Shailesh Palkar

Romance Tragedy Classics

3.6  

Shailesh Palkar

Romance Tragedy Classics

वात्सल्याची भूक

वात्सल्याची भूक

9 mins
373


पहा, कशी इटूकली, पिटूकली, गोड, लोभस आहे ती! आपण तिचे नाव मेहताब ठेऊ या! तिचे फुलणे तिच्या नावाप्रमाणेच आपल्या भावविश्वात सुगंधाची उधळण-पखरण करीत राहील. आईचे वात्सल्य ऊरी पान्हा फुटल्यावर द्विगुणित होत असले तरी शुष्क पुरुषी ऊरातही वात्सल्य वसलेले असते.

नक्षलवादी.... प्रांत विभाजनासाठी सशस्त्र उठाव करणाऱ्या चळवळीतील कार्यकर्त्यांचा वृत्तपत्रीय भाषेतील शब्दोल्लेख. नक्षलवाद्यांच्या असंख्य कारवायांच्या बातम्या वृत्तपत्रांचे मथळे ठळक आणि भडकपणे रंगवित असताना सारंगचे लक्ष एका वेगळयाच बातमीने वेधून घेतले. एक प्रेमी युगुल या चळवळीत सक्रीय होते. मात्र ते वेगवेगळया आघाडयांवर कार्यरत असल्याने आपसातील प्रेम ते पत्रसंपर्काद्वारे व्यक्त करीत असत. हर्फन, त्या तरुणाचे नाव. हसिना, ही त्याची प्रेयसी. कालच शीघ्र गती पोलीस दलाच्या कारवाईत दोघेही आपआपल्या आघाडयांवर मारले गेले. त्यामुळे सारंगला आजच्या वृत्तपत्रात ही विलक्षण लक्षवेधी बातमी वाचण्यास मिळाली. सारंग बातमीतील तपशील वाचताना अंतर्मुखपणे हर्फन-हसिनाच्या भावविश्वात ओढला गेला.


हर्फन राज्याच्या सीमेवरील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील हुशार विद्यार्थी. दोन राज्यांच्या सीमेवर असल्याने दोन्ही राज्यांकडून आपला परिसर उपेक्षित राहिला असल्याने संपूर्ण प्रांतच स्वायत्त व स्वतंत्र विचारांनी अस्तित्वात यावा या तेथील स्थानिक संघटनेच्या विचारांनी हर्फन प्रभावित झाला होता. दरम्यान, त्याने अभियांत्रिकी शिक्षणाचा उपयोग अत्याधुनिक शस्त्रनिर्मितीसाठी यशस्वीरित्या केल्याने तो त्या संघटनेच्या चळवळीत सहज ओढला गेला. छोटी पिस्तुले, लांब पल्ल्याचा वेध घेणाऱ्या बंदुका, दोन तळांवर संपर्क साधणारी बिनतारी संदेश वहन यंत्रणा अशा साधनांची निर्मिती हर्फने केल्याने संघटनेचे प्रमुख त्यांच्या मर्जीतील खास व्यक्ती म्हणून हर्फनला वागणूक देत असत. महाविद्यालयात त्याची प्रयोगशील वृत्ती अन्य सहविद्यार्थ्यांत प्रिय होती. तो साधी राहणी आणि नक्षल विचारसरणीनुसार महाविद्यालयीन जीवनात वाटचाल करीत होता. एक कनिष्ठ युवती त्याच्यापासून प्रभावित होती. हर्फन स्वत:च्या जीवनाचे ध्येय साध्य करायचे असल्याने त्याला ती युवती आवडली असूनही त्याने तिला दुर्लक्षित केले. अखेरीस तिनेच हर्फनला अडवून त्याच्याशी संवाद साधला.


'मायसेल्फ हसिना, सर तुम्हाला माझ्यात इंटरेस्ट नसेलही. पण मला तुम्ही आवडता. मी तुमच्याप्रती प्रामाणिक राहीन. माझे तुमच्यावरील प्रेम परिपक्व आहे. प्लीज, बिलिव्ह इन मी. माझ्यावर विश्वास ठेवा.' हर्फनला तिच्या परिपक्व प्रेमाची जाणीव तिच्या पहिल्याच संवादात झाली तरीही स्वत:चा निर्विकार चेहरा न बदलता तो म्हणाला.

'मी हर्फन, कदाचित तुला माझे नाव माहित असेल. तुझ्या माझ्यावरील परिपक्व प्रेमाला मी स्विकारु शकत नाही. माझा प्रांत स्वतंत्र, स्वायत्त व्हावा हे माझ्या जीवनाचे ध्ये आहे...'

'हर्फन, तुमचे ध्येय ते आजपासून माझेही.' हसिनाने त्याचे वाक्य मध्येच तोडत सहज समरुपता दर्शविली.

'थिंक अबाऊट माय ऍंबीशन केअरफुली ऍंड देन डिझाईन हसिना. पूर्ण विचार केल्याखेरीज तुझ्या आयुष्याची माझ्यासोबत फरफट करु नकोस. तुला तुझ्या पालकांनी अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी येथे पाठविले आहे.'

'सो व्हॉट, आय हॅव डिसाईडेड वुईथ युवर ऍंबीशन. इटस् माय मिशन. मी तुमची या क्षणापासून सहचारिणी आहे.' हसिनाचे वाक्य हर्फनने हाताच्या इशाऱ्याने थांबविले. 'हसिना, माझ्यासोबत तुला राहता येणार नाही. तु माझी कधीही सहचारिणी होऊ शकणार नाहीस. संघटनेत महिलांची आघाडी पूर्णत: वेगळी असते. पुरुषांनाही तेथे स्थान नसते. फक्त पत्रद्वारे संपर्क राहील. तुझ्या पत्रातील अक्षरं तुझा चेहरा, तुझा सुगंध, तुझे शब्द, तुझे अस्तित्व बनतील. माझ्या पत्रातील अक्षरं मी असेन, जे बागा-फुलांमध्ये बहरते तसे आपले प्रेम नसेल. जंगलात रात्रंदिन युध्दाचे प्रसंग आणि मरणे हेच जीवन. तेच प्रेम. तोपर्यंत हसिनाने त्याचा हात दोन्ही हातांनी दाबून धरला. 'आय ऍडमिट हर्फन. मला हेही मान्य आहे.' हर्फनने तिच्या खांद्याला थोपटत खांद्यावर हात ठेवला. ते दोघे आपआपल्या होस्टेलकडे निघून गेले.


खरं तर हर्फन-हसिना विषयीच्या बातमीतील तपशिलवार मजकूर वाचून सारंगच्या डोळयासमोर उभं राहिलेलं हे पहिले दृश्य होते. सारंग कुठेतरी स्वत:सोबत हर्फन-हसिनाची सांगत घालत होता. हर्फन आणि हसिना अभियांत्रिकी महाविद्यालयीन शिक्षण अर्ध्यावर सोडून नक्षल चळवळीत पूर्णपणे सक्रीय झाले. हसिनाने हातात रायफल धरली आणि तंग हिरवी जीन्स पँट अशा पेहेरावात खांद्यावर आर्टीलरी बॅग आणि हातात स्टेनगन घेऊन जंगल-रानं तुडवू लागला. नक्षलप्रांत स्वतंत्र-स्वायत्त करण्याच्या ध्येयासक्तीने त्यांच्यातील नुकत्याच उमललेल्या प्रेमाचे काटेरी निवडूंग झाले. पायांना वाटा आणि ओठांना शब्द सापडले नाहीत अशा निर्जन इलाक्यात त्यांचे वास्तव्य होते. पौर्णिमा आणि अमावस्येच्या रात्री म्हणजे दर पंधरवडयाने त्यांचे छावणीत शिबिर असे. हसिना पंधरा दिवसानंतर छावणीकडे परतली. तेव्हा तेथील महिला कमांडरने तिच्या हातात एक पत्र दिले, ते हर्फनचे होते.

'हसिना, तन-मन-धन याहीपलिकडे ध्येयवाद श्रेष्ठ मानणारे आपले प्रेम ईश्वराच्या दरबारात नक्कीच श्रेष्ठ ठरावे. मी तुझे, तू माझे शरीर पाहू शकत नाही. एकमेकांचे मन जाणून घेण्याचीही इच्छा दोघांत नव्हती. धन ही काही आपल्या ध्येयाची दिशा नव्हे. माझी महत्त्वाकांक्षा ऐकताच त्याची पूर्तता करण्याचे उद्दीष्ट तु तुझ्या माझ्याप्रतीच्या प्रेमाचे सार्थक ठरविलेस. या जन्मी जरी हे प्रेम स्वातंत्र्याच्या वेदीवर बळी जाणार आहे, तरी पुढील जन्म ते खऱ्या अर्थाने प्रेमच राहील असे वाटते. हसिना, माझ्या महत्त्वाकांक्षेमुळे तू, तुझे सौंदर्य, तुझा सहवास या सर्वांनाच मी पारखा झालो आहे. तुझा त्यागदेखील असीम आहे. आपले सर्वस्वासह मिलन स्वतंत्र नक्षलप्रांतात व्हावे. तूर्तास आपल्या कल्पनाविलासातच आपले भावविश्व फुलावे, तुझी एकमेव आठवण वेळोवेळी स्मरताना काल्पनिक भावविश्व विणणारा तुझा हर्फन.'


हसिनाने पत्र वाचून चुंबन घेतले. शर्टच्या डाव्या खिशात हृदयापाशी पत्र जपून ठेवले. पौर्णिमा चंद्राच्या शीतप्रकाशात हसिनानेही आपल्या महिला कमांडरकडे कागद मागून घेतला. ती लिहू लागली. 'हर्फन, खरं तर तुझ्याविषयी माझे प्रेम व्यक्त करण्यापूर्वीच तुझ्यासारख्या बुध्दीमान हरहुन्नरी तरुणासोबत सुखाच्या संसाराच्या कल्पना घेऊन जगत होते. तु गरीब असशील तर गरिबीत, तु व्यग्र असशील तर तुझ्या कामात मी ही व्यग्र व्हावे अशा रितीने मी तुझ्याशी एकरुप होण्यास उत्सूक होते. आपल्या छोटया संसारात सुंदर छोटी मुलगी जन्मास यावी अशी माझी एकमेव इच्छा मी उरी बाळगून आहे. मात्र, आता तुझ्याशी एकरुप होण्यासाठी मी तुझ्याच महत्त्वाकांक्षेची पूर्तता करण्याचे उद्दीष्ट माझ्या प्रेमाला दिले आहे. मी यामुळे आजही सुखी आहे. तुझ्या आठवणीने माझे प्रेम द्विगुणित होते - तुझी हसीना.'


हसिनाने ते पत्र घडी घालून कमांडरच्या हाती सोपविले आणि अंगठयाच्या उलटया बाजूने डोळयांच्या ओलावलेल्या कडा पुसत रायफलवर पकड घट्ट केली. शिबिर संपताच सर्व महिला कमांडर रणरागिणी जंगलात पांगल्या. पौर्णिमेची रात्र असल्याने शीघ्रकृती पोलीस दलाची गस्त सुरु होती. समोरुन पोलीसांची व्हॅन येताच हसिनासह चार रणरागिणींनी रायफली रोखल्या. हसिनाने करडी नजर करुन व्हॅनमध्ये ड्रायव्हर शेजारी बसलेला इन्स्पेक्टरच आपल्या प्रेमाचा शत्रू असल्याच्या मानसिकतेतून रायफलीतून गोळी डागली आणि दुसऱ्या क्षणातच त्या इन्स्पेक्टरची मान व्हॅनच्या खिडकीतून बाहेर लोंबकळून त्यावरील कॅप खाली पडली. त्यानंतर गोळी नक्की कोणत्या दिशेने आली हे समजले नसल्याने व्हॅनमध्ये बसूनच उर्वरित पोलीस दलाने अंधाधुंद गोळीबार कला. सारे जंगल शांत झाले तेव्हा गनिमी काव्याने अगदी जवळून हसिनाने दहा पोलीस धारातीर्थी पाडले होते. व्हॅनच्या हेडलाईटच्या प्रखर प्रकाशझोतात व्हॅनच्या ड्रायव्हरने हसिनाचा चंडिकाअवतार पाहिला आणि व्हॅनसह तेथून पळ काढला.


तिकडे हर्फनच्या छावणीत सर्वांना अनेक दिवस दबा धरुन बसावे लागले. हसिनाने केलेली करामत आणि तिचे हर्फनसाठीचे पत्र घेऊन एक संदेशवाहन हर्फनच्या छावणीत आला. हर्फनने शौर्य त्याच्याकडून ऐकले. तिचे पत्र हाती घेऊन ता आडोशाला गेला. हसिनाच्या भावना आपल्या महत्त्वाकांक्षेपुढे चक्काचूर झाल्याचे त्याला समजून आले, त्याने पत्र लिहिले. 'हसिना, नक्षलप्रांत आज स्वतंत्र झाला तर तुझ्या कल्पनेतील सुंदर छोटी मुलगी आणि सुखद संसार उभारण्यास मीदेखील इच्छूक आहे. माझ्या ध्येयाप्रती तू तुझ्या उत्कट प्रेमाचा असीम त्याग करुन जे शौर्य गाजवित आहेस, मी तुझ्यावर बेहद्द खुश आहे. मी या खुशीत माझ्या कल्पनाविलासातही एक सुंदर मुलगी तुझ्या उदरात जन्मल्याचे पाहात आहे. पहा! कशी इटूकली, पिटुकली, गोड, लोभस आहे ती! आपण तिचे नाव मेहताब ठेऊ या! तिचे फुलणे तिच्या नावाप्रमाणेच आपल्या भावविश्वात सुगंधाची उधळण पखरण करीत राहिल. आपल्या मेहताबचे संगोपन सध्या तुच कर. तुझ्या खांद्यावर हात ठेवून मी तुला कवेत घेतले असताना आपल्या दोघांच्या मांडीवर विसावलेली मेहताब खुदकन हसेल तेव्हा आपल प्रेम दृश्यपणे आपणासमोर व्यक्त होईल, त्या सुखद प्रसंगाच्या प्रतिक्षेत सध्याचे खडतर जीवन उदंड ध्येयासक्तीने आपलेसे करु या! - हर्फन.'


हर्फनने लिहिलेले पत्र संदेश वाहकाने हसिनाच्या छावणीत पोहोचविले. हसिना अचंबित झाली. तिचे प्रेम केवळ ध्येयवादाने पछाडलेले होते तरी ध्येयपूर्तीमध्ये दडलेले सुंदर भावविश्वाचे स्वप्न तिला अनपेक्षित होते. तिने पत्रोत्तर लिहिले. 'हर्फन-हसिनाच्या प्रेमातून नक्षलप्रांताच्या स्वातंत्र्याचेच नव्हे तर एका अनमोल जीवाचे उत्कट अस्तित्व उदयास येणार आहे. मेहताबचे आगमन आपली संपूर्ण सृष्टीचदरवळत ठेवत आहे, असा भास जरी आज मला होत आहे तरी तो भास माझ्या जीवनाचा ध्यास झाला आहे. मेहताबचे तुझ्या कल्पनाविलासातील आगमन हाच आपल्या प्रेमाचा वृध्दींगत होण्याचा क्षण. तोच मेहताबचा जन्मक्षण. मी भारावलेले आहे. तुझ्या सुखस्वप्नांनी हलकेच माझ्या शरीरावर सप्तरंगी मुलायम मोरपीस फिरवून मला मोहोरवून आपलेसे केले आहे. मेहताब हे आपल्या त्या विश्वातील मोरपीस आज आताही मला रोमांचित करीत आहे. हर्फन, तु मला या रुक्ष खडतर आयुष्यात स्वत:च्या ध्येयापोटी जरी लोटलेस तरीही मी मेहताबची अद्वैत देणगी अचानकपणे अनपेक्षितरित्या तुझ्याकडून मिळवून कृतार्थ झाले आहे. माझे मेहताब प्रतीचे स्वप्नरंजन माझ्या नक्षलप्रांतासाठी सुरु असलेला स्वातंत्र्यसंघर्ष सहज सोपा वाटण्यास सहाय्यभूत ठरत आहे. मी या जन्मी मेहताबला मांडीवर खेळविण्याची तीळमात्र शक्यता नसली तरी ती माझी सात जन्मांची इच्छा जरुर राहील- आपल्या मेहताबची आई तुझी हसिना.'


सारंग त्यांच्या कल्पनेत भावविवश झाला. कारण त्याच्या कल्पनेतून आता एक शोकांतिका डोकावू लागली. हसिनाने ते पत्र पूर्ण केल्यावर आमावस्येला रात्री हर्फनच्या छावणीत पोहोचणार होते. काळयाकुट्ट अंधाऱ्या रात्री हसिना मेहताबच्या आठवणीत रममाण होऊन आपल्या छावणीकडे दोन रणरागिणींसोबत रायफल रोखून पावले टाकत सरसावत असताना अचानक दबा धरुन बसलेल्या शीघ्रकृती पोलीस दलाच्या दोन जवानांनी आपल्या स्वयंचलित रायफल्समधून गोळयांच्या फैरी झाडल्या. काही क्षणात तिघीजणी धाराशायी झाल्या. अमावस्येची रात्र नक्षलवाद्यांचे एका ठिकाणी जमण्याची वेळ असते, ही माहिती शीघ्रकृती पोलीस दलाला मिळाल्यानुसार ही मोहीम यशस्वी झाली. तिकडे हर्फने संदेशवाहकाकडून ते पत्र घेऊन नेहमीप्रमाणे आडोशाला जाऊन वाचले. तो हसिनाच्या भावनांनी सद्गदित झाला. त्याच्या ध्येयवादी डोळयांत भाववेडे अश्रू तरळले. कंदिलाच्या प्रकाशात तो जमिनीवर आडवा होऊन पत्र लिहू लागला.


'मेहताब, रक्तरंजित नक्षलप्रांताच्या स्वातंत्र्यवेदीवर कल्पनाविश्वात साकारलेले आगळे वेगळे फूल. जेथे माता-पित्याचे शारीरिक मिलनही झाले नसताना डोलू लागलेल्या फुलाचा दरवळणारा सुगंध दोहोंचे जीवन खडतरतेकडून स्वर्गासक्त अनुभवाने ओतप्रोत करणाऱ्या असा भासत आहे. हसिना, तुझे स्वप्न माझ्या डोळयांनी मी पाहिले तशीच तुझी खंतही माझ्या डोळयांना सतत आहे. या जन्मी आपली पूर्ण होणार नाही अशी इच्छा पुढील जन्मी नक्कीच पूर्ण होईल. यासाठी आपण दोघेही इश्वराकडे हा जन्म लवकर पूर्ण होण्यासाठी करुणा भाकू या इश्वर आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपली प्रार्थना नक्कीच मान्य करेल. पुढील जन्मी मी, तु अन् मेहताब असे तिघांचे भावविश्व अस्तित्वात येईल. तेव्हा माझा नक्षलप्रांत स्वतंत्र झाला असेल. माझ्यासारख्या असंख्य तरुणांच्या रक्ताचा लालिमा घेऊन स्वातंत्र्यसूर्य उगवेल....'


तेवढयात शीघ्र गती दलाच्या जवानांनी हर्फनच्या छावणीला वेढून अंदाधुंद गोळीबार केला. सारेच संपले. कंदिलापुढे आडवा होऊन पत्र लिहिणाऱ्या हर्फनचेही मस्तक त्या कागदावर टेकले आणि एका गोळीने तो कंदिल उडवून दिला. त्याचा भडका उडाला. सर्व निपचित पडले असताना नक्षलवादी मेल्याची खात्री करीत शीघ्र कृती पोलीस दलाच्या जवानांनी संगिनी त्यांच्या देहात भोसकण्यास सुरुवात केली. तत्पूर्वीच सगळे गतप्राण झाले होते. त्यांची मोहीम फत्ते झाली. प्रखर टॉर्चच्या प्रकाशझोतात पोलीस जवानांनी झडती घेण्यास सुरुवात केली. हर्फनच्या मस्तकाखालील अपूर्ण पत्र पोलिसांनी जप्त केले. मृतदेहावरील कपडयांच्या झडतीत हर्फनकडे आणखी काही पत्रं सापडली. ती हसिनाने पाठविली होती.


मृत हसिना आणि तिच्या सोबती रणरागिणीचे देह शववाहितीतून पोलीस ठाण्यात आणले गेले. तेथे महिला पोलिसांनी त्यांच्या देहाची-कपडयांची झडती घेतली. हसिनाच्या शर्टाच्या डाव्या खिशात हृदयालगत काही पत्रं सापडली. ती पत्रं हर्फनने लिहिली होती. पोलिसांनी हर्फन व हसिनाने लिहिलेल्या पत्रांचा क्रम निश्चित केला. त्यांचे पूर्वायुष्य शोधून काढले नक्षलवाद्यांमध्ये जरी ध्येयवादी तरुण-तरुणींनी हौतात्म्य पत्करले होते, ते गोळया घालणारे-झेलणारे अतिरेकी होते तरीदेखील त्यांच्यातील माणूसपण भावूकच होतं, ही जाणीव पोलिसांना झाली. नक्षलप्रांताच्या स्वातंत्र्याचा सूर्य हर्फन-हसिनाच्या व्यर्थ बलिदानानंतर पुन्हा कधीच उगवला नाही. मात्र, ज्या प्रांतासाठी दोघांनी आपले आयुष्य तारुण्य भावविश्वासह अर्पण केले त्या प्रांतातील मातीमध्येच दोघाचे देह दफन करण्यात आले.


सारंगच्या डोळयात दाटलेले अश्रू गालांवरुन ओघळले. त्याची पत्नी अन् प्रेयसी श्रद्धा नोकरीनिमित्त दूर राहून अशाच एका भावविश्वासाठी आतूर झालेली होती. सारंग आणि श्रद्धाच्या भावविश्वातही मेहताबसारखी काल्पनिक कन्या खेळत असे. सारंगचे ऊर लहानग्या मुलीचा बाप होण्यासाठी आसूसलेले असताना श्रध्दाही त्यासाठी पारखी राहिली होती. सारंगने बाप होण्याचे स्वप्न जेव्हा पाहिले तेव्हा त्याला काही गुणसूत्र-जैविक अडचणींमुळे ते सहज साध्य नसल्याचीही जाणीव होती. आईचे वात्सल्य उरी पान्हा फुटल्यावर द्विगुणित होत असले तरी शुष्क पुरुषी ऊरातही वात्सल्य वसलेले असते, ही जाणीव फक्त सारंगच अनुभवित होता. नव्या सुशिक्षित जगात तरुण-तरुणी अचानक एकत्र येऊन प्रेमात पडून विवाहबद्ध होतात ही सहजशक्य बाब असली तरी त्यांची वात्सल्याची भूक भागविणे त्यांच्यातील प्रेमसंबंधालाही कधी-कधी शक्य होत नाही. सारंग अन् श्रध्दाचे प्रेम हे सफलतेच्या अपवादात अडकले नव्हते. मात्र, त्यांच्या संसार वेलीवर अद्याप फूल उमलले नसल्याने इतरांच्या यशस्वी प्रेमाच्या तुलनेत त्यांचे प्रेम मर्यादित राहिले. त्यांचा विरह हा नक्षलप्रांताच्या ध्येयासक्तीने नव्हे तर मिलन निष्फळतेच्या भावनेतून सुरू होता. सारंगला जरी वात्सल्याची भूक भागविता येत नव्हती तरी तो आपल्या पत्नीस-प्रेयसीस अंतर देऊ इच्छित नव्हता. श्रद्धा जेव्हा सोबत असे तेव्हा ते दोघेही एकमेकांशी लहान मुलांप्रमाणे वर्तन करुन आपले वात्सल्य चाळवित असत. कधी-कधी त्यातील समाधानही नष्ट होत गेल्यावर हीच वात्सल्याची भूक सारंग-श्रद्धा यांच्याकडे हर्फन-हसिना यांच्याप्रमाणेच हौतात्म्य पत्करण्याची मागणी करु लागली. सारंगचे डोळे अश्रूंनी ओघळत असताना पुढील जन्मीतरी वात्सल्याची भूक पूर्ण व्हावी हा विचार अचानक त्याच्या मनास स्पर्शून गेला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance