मिशन साखर कारखाना भाग ३ !
मिशन साखर कारखाना भाग ३ !


सुध्या आमच्या पेक्षा दहा-बारा वर्षांनी थोरला असेल , पण आम्ही त्याला एकेरीच बोलवायचो. सुध्याचे बाबा फौजेत होते म्हणे. त्यांच्या घरासमोर एक जीप असायची. ती जीप त्यांना गिफ्ट दिली होती फौजेतनं रिटायर झाल्यावर. अर्थात ही आगाऊ माहिती मला विक्कूनेच पुरवली होती. “गिफ्ट का दिल्ती ? ” असं विचारल्यावर त्याने सांगितलं, “सुध्याचं बाबा फौजेत असताना त्यांचा एका कानाजवळनं गोळी गेल्ती. तवापासनं ते एका कानान भैरे झाल्ते म्हणून !” विक्कूला या असल्या गोष्टी कुठून कळायच्या देव जाणे. कदाचित त्यासुद्धा माझ्या ‘सरडा हा डायनासूर व्हता‘ या शोधाप्रमाणे त्याच्या मनाचेच शोध असावेत ...
असो ! आम्ही आमच्या सोळा – सोळाच्या दोन अर्काच्या पुड्या घेऊन तिथून परतलो. अन्न्या, बाळ्या आणि बारकू हे तिघे जण आपापल्या घुम्पटांना तिथल्या तिथं फिरवत गिरकी घेत होते . अशी गिरकी घेत घुम्पट फिरवलं की चक्कर यायची आणि थांबलं की सगळं आवार हलल्यागत वाटायचं . हा देखील आमचाच शोध होता . या तिघांमध्ये पहिला कोण पडतोय याची शर्यत लागली होती . सुरुवात बाळ्या पासून झाली , मग अन्न्या आणि मग बारकू . पडल्यावर आभाळाकडे बघत तिघंही मनमुराद हसू लागली . विक्कूने पुढ्या उघडताच तिघंही आपापला तोल सांभाळत उभं राहण्याचा निरर्थक प्रयत्न करून खालतीच मांडी घालून बसले .
“दोन सोळा गोळ्या पाच जणांमध्ये कशा वाटणात ? ” मी सगळ्यांना अनुसरून मुद्दाम विचारलं .
“ आम्हाला शाळत नुस्ती बेरीज शिकीव्लीया . “ बारकू सोंड काढत म्हणाला .
“ आम्हाला बी फक्त वजा – बाकी शिकीव्लीया . “ अन्न्या – बाळ्याने त्या पुढची रीघ ओढली .
“ किक्कू ! आता तुझी पाळी .” विक्कूला हे जमणार नाही असं मला माहीत होतं पण तो काय उत्तर देतो हे मला बघायचं होतं .
“ पाचचा पाढा म्हणू काय सोळाचा ? “ जरा विचार केल्यासारखं करत त्याने मला विचारलं .
“ पाचचा म्हण ! ” मी म्हणालो .
पाचच्या पाढ्यात सोळा कुठेत येत नाही हे एव्हाना त्याला कळून चुकलं होतं , पण ज्याच्याकडे उत्तर नाही तो विक्कू कसला .
“ गोळ्या वाटायला पाढे कशाला पायजेत ? “ असं म्हणत त्याने एक पुडी बाकड्यावर ठेवली आणि प्रत्येकाला एक – एक गोळी उचलायला सांगितली .
“ प्रत्येकाला किती गोळ्या मिळाल्या ? “ विक्कूने वाटून झाल्यावर शेवटी विचारलं .
" तीSSन ! " सगळे एका सुरात म्हणाले .
" पुडीत किती उरलेSS? " विककू त्यांच्या सारखं सूर ओढत म्हणाला .
" एक ! " सगळे पुडीत बघून म्हणाले .
" दोन पुडीतल्या गोळ्या मिळून प्रत्येकाला किती मिळणार ? "
" सहा ! "
" मग उरलेल्या दोन गोळ्या कुनाला ? "
" मल्ला ! " सगळी एकत्र हात पुढे करत म्हणाली .
" बरोबर ! मल्ला ! " विककू हुशारकीत म्हणाला आणि स्वतःच जोरजोरात हसू लागला .
बस - स्टॉप वरचा गणिताचा तास आटोपला तसं विक्कूने त्या उरलेल्या दोन गोळ्यांपैकी स्वतः एक गोळी घेतली आणि मला एक गोळी देऊन तो कौटुंबिक वाटणीचा वादही संपुष्टात आणला .
मी विककू पेक्षा तीन दिवसांनी मोठा होतो . अन्न्या आणि बारकू आमच्या पेक्षा दोन वर्षांनी तर बाळ्या आणि चन्नू तीन वर्षांनी लहान होते . मी जरी थोरला असलो तरी दादागिरी चालायची ती विक्कूचीच .
“ आता प्रवासाचे नियम ! ” मी पुढे होत म्हणालो “ नियम क्रमांक एक - सगळ्यांनी रस्त्याच्या डाव्या कडेनं चालायचं . दोन – जोरात पाळायचं नाही . तीन – एका लाईनीत राहायचं . चार आणि सर्वात महत्वाचं – सर्वात फुडं मी राहणार आणि विक्कू , तू सर्वात माग्न यायचं . “
“ हुंSS ! मी न्हाई जा ! मी फुडं राहनार ! “ विक्कू चिडून म्हणाला .
“ तू येताना राहा फुडं ! सोन्यादा , तूच राहा फुडं . ” बारकू मध्येच म्हणाला . विक्कू दादागिरी करायचा , पण कुणाला त्याची दादागिरी पटत न्हवती .
“ बरं ! चालतंय कि ! “ विक्कूला ते पटलं , याचंच मला नवल वाटलं . नाही तर आशा वेळी समक्ष ब्रम्हा देवाला ही त्याचा हट्ट बदलता आला नसता .
“ हमलाSSS ! “ असं म्हणत मी अचानक आपलं घुम्पट साळीला लावलं आणि कारखान्याच्या मोहिमेचा नारळ फोडला .
“ हमलाSSS ! “ असं म्हणत सगळे मावळे माझ्या मागो - माग घुम्पटांची रीघ ओढत आगेकूच करत पळत सुटले .