STORYMIRROR

Shailesh Palkar

Others

3  

Shailesh Palkar

Others

आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर

आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर

4 mins
350

इंग्रज राजवटीत मराठी वर्तमानपत्राची मुहूर्तमेढ रोवण्याचे श्रेय दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जाते. मराठी वृत्तपत्राचा पाया घालून त्याची थोर परंपरा सुरु करण्याचा मान दर्पणकारांना जातो. चिपळूणकर, टिळक, आगरकर, न्या.रानडे यांचे कर्तृत्वपर्व सुरु होण्याआधी ज्या लोकोत्तर महापुरुषांनी महाराष्ट्राची सामाजिक, शैक्षणिक व आध्यात्मिक जीवनाची पायाभरणी केली, त्यांच्यात कै.बाळशास्त्री जांभेकरांचे नाव सर्वोच्च स्थानी घेतले जाते. समाज प्रबोधन हे उद्दिष्ट मनाशी बाळगून बाळशास्त्रींनी 6 जानेवारी 1832 रोजी आपल्या 'दर्पण' या वृत्तपत्राचा शुभारंभ केला. 6 जानेवारी या पत्रकार दिनाचे औचित्य साधून मराठी पत्रकारितेचे निर्माते कै. बाळशास्त्री जांभेकर यांच्या महान कार्यावर टाकलेला हा दृष्टीक्षेप...

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म कोकणातील देवगड तालुक्यातील पाेंभुर्ले येथे 1812 साली झाला. आपल्या काळाच्याही पुढे दृष्टी टाकण्याची असाधारण प्रतिभा लाभलेल्या विभूतीचे एखाद्या क्षेत्रातले योगदान इतके अलौकिक असते की, ते क्षेत्र त्या व्यक्तिच्या नावाने ओळखले जाते, ते महान व्यक्तिमत्व म्हणजे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर तर क्षेत्र पत्रकारिता होय. या कोकणातील एका हिऱ्याने वयाच्या अवघ्या विसाव्यावर्षी आजपासून 177 वर्षापूर्वी स्वातंत्र्य पूर्वकाळात अत्यंत कठीण परिस्थितीत मुंबई येथे 6 जानेवारी 1832 रोजी 'दर्पण' नावाचे पहिले मराठी वृत्तपत्र सुरु केले आणि येथेच मराठी वृत्तपत्रसृष्टीचा पाया घातला गेला, याचा सार्थ अभिमान महाराष्ट्राला आणि विशेषत: कोकणाला आहे.

स्वदेशी लोकांमध्ये विलायतेतील विद्यांचा अभ्यास व्हावा व त्याद्वारे समाजजीवनातील अज्ञान, अंधश्रध्देचा लोप व्हावा, हे उद्दिष्ट डोळयासमोर ठेवून दर्पणकरांनी पत्रकारिता केली. लोकशिक्षण व समाज प्रबोधन करण्याचे व्रत घेतलेल्या बाळशास्त्रींची टीका निर्भिड व विधायक असे. त्यांचा सरकारदरबारी एवढा वचक होता की, त्यांच्या सूचनांची वेळीच दखल घेतली जात असे. एकीकडे रयतेला सज्ञान करणे, तर दुसरीकडे आपला स्वाभिमान शाबूत ठेवून ते इंग्रज सरकारला लोककल्याणार्थ योग्य सल्लाही देत असत. खरं म्हणजे दर्पणकारांना केवळ राजदरबारीच नव्हे, तर लोकदरबारीही मानाचे स्थान होते. दिग्दर्शन या आद्यमराठी मासिकाची निर्मितीही त्यांनी केली.

मुंबईचे तत्कालीन गर्व्हनर सर जेम्स कर्नाक यांनी तर दर्पणकारांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना 'जस्टीस ऑफ पीस' ही पदवी दिली होती. न्या.ना.ग.चंदावरकरांनी त्यांचा पश्चिम भारतातील आद्यॠषी म्हणून गौरव केला होता. तर बाळशास्त्रींच्या सान्निध्यात विद्यार्थी म्हणून वावरलेल्या दादाभाई नौरोजी यांनी देखील आपल्या गुरुंची प्रख्यात पंडित व अद्वितीय विद्वान अशा आदरार्थी शब्दात महिमा गायली होती. आपले राज्य कां गेले आणि इंग्रजांचे राज्य या देशात का आले, याचे अचूक निदान करणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ति म्हणजे दर्पणकार असे गौरवोद्गार आचार्य अत्रे यांनी काढले होते.

व्यवसायाने शिक्षणाधिकारी असलेल्या बाळशास्त्रींनी कुलाबा वेधशाळेचे ज्योतिर्निरीक्षक, भारतीय इतिहासचे आद्य संशोधक, रॉयल एशियाटिक सोसायटीचे निबंधकार, संस्कृत पंडित, पत्रकार, साहित्यकार मराठी भाषेचे चिकित्सक, शब्दकोषकर्ते, ज्ञानेश्वरीचे आद्य ग्रंथप्रकाशक, आद्य समाजसुधारक, शुध्दिकर्ते धर्मशास्त्रज्ञ, ग्रँड ज्युरी मेंबर, अक्कलकोट संस्थानचे युवराजगुरु अशा अनेक भुमिका त्यांनी जनहितार्थ बजावल्या.

दर्पणकारांचे मराठी संस्कृत, बंगाली, इंग्रजी अशा 9 भाषांवर प्रभुत्त्व होते. प्रारंभी त्यांची नियुक्ती एल्फीस्टन कॉलेजमध्ये झाली. गणित विषयाचे अध्यापक, नॉर्मल स्कुलचे डायरेक्टर अशी शिक्षण क्षेत्रातील विविध पदे भूषवून त्यांनी मराठी जनमानसाला सज्ञान करण्यात आपले सारे आयुष्य वेचले. इतिहास, भूगोल, विविध भाषा यावर अनेक शालेय पुस्तके त्यांनी लिहिली. इतकेच नव्हे तर, अनेक शिलालेख व ताम्रपटांचे वाचन व भाषांतर केले. समाजाला योग्य दिशा दाखविण्यासाठी शाळा व वृत्तपत्रे ही उत्तम साधने आहेत, हे जाणून दर्पणकारांनी प्रत्येक संधीचा, प्रसंगाचा, अधिकाराचा व प्राप्त परिस्थितीचा लोकशिक्षण व समाजप्रबोधनासाठी उपयोग करुन घेतला. बाळशास्त्री जांभेकर यांनी आपला 1812-1846 एवढा अल्पशा जीवनकाळ समाजप्रबोधन, ज्ञानोपासना व ज्ञानदानातच व्यतित केला. वृत्तपत्र चालवितांना व्यावसायिक दृष्टीकोन व स्वहित याचा बाळशास्त्रींनी कधी विचारच केला नाही.

आद्यपत्रकार बाळशास्त्री हे महाराष्ट्रातील स्त्री मुक्तीचे प्रवर्तक म्हणूनही गणले जातात. सतीची कुप्रथा समाजातून हद्दपार करण्यासाठी सर्वप्रथम स्त्रियांमधील अज्ञान घालविले पाहिजे, हे जाणून त्यांनी पुरुषांप्रमाणेच महिलांना शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला. समाजरोषाची पर्वा न करता जांभेकरांनी सतीप्रथा, बालविवाहविरुध्द लढा उभारुन स्त्रीशिक्षण,विधवा पुनर्विवाहाचा दर्पण या माध्यमातून पुरस्कार केला. स्त्रीयांना पुरुषांइतकीच सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, अशी आग्रही मागणी दर्पणकारांनी केली. सामाजिक सुधारणांच्या पार्श्वभूमीवर स्त्रीशिक्षणाच्या चळवळीत जांभेकर अग्रस्थानी राहिले. घराघरातील स्त्री शिकली पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. कारण स्त्री आपल्या घरात जी सुधारणा आग्रहाने राबवेल, तीच समाजात रुढ होणार, अशी त्यांची पक्की धारणा होती. दर्पणकारांनी खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित केली. पहा! आपले प्रतिबिंब आणि मगच ठरवा! असा मोलाचा संदेश त्यांनी समस्त जनमानसाला दिला. ज्ञान-विज्ञानाचा प्रसार व समाजाची सार्वजनिक नितिमत्ता सुधारणे हे काम वृत्तपत्राचे आहे, हे बाळशास्त्रींनी दर्पणच्या माध्यमातून लोकांच्या मनात बिंबवले.

आजच्या इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांच्या युगात वृत्तपत्रांची विश्वासार्हता अजूनही टिकून आहे आणि यापुढे देखील टिकून राहील. आजही समाजाचे मार्गदर्शक म्हणून वृत्तपत्राकडे पाहिले जाते. त्या पार्श्वभूमीवर वृत्तपत्रे ही भूमिका जबाबदारीने पार पाडीत आहेत. भारतासारख्या विकसनशील व खंडप्राय लोकशाही राष्ट्रामध्ये वृत्तपत्रांवर मोठी जबाबदारी आहे. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा लाभलेल्या मराठी पत्रकारितेला जनमानसात सदैव मान-सन्मान मिळत राहीलच, यात तसूभरही शंका नाही.

   बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारिता अधिक समृध्द व्हावी, यासाठी जे योगदान दिले आहे, ते लक्षात घेऊन पत्रकारांनी त्यांचा आदर्श समोर ठेवून लेखणी या आयुधाचा योग्यरित्या वापर करावा. लोकशिक्षण व जनजागृती याकरिता सदैव तत्पर राहावे. पितपत्रकारिता करणे पूर्णत: टाळावे. लोकांना बातमीद्वारे वास्तवाचे दर्शन घडावे यासाठी सदैव प्रयत्नशील राहावे. वृत्तपत्राची विश्वासार्हता टिकून राहण्यासाठी वृत्तपत्राने जनतेसमोर खरी माहिती ठेवावी. शासन व जनता यातील दुवा म्हणून वृत्तपत्राने मध्यस्थाची भूमिका बजवावी. जनतेची दिशाभूल होईल, असे लिखाण करु नये. कुठल्याही आमिषापासून दूर राहावे. धार्मिक सदभावना व सामाजिक ऐक्य अबाधित राखण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहावे. जाती-जातीत, धर्मा-धर्मात वैमनस्य निर्माण होईल, असे लिखाण कदापि करु नये. बातमी लिहिताना सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. कुठल्याही व्यक्तिचे चारित्र्यहनन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. जातीय दंगे, बॉम्बस्फोट, अतिवृष्टी, महापूर, चक्रीवादळ सारख्या आपत्तींची वास्तव माहिती जनतेसमोर ठेवावी. जनतेत भीतीचे, संभ्रमाचे वातावरण निर्माण होईल, असे लिखाण करणे टाळावे. नि:पक्षपातीपणाची भूमिका बजावून सर्व जाती-धर्मातील लोकांना समान न्याय द्यावा. कोणत्याही धर्म वा जाती विरोधात लिखाण करु नये. जनकल्याणार्थ शासनाने हाती घेतलेल्या योजनांची माहिती जनतेला तत्परतेन द्यावी. कुटूंब नियोजन, हुंडाबंदी, लसीकरण, पोलिओ निर्मूलन, अंधश्रध्दा निर्मूलन, ग्राहक संरक्षण कायदा, कुपोषण निर्मूलन, वीजबचत, रक्तदान, नेत्रदान, धुम्रपान बंदी अशा लोकोपयोगी योजनांना व्यापक प्रसिध्द देऊन वृत्तपत्रांनी जनजागृतीत आपले योगदान द्यावे, म्हणजे हीच दर्पणकार आद्यपत्रकार स्व.बाळशास्त्री जांभेकरांना खरी श्रध्दांजली ठरेल.


Rate this content
Log in