"आठवणीतील दिवाळी
"आठवणीतील दिवाळी
यावेळेस थोडा उशीरच झालाय. पण वाचकहो लिखाण करायला वेळ मिळाला नाही.
माझ्या एका सखीने तिच्या आठवणीतील फोटोची पोस्ट Fb टाकली. न जानो त्या फोटो समवेत माझ्या आठवणींचे पाखरू मनात घिरटय़ा घालू लागले नि अचानक ऊंच झेपावत बालपणीच्या आठवणी घेऊन माहेरी जाऊन पोंहचले व मस्त विहार करू लागले..
खरंच किती रम्य त्या आठवणी.
कोजागिरी पौर्णिमेला चंद्राच्या प्रतिमेला, आटवलेल्या दुधाच्या पातेल्यात गोलमटोल पाहिले, व ते दुध मटकावले कि, दिवाळीचे वेध लागायचे...
दुसऱ्या दिवसापासून आई कामाला लागायची. जात्यावर दिवाळी साठी लागणारी पिठ दळताना पहाटेच तिच्या जात्यावर ओव्या रंगायच्या..
वडील अकाशकंदील व इतर गोष्टींच्या तयारीला लागायचे, मधून मधून आठवून आई सामानाची यादी सांगायची. वडील ती पाठकोऱ्या कागदावर उतरून घेत. यादी तयार झाली की, आमची स्वारी वाण्याच्या दुकानात पळत जाऊन थडकायची. मोती साबण व वासाचे तेल, उटणं याचा उल्लेख यादीत अवर्जून असायचाच..
कागदाच्या पुडयात सामानाची पॅकिंग व्हायची. सगळ जिन्नस मोजून जड कापडी पिशवी लोळतलोंबत घेऊन आम्ही घरी यायचो. पैशाचा हिशोब डायरीत जेरबंद व्हायचा, वडील जाऊन चुकता करायचे..
मग मोठ्या भावंडाच्या वाटेकडे डोळे लागायचे. औरंगाबादला शिक्षणाच्या निमित्ताने असलेले भांऊ व बहिण दिवाळीला यायचे त्यांच्या येण्या पेक्षा ते घेउन येणाऱ्या फटाक्यांचीच उत्सुकता जास्त असायची.
मग त्यांनी आणलेल्या फटाके व मिल्कब्रेड माझ्यात व धाकट्या भावात वाटला जायचा. मग मी व माझा धाकटा भाऊ लपवून ठेवत व आणि पुरवून पुरवून वापरायचो वाट बघायची आपले जास्त टिकेल व त्याच लवकर संपेल याची.ती एक वेगळीच मजा असायची.
नरकचतुर्दशीला अंघोळीची घाई.अंघोळी आधी आई ओवाळायची,वासाचे तेल अंगाला चोपटायची, मग चुलीवर तापवलेल्या हंड्यातले गरम गरम पाणी अंघोळीच्या मध्ये परत औक्षण. परत अंगाला उटणं मोती साबणाचा वास आणि हो सगळ्यामध्ये एकच साबण हं! मस्त साग्रसंगीत अंघोळ, फटाक्यांचा जल्लोष, बोचरी थंडी वा मस्त! मग आई अंगणात शेणाचा सडा टाकायची.
तुळशीजवळ शेणाच्या गवळणी करायची,त्या मध्ये एक पेंद्या असायचा आणि त्या पेंद्याच्या बेंबीत खोचून फटका उडवण्याची मजा काही औरच असायची त्यातही माझे व भावाचे भांडण ठरलेले मग आई रागवायची आरे दिवसभर तरी राहू द्या गवळणी पण तोपर्यंत फटाका फूटून अंगणभर शेण झाले असायचे. मोठी बहीण दारात रांगोळी सजवायची.
मस्त फराळ भाजक्या पोह्याचा चिवडा, करंजी, लाडू व अनारसे, चकली व परंपरागत चालत आलेले गुळपापडीचे लाडू आई अवर्जून करायची.
दारात आलेल्या भुकेल्यांना अवर्जून सगळे पदार्थ दिले जायचे. गरीबीतही श्रीमंती असायची 'अतिथी देवो भव' हे वडीलांचे तत्वच
होते..
.
दिवाळीत दिलेला अभ्यास दूरेघी वहीत सजायचा. वही पण आम्ही नटवायचो. हसत खेळत पाढे पाठ व्हायचे कारण दिवाळी नंतर सूरू होणाऱ्या शाळेत वहीला सन्मान मिळायचा. त्यासाठी धडपड असायची ती वेगळीच..
संध्याकाळी घरोघरी लक्ष्मीपूजनाची लगबग पणत्यांची रोषणाई, दारासमोर वेगवेगळ्या रांगोळीचे साज, झेंडूच्या फुलांची आरास बत्तासे व लाह्यांचा नैवेद्य खरच मजा औरच..
मग यायचा पाडवा व मग भाऊबीज हा आवडीचा दिवस भाऊ किती ओवाळणी टाकणार? याची मैत्रीणीत चर्चा व्हायची येणाऱ्या ओवाळणीतून काही तरी खरेदी करायची असायची ना! खरेदी फार मोठी नाही कानातले, गळ्यातले नाहीतर कंपासपेटी वा पेन. कारण दुकान या गोष्टींनी भरलेली असायची व त्या वस्तू आम्हाला वाकुल्या दाखवायचे.
माझा मोठा भाऊ नेहमी काहीतरी क्लुप्त्या करायचा. तो आम्हा बहिणींन साठी चिठ्ठ्या करायचा, प्रत्येक चिठ्ठीत सुपारी असेच लिहायचा पण मला हे माहित नव्हते.
मी लहान मलाच ऊचलायला सांगायचा, मग काय सुपारीची ओवाळणी नि डोळ्यात पाणी.
मग छान gift असायचे सगळ्या मैत्रिणीन पेक्षा वेगळ. हि गोष्ट सोडा पण आधी रडवायचे ना मला.
आज खुप आठवणी दाटून आल्या आहेत. खुप उतरवल्या खुप मनात घोळत आहेत.. खर सांगू आज ही दिवाळी आठवणीच्या कप्प्यात सरकली आहे.
आज दिवाळी आहे पण श्रीमंतीत लपटलेली. पूर्वीची मजा यात नाही.सगळ online shopping. शुभेच्छांचा पाऊस what'sapp वर Facebook वर पडतो. 'गळाभेट' पेक्षा 'नेटभेट' वाढली आहे.
घरोघरी जाऊन मोठ्यांचा आशीर्वाद हमखास घेतला जायचा. काकू आत्या हातावर लाडू, करंजी ठेवायचे पण आता फराळाची image पाठवून फराळ पोंहचता होतो.
नवीन कपड्यांची मजाच विरून गेली. दिवाळीच्या पदार्थावर पण डायटिंगच्या नावाखाली कंजूषी आली. आपलेपणा, एकमेकांकडे जाणं येणं याला वेळच नाही याचे लेबल लावून दिले.
दिवाळीच्या दिवशी काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या ती काढतानाच एकाग्रता त्यात रंग भरण्याची कुशलता जाउन फोटो सेशन वाढले.
घरासमोर रेडिमेड रांगोळीने बस्तान बसवले. सुंदर प्रभात गीते मनातच गुणगुणू लागली. शाळेत मुलांना मागवलेली सणाची माहिती गुगल बाई डोक्याला ताप न देता हातात देऊ लागली.
आठवतय मला भाऊ चांदोबा, बालवाडी, किशोर हे दिवाळी अंक आणायचा आणि आम्ही त्याचा फडशा पडायचो. आता हे दिवाळी अंक लहानग्यांच्या हातात मला दिसतच नाहीत. खरच मनाने नवीन स्वीकारले पण जून्याचं काय? मोठे प्रश्नचिन्ह??
नेहमीच येतो पावसाळा तद्वतच नेहमीच येते दिवाळी आशी गत नक्की या दिवाळीला काय म्हणायचं या बाबतीत मीच संभ्रमित आहे..
द्याल याचे उत्तर? मी मात्र अजूनही माझ्या आठवणीतील दिवाळीत रममाण.