मिशन साखर कारखाना भाग १
मिशन साखर कारखाना भाग १


मे महिन्याच्या सुट्टीत मी , चन्नू आणि आई मामाच्या गावी जायचो. खरं सांगायचं तर वर्षभर मी याचीच वाट पाहायचो . उन्हाळ्यातले दोन महिने आणि दिवाळीचे २१ दिवस, हे हमखास मामाच्या गावी जायचे . मुंबईच्या चाळीत माझं मन कधी रमलच नाही . ते होतं विहिरी काटच्या अशोकाच्या झाडापाशी असलेल्या शंकराच्या पिंडीपाशी ... हे अशोकचं झाड तुमच्या मनाने चित्रित केल्याप्रमाणे सरळ आणि छाया रहीत नव्हतं बरं का ! ते होतं वडाच्या झाडा सारखं ... मोठ्ठ ! विशाल ! बुजुर्ग ! बारक्या सांगत होता कि त्याच्या सावलीत ठेवलेली ती भली-मोठी शंखराची पिंडी भाव काढताना त्यातनं बाहेर काढली होती .
आम्ही खेळलेले प्रत्येक खेळ , भर दुपारी विहिरीत पोहणे ,बांदलेले मातीचे किल्ले आणि अश्या अनेक उपद्रवांना ती शंकराची पिंडी आणि ते अशोकाचं झाड हे समक्ष साक्षीदार होते ... जणू काही त्यांच्या छत्रछायेखालीच आम्हां पामरांचा राज्य कारभार चालत होता ... अशाच एका भर दुपारी आमचा दरबार भरला होता ... विकू ,बाळू ,अन्या ,बारकू आणि मी असे दुपारी सगळे झोपलेले असताना ... आवाज न करण्याची ताकिद असल्याने विहिरीतल्या निथळ पाण्यात माशांची चाललेली सहल पाहत होतो .
बारकू -तो बग साप !
मध्येच बारकू ओरडला . त्यावर सगळ्यांनी त्याला शू !!! करत त्याने दाखवलेल्या दिशेने पाहू लागलो . विहिरीच्या दगडांच्या सांदडीतच असे साप ,बेडूक ,खेकडी असतातच ... पण त्यामुळे आमच्या पोहण्यात कधीच व्यत्यय आला नाही ... बाबा म्हणाला होता कि माणसं विहिरीत उतरली कि अन्य श्वापदे घाबरून आप -आपल्या बिळात लपून बसतात ...
विकू -नाग साप हाय त्यो !
अन्या -नाग साप लांब नसतोय ! धामीन हाय ती !
बाळ्या -नागाला फना असतोय !
बारकू-नागीन हाय ती ! नागिन लांब असती नागा पेक्षा !
मी -थांब मी दगडं घेऊन येतो !
विकू -नको ! जाईल ती ! नागीन ला मारलं की नाग येतोय रात्रीचं हांतरूणात !
मी -ह्या ! ते पिक्चररातलं सगळं खोटं असतंय !
बारकू -मग तूच मार दगड आणि बग खरं असतंय की खोटं !
मी -नको ! असूदे ,उगाच मुक्या जनावराला मारू नये .
माझ्या या वाक्या पाठी मागचं घाबरटपणा सगळ्यांना कळला. तसं सगळी एकत्र हिय्या -हिय्या करत माझ्यावरं जोर -जोरात हसू लागली ...
' ऐ ! जात्यासा काय ... येऊ तिकडं ? !!! '
घरातून बाबाचा आवाज आला .ते ऐकताच सगळ्यांनी तिथून धूम ठोकली आणि सरळ माईच्या खोपीत गेलो ! माईच्या खोपीत शेणी ,जाळण्याची लाकडं ,नांगरी असं सगळं भरलेले होतं . तिथंच कोपऱ्यात आम्हा सगळ्यांची घुम्पटं ठेवलेली होती ... प्रत्येक सुट्टीत आमच्याकडे वेगवेगळी खेळणी असायची . म्हणजे एक वर्षीं टायरी फिरवत ... अख्ख गाव पालथी घातलं होतं . तर दुसऱ्या वर्षी भवरे फिरवत शेवटी हवेतल्या -हवेत तो कसा झेलायचा ,हे शिकलो होतो . या वर्षी घुम्पट फिरवायचा नाद लागला होता . घुम्पट फिरवण्यासाठी लागणारी सळी खास लव्हराकडं जाऊन आईन वाकवून आणली होती . माईची खोप म्हणजे एक प्रकारे आमचा अड्डा होता ... तिथं आम्हांला पडलेल्या असंख्य प्रश्नांची उजळणी होत असे .
बारकू -बाबानं नवीन चाबूक आणलाय !
(बोलताना त्याला दम लागला होता . )
विकू -आज ,उदघाटन झालं असत मग !
यावर सगळे हसू लागलो . तोच अन्याची नजर घुम्पटांवर पडली .
अन्या -चला शर्यत लावूया !
सगळ्यांनी आप -आपली घुम्पटं उचलली आणि सळीला लावून ढकलायला लागली तोच विकू म्हणाला " थांबा ! इथनं नको ! आवाजानं घरची जागी होतील ."
सगळ्यांना ते पटलं . रसत्या पर्यंत हळू -हळू चालत जायचं ठरलं .दुपारची वेळ असल्याने गाड्या बंद होत्या .बस -स्टॉप वर पोहचताच सगळ्यांनी धावत जाऊन बसायची जागा पकडली .थोडा वेळ शांततेत गेला !
बारकू-दुपारचं किती शांत असतंय नई सगळं ?
त्या शांततेत फक्त चिमण्यांचा होत असलेला चिवचिवाट किती विलोभनीय वाटत होता ... मध्येच एक खारुताई येऊन स्टोपवर पडलेलं खाऊ घेऊन गेली . तोवर सर -सर करत सारडा ही त्या पाठीमागून झाडावर चढत मधेच थांबला !
" सारडा म्हनं आधी डायनासूर होता ! खायला कमी पडू लागलं म्हणून ती छोटी झाली ! " माझ्या मनानं कुठूनतरी तो शोध लावला आणि हमखास पणे मी तो ओकून टाकला .गम्मत म्हणजे ,सगळयांना तो पटला ही !
" मग उडणाऱ्या डायनसूरांचं काय झालं ?"
बारुकूच्या भाबड्या प्रश्नाच उत्तर माझ्याकडं नव्हतं
" त्यांचं , पक्षी झालं असतील ! " विकू म्हणाला .
थोरले असल्याचा एक फायदा असा कि , धाकटे तुमच्या कोणत्याही वाक्यावर डोळे झापून विश्वास ठेवतात . विक्कू माझ्याकडे बघून मिष्कीलपणे हसू लागला .
" मग मासे कुठल्या डायनासूर पासून झाली ? " अन्याच्या या प्रश्नाला ही उत्तर देणं भाग होतं .
" आ sss! ते आता डार्विनलाच विचाराय पायजे ! " बाळ्याला असं खोड मोडणं फार आवडत .
सगळे त्यावर हसू लागलो . तोच साखर कारखान्याचा भोंगा वाजला ... दुपारचे दोन वाजण्याची हीच ती खूण .
साखर कारखाना हरळीत होता . महागावाहून , म्हणजे मामाच्या गावाहून हरळीला जाण्यासाठी सरळ रस्ता होता ... बाम्बराकडच्या शेतातून तर तो साखर कारखाना दिसायचा देखील .
कारखान्याच्या मधून ही उंच चिमणी निघायची ... त्यातून काळाकुट्ट असा धूर निघताना दिसे ... मला तेव्हा पासून कारखान्यात जायचं होतं ...
" चला कारखान्याकडे जाऊया ! " मी माझी इच्छा प्रकट केली ...
भाग १ समाप्त ...