Shailesh Palkar

Abstract Drama Fantasy

3.6  

Shailesh Palkar

Abstract Drama Fantasy

मनगुज

मनगुज

24 mins
290


मनाचं बीज कोरडं पडणं, ओलावणं, अंकुरणं अन् फोफावणं या अवस्थांचं पुढे काय होईल? याची उत्कंठा तिला बेचैन करणारी होती. जीवनाच्या जगरहाटीत तन, मन, धनाची अपेक्षा बाळगून खोटी चर्चा होते. तन आणि धनाच्या मागे सर्वच धावत असतात. मात्र, जे हळूवार अमूर्त असते त्या मनाचा विचार कोणी करतो? फोफावणाऱ्या मनाला विभक्त ठेऊन त्याच्यासोबत केलेलं गुंजन.... 'मनगुज!

सम्राट आज सैरंध्रीवर नाराज होता. 'तु माझी लग्नापूर्वीपासूनची प्रेयसी असूनही केवळ तन आणि धनाचाच विचार तुझ्या डोक्यात घोळत असतो. कधी तु माझ्या मनाचा विचार केलास का?' त्याच्या तोंडून हे उत्स्फूर्तपणे बाहेर पडलेले उद्गार क्षणार्धात त्याला अंतर्मुख करुन गेले. सैरंध्रीची त्यावरील प्रतिक्रिया व्यक्त होण्यापूर्वीच त्याचे डोळे विस्मयचकीत होऊन तो लगेचच उद्गारला, 'इटस् ऍन एक्सलंट आयडिया!' सैरंध्रीलाही त्याचे ते वागणे अजब वाटले. गोंधळलेल्या चेहऱ्याने ती त्याच्याकडे पाहात असतानाच तो तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला घेऊन बेडरुमच्या दिशेने चालू लागला. पलंगावर तिला कुशीत घेऊनच पहुडला. तिच्या खांद्यावरील हात त्याने अद्याप काढला नव्हता. तिने मात्र त्याच्या छातीवर हात ठेवून आपला गोंधळलेला चेहरा तसाच कायम ठेवला होता.'सैरंध्री, तु माझी लग्नापूर्वीपासूनची प्रेयसी असूनही केवळ तन आणि धनाचाच विचार तुझ्या डोक्यात घोळत असतो. कधी तु माझ्या मनाचा विचार केलास का?' सम्राटचा सूर आता समजुतदारपणाचा, तिला विश्वासात घेणारा जरी होता, तरी वाक्य तेच होते. सैरंध्रीने त्याचा विक्षिप्तपणा यापूर्वीही अनेकदा अनुभवला होता. पण आजचे त्याचे वागणे तिला काही वेगळेच वाटत होते. ती मनातून पूर्णपणे हादरली होती. कारण सम्राटला मन आहे, असावे अशी भावनाही तिला कधीच स्पर्शून गेली नव्हती. त्याला जे पाहिजे तो ते मिळवित असे. सैरंध्रीलाही त्याने त्याच पध्दतीने मिळविले होते.

लग्नापूर्वीपासूनची प्रेयसी सैरंध्री होती हे जरी खरे होते तरी तेव्हा सुध्दा तिने त्याला मन असेल अशी शंकाही मनात येऊ दिली नव्हती. इतका तो परिपक्व विचारांचा होता. सैरंध्रीच्या जीवनात प्रेम फुलविण्याचे दिवस असताना अनाहुतपणे घुसखोरी करुन स्वत:ला पाहिजे ते मिळविण्याच्या जिद्दी स्वभावानुसार तिला मिळविणारा सम्राट आज चक्क मनाविषयी काहीतरी बोलतोय. ही बाब सैरंध्रीला त्याच्याशी आपण लग्नानंतर पाच वर्षे उलटूनही एकरुप होऊ शकलो नाही याची जाणीव करुन देणारी होती. ती नेहमीप्रमाणे निरुत्तर होती. आजही सम्राटच बोलणार आणि आपण फक्त ऐकत राहायचं या उद्देशाने तिला त्याच्या छातीवर थिजलेला हात तिने किंचितसा हलवून त्याला त्याच्या विचारांतून जागविले. तो पुन्हा म्हणाला, 'इट इज ऍन एक्सलंट आयडिया!' हे त्याचे स्वगतच होते. सैरंध्रीने न राहून त्याला विचारले, 'सम्राट, मघाशी रागाच्या भरात जे तु बोललास तेच पुन्हा आता समजुतीच्या सुरात बोलतोहेस. काय चाललंय हे तुझं?'सम्राटने जवळच्याच टिपॉयवरील सिगारेटचे पाकिट उचलून सिगारेट शिलगावली. तोंडातून धूर त्यापाठोपाठ दीर्घ उसासा सोडीत तो म्हणाला, 'हे बघ सैरंध्री, लग्नापूर्वी आणि लग्नानंतर इतकी वर्ष मी तुझ्यासोबत आहे. पण माझ्या शरीराचा आणि पैशाचाच तु उपपभोग घेत आलीस. खरं तर तन, मन आणि धन अर्पण करुन तुला मी अर्धांगी बनविलं होतं. तु मनाचा विचार कर केला नाहीस माझ्या?''सम्राट, अशी कोणती चूक आज माझ्याकडून घडली? त्याचा एवढा त्रागा का बरं करतोस तु? प्लीज बोल ना?' क्षमायाचनेच्या सुरात  म्हणाली.'सैरंध्री, तु, माझ्या कथा, कविता, लेख वाचलेस कधी?' सम्राटचा हा प्रश्न आणि त्याच्या आधीच्या बोलण्याचा परस्पर संबंध लावताना सैरंध्रीच्या कपाळावर उमटलेल्या आठया पाहून सम्राट पुढे म्हणाला, 'तुझ्या अपयशानं मला एक कथेचा नवा विषय दिलाय. तु माझी प्रेयसी पत्नी आहेस. जे तु स्वत:हून स्विकारले आहेस. त्या शरीराची आणि संपत्तीची दुसरी कोणी भागीदार न येता तु नाकारलेलं किंवा दुर्लक्षित केलेल्या मनाची कोणी साथीदार मला मिळाली तर तो अनुभव त्या कथानकात जान ओतेल. चालेल तुला?' सम्राटची एक्सलंट आयडीया कोणती ती आता सैरंध्रीला समजून आली होती. तो तसा अनुभव घेऊन त्याची कथा पूर्ण करणार याबाबत तिला जशी खात्री होती त्याचबरोबर तो जिला मनाची साथीदार बनवेल तिला शरीर अन् संपत्तीपासून नक्कीच दूर ठेवेल याबाबतही दृढविश्वास होता. तरीही ती परवानगी देण्यापूर्वी वचन घेण्याच्या सुरात म्हणाली, 'पण माझ्या स्थानाला कोणतीही बाधा आली नाही पाहिजे, प्रॉमिस?'

सम्राटच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला होता. तो तितक्याच उत्स्फूर्तपणे म्हणाला, 'येस, प्रॉमिस! कधी-कधी तुझीही मदत लागेल त्यासाठी, द्यावी लागेल!' सैरंध्रीला जणू तो आपणास सवतच नांदविण्यास सांगत असल्याचा भास झाला आणि ती पुढे काय घडेल त्यास पराभूतपणे सामोरे जाण्यास तयार झाली. एव्हाना अर्धेअधिक जळलेले सिगारेट त्याने ऍश ट्रेमध्ये कोंबले आणि सैरंध्रीचे आभार व्यक्त करण्यासाठी चुंबन घेतले. तिचा भेदरलेला चेहरा पाहून त्याने आता माझं मन समजून घेण्याची संधी तु गमाविली आहेस कशा अविर्भावात तिच्या गालावर हलकेच चापट मारली. तो बेडवरुन उठला तोवर सैरंध्री अर्धमेली झाली होती तर सम्राट अधिक तजेलदार दिसू लागला होता. मनाची साथीदार जणू आताच घराबाहेर त्याची वाट पाहात असल्याप्रमाणे त्याच्या हालचाली व्यक्त होत होत्या. सैरंध्रीने न राहून पुन्हा म्हटलं, 'सम्राट, आणखी एक अट, तुझी कथा संपल्यावर तुझ्या मनाची साथीदारही दूर झाली पाहिजे.' सम्राट कुत्सितपणे हसला. 'जेलस्ऽऽ! आता का जळतेस? आधीपासून काळची वाटली का नाही? ठीक आहे. मान्य आहे.' तिची अवस्था केविलवाणी झाली होती. पण तो शब्दाचा पक्का आहे ही त्याच्याबाबतची खात्री तिला निर्धास्त करणारी होती.सम्राट लेखन, राजकारण, समाजकारण, जनसंर्क अशा विविध आघाडयांवर प्रसिध्द होता. त्यामुळे त्याच्या पाहण्यात अशी एखादी व्यक्ती येईलही, मात्र, त्याचे इप्सित त्यातून साध्य होण्यास त्याचे वलयच अडथळा बनेल अशी मनोधारणा बाळगून सैरंध्री प्रथमच त्याचे अपयश चिंतीत होती. सम्राटचा संवाद त्यानंतर दिवसेंदिवस कमी होऊ लागला. सैरंध्री त्याला या प्रकरणात अद्याप यश आले नसल्याचे अनुमान लावीत होती. पण त्याचे बोलणे आता तिलाही समाधान देत नव्हते. कसाही वागला तरी सम्राट सैरंध्रीसोबत अबोला धरीत नसे. सैरंध्रीलाही सम्राटला असलेल्या मनाचे अस्तित्व आणि ते समजून घेण्याची ओढ निर्माण झाली होती. सम्राटचे मन आता थाऱ्यावर नाही हे तिला पदोपदी जाणवत होते. नेहमी उत्साहाने घराबाहेर जाणारा सम्राट मलूल होऊन घरीच परतायचा. तो आला की दरवाजा उघडताना त्याचे सिगारेट दरवाजापाशीच तो पायाखाली विझवून सैरंध्रीकडे न पाहताच हातातील बॅग सोफ्यावर भिरकावित बाथरुमकडे जात असे. तेथेच पायातील बूट आणि अंगावरील कपडे उतरवून शॉवरखाली फ्रेश होण्याचा त्याचा प्रयत्न अपयशी ठरत असे. नेहमीप्रमाणे त्याचे वर्तन सहज घडत नसे. सैरंध्रीचे अस्तित्व त्याला खटकतही नसे. अन् जाणवतही नसे. त्यामुळे घरपण संपत आले होते.'सम्राट, असे किती दिवस वागणार आहेस? हे बघ, मी प्रयत्न करेन तुझे मन सांभाळण्याचा, ते समजून घेण्याचा.' सैरंध्रीच्या मतावर काहीच प्रतिक्रिया न देता सम्राटने पुन्हा सिगारेट शिलगावीत स्वत:ला सोफ्यावर अस्ताव्यस्त झोकून दिले. ती मात्र चहा-पाणी, टॉवेल पुढे करीत आपला पत्नी धर्म निमूटपणे पार पाडीत होती. समोरच्या टी-पॉयवर रिकामा झालेला चहाचा कप आणि पाण्याचा ग्लास उचलण्यासाठी सैरंध्री समोर वाकली. तेव्हा सम्राटही सिगारेट ऍश ट्रेमध्ये विझविण्यासाठी पुढे सरसावला आणि दोघांची नजरानजर झाली. सैरंध्रीने अशा वेळी आपल्या मादक नजरेचा कटाक्ष त्याच्यावर टाकला. सम्राटला त्याचा अर्थ समजला. 'का? भूक लागली? तनाची आग विझवायचेय?' त्.याच्या तिरसट विक्षिप्त प्रश्नानं सैरंध्रीच्या डोळयात पाणी खळाळलं. शेवटी सम्राटनंच उठून तिच्या खांद्यांना धरीत तिला सोफ्यावर बसविलं.'सॉरी!' त्याचे स्वर भावूक झाले होते. 'इटस् युवर राईट! हा तुझा अधिकार आहे. माझं शरीर, माझं मन, माझा पैसा सारं तुला देऊ केला असताना तुला केवळ शरीर आणि पैसाच उपभोगण्याची बुध्दी आहे. माफ कर, आज नव्हे, सध्या तरी तुझ्या अधिकारातलं शरीर तुला उपभोगण्यास देण्याची मानसिकता माझ्यात नाही. प्लीज, ट्राय टू अण्डरस्टॅण्ड मी!' सम्राटचे समजूतीचे सूर दुर्लक्षित करण्याएवढी सैरंध्री स्वार्थी नव्हती. तिने सम्राटच्या मानशिलाजवळील केसांतून हलकेच आपल्या हाताची बोटे नेली आणि त्याच्या कपाळाचे हळुवार चुंबन घेऊन म्हणाली, 'गो अहेड!' ती तेथून ग्लास, कप, टॉवेलसह उठून आत गेली. सम्राटचा दिवस अन् रात्रही त्या सोफ्यावर पडल्या-पडल्याच संपली.सकाळी अवघडलेल्या अवस्थेट सम्राट उठला. तहान, भूक या मानवी शरीराच्या जाणीवा त्याच्यापासून अलिप्त रहाव्यात यासाठी त्याचे त्याच्यापासून दुरावलेले मन एका आशाकिरणाने प्रफुल्लित होत असे. सम्राटने पुन्हा आपोआप तजेलदार चेहरा धारण केला. पूर्वी घराबाहेर ऑफिसकडे रवाना होताना दिसत असेद्व त्याहीपेक्षा तो अधिकच स्माट दिसतो हे जाणविणाऱ्या सैरंध्रीला मात्र ती आज संध्याकाळी पुन्हा मलूल होऊन घरी परतणार नाही ना? याची चिंता सतावित होती.निघताना वेळेवर घराबाहेर पाऊल ठेवणारा सम्राट दिवसभरात काय करीत असतो याबाबत नेहमीच उदासिन असणारी सैरंध्री सध्या तरी चौकस झाली असली तरी तिला माहित असलेल्या त्याच्या ऑफिसातील दूरध्वनीवर थेट त्याच्याशीच बोलण्याइतके धाडस आता पूर्वीप्रमाणे तिच्यात नव्हते. बेचैनीत ती तो परतण्याच्या क्षणाची वाट पाहात होती. आता बेल वाजेल..... वेळ आली तो येण्याची.... छेऽऽ! कसले काय? सोफ्यावर बसल्या-बसल्या विचारांती ती शिणली. 'ठक्ऽऽ ठक्ऽऽ!' दरवाजावरील नॉकिंग.... 'सैरंध्रीऽऽ!..... सम्राटचा पाठोपाठ आवाज. विचित्रच!' दरवाजाची बेल वाजविणारा सम्राट चक्क दार ठोठावतोय, साद घालतोय, सैरंध्रीने लगबगीने दरवाजा उघडला. आज तो मलूल नव्हता. त्याने तिच्या हातात बॅग दिली. जवळच बूट काढले. सोफ्यासमोर बसून मोजे पायातून काढले. सैरंध्रीच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्हं पाहून तो म्हणाला, 'आज भी मेरी जिन्दगीमें वही हुआ जिसका मुझे हमेशासे डर था, की आज भी मेरी जिन्दगीमें कुछ नही हुआ' सैरंध्रीने बळेच हसल्यासारखं केलं आणि तो अनपेक्षितरित्या म्हणाला, 'ब्युटीफूल, गुड स्माईल, स्वारी आज खुशीत आहे असे समजून तिने चहा-पाणी, नाश्ता, टॉवेल अशी तयारी जरा घाईनेच केली. तो फ्रेश होऊन बाथरुपबाहेर आला. टी-पॉयवरील सिगारेटचे पाकिट लायटर उचलणार तेवढयात सैरंध्री खांद्यावर टॉवेल आणि हातात चहा-पाणी-नाश्ताचा ट्रे घेऊन आली.'सम्राट, मूड कायम ठेव, ते सिगारेट आधी बाजुला ठेव पाहू!' ती तिची अधिकारवाणी गाजवित होती. सम्राटही ते ऐकण्याच्या मनस्थितीत होता.'दॅटस् लाईक अ गुड हसबण्ड! आज खूप दिवसांनंतर तु फ्रेश झालाहेस. काय कोणी भेटलं?' तिचा प्रश्न अनपेक्षित होता. सम्राटनं सिगारेट खाली ठेवलं. तिने पुढे सरसावलेला चहाचा कप त्याने हातात घेऊन तिला सोबत सोफ्यावर बसविले.

'सैरंध्री, तुझ्यातही बदल घडतोय. पण आता माझी मानसिकता तुला अनुकुल नाही. तु समजून घे. साथ दे. माझ्याकडून काही वावगं घडणार नाही याची खात्री ठेव. आज एक तरुणी भेटली. ती यापूर्वीही भेटत असे मला. ओळख पूर्वीची. दीड-दोन महिन्यांची असेल. ती बेचैन होऊन घरी येत असे. तिला काही विचारु शकत नसे म्हणूनच. पण आज धाडस केले. पूर्वीच्या बोलण्यात थोडा फरक करुन थोडा व्यक्तीगत संवाद साधला. तीही विवाहित आहे. एक मुलगी आहे. तिचे मिस्टर आणि तिच्यात वैचारिक अंतर आहे. शैक्षणिक व्यक्तिमत्व आणि आवड-निवडीतही बरेच अंतर आहे असं ती म्हणाली. साहित्य, राजकारण यात तिला असलेला रस हा केवळ या क्षेत्रातील माझ्यासारख्यांशी ओळख निर्माण करण्यापुरताच आहे, असं मला जाणवलं. ती माझ्यासोबत ओळख झाल्यापासूनच प्रभावित आहे. मीच आतापर्यंत कधी तिची दखल घेतली नव्हती. मधाळ बोलणं, सौंदर्य, रसिकता याप्रमाणेच ती थोडीशी मनकवडीदेखील आहे. नेमकं कसं बोलावं अन् बोलतं करावं यात तिचा हातखंडा आहे. मला आज तिनेच बोलतं केलं आणि मी पहिल्याच व्यक्तीगत संवादात मी तिच्यापासून प्रभावित असल्याचं मत तिला चिकटवून दिलं. यामागे ती माझं मन सांभाळू शकते काय? याचा अंदाज बांधण्याचा माहा हेतू होता. 'सम्राटचं बोलणं सैरंध्रीसमोरही आडपडदा न ठेवता सुरु होतं.' मनाली मानकामे. तिला मी आज माझ्या आवश्यकतेनुसार चाचपून पाहिलं. शी इज राईट चॉईस फॉर माय कन्सेप्ट. उद्या ती मला प्रवासात नेहमीप्रमाणेच भेटेल. मी पुढील अध्याय सुरु करेन. तरीही तन आणि धन तुझंच राहिल याची खात्री ठेव.''हुऽऽश्य!' सैरंध्रीने सुस्कारा सोडताच दोघेही हसू लागले. त्याने मनाली मानकामेला देऊ केलेलं मन आज तिच्यासमोर रुपरेषेसह मांडले. 'तुला काय वाटतं?' ती तिचा संसार सोडून तुझ्या नादी लागेल? बघ, पुन्हा पश्चातापाची वेळ ओढवेल!' सैरंध्रीची शंका.'नाही. तिने तिचा संसार नेटका करावा. माझा त्यात हस्तक्षेप नसेल. तरीही तिने माझ्या मनाचा सांभाळ करावा ही माझी अपेक्षा आहे.

सम्राटच्या बोलण्यात तिला दोन-तीन जणांचा पराभव दिसत होता. एक स्वत: सम्राट, मनाली आणि झालंच तर तिचा संसारदेखील. यामुळे उद्ध्वस्त होईल अशी शंका तिच्या मनाला स्पर्शून गेली. मात्र, तरीही सम्राट पूर्वीप्रमाणे नॉर्मल झाल्याचे एकमेव समाधान तिला लाभले होते. तो तिच्यासोबत जेवला आणि झोपला. काही तासांतच सम्राटने डोळे उघडले. तच्यासमोर मनालीचा चेहरा सतेच होऊन तरळू लागला. तो तेथून उठला आणि थेट बेडरुमबाहेरील ड्रॉईंगरुममध्ये जाऊन टी पॉयवरील लेटरपॅड आणि पेन उचलले. तो आपल्या मनातील विचार लिहू लागला.'जीवनावर सारेच प्रेम करतात. पण सारेच स्वत:चे जीवन कुठे जगतात, मी जर मनावर प्रेम करतो तर ते मनही माझेच असावे असे का वाटून घ्यावे? जीवन कुठे माझ्यानुसारच मला जगविणार आहे? मग मनावरही माझाच ताबा का असावा? मी अन् माझे जीवन मर्त्य तर माझे प्रेम, माझे 'मन'अमर्त्य? असेलही! मी साऱ्यांकडून खेळविला जात असलो तरी त्यातही निश्चितच आनंदी आहे.'ते लेटरपॅड त्याने टी-पॉयच्या खालील वर्तमानपत्रांच्या गठ्ठयात ठेवले. आणि तो पुन्हा सैरंध्रीच्या शेजारी येऊन निजला. तो तळमळत होता. सैरंध्री त्याची ही अवस्था किलकिल्या उघडया डोळयांनी पाहात होती. साधारण तासा-दोन तासांनी सम्राट पुन्हा टी-पॉयकडे गेला. त्याने ते लेटरपॅड पुन्हा उचलले. तो लिहू लागला. आता मात्र सैरंध्री बेडरुमच्या दरवाजाजवळ येऊन त्याला चाहूल न लागू देता तो काय करतोय ते पाहू लागली. थोडया वेळाने त्याचे लेखन थांबले अन् ती झटदिशी बेडवर पांघरुण ओढून झोपल्याचे सोंग करु लागली. सम्राटही तिच्या शेजारी आडवा पडला. 'सम्राट, आता निवांतपणे झोप पाहू, किती वेळ जागशील?' तिने हे बरळल्यासारखे म्हटले. तो निपचीत पडून होता.सम्राट ऑफिसला जाण्यासाठी आज खूपच दिवसांनी परफ्यूम वापरत असल्याचे पाहून सैरंध्रीला आश्चर्य वाटले. पण तरीही तो जाण्याचीच ती वाट पाहात होती. तो गेला अन् तिने रात्री तो लिहित असलेल्या टी-पॉय खालील लेटरपॅडचे पान उघडले. पहिल्या पानावरचा मजकूर थोडाच होता. तिने पान पलटले. ती वाचू लागली......'जीवनातला प्रत्येक क्षण जीवंतपणे जगताना इतरांच्या जीवन जगण्याच्या क्षणांच्या तुलनेत आयुष्यातील अनुभवांच्या क्षणांनी प्रगल्भतेपेक्षा वार्धक्याकडे तर पोहोचवीलं नाही ना? असा विचार मनात येतो. आज या जगण्यातील उर्मी असंगत होत असताना क्षणभंगूर जीवनाकडे तटस्थपणे पाहू लागलो तर प्रत्येक क्षण जीवंतपणे जगण्याचा खटाटोप-अट्टहास जीवनावर लादत तर नाही ना? या आणि अशा असंख्य विचारांचे काहूर मनात उठते.मन... अनुभवप्राप्तीची ओढ आणि त्यास जगण्यास मिळालेल्या क्षणांची जोड यांचं एक अजब रसायन होवू पाहतेय. इच्छांचे धुमारे, आशांचे रंग, निराशेच गडद ढग, आनंदाचे तरंग, संघर्षाची जंग, प्रेमाची आस, सत्याची कास, असत्याची ढास, आपुलकीचा भास, दुर्जनांचा त्रास, नवनिर्मितीचा ध्यास, अहंकाराचा ऱ्हास, सन्मानाचा हव्यास, प्रियजनांचा सहवास, कर्तव्याची गती, कर्तृत्वपूर्तीची मती, त्यागाची भावना, प्रतिशोधांची कामना, थोडी विषयवासना सारेच क्षण या अजब रसायनाचे जणू अणू-रेणूंप्रमाणे अंग झाले आहेत.मग... हे मन कोणाकडे कसे मोकळे करु शकतो? नश्वर शरीर, तथाकथित आत्मा, सद्सद्विवेकबुध्दी, नीतिमत्ता, राहणीमान साऱ्यांचा केंद्रबिंदू होऊन शरीर आणि जीवन यांचे विलक्षण परिमाण ठरलेले मन या दोहोंपासून अविभाज्य असतानाही आज ते मी विभक्त करीत आहे. तुझेच ते नाव ठेऊन... 'मन'! तु एक अमूर्त अन् मनही!मी आता मन नसलेला निर्मनुष्य झालोय!

सैरंध्रीला सम्राटचं मन केवढं हळुवार झालं असेल याची आता कल्पना येऊ लागली होती. ती मटकन सोफ्यावर बसली. आता तिला तिचे प्रेमातले अत्तराचे सुगंधी दिवस आठवू लागले. खरं तर सुगंध दरवळण्यासाठी सम्राटच अधिकाधिक झिजत होता. जे तेव्हा लक्षात आलं नाही ते तिला जाणवलं. सोबतच तो पुन्हा दरवळण्यासाठी पुन्हा झिजत असल्याचीही तिला जाणीव झाली होती.दिवसामागून दिवस जात होते. सैरंध्री त्या लेटरपॅडची पाने रोज नित्यनेमाने वाचून स्वत:चे आत्मपरिक्षण करु लागली. सम्राट आणि तिच्यात आता फारसा संवाद राहिला नव्हता.'मन जे कुढत राहते, उचंबळून येते. कधी मारावे लागते, कधी मोडले जाते. आनंदाने, सुखावते, दु:खी होते. नाचते-गाते. ते सारे आता माझ्यापासून दूर झाले आहे. मी कुढत बसणार नाही, केवळ उचंबळून येणार नाही. मारणार नाही-मोडणारही नाही, आनंदणं-सुधावणं-दुखावणं, नाचणं-गाणं हे सारं आता तुझं काम, तुझ्या भावना. मी अलिप्त झालोय. तुला मन बनवून. तु सारं व्यक्त कराचयचं अन् मी.......केवळ पाहात रहायचं, डोळयात साठवायचं, तु तुझे भावनाविष्कार! एक स्वगत सम्राटचे.'तन, मन, धन अर्पून कोणी आपलंसं करण्यासाठी निवडलं अन् प्रेयसीसोबत विवाहबध्द झालो. तर तन घेऊन अर्धांगी अन् धन घेऊन सहचारिणी होणाऱ्या तिने मनाची फारच उपेक्षा केली. ते माझ्यापासून सोडविता येईना. मग मी तरी ते वाऱ्यावर कसे सोडणार? आता तन आणि धनाची मनाला साथ नसल्याने मी मनाची जास्त काळजी घेत होतो. पण ते मात्र एकाकी झाले होते. कदाचित माझंच मन मला व्यवस्थित राखता येत नव्हते. एखाद्या रेशमी कोषातून सुरवंट व्हावं इतकं ते विद्रूप दिसण्यापूर्वीच मनाचा एकटेपणा दूर करण्याची आवश्यकता होती आणि खरंच मनपाखरु आता फुलपाखरु झालंय. ते शब्दात अव्यक्त असेल, पण स्वप्नात भराऱ्या घेतंय हे नक्की! मन आता तुझ्याकडे आहे. ते तु स्विकारलेस असा जरी माझा गोड गैरसमज असला तरी तो खोटा ठरविण्यासाठी माझ्या मनपाखरास झिडकारु नकोस. त्याचे ते सुंदर मखमली पंख माझ्या संगोपनातून नसेलही पण तुझ्या तरी सहवासातून फडफडले असतील? अजून ते नाजूक आहेत. हळूवार आहेत. त्या मनपाखराचे झिडकारणे त्याच्या पंखांचा नाश करुन त्याला पुन्हा विद्रूप सुरवंट करणारे ठरेल. मग...किडा-मुंगीसारखे जगेल... भानावर ये!अजूनतरी मनपाखरु तुझ्याभोवताली फुलपाखरु होऊन घुटमळतंय. ते बघ! घे आनंद! दे आनंद! त्याला तु हळूवार स्पर्शून. ते पुनश्च उभारी घेईल. राखेतून भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे. मनाच्या हाळीसरशी सारी सृष्टीच माझ्यासाठी बदलण्याची अनुभूती मन प्रसन्न करेल. पण त्यावेळीही ते तुझ्याचकडे असेल अन् मी फक्त न्याहाळीत असेन. भरलेल्या डोळयांनी! त्रयस्थासारखा! माझ्याकडे असे एक निपचित शरीर, निस्तेज डोळे जे मन नसल्यामुळे संवेदनशून्य, भावनाहीन, मृतवत् झालेले असेल! निरपेक्षतेने तुला देऊ केलेले माझे मन जर मन समजूनच बाळगलेस तर ठीक अन्यथा त्या निस्तेज डोळयांतील ओघळून सुकणारे अश्रू भावना जेव्हा व्यक्त करतील तेव्हा कदाचिततन आणि धन जरी संपले असले तरी त्या भावना समजून घेण्यास मन जीवंत असेल. तेही फक्त तुझ्याकडे... मन!'सैरंध्रीच्या डोळयांच्या पापण्या ओलावल्या त्याचे मन त्याने अन्य कोणाला अर्पण केले असल्याचे त्याने शब्दात व्यक्त केले असले तरी सत्यात ते शक्य नाही असे तिला मनोमन वाटत होते. तिने त्याचे लेटरपॅडवरील पुढचे स्वगत वाचण्यास सुरुवात केली.'माझ्या जीवनात 'मी'चे अस्तित्व कधीकाळी होते. व्यक्तिमत्व विकासासाठीचे माझे प्रयत्न 'मी'लाही खतपाणी घालीत असल्याने स्वत:ला बुध्दीवादी म्हणजेच 'जायन्ट' म्हणवून घेऊ लागलो होतो. मनापेक्षा जेव्हा 'मी' मोठा होतो, तेव्हा बुध्दीवादी 'जायन्ट'चा अर्थ 'राक्षस' असाही लावला जातो आणि तो तसाही लावला गेला माझ्या बुध्दीवादीपणाचे भय इतरांना वाटू लागले. प्रखर सत्य, जहाल विचार, असीम निष्ठा, अद्वैत प्रामाणिकपणा प्रत्येक गुणांना विशेषण जोडले जाऊ लागले, अन् 'मी' मोठा झाला. तरीही त्या मोठेपणाला मनाने सोडले नव्हते. मन कुठे तरी अडगळीत फेकले गेलेले निपचित पहुडलेले होते, तरी मृतवत् नव्हते. मनामध्ये 'मी'ला मोडीत काढण्याची एक जबरदस्त इर्ष्या होती.

'मी' मला सहज कोणाशीही बोलण्यास प्रतिबंध करीत असे. अलिकडेच एकदा 'मी' मला सहज कोणाशीही बोलण्यास प्रतिबंध करीत असे. अलिकडेच एकदा 'मी' गाफील असताना मनाने संधी साधली आणि तुझ्याशी संवाद साधला गेला. त्यानंतर माझ्या मनावर मनाचेच राज्य सुरु झाले. तुझे माझ्या जीवनातील अस्तित्व हे 'मनोरंजन' नाही, 'मनोकामना'ही नाही तर सपशेल 'मन'च झाले आहे हे जरी आता प्रकर्षाने जाणवत असले तरी मध्येख कधी तरी माझ्यातून गळून गेलेल्या 'मी'पणाची उणीव मला त्यामुळे भासेनाशी झालेय. ते एकप्रकारे चांगलंच झालं. बुध्दीवादी 'जायन्ट' हा राक्षस अर्थाने 'जायन्ट' झाला होता त्याचा पुन्हा माणूस झाला. माणूस झाल्यानंतर एका हळव्या क्षणी तुला 'मन' अर्पून बसला. आता सध्या तरी त्याचे शरीरच ओळख बनलेय. त्याचे मन केवळ तुझ्या ओळखीचेच आहे. शरीराला ओळखणाऱ्या हजारोंपेक्षा मला ही ओळख 'अनमोल' आहे. इतरांसाठी मी केवळ शरीर आहे.'सैरंध्रीने सम्राटने मनाली मानकामे या विवाहित महिलेला अर्पण केलेले 'मन' आता आपणास वश होणार नाही हे त्या स्वगतांवरुन जाणले. मात्र, तिला उत्सुकता होती, ती सम्राटच्या 'मन' विषयक संकल्पना केवळ मनाचेच अस्तित्व अबाधित राखणाऱ्या आहेत अथवा त्यामध्ये तन आणि धनाची गल्लत करणाऱ्या आहेत? हे जाणून घेण्याची ती मोठया उत्कंठेने लेटरपॅडवरील स्वगत वाचू लागली.'मन... सध्या माझ्या नियंत्रणाखाली नसलेली माझीच एक अमूर्त संकल्पना. मग मी फक्त शरीर आणि खिशात पैसा अन् नाहीसा झालो तर? त्याबाबत मला फारसे दु:ख वाटणार नाही. पण माझ्यापासून विभक्त होन तुला देऊ केलेले माझे मन, माझेही नाही आणि तुझेही नाही अशा परिस्थितीत निर्मन झालो तर.... ईश्वराच्या श्रध्देपोटी वाहिलेल्या फुलांचे जसे निर्माल्य होते; तसे प्रेमापोटी अर्पण केलेल्या मनाचेही निर्माल्य होईल. कोमेजलेली फुले आणि मन ईश्वराला तरी कोठे कायम तजेलदार ठेवता येतात? मग ईश्वराप्रती व्यक्त केलेली श्रध्दा काय अन् प्रेम काय त्यातून मलुलता येणार असेल तर काय उपयोग? ईश्वर आणि प्रेम ही संकल्पना एकच. मात्र, मन हे दोन्हीपासून वेगळे, तरीही अमूर्तच! भक्तीने ईश्वरप्राप्ती होईलच असे नाही; तद्वतच मन अर्पून प्रेम मिळणेही अशक्य आहे. माझे मन निर्माल्य होईल त्या प्रेमाखातर जेथे मी ते अर्पण केले आहे. निर्माल्य झाल्यावर प्रेमाची जागा ती कोणती? माझे शरीर तर त्याने केव्हाच सोडले आहे. ते अधांतरीच राहील. पुन्हा कोणावर प्रेम करताना ते त्यास पात्र ठरणार नाही. मग सारे राज्य तन आणि धनाचे! शीऽऽ! किती किळसवाणे असेल ते तन तन आणि धन?प्रेमाला अर्पिलेले मन आणि ईश्वराला वाहिलेली फुलं मलूल होण्यापूर्वीच प्रेमाने अन् ईश्वराने स्विकारावीत. पण तसे घडणार नाही. दुर्दैवच दुसरे काय? मनाला वेदना होतात. संवेदनाही होतात. ते आराधना करते. त्यामुळेच 'मन तुझे शुध्द ही गोष्ट लाख मोलाची. तु चाल रे पुढे तुला रे भिती कोणाची?' अशी प्रोत्साहनात्मक भाषा मनाला आत्म्याकडून प्रेरणा देत आहे. आता शरीराला धन आणि मनाला आत्मा साध देत असल्याचे जाणवित आहे. कदाचित, शरीरासोबत जसे धनाचे मोल संपेल तसे मन माझ्यापासून दूर झाल्याने त्यापाठोपाठ आत्माही जाईल. प्रेमात सर्वकाही क्षम्य असते म्हणतात. माझे शरीर त्या मनास व आत्म्यास बंडखोरी केल्याबद्दल क्षमा करण्यासाठी जीवंत तरी असेल काय? शरीर जीवंत नसले म्हणून काय झाले? माझे मन आणि त्यासोबत गेलेला आत्मा निश्चितच चिरंतन राहतील. कारण सध्या जरी मनच तुझ्याकडे असले तरी त्यानंतर आत्माही येऊ पाहतंय. एका आंग्लकवीनं कदाचित माझ्या या अवस्थेचं वर्णन शतकापूर्वीच केलंय. तो म्हणतो, 'खऱ्या मनांचं मिलन स्वर्गातच घडतं. मग मी पृथ्वीवरल्या मिलनाची का आशा धरु? मन... तुझे मन मन माझेही....जेव्हा शरीराचं अस्तित्व नश्वर होईल तेव्हा ईश्वरा घरी दोन्ही मनं नक्कीच भेटतील. येथे ज्या शरीराचा विटाळ होतो, ते शरीर तेथे नसेल. आज शुध्द असलेलं मन येथे जरी मांगल्य झालं तरी तेथे ते पवित्र असेल. तैसे मिलन आपले व्हावे! हीच प्रार्थना!'सम्राटच्या प्रत्येक भावनेतील आवेग या स्वगतातील ओळी ओथंबून व्यक्त करीत होत्या. सैरंध्रीला तर तन, मन आणि धन यापैकी 'मन' हीच श्रेष्ठ बाब असल्याचे आता जाणवू लागले होते. गेल्या अनेक दिवसात सम्राट आणि सैरंध्रीतील दुराव्याचीच तर ही परिणती नसावी ना? सैरंध्रीने आपल्या तन आणि धनाचा अधिकार गाजविण्याचा निर्धार केला. आज सम्राटची अनेक स्वगतं वाचल्यानंतर अमूर्त मनापेक्षा मूर्त शरीराशी एकरुप होऊन सम्राटचं एकाकीपण दूर होईल असा विचार सैरंध्रीच्या मनात आला. सायंकाळी सम्राट येण्यापूर्वीच सैरंध्रीने सोळा श्रृंगार केलेल्या नववधुचे रुप धारण केले आणि सम्राटवर मोहिनी अस्र सोडण्याची स्वत:ची मानसिकता निर्माण केली. दरवाजाची बेल वाजली अन् त्याच प्रतिक्षेत असलेली सैरंध्री पुढे सरसावली. 'सुस्वागतम्, पतिराज! आपलं स्वागत आहे!' आधीच आनंदी असलेला सम्राट आपला चेहरा अधिक आनंदानं प्रफुल्लित न करता प्रवेशला.'आज काही विशेष?' दोघांच्या तोंडून एकच उद्गार एकाच वेळी. सम्राटचं आनंदित असणं हे नैसर्गिक तर सैरंध्रीचं आनंदणं हेतुत: होते. सम्राट नित्यकर्म पार पाडून सोफ्यावर बसला सैरंध्रीचा प्रतिसाद! तिच्या अपेक्षेस अनुरुप कायम होता. जेवणापूर्वी काही वेळ सम्राटने टी-पॉय खालील लेटरपॅड काढून लिहिण्यास सुरुवात केली.'प्रफुल्लित असलेलं मन बेफानपणे कार्यरत होऊन शरीराकडे एक यंत्र याच दृष्टीने कामे सोपवित जातं आणि शरीर थकवा येऊ न देता ती पार पाडीत असतो. या मनाचं शरीरावर आता नियंत्रणच नव्हे तर सुलतानी राज्यही सुरु झालंय. मन तजेजदार राहतं म्हणून शरीराला भुकेची जाणीव होत नाही. शिवलेल्या शरीराला निद्राधीन होणेही निद्रेतील मनाच्या शिरकावामुळे अशक्य होऊन बसले आहे. मनाच्या विलोभनीय दृष्याची अनुभूती होणे म्हणजे आता भास नव्हे साक्षात्कारच आहे. मी माझ्यापासून वेगळं केलेलं मन म्हणून तुझ्याकडे पाहतो; तेव्हा ते तुझ्याकडे बघणं हे माझ्या मनाकडे पाहण्याचा; खरं तर मीच माझं मन न्याहाळण्याचा प्रकार असतो. पण जेव्हा हे विलग झालेले मन दिसत नाही; तेव्हा....शिणलेल्या शरीराला न भागविलेल्या भूकेची, न लाभलेल्या विश्रांतीची, त्यामुळे उद्भवलेल्या शारीरिक बिघाडांची तसेच शरीराच्या नश्वरतेचीही जाणीव होते. हे यंत्र बंद पडावे अन् मी केवळ मन म्हणून अमर रहावे असे वाटण्याची हीच ती वेळ असते मात्र तसे का घडत नाही? या प्रश्नाचे उत्तर कालचक्रातून कधीतरी स्पष्ट होईल, अशी मनोमन अपेक्षा आहे.शरीरात मेंदू नावाचा अवयव आणि त्याची सर्व कर्म मनाला वश आहेत. नाहीतर मग मन शरीरावर सुलतानी राज्य कसे करेल? दिनक्रमातील कर्म पार पाडताना सदोदीत विभक्त झालेले मन या मेंदूमध्ये ओढ, आसक्ती निर्माण करुन आहे. मेंदूत मनाला बघण्याची ओढही मनच निर्माण करते आणि त्यासाठी शरीराला तगमग करायला लावते. मन आता खरंच सुलतानी करीत असलं तरी शरीर आणि मेंदू हे काही मनाला सोबत आंदण म्हणून दिलं नव्हतं! मन ज्यावर प्रेम करावं, ते फुलवावं त्या मनाला यातना होऊ नये म्हणून काळजी घ्यावी ते मनच शरीराला शिणवतंय. त्याला शरीराची मात्र कसलीही हरकत नाही. तेही झिजायला तयार आहे. ते चंदनाचा परिमळ होऊन दरवळण्यासाठी, अमूर्त मन होण्यासाठी... पण त्यापासून विलग झालेले माझे मन मात्र तुझ्या मनाला गुंजी घालतेय हळुवारपणे, 'रे मना आज कोणी बघ तुला साद घाली, जाण रे दाटलेली ही किमया भोवताली रे मना, हा वारा तान घेई निर्झरही साथ देई, रुणझुणती दिशा दाही हे जाणून मूक बोली' तरीही मनाचा मनाला प्रतिसाद शून्यच! हे यापुढेही असेच सुरु राहणार... मन माझ्या शरीरावर असेच राज्य करणार.... माझे शरीरही शिणवून घेणार.... मात्र माझे मन? ते पहा कसे आनंदी दिसतंय?'

सम्राटनं लेखणी खाली ठेवली अन् आतून सैरंध्रीची जेवणासाठी साद आली. त्याने लेटरपॅड पुन्हा टी-पॉयखाली ठेवलं आणि तो आत गेला. त्याचा आणि तिचा आनंद आपापल्या ठायी ठीकच होता. जेवण आटोपल्यानंतर रात्री बेडरुममध्ये आव्हानात्मक झाली होती. मात्र मन हरविलेल्या सम्राटकडून फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. तिने त्याच्या भावनांऐवजी वासना चाळविल्या आणि तोही पुरुष सुलभ मानसिकतेतून काही काळ तिला वश झाला. शरीरावरील तिने तिचा अधिकार यथार्थ गाजविला. मन आधीच विलग झालेली शरीरंही फार काळ एकरुप होऊ शकली नाहीत. सम्राटने माघार घेतली. सैरंध्री हताश होती. 'सम्राट, व्हॉट इज राँग विथ यु?' अरे, मी तुझी बायको आहे. स्वत:ला का चोरुन वागवतोहेस?' तो निरुत्तर होऊन अंतर्मुखही झाला. अंगावरील कपडे व्यवस्थित करुन बाहेर ड्रॉईंगरुममध्ये सोफ्यासमोरील टी-पॉयजवळ बसला. तेथील सिगारेटचे पाकीट उचलून सिगारेट शिलगावली. विषण्ण मनाने त्याने लेटरपॅड टी-पॉयवर ठेवले. तो पुन्हा लिहू लागला.'तर, धन आणि मनाची फारकत झाल्यापासून मला गृहदेवता आणि मनोदेवता यांच्यामार्फत दुहेरी समाधान लाभू लागले होते. गृहदेवतेचा अर्धांगीनीचा मनाशी काहीही संबंध नाही तर मनोदेवता तन आणि धनाशी संबंधीत नाही असे माझे मानणे मला शरीर व आत्मा विभक्त ठेवण्यास प्रवृत्त करीत आहेत. अर्धांगीनीला अपेक्षित शारीरिक समाधान देण्यास माझे मन अनुत्सूक असल्याने तिने तिचा हक्क शरीरावर गाजविला तेव्हा तो मला मानसिक दृष्टया झालेला माझ्यावरचा बलात्कारच वाटला. हे असे व्हायला नको होते. पण तसे झाले ते शेवटी मन तिला सांभाळता आले नाही म्हणूनच. चूक तिची नव्हती तर ती दोन मानसिक अवस्थातील संघर्षांची परिणती होती. तिचा हक्क तिला देण्यात मी टाळाटाळ का केली? त्यालाही कारण 'मन'च आहे जे आता माझे नाही. गृहदेवता आणि मनोदेवता या दोन भिन्न प्रकृती असल्यातरी त्यांचे माझ्याठायी समान अस्तित्व आहे. गृहदेवतेवर माझा अन् तिचाही माझ्यावर हक्क आहे. मात्र मनोदेवतेचे तसे नाही माझा तिच्यावर कोणताही अधिकार नाही अन् तीदेखील कोणताही अधिकार माझ्यावर गाजवित नाही. कारण त्या नात्याचे नांव अन् मर्यादा अद्याप स्पष्ट झालेल्या नसल्या तरी ते आता अस्तित्वात आहे हे नक्की. हे स्वगत लिहून झाल्यानंतर सम्राट गृहदेवतेऐवजी मनोदेवतेच्या राज्यात विचार विलासात रममाण झाला आणि तेथेच झोपला. दुसऱ्या दिवशी त्याची दिनचर्या नित्यनियमाने सुरु झाली.

घरातून बाहेर पडेपर्यंत सैरंध्रीला त्याच्याकडे ढुंकूनही पाहण्याची इच्छा नव्हती. मात्र, दरवाजा बंद करण्यासाठी आलेल्या तिने त्याची पाठमोरी आकृती पाहिली. तो खूपच थकलेला दिसत होता. त्याच्या चालण्यात उमेदीचा अभाव जाणवत होता. तिने त्याच्या लेटरपॅडवरील स्वगत वाचण्यासाठी दरवाजा बंद केला. स्वगत वाचताना त्याच्या द्विधा मन:स्थितीची कल्पना जरी तिला आली तरी मनोदेवताच आपल्यापेक्षा सरस ठरत असल्याने ती नाराज होती. सकाळी निरुत्साहित थकलेला सम्राट संध्याकाळी तर पारच शिलून घरी परतला. खरं तर आता त्याला मानसिक आधाराची गरज होती. पण त्याचं मन कधीच समजून न घेणाऱ्या सैरंध्रीला ते उमगलेच नाही. सम्राटनं हातून बॅग गळल्यासारखी जमिनीवर सोडली. तो फ्रेश होण्यासाठी कोणतीही कृती करण्याच्या मनस्थितीत नव्हता. पॅन्टच्या खिशातून सिगारेटचे पाकीट काढीत तो सोफ्यावर झोकून बसला. सिगारेट शिलगावले. धूर सोडण्यासाठी त्याला ओठांचा चंबू करण्याइतकेही त्राण त्याच्यात उरले नव्हे. थोडावेळ सोफ्यावर तेथेच अस्ताव्यस्त पडल्यानंतर त्याने लेटरपॅड टी-पॉयवर ठेवले. शर्टाच्या खिशात चाचपून त्याने पेन काढले. तो लिहू लागला.'आज शरीर शिणलंय. मन दृष्टीआड मावळल्याने चैतन्यच हरपलंय. मन दुसऱ्याच्याच असलेल्यांना वारस ठेऊन अर्पण करताना माझं मन स्विकारणारा वारसदारही माझाच व्हावा, अशी अपेक्षा मनाने कधीही बाळगली नव्हती. तरीही त्या वारसदाराने दिलेल्या आपुलकी-सहवासाचा नकळत हव्यास जडला. हा माझा पश्चाताप नव्हे, आत्मपरिक्षण आहे. आज प्रेरणादायी मनाचा सहवास लाभला नाही, तेव्हा मनावाचून शरीराचे अस्तित्व नगण्य असल्याचे अनुभविण्यास मिळत आहे. माझंच काहीतरी चुकतंय हे खरं! पण आता उशीर झाला आहे हे नक्की! प्रेम न मिळताच मनाचे निर्माल्य होताना माझ्या शरीराला जोडलेले डोळे पाहतील. मात्र, आता त्या दृश्याच्या भावना मेंदूपर्यंत पोहोचविल्या जाणार नाहीत. इतकं हे शरीर शिणलंय. जीवनाच्या धकाधकीत मन उल्हासित ठेऊन शरीराकडून असंख्य कर्तव्य पार पाडून घेणारा मी आज माझे 'मी'पणही जळून गेले आहे. 'मन' या गोष्टीचा शरीरापासून त्याग करताना जी विरक्ती होती; तीच विरक्ती आज अनामिक आसक्तीत बदलत आहे. कदाचित त्या अवस्थेलाच प्रेम म्हणत असावेत. प्रेम जे द्याने अन् घ्यावे असे असते. मलाही ते मनापासून द्यावे वाटले अन् मी ते मन देऊनच केले. शब्दातून नाही, पण मनाच्या कोणत्यातरी कप्प्यातून ठेवणीतले प्रेम व्यक्त न करताही तुला देता येते. कारण तुझ्याकडे माझेही मन आहे आणि स्वत:चेही. माझ्याकडे फक्त शरीर आहे. या शरीराला शब्दांचे सहाय्य घ्यावे लागते. त्यातून व्यक्त होणारे प्रेम तुला जरी वरकरणी वाटत असले तरी तुझ्याचकडे असलेल्या मनाला त्याची सत्यता पटली असेल. सद्सद्विवेकबुध्दी ही मन बंदिस्त करणारी श्रृंखलांना धडका देऊन तोडण्याचा विचार कधी तरी नक्कीच करीत असेल तेही निश्चित यशस्वी होईल. मग माझ्या शरीरापासून दुरावलेले मन आणि श्रृंखला तोडून मुक्त झालेले तुझे मन खऱ्या अर्थाने प्रेम या संकल्पनेशी तादात्म्य पावतील. त्याला आपण मनोमिलन म्हणू शकू. शुध्द प्रेमाची परिणती शारीरिक मिलनात नसते याचीप्रचिती तुलाही येईल आणि खरा ठरेल तो इंग्रज कवी जो म्हणतो, 'खऱ्या मनांचं मिलन स्वर्गातच घडतं!' माझ्या मनाची तयारी झाली आहे आता तुझ्या मनाच्या प्रतिसादाची प्रतिक्षा!सम्राटचं शिणलेलं शरीर त्या लेटरपॅडवर डोकं टेकून गलितगात्र होऊन मृतवत् झालं.

सैरंध्री आतापर्यंत बेडरुममध्ये अबोला धरुन होती. तिने बाहेर आल्यावर हे दृश्य पाहिले. ती हबकली. सम्राटला तिने इतकं मलून झालेले यापूर्वी केव्हाही पाहिले नव्हते. तिचे काळीज चर्रऽऽ झाले. सम्राट शिरी घाव घेऊन जगणारा अश्वत्थामाच वाटत होता. सर्वसाधारणपणे तन, मन, धनासाठी नवीन जगणारं तिने स्वत:सह अनुभवले होते. पण मन या संकल्पनेला अमूर्त असूनही दृश्य करणारा सम्राट पाहून तिला असहाय्यपणे हुंदका अनावर झाला. ती त्याच्याजवळ जाऊन बसली. त्याचे डोके मांडीवर घेतले. त्याचे निस्तेज डोळे शुष्क झाले होते. 'सम्राट, मी हरले रे, तु तुझे असे बरं वाईट करुन घेऊ नकोस. मला सारे सहन होण्यापलिकडे आहे. सुकून गेलेल्या डोळयांतील अश्रूंचा बांध फोड. सम्राट प्लीज!' सैरंध्रीच्यिा वाक्यातील आर्तता हेलावणारी होती. सम्राट तिच्या मांडीत डोके खुपसून हमसाहमशी रडू लागला. तीदेखील त्यात सामील झाली. ते दोघे रात्री न जेवता पोट भरुन रडले आणि तेथेच निद्राधीन झाले.सम्राटला जाग येताना त्याच्या ओठांतून नकळत 'मन' असे अस्पष्ट शब्द सैरंध्रीच्या कानावर पडले. मनाली मानकामे हिचे सम्राटनं ठेवलेलं नाव मन आहे, हे आतापर्यंत त्याची लिखित स्वगतं वाचून सैरंध्रीला ज्ञान झाले होते. तिने तिची भेट घेण्याचे ठरविले. ती टॅक्सी तळापर्यंत सम्राटच्या मागे काही अंतर राखून चालत राहिली. तेवढयात एक सुंदर विवाहिता आपल्या पतीसोबत मोटार बाईकवरुन तेथे आली. 'शेअर अ कार' तत्वावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्सीत सम्राटसोबत तिला सोडून तिचे पती विरुध्द दिशेला भरधाव निघून गेले आणि टॅक्तीत ते दोघे पती-पत्नीप्रमाणे गप्पा मारीत असताना टॅक्सी सैरंध्रीच्या दृष्टीआड गेली.सायंकाळी सम्राट घरी परतला. तेव्हा घराला कुलूप होतं. त्याला आश्चर्य वाटलं. त्याने बॅगेच्या कप्प्यातील दुसरी चावी लावून प्रवेश केला. काही दिवसांचा खंड पडल्यानंतर त्यला आज मन भेटल्याने तो ताजातवाना झाला होता. फ्रेश होन तो आज चक्क सोफ्यावर बसून वर्तमानपत्रे वाचत बसला. तब्बल एक तासाने सैरंध्री परतली.'आज खूप दिवसांनी घराबाहेर गेली होतीस?' सम्राटचा सहज प्रश्न. 'मनालीकडे गेले होते.' सैरंध्रीच्या अनेपेक्षित उत्तरानं सम्राट चमकला. 'तुझजवळ तिचं प्रेम समजण्याइतकी मी प्रगल्भ नाही. तुमचं प्रेम हे तु माझ्यावर अन् मी तुझ्यावर केलेल्या प्रेमापेक्षाही खूप उंचीवरचं आहे. माझ्या बुध्दीची पोहोच नाही तेवढी. मनालीसोबत गप्पा मारताना ती तुला माझ्यापेक्षाही अधिक ओळखत असल्याचं जाणवलं. माझ्या मनात तुमच्याबाबत जराही आक्षेप नाही.'तिने सम्राटला चकित करुन सोडले. या प्रसंगानंतर सम्राट अन् सैरंध्रीत पुन्हा पती-पत्नीचे नाते दृढ झाले. हल्ली त्याच्या लेटरपॅडवरील स्वगताचे ती चोरुन वाचन करीत नसे. मात्र, सम्राट नेहमीच त्यावर लिहित राहिला.

 एका संध्याकाळी तिने सम्राटसमोरच ते लेटरपॅड हातात घेतलं आणि वाचण्यास सुरुवात केली.'विमनस्क, मनस्वी, शून्य मनस्थिती यापेक्षा मन नसलेली अवस्था अमानूष नव्हे तर चक्क निर्मनुष्य म्णण्याचं माझं धाडस हे त्या अवस्थेत गर्दी-गराडयातही मिळणाऱ्या एकाकीपणामुळेच आहे. या गर्दीचे आणि गार्दीच्या मानसिकतेचे मन न ठेवता मी माझ्या मनाशी गुंजन करत ते कोणालाही ऐकू जाणार नाही, मात्र मनालाच ते कळेल या ठाम विश्वासाने माझं मन कसं आरसपाणी स्वच्छ प्रतिबिंब देणारं आहे. जर मी हसतमुख तर मनही.... नव्हे, मन हसतमुख तर मीदेखील आणि मी जर थोडा आगाऊपणा केला तर? ते मात्र मनाला मानवणारं नसेल. तेव्हा ते निकोप राहणार नाही. तरीही मनाने त्याच्याच आवाक्यातील शिक्षा द्यावी. ती मानसिकच असावी. माझी ती भोगण्याची तयारी असेल. कारण मनाने मनावर आघात करावा. शरीर आणि धन ज्यामुळे संसार थाटला जातो त्या बाबींवर मनाचा अधिकार नाही. ते आधीच दुसऱ्यांचा अधिकार बनले आहे. म्हणूनच मन हे असं आहे; त्याचे अधिकार तुझ्याकडे आहेत. तन आणि धनाचा समाजात संसार आणि मनापासून प्रेमाचा अविष्कार यात निर्मनुष्य माझे पार्थिव होण्याची वेळ येईल, तेव्हा शेवटचे ओठावरले नाव नाव तन आणि धनाच्या अर्धांगिनीचे असेल तर मन तुला अर्पण करुन तुझी प्रतारणा-फसवणूक केली असा गैरसमज होऊ देऊ नको. निर्जीव होणारे शरीर शेवटच्या क्षणीही त्याच्याच स्वामिनीचे नाव उच्चारेल आणि शरीराची पृथ्वीवरील शेवटची श्रृंखला तुटेल. शरीर सुटेल... मन उडेल... स्वर्गाकडे! सोबत एक नाव घेऊन... मन! तेथे मनोमिलनाची आस-प्रतिक्षा त्यास लागेल. 'भेटीला गे जीवा, लागलीसे आस। पाहे रात्रंदिवस वाट तुझी।' एका उत्कट क्षणी तरी ती आस पूर्ण होईल? नव्हे, ती पूर्ण करण्यासाठी तुझे मनही श्रृंखलामुक्त होईल. कारण मला जे तुझ्याप्रती वाटतं, ते केवळ प्रेमच नाही तर कदाचित त्याहीपुढील ती पवित्र भावना आहे. अपेक्षा एकच जी मनालाही उमगली असेल.'सैरंध्रीचे वाचन थांबले. आपले महत्त्व जरादेखील कमी होणार नाही अशी खात्री तिला पटली होती तरी सम्राटच्या मनाचं बीज कोरडं पडणं, ओलावणं, अंकूरणं अन् फोफावणं या अवस्थांचे पुढे काय होईल याचीही उत्कंठा तिला बेचैन करणारी होती. लेटरपॅडवर पुढे एक दोन स्वगतं होती. पण ती वाचणं मानसिकदृष्टया तिला अशक्य झालं होतं. पान उलटता-उलटता शेवटच्या पानावरील कदाचित कालचंच स्वगत असावं. त्या पानोवक्षरहील पहिला शब्दच अपरिचितपणामुळे तिला आकर्शित करणारा होता.'मन परिणय, अर्थात मंगल परिणय म्हणजेच विवाहानंतरही क्वचितच साध्य होणारा दोन मनांचा मिलाफ. मंगल परिणयासाठी समाजाची साक्ष, देवा-ब्राह्मणांची संगती, मान-पान, जन्म-लग्नपत्रिका, अनुरुपता एक नव्हे अनेक बाबी जुळवून पडताळून पाहिल्या गेल्या तरी त्याच्या यशस्वितेची शाश्वती देता येत नसते. प्रेम परिणयातही दोन शरीरांचाच मिलाफ घडण्यापलिकडे वेगळे काही घडले नाही, तेव्हाच माझे मन एकाकी पडले. ते तुला देऊ करताना तुही हळूवारपणे त्याचे संगोपन करशील अशी अपेक्षा बाळगली होती. त्यात तु कमालीची यशस्वी होऊन तुला मी दिलेले मन आणि मन हे नावही सार्थ ठरविलेस. एक अनामिक नातं निर्माण झालं खरं आपल्यात; मात्र त्याचं स्वरुप स्पष्ट होत नव्हतं! जीवनसाथी तन, मन, धनाने समरस व्हावा ही अपेक्षा फोल ठरल्यानंतर मन सांभाळणारी तुदेखील योग्य नात्याने जोडली जावीस,यासाठी या अनामिक नात्याला नाव देण्याचा प्रयत्न मी करीत असताना 'मन परिणय' हा शब्द सुचला. तन सांभाळणारी अर्धांगी, धन सांभाळणारी गृहदेवता, तशी तु मन राखणारी मनोदेवताच आहेस माझ्यासाठी! तन-धन सांभाळणाऱ्या व्यक्तीसोबत माझा मंगल परिणय झाला आहे, हे सत्य नाकारु शकत नसलो तरी हे अनामिक नातं आपले मन परिणयच आहे याची खात्री मी स्वत:ला देत आहे.हे नातं अदृश्य जरुर आहे पण भौतिक जीवनातील अन्य कोणत्याही नातेसंबंधांपेक्षा अधिक दृढ आणि अमरदेखील आहे. तु मनपरिणीता आहेस तर मी.....?'

सम्राटच्या कोरडया मनाला न केवळ कोंब, पालवी फुटली तर त्याचा एव्हाना डेरेदार वृक्ष झाला होता. त्याच्या सावलीत सैरंध्रीचाही विनासायास आश्रय कायम राहिला. तिने नगण्य मनाची उत्तुंगतेपर्यंतची भरारी 'याचि देहि याचि डोळा' पाहिली. लेटरपॅडवरील रोजच विविधांगी स्वगतं लिहिली जात होती. मनाली तिचे पती व मुलगी हेदेखील सम्राट आणि सैरंध्रीच्या कुटुंबाचे अविभाज्य अंग झाले होते. स्वगताचे लेटरपॅड एक संपले की दुसरे येत होते. लेखन थांबलेच नसल्याने सम्राटने मन सांभाळणाऱ्या मनाला बेदखल करण्याचे वचन पूर्ण करण्याची आठवण सैरंध्रीला कधीही झाली नाही. मनगूज अव्याहतपणे पुढे सुरु राहिले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract