Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Sangieta Devkar

Romance Inspirational


3.7  

Sangieta Devkar

Romance Inspirational


मन उधाण वाऱ्याचे...

मन उधाण वाऱ्याचे...

7 mins 12.2K 7 mins 12.2K

आज समीरच्या शाळेत मिटींग होती म्हणून श्रुतीने ऑफिसला सुट्टी टाकली होती. आजच नेमका नवीन कोणी एच.आर. रुजू होणार होता. कसा असेल तो कोण जाणे? समजून घेणारा असेल तर ठीक असे तिच्या मनात आले. संध्याकाळी वैशुला कॉल करून विचारू असे तिने ठरवले.


ऑफिस सुटल्यानंतर तिने वैष्णवी, तिची ऑफिस कलीग तिला कॉल लावला, हॅलो वैशु निघालीस का ऑफिसमधून...


हो गं खाली पार्किंगलाच आहे बोल.


काही नाही अगं तो न्यू एच आर आला होता का आज, कसा आहे तो... काही बोलला का मी रजेवर आहे म्हणून.


चिल श्रुती, अगं कसला भारी आहे तो एच. आर. एकदम जॉली गुड फ़ेल्लो, मनमोकळा... कोणत्याच अँगलने एच. आर. वाटत नाही. दिसायला हॅन्डसम, मस्त पर्सनॅलिटी. तू बघ उद्या. बोलायला पण छान आहे.


बरं बरं इतकंच विचारायचं होतं मला. भेटू उद्या बाय, असे म्हणत श्रुतीने फोन बंद केला.


दुसऱ्या दिवशी श्रुती ऑफिसला आली. एक एक करून सगळा स्टाफ येत होता. वैशुपण आली, तिच्या कडे येत म्हणाली, श्रुती आता येईलच बघ तो हॅण्डसम एच. आर.


वैशु, अगं इतकं काय त्यात माणसासारखा माणूस इतकं कौतुक नको करू त्याचं.


मग बघच तू... त्याच्यावरून तुझी नजर नाही हटली, तर विचार मला... गॉड काश मैं सिंगल होती, उसे यु ही पटा लेती. हम्मम.. वैशु म्हणाली.


ओह मॅडम जा आणि तुमचे टेबल सांभाळा... ओके... श्रुती बोलली.


पाचच मिनिटात तो आला. आल्या आल्या गुड मॉर्निंग ऑल ऑफ यु म्हणत आत आला. श्रुतीने मान वर करून पाहिले. मस्त ऑफ व्हाईट शर्ट ब्लु जीन्स, उंच रुबाबदार, जिमची कसदार शरीरयष्टी गोरा, उभा चेहरा, चेहऱ्याला शोभणारी दाढी असा तो. सगळ्यांनी त्याला गुड मॉर्निंग विश केले.


तो श्रुतीच्या टेबल जवळ आला आणि म्हणाला, हॅलो मिस श्रुती काल आपली ओळख नाही झाली. तुम्ही नव्हता ऑफिसला.


हो, काल मी रजे वर होते.


ओके, मायसेल्फ रोहन वर्मा, न्यूली जॉईन धिस ऑफिस ऍज एच. आर. असे म्हणत त्याने श्रुतीला शेकहॅन्ड केला. श्रुती एकदम बावरली होती. कारण इतकं फ्रॅंक आजपर्यंत कोणी ऑफिसमध्ये बोलत नव्हते, जो तो कामापुरता आणि लंच टाईमला तेवढ्या गप्पा व्हायच्या. पण हे रोहन रसायन जरा अजबच होते.


तीही म्हणाली, मी श्रुती देशमुख.


हो काल तुमच्या मैत्रिणीने सांगितले तुमचे नाव. मग रोहन गेला त्याच्या केबिनमध्ये. त्याच्या केबिनला दरवाजा काचेचा होता, सो नेमका दरवाजा समोर त्याची चेयर होती. श्रुतीने रोहनकडे सहज पाहिले तर तोही तिला पाहात होता. तिने नजर चोरली आणि खाली फाईलमध्ये पाहू लागली.


खरंच किती हॅन्डसम आहे हा, वैशु बोलली तसाच, सारखं त्याला पाहावेसे वाटते अशी पर्सनॅलिटी, हम्मम ही वॉज ऑसम!! श्रुतीला मनोमन हे पटले. लंचमध्ये सगळे एकत्र जेवत असत. आज रोहनही त्यांच्यात येऊन बसला. खूप गप्पा मारत शेयरिंग करत जेवण चालले होते. अधून मधून रोहनला श्रुती चोरून पाहात होती. तो होताच तसा. श्रुतीच नव्हे तर ऑफिसमधील वैशु, रीमा, साक्षीही त्याच्याकडे बघत होत्या. खूप जॉली होता तो. श्रुतीला दहा वर्षाचा समीर होता, तरी तिने स्वतःला वेल मेन्टेन ठेवले होते. आजही तिला एकदा तरी वळून पाहण्याचा मोह अनेक पुरुषांना व्हायचा. मग रोहन काय अपवाद..!! श्रुतीचे डोळे घारे होते सिल्की थोडे ब्राऊन केस, गोरा रंग दिसायला छानच होती ती. जेवताना बराच वेळ रोहन आणि तिची नजरानजर होत होती.


असेच रोज बोलणे-जेवण एकत्र व्हायचे. खूप कमी वेळात रोहन ऑफिसमध्ये रुळला. व्हाॅटसऍप ग्रुपमध्ये रोहनचा डीपी पाहण्याचा मोह श्रुती टाळू शकत नव्हती. त्याचं गोड बोलणं, श्रुतीला कॉम्प्लिमेंट देणं, कुठेतरी तिला हवंहवंसं वाटू लागलं. शनिवारी सगळे कॅज्युल ड्रेसमध्ये यायचे ऑफिसला. आज रोहनने टी शर्ट आणि जीन्स घातली होती. टी शर्टमधून त्याची जिमची शरीरयष्टी एकदम भारदस्त दिसत होती. पुन्हा पुन्हा श्रुतीची नजर रोहनकडे जात होती. कसे असते ना माणसाचे मन खूप चंचल असते आणि विचित्रही... जे सुंदर आहे आकर्षक आहे त्याकडे ते ओढ घेत असते. कितीही नाही म्हटले तरी पुन्हा पुन्हा त्या गोष्टीकडे मन जाते, असे काहीसे श्रुतीचे होत होते. रोहन काय शेवटी एक पुरुषच त्याला काय फरक पडणार उलट समोरून एखादी स्त्री आपल्या जाळ्यात फसत असेल तर! मग तोही मुद्दाम श्रुतीशी बोलायचा, छान छान शेरो शायरीचे मेसेज करायचा. कसे असते की पुरुष हा शिकारी असतो आणि आपण त्याचे सावज व्हायचे की नाही याचा आपणच विचार करायचा असतो. पण हे मन वेडे असते त्याला सारे काही कळत असूनही वळत मात्र नसते.


श्रुतीला आता रोहनशी बोलल्याशिवाय आजिबात करमत नसायचे, त्याच्या दिसण्याची बोलण्याची तिला भुरळ पडली होती. आपण कोणाची तरी पत्नी आहोत, आई आहोत, हे ती विसरत चालली होती. याउलट प्रशांत श्रुतीचा नवरा तो इंजीनियर होता, जॉब करत होता. पण कायम श्रुतीला सपोर्ट करणारा. तिची स्पेस जपणारा असा. दिसायलाही बऱ्यापैकी छान... तोही वेळ मिळेल तसा जिम करायचा. त्यामुळे श्रुतीसोबत त्याचा जोडा छानच दिसायचा. लव्ह मॅरेज होते त्यांचे. खूप समजून घ्यायचा तो तिला. आणि खूप विश्वासही होता त्याचा श्रुतीवर. कधीही त्याने तिचा फोन चेक करणे किंवा पार्टी पिकनिकला ऑब्जेक्शन घेणे असे काहीच केले नाही. खूप सुखात त्यांचा संसार चालू होता. यामुळेच श्रुती बेफिकीर होती.


दिवसेंदिवस ती रोहनकडे आकर्षित होत चालली होती. रोहन आता तिला श्रुती डियर, यु आर सो स्वीट इथपर्यंत बोलण्यात त्याने मजल मारली होती आणि श्रुतीला ते आवडू लागलं होतं. दोघ चॅटही करत होते. श्रुती आता ऑफिसला छान तयार होऊन जात असे. मग रोहन तिचं नजरेनेच कौतुक करत असे. श्रुतीला आपण काय करतो आहोत, कसे वागत आहोतस, याचे भान राहिले नव्हते. ती दिवसेंदिवस रोहनमध्ये गुंतत चालली होती. मनाला तिच्या तिला आवर घालता येत नव्हता. रोहन स्मार्ट होता तितकाच स्वार्थीही होता. पण श्रुतीला कशाचेच भान राहिले नव्हते. अलीकडे ती खूप खुश आणि आनंदी असायची. प्रशांतलाही तिच्यातला हा बदल जाणवला. बट नेहमीप्रमाणे तो तिला गृहीत धरून असायचा की, छान आहे ना श्रुती जर अशी हसत आनंदात राहत असेल तर! त्याचा पूर्ण विश्वास होता तिच्यावर.


आज प्रशांत घरी आला तेव्हा जरा टेन्स दिसत होता. हे श्रुतीला जाणवले. तिने त्याला विचारले, काय झाले प्रशांत असा अपसेट का दिसतो आहेस?


तो म्हणाला, चहा दे मग आपण बोलू चहा घेत. तिने दोघांचा चहा बनवला आणि प्रशांत फ्रेश होऊन आला.


श्रुती म्हणाली, बोल काय झाले आहे?


श्रुती माझा मित्र अजय तुला माहीत आहे ना?


हा त्याचे काय, तिने विचारले.


अजय त्याच्या बायकोला डायवोर्स देणार आहे.


का काय झाले असे अचानक की एकदम डायवोर्स?


अजयच्या बायकोचे बाहेर अफेयर सुरू आहे गं एका बरोबर.


ओहह... पण त्याला पूर्ण खात्री आहे का प्रशांत की नुसता संशय आहे.


पूर्ण खात्री आहे त्याला, रादर त्याने दोघांना एकत्र पाहिले आहे आणि व्हाॅटसऍप चॅट बघितले आहेत. खूप भांडण झाले आहे त्यांचं, त्यामुळे तो तिला आता डायवोर्स देणार आहे, कोणाला पटेल गं हे असे वागणे... अजयचा किती विश्वास होता बायकोवर आणि तिने त्याचा विश्वासघात केला. अजयने काहीही कमी केले नाही तिला, नोकरी करू दिली. पूर्ण स्वातंत्र्य दिले, याचा तिने गैरफायदा घेतला. कसे असते ना श्रुती आपल्या मनावर आपला कंट्रोल हवा, कोणी जरा गोड बोललं किंवा आपलं कौतुक केले की लगेच आपण त्या व्यक्तीला भुलून जाऊ नये. आपण काय आहोत, काय करतो आहोत, कोणाची तरी बायको आहोत. आपल्यावर घरची जबाबदारी आहे, हे नवरा आणि बायको दोघांनी विसरता कामा नये. एकमेकांच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊ नये. आपलं मन नाठाळ असतं गं, क्षणिक सुखाच्या मागे ते धावत असतं. आपल्याकडे जे नाही तेच आपल्या मनाला हवे असते. पण माणूस हे विसरतो की आपल्याकडे जे आहे ते सुंदरच आहे. आपणच त्याची किंमत केली पाहिजे, कदर केली पाहिजे. तुला काय वाटतं श्रुती? प्रशांतने विचारले.


ती त्याच्या बोलण्याच्या विचारात मग्न होती. प्रशांतने तिला हलवून विचारले, कसला विचार करतेस इतका?


ती म्हणाली, नाही काही पण तुला पटले का अजयचे म्हणजे तू जर अजयच्या जागी असतास तर तूही मला डायवोर्स दिला असतास का?


प्रशांतने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, एक तर माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तू कधीही चुकीचे वागणार नाहीस याची मला खात्री आहे..हो ना?


हु.. इतकंच ती म्हणाली.


रात्रीच्या स्वयंपाकाची ती तयारी करू लागली, पण मनातून प्रशांतचे बोलणे काही केल्या जात नव्हते. रात्री तिला नीट झोप लागली नाही. रात्रभर ती आपल्या वागण्याचा विचार करत राहिली. आपण प्रशांतसारख्या चांगल्या नवऱ्याला फसवत आहोत ही भावना तिचं मन पोखरत राहिली. उद्या जर प्रशांतला माझे आणि रोहनचे जे चाललंय ते समजले तर?? किती मोठा धक्का बसेल त्याला. मलाही प्रशांतने डायवोर्स दिला तर मी एकटी कशी जगणार आणि तो रोहन मला का स्वीकारेल, तेही समीरसोबत? नाही मी चुकीचे वागत आहे. आतापर्यंत ही गोष्ट बाहेर कोणाला म्हणजे ऑफिसमध्येसुद्धा नाही समजली. तेव्हा आताच आपण यातून बाहेर पडायला हवं. खूप पुढे वाहवत जाण्यापेक्षा आता थांबणं महत्वाचं आहे. असा विचार करत ती झोपी गेली.


काल संध्याकाळपासून तिने मोबाईल पाहिलाही नव्हता. सो सकाळी उठल्यावर तिने फोन बघितला, तर रोहनचे 25 मेसेज आले होते. त्यात तू रिप्लाय का करत नाहीयेस, काय झाले डियर, एनी प्रॉब्लेम, आय मिस यु यार, असे खूप मेसेज होते. श्रुतीने त्याला मेसेज केला, काही झाले नाही रोहन, पण आता मी तुझ्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवणार नाही. आपण एकत्र काम करतो तर तेवढंच ठीक आहे. मला जास्त तुझ्याशी बोलण्यात आणि मैत्री ठेवण्यात इंटरेस्ट नाही. सो तू मला मेसेज किंवा कॉल करू नकोस...


तसा रोहनचा रिप्लाय आला, अगं असे का बोलतेस माझे काही चुकले का?


श्रुतीने मेसेज केला, रोहन मला काहीही बोलायचे नाही. तू मला कॉन्टॅक्ट करू नकोस, ओके. असे म्हणत तिने त्याचा नंबर ब्लॉक केला. आणि प्रसन्न मनाने तिचे काम आवरू लागली.


तिचे आयुष्य प्रशांत आणि समीरमुळे सुंदर बनले आहे, त्याला ती कीड लागू देणार नव्हती. क्षणिक भौतिक आकर्षणापायी तिचे मन बेलगाम झाले होते, त्या मनाला आवर घालणे आणि भरकटू न देणे हे आपल्याच हातात असते. श्रुती वेळीच सावरली होती आणि मनालाही तिने सावरले होते. मन ते मनच, ते चौफेर उधळणारच पण त्या मनाचा लगाम आपल्या हाती घट्ट पकडून ठेवायला हवा. म्हणूनच बहिणाबाई म्हणतात...


मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर । किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।।

मन मोकाट मोकाट, त्याले ठायी ठायी वाटा । जशा वार्‍यानं चालल्या, पानावर्हल्यारे लाटा ।।

मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन? । उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन ।।

मन जह्यरी जह्यरी, याचं न्यारं रे तंतर आरे । इचू साप बरा, त्याले उतारे मंतर ।।

मन पाखरू पाखरू, त्याची काय सांगू मात?। आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात ।।


Rate this content
Log in

More marathi story from Sangieta Devkar

Similar marathi story from Romance