गेले द्यायचे राहूनी
गेले द्यायचे राहूनी
सुजू ताईचा फोन आला "संध्या आई गेली ग सकाळी."
"काय सांगतेस ताई? अग आज निघणार होते मी,अशी कशी गेली ती?"हो तुझ्या वाटेला डोळे लावूनच तिने प्राण सोडला.
माझं मन विषन्न झाले. रडायचे होते पण डोळ्यातून पाणी ओघळत नव्हते.नुसते स्फुंदन चालू होते."
प्रशांतला आॉफीस मध्ये फोन केला.लवकर या घरी येताना शाळेतून मुलांना घेऊन या आपल्याला निघायला हवं आई गेली. "
बापरे असे कसं अचानक? तु केंव्हाच जायला हवं होतं संध्या प्रशांत म्हणाला.
हो आता काय करायला हवं होतं आणि काय नको?ते सगळे व्यर्थ आईची शेवटची भेट मात्र राहून गेली. मी फोन ठेवला.
कॉटवर पसरलेल्या बऱ्याच वस्तू आता मला वाकुल्या दाखवत होत्या.ज्या गोष्टी मी आईसाठी आणल्या होत्या आणि आज त्या घेऊन मी जाणार होते.
परवाच तर फोनवर बोलली माझ्याशी, तेंव्हा म्हणाली, "संध्या कधी येशील ग, फार भेटावसं वाटतं तुला!" बरेच दिवस झाले आली नाहीस. फारच संसारात गुरफटून गेलीस. आजकाल तुला आईला फोन करायला पण वेळ नसतो."
"हो आई येते ग खरच वेळ नाही ग मुलांच्या शाळा, प्रशांतचे आॉफीस, घर संसार यात दिवसभराचा वेळ कसा संपून जातो कळतच नाही."
हो चालायचेच ग, लेक सासरी गेली कि, तिची माहेरवरची माया पातळ होते.सासर तिला आपलेसं होउन जातं.असेच असते ग,नवीन नाती जोडली कि, जुन्या नात्याची किंमत थोडी कमीच व्हायला लागते असो.
याचा मला अभिमान वाटतो ग, पण कधी कधी या जबाबदाऱ्या पेलताना, आपली पण कोणीतरी वाट पाहत आहे. याची जाण असावी ग!.
मी काय यावर्षी आहे, पुढच्या वर्षी कोणी बघितले. ठेवते फोन.
आईने फोन ठेवला.का बरं आई एवढे निर्वाणीचे बोलली? काय सल हिच्या मनात? काही नाही जायलाच हवे तिला भेटायला.आपण आज करू ऊद्या करू करता तिला फोन पण नाही झाला एवढ्यात.
न राहून मी परत फोन केला.आई येते मी तुला भेटायला आणि येताना मी तुला घेऊन येणार आहे माझ्याकडे. तयारी ठेव.
बरं काय आणू येताना तुझ्यासाठी? मी विचारले.
काही नको फक्त तु ये संध्या! माझे काही तुझ्याकडे येणे खरे नाही ते बघू नंतर. पण तु ये लवकर.
आईशी बोलणे झाले आणि मी तिकिट बुक केले. दोन दिवसांनतरचे बुकिंग मिळाले.
असो दोन दिवसानंतर तर दोन दिवसानंतर पण जाणार ना मी तिला भेटायला. म्हणत तयारीला लागले.
चार दिवसच जायचे म्हणजे तेवढी व्यवस्था तर घरची लावायला पाहिजे.
मुलांच्या शाळा बाहेरचे खाणे नको म्हणून थोडासा जास्तीचा खाऊ करायला घेतला. आईला आवडतात म्हणून बेसणाचं लाडू करून घेतले. तिला काळा खजूर आवडतो म्हणून तोही आणला.दोन रेडिमेड ढोकळ्याचे पॅकेट टाकले. आईला ढोकळा आवडतो. करून खाऊ घालेल.
अंबाड्यावरच्या चार पाच जाळ्या घेतल्य
ा. मस्त अंबाडा घालते आई अजूनही आणि त्यावर जाळी आणि अंबाड्याच्या उजव्या बाजूला आकड्यात खोचून पिवळा चाफा आई माळायची.पण आता फक्त अंबाडा उरला. बाबा तो चाफा आणि सुगंध घेऊन गेले.
असो जेवढे आठवेल तेवढे बॅगेत भरत होते. आईच्या आवडीचा मोरपिशी रंग, त्या रंगाच्या दोन साड्या पण घेतल्या.आईचे मापाचं ब्लाऊज असते तर शिऊनच नेले असते. जाऊ दे टाकू या आपणच तिकडे गेल्यावर शिवायला. म्हणत भराभर बॅग भरली.
एक छोटा औषधे ठेवण्याचा डबा आवडला म्हणून घेऊन ठेवला होता. आता त्यात तिची औषध भरून ठेवेन.म्हणजे कोणती गोळी विसरण्याचा प्रश्न येणार नाही.
आईला भाजणीचे थालिपीठ पण करून खाऊ घालेल. भरलं कारलं पण करेल. मनात नुसते मनसुबे.आता काही नवीन पदार्थ शिकले होते ते पण आईला करून खाऊ घालूया.तिकडे नकोच इकडे आईला घेऊन येऊ, छान माहेरपण करूया तिचे.
घरात सगळी तयारी करुन कोठे काय ठेवले त्याची नोट लिहून फ्रिजवर चिटकवून ठेवली.
ताईला फोन केला. ताई तु पण ये आईकडे मी येते आहे. दोघींनीही ठरवलं.दादालाही फोन झाला.
तयारीला लागले खरे तर मुलांना चार दिवस एकटे सोडायचे पण जिवावर येते. प्रशांतने त्याकाळात घरूनच काम करायचे ठरवले होते म्हणून थोडी काळजी कमी झाली.
बघता, बघता तयारीत दोन दिवस संपले ऊद्या दुपारच्या गाडीनं निघाले रात्री पोंहचेल.
येताना आपण आईला आग्रहच करूया,प्रशांतला बोलावून घेऊया आपल्याला घेऊन जायला. मग आई तेंव्हा प्रशांतला नाही काही म्हणणार नाही. येईलच बरोबर.
ताई जवळच राहत होती.ती नेहमीच यायची आईकडे. वेळप्रसंगी दादा बरोबर उभी असायची. मी थोडी लांब आणि जास्तीच संसारात गुंतलेली.
पण नाही आता ठरवेन दर महिन्याला आईला भेटायला जाईल आणि न चुकता तिला रोज फोन करणार.
काय घ्यायचे राहिले नाही ना म्हणत बॅग भरायला घेतली. इतक्यात ताईचा फोन.
सगळेच संपले,खरच आई गेली.मला उशीर झाला पोहचायला.
प्रशांत म्हणाला होता.जा अर्जंटमध्ये तिकिट काढून. मी म्हणाले,असू दे दोन दिवस मिळतात तर थोडी तयारीनिशी जाते. वाटल्यास परत तिकडे दोन दिवस राहील जास्त.
नक्की काय हाती लागले माझ्या?आता सगळेच संपले. आईला कळलं होतं का आपण जाणार, म्हणूनच तीने मला फोन नव्हता ना केला?
आता काय देऊ तिला सगळेच द्यायचे राहून गेले.आता मी गेले
आणि नाही गेले तरी काय फरक पडणार होता.
आई नेहमी म्हणायची, संध्या कोणत्या कामाला किती महत्व द्यायचे ते समजून घेणे महत्वाचे, कारण कोणती वेळ कशी येईल हे सांगता येत नाही. आज कळलं आई सगळे पण आता काय ऊपयोग?..
प्रशांत दारात उभा होता. मला म्हणाला, "आपण आधीच जायला हवे होते.काय ऊपयोग दारात चारचाकी असून!"....
"सगळेच गेले द्यायचे राहूनी!" ...