मरावे परी किर्ती रूपी उरावे
मरावे परी किर्ती रूपी उरावे


कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि
आज तो अलिशान गाडीतून बायकोसह खाली उतरला. नेहमीचेच परीचयाचे गाव, जन्मभूमी, कर्मभूमी. पण अपरिचित का वाटत होती?? मनात शंकेची पाल चूकचूकली. थोरल्याने वाटणीसाठी बोलावून घेतले होते. खुपदा मला नको आहे, आई-अण्णांच्या आशीर्वादाने सगळे आहे रे मला! मलाच तुझी उतराई होऊ दे! मी सतत सांगूनही तो मानत नव्हता. सुहास हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. पण वडिलोपार्जित जे आहे त्यात सर्वांचाच वाटा ना रे! तो म्हणत असे. हो पण आसू दे वडीलांच्या जागी तूच आहेस आता! माझी भूमिका ठाम होती. थोरला ऐकेनाच; शेवटी यावेच लागले.
आज त्यांनी सगळ्यांनाच बोलावले होते. दोघी बहिणीपण आल्या होत्या. माहेरपण त्याही आई-अण्णांच्या पाश्चात्य व्यवस्थित उपभोगायच्या. सगळे आपापल्या परीने स्थिरस्थावर होते.
कोणालाही वडीलोपार्जीत संपत्तीची हाव नसणार. हा सुहासचा अंदाज होता.
आजारपणात आई-वडीलांची सेवा थोरल्यानेच केलेली. नोकरी व सुट्ट्या या पेचात अडकलेलो मी नेहमी दुरच. बहिणी संसारात अडकलेल्या. पण कधी त्याची वाच्यतापण नाही केली.
आई-वडील गावीच, त्यामुळे पाहूण्यांचा राबता पण गावीच. दोघेही नवरा-बायको हसतमुखाने करत. कसली तक्रार ना चिडचिड. सगळं व्यवस्थित. सुट्टीत चार दिवस गेलो तरी कायम वास्तव्य करावे इतकी बडदास्त. आगदी अभिमान वाटावा असा भाऊ.
सगळं कसं छान कधी कोणी वाटणीबद्दल बोलतपण नसत. तसे पाहिले तर, थोरल्याचीच परिस्थिती थोडी यथातथाच. शिक्षकीपेशा पगार असा कितीसा? दोन पोरी पदरात त्याही गावच्या वातावरणातच वाढल्या. योग्य वयात त्याने उजवून टाकल्या. काही हवं का? मी विचारलं की, नाही आहे सगळं, मागेन पाहिजे तेव्हा. हे पालुपद ठरलेले. निघताना वहिनी भरभरुन भरून देणार गावचा ठेवा. प्रत्येकाची आवडनिवड तिच्यापण नसानसांत मुरलेली. शेवटी दादाची अर्धांगिनी बरोबर शोभत होती. शेतीभाती होती पण उत्पन्न नेहमी अर्धेच, नफ्यापेक्षा तोटाच जास्त..
कधीच मनात हा विचार आलासुद्धा नाही तो आज थोरल्याने केला होता. वडील जिवंत असताना मृत्यूपत्र बनवले होते. नंतर वादविवाद नको म्हणून कोणालाही सुगावा न लागू देता. वडीलोपार्जीत संपत्तीची विभागणी समप्रमाणात केलेली होती. अगदी निःस्वाथीँ वृत्तीचे दर्शन इथेच झाले. 'दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती' याची प्रचिती आली. मी पणा नाही. मी केले याची वाच्यता नाही. खरंच आज सगळे जरी त्याला अर्पण केले तरी अपूर्णच होते. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून मनसोक्त रडून घेतले. दादा आपण आता वेगळं होणार का?
नाही लाडक्या ही घराची ओसरी कायम तुमच्या विसाव्यासाठी हक्काची राहील. फक्त कागदोपत्री लिखाण महत्वाचे असते लेकरा! सगळे कर्तव्य पार पाडले कोठे कसूर नको. आज मी मोकळा झालो. खूप बोलत होता, आम्ही ऐकत होतो.
जेवणं केली, रात्री सगळं शांत. दादाचा अपार अभिमान मनी जागवत झोपलो खरा पण झोप पण रूसलेली. सगळी उलटापालट कोणाच्या मनाचा अंदाज कोणाला येत नव्हता. सकाळचा सूर्योदय भयाण शांतता घेऊन उगवला. दादा अचानक अनंताच्या प्रवासाला निघून गेला. अगदी शेवटचे कर्तव्य पार पाडून...
नक्की विधात्याने काय साधले?
'मरावे परी किर्ती रूपी ऊरावे'
खरोखरच सर्वार्थाने ही म्हण दादाला लागू होती.
'दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती'
शब्द गोठले, मन अक्रोशले. घर शांत झाले. गाव हळहळले पण सगळे पुण्य पदरी बांधून आत्मा अनंतात विलीन झाला होता. पठ्ठ्याने इथे मात्र स्वार्थ साधला होता. एक तारा बनून तो आकाशात नक्कीच लुकलुकत राहणार यात तिळमात्र शंका नाही..!
जो आवडतो सर्वांना तोच आवडे देवाला...
'खरंच काम करण्याचा अधिकार आपला आहे. फळाची आशा धरू नका, फक्त कर्तव्य करीत राहा.'
भगवद्गीतेतील तत्वज्ञान मनावर रूजवून गेला. तो जगला तसेच व आम्हालापण हा अमोल ठेवा पदरी टाकून गेला... यथावकाश...