही सुपारी मंतरून जेव्हा विहिरी मध्ये टाकल्या तेव्हा पाण्यामध्ये बुडण्याचा आवाज आला पण तो आवाज लागोपाठ दोन वेळा आला.
शांती नंतर महिनाभर सर्व ठीक चालले होते कि अचानक एका रात्री शांतारामच्या खोलीमधून ओरडण्याचा आवाज येऊ लागले. कुशल पळत त्यांच्या खोलीमध्ये आला तेव्हा शांताराम एका कोपऱ्यात हात पाय जवळ घेऊन रडत कोणाची तरी माफी मागत होते.
" म... मला ...मला माफ कर मी चुकलो मला माफ कर... मी चुकीचे केले मला माफ कर.."
" आबा काय झाले आहे तुम्हाला असे का वागत आहात तुम्ही.. कोणाची माफी मागत आहात. कोण आहे तिकडे ..." चिडून कुशल ने शांताराम ज्या दिशेला पाहत होते तिकडे पाहिले पण तिकडे त्याला कोणी दिसले नाही.
" ती ... ती परत आली आहे .. आपल्या कोणाला नाही सोडणार ... ती .." शांताराम वेड्या सारखे हसत म्हणाले.
" कोण परत आली आहे काय झाले आहे कोण आहे आबा तिकडे.." कुशल ने पुन्हा चिडून विचारले.
" ती ... ती... " बोलून शांताराम उठले आणि पळत किचन च्या दिशेने निघाले. त्याचा मागे संगीता आणि कुशल पळाले.
शांताराम ने किचन म्ह्णून सूरी घेतली आणि ते विहिरीच्या दिशने निघाले. विहिरीच्या कट्यावर उभे राहिले,
" ती कोणाला नाही सोडणा
र कारण आपण तिला सोडले नाही." हसत हसत बोलून त्यांनी सूरी आपल्या मानेवर फिरवली रक्ताची एक चिळकांडी उडाली आणि शांताराम मागे विहिरीमध्ये पडले.
त्याचा अश्या अचानक जाण्याची आणि विचित्र वागण्याची कुणकुण गावात लागली होती. सरपंचाचे घर पछाडलेले आहे अशी वावडी सर्व ठिकाणी उठू लागली. पहिले ओम मग राकेश आणि आता शांताराम ... पुढचा नंबर कोणाचा ह्यावर गावात चर्चा होऊ लागली होती.
शांताराम ह्याचे अंतिम संस्कार आणि बारावे करण्यासाठी त्याचा लहान मुलगा राज शहरातून गावी आला होता.
" दादा हे... हे सर्व काय चालू आहे घरात ...एक काम कर घर शेती सर्व विकून आपण निघून जाऊ इकडून शहरात राहू इकडे नको. इकडे तुझ्या पण जीवाला धोका आहे." राज कुशल ला समजावत म्हणाला.
" हम्म .. तू बोलतोस ते बरोबर आहे आबांचे कार्य झाले कि विकू सर्व आणि निघू इकडून कायमचे.." कुशल म्हणाला.
शांतारामाचे सर्व कार्य व्यवस्तीत पार पडले होते. पुन्हा असे काही होऊ नये म्हणून विहिरीवर एक लोखंडी जाळी टाकून तिला बंद केले होते. घरात सर्वत्र शांतात होती ,मध्यरात्री अचानक कुशलच्या खोलीमधून त्याचा ओरडण्याचा आवाज येऊ लागला. शांताराम प्रमाणे तो पण एका कोपऱ्यात बसून एका ठिकाणी पाहून हात जोडून रडून माफी मागत होता.
" हे बघ मला माफ कर .. मी ... असे करायला नको होते पण आबाच्या सांगण्यावरून मी हे सर्व केले मला माफ कर माझे ... माझे तुझ्यावर प्रेम होते आणि अजून पण आहे. म.... मला दुसरे लग्न पण करायचे नव्हतं पण ते आबांच्या बोलण्याला मी भुललो.मला खरच माफ कर.."
कुशल चा आरडा ओरडा ऐकून संगीता आणि राज दोघे पळत त्याच्या रूमच्या दिशने आले. पहिले तर कुशल शांताराम प्रमाणे कोपऱ्यात बसून कोणाची तरी माफी मागत आहे. पण त्या दोघांना तिकडे कोणी दिसले नाही. कुशल उठला आणि किचन च्या दिशने निघाला पण शांतारामचा मृत्यू झाल्या पासून किचन ला रात्री टाळा लावला जात होता. तो तडक बाहेर गेला आणि आजूबाजूला पाहू लागला. त्याला एक पहार दिसली त्यांनी ती पहार घेतली आणि विहिरीच्या कट्यावर उभा राहून त्या पहारीने त्याने जाळे तोडण्यास सुरु केले. राज त्याचा मागे पळत आला आणि त्याला कट्यावरून उतरवण्याचा प्रयन्त करू लागला पण त्याला कुशल चा सामना करता आला नाही. कुशल ने त्याचा कानात हळूच भसाड्या आवाजात म्हणाला,
" पुढचा नंबर तुझाच आहे मी कोणाला नाही सोडणार."
राज ला कुशल ने जोरात धक्का दिला तो धक्का जास्त जोरात होता त्याने राज दहा पावले मागे जाऊन पडला. उठून येई पर्यंत कुशल ने ती जाळी तोडली आणि त्यातील एक शीग घेऊन स्वतःचा छातीमध्ये घुसवली. अस्फुट किंकाळी कुशल च्या तोंडातुन बाहेर पडली आणि तो त्याच विहिरीत पडला.
गावात आता पुन्हा चर्चा रंगू लागली होती. घरात चार मृत्यू झाले आणि ते सर्व विहिरीच्या जवळ होते. घराला वाळीत टाकले गेले. भावाच्या मृत्यू नंतर दोन दिवसात राज ने बॅग भरायला सुरु केले होते.
" अरे तू कुठे जातो आहेस अजून कुशल चे बारावे बाकी आहे." संगीता रडत म्हणाली.
" आई त्याचे बारावे घालायला मला वेळ नाही आणि जर मी इकडे राहिलो तर मी जगणार नाही हे सर्व सावित्री वाहिनी करत आहे." राज घाबरत म्हणाला.
" काय सावित्री आणि ती हे का करेल?" संगीताने विचारले तसे राज विक्षिप्त पणे हसला आणि एका वेगळ्या भसाड्या आवाजात म्हणाला.
" त्याला कारण पण तुझा हाच मुलगा आहे. आबांना मी आधी पासून पसंत नव्हते, माझ्या वडिलांकडे देण्यासाठी हुंडा नव्हता पण कुशल ने मला बिना हुंडयाचे लग्न करून ह्या घरात आणले आणि ह्याचे माझ्याशरीरावर वाईट नजरेने पाहणे सुरु झाले . मला कोणी नसताना अडवायचा म्हणायचा वहिनी इकडे तुझी कोणाला कदर नाही आहे दादा तुला मोलकरीण समजतो आणि आबाना तू कधीच पसंत नव्हती. माझ्या सोबत शहरात चल तिकडे तुला राणी बनवून ठेवतो. ह्याला नकार दिला तर ह्याने हद्द केली मला मिठी मारली तसे मी त्याच्यावर हात उचलला. ह्याचा बदला घायचा म्हणून त्याने मी गरोदर असताना लिंग चाचणी करण्यास आबांना प्रवृत्त केले. तीन वेळा मी गरोदर होते आणि तिन्ही वेळा मुलीचं होत्या म्हणून माझा गर्भ पडला आणि ह्याने आबाच्या डोक्यात आणि आबांनी कुशल च्या डोक्यात भरवले कि मी ह्या घराला मुलगा देऊ शकत नाही. कुशल चे दुसरे लग्न केले तर मुलगा पण होईल आणि हुंडा पण येईल आणि कुशल ने माझा गळा दाबुन खून केला आणि माझे प्रेत विहिरीत टाकून त्याला आत्महत्या नाव दिले. माझ्या गर्भपात करण्यासाठी हाच दवाखाना शोधून देत होता. मी मरताना शपत घेतली होती. इनामदारांच्या निर्वंश करून राहणार आणि आज ती मी पूर्ण करणार." बोलून राज ने त्याचा पहिल्या माळ्यावरील रूम मधून खाली उडी मारली तसे त्याचा पायाची हाडे मोडली. तो लंगडत लंगडत विहिरी जवळ आला आणि हसून त्याने विहिरीत उडी मारली. संगीता लोक गोळा करून राजला बाहेर काढेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
सावित्री ने आपला मारताना बोलले शब्द खरे करून दाखवले होते.