फुट – पाथ !!!
फुट – पाथ !!!


( ठिकाण - फुट – पाथ , वक्ता – एक चार वर्षांचा मुलगा , प्रसंग – फुट – पाथवर झोपलेले एक कुटुंब )
मधूनच झोपेतून जाग आली . डोळ्यांनी कोवळ्या उन्हाला पित मला पहाट झाल्याची जाणीव करून दिली... अंगावर फिरणारा आईचा हात जाणवला आणि मला जाग येण्याचं कारण लक्षात आलं .
मी माझे डोळे बंद केले . कारण काल रात्री मारणाऱ्या आईचा तो हात , आज मला कुरवाळत होता ...
कारण काम करून खरबुडीत झालेल्या तळ हाताचा स्पर्श , मला बरा वाटत होता ...
माझ्या बाजूला माझा दोन वर्षांचा लहान भाऊ आणि त्याच्या बाजूला माझे दारोडे वडील झोपले होते . अगदी गाढ निद्रेत ... आईचा हुंदका ऐकू येताच , ती रडत असल्याची जाणीव मला झाली आणि मला मेल्याहून मेल्या सारखं वाटू लागलं ... कारण आई माझ्या मुळे रडत होती . याच्या आधीही मी आईचा मार खाल्ला होता , पण तेव्हा तर ती कधीच रडली नव्हती ! कशाला रडत होती ती ? कसलं दुःख होत होतं तिला ? पश्चाताप होत असेल तिला ... पण कशाचा ? माझ्या दरोड्या बापाचा ? फुट – पाथ वर झोपण्या इतपत गरिबीचा ? तिच्या वर्तमान आणि भविष्यातल्या लख्ख काळोखाचा ? आमचे बाल - हट्ट न पुरवू शकणार्या लाचारीचा ?
आई ! तू रडू नकोस ... नाही तर मी ही रडेन ... आई !! तुला मी कधी – कध्धी त्रास देणार नाही ... मी शिकेन ... अभ्यास करेन ... मोठा होईन आणि तुला इथून घेऊन जाईन ... अगदी तू सांगतेस तशा पऱ्यांच्या देशात ... आई !!! तू निश्चिंत होऊन झोप . तुझा हा मुलगा कोणत्या ही वाईट वाटेवर जाणार नाही ...
मी डोळे उघडले आणि आईचे डोळे पुसत तिला घट्ट मिठी मारली ...