गवत-फूल
गवत-फूल


प्रत्येक दिवसा प्रमाणे तो ही दिवस अगदी रम्य सूर्याच्या छायेत फुललेला होता... पक्षी गात होते, झाडांची पानं झुलत होती, गायी चरत होत्या... अर्थात, सगळं अगदी जसं असायला हवं होतं तसंच होतं... पण एका बागेत एक गवत-फूल मात्र निराश होता... आपल्या अस्तित्वाचा अगदी रोष व्यक्त करत होता तो... देवा वर... स्वतः वर... त्याच्या कोमल आवाजात रडत-रडत तो एकच प्रश्न विचारात होता... "का? देवा तू मला गवत-फूलच का बनवलं? त्या गुलाबांप्रमाणे मला कुणीच कुरवाळत नाही. सूर्य-प्रकाश तर माझ्या वाट्याला येण्यापूर्वीच ते शोषून घेतात... माझं अस्तित्व असुन नसल्या सारखेच आहे... "
देवाला त्याच्या कोमल आवाजातल्या तक्रारीची गम्मत वाटतं होती आणि सोबत दया ही येत होती. त्याला समजावत ते त्याला म्हणाले, " जे आहे ते सोडून नसल्याची हाव केल्याने पदरी येतं ते केवळ दुःख आणि पश्चात्ताप... हे बघ गवत-फूला, हट्ट सोड, तुला जाणवेल की तुझ्या इतका भाग्यशाली तूच आहेस... " पण गवत-फुलाने आज ठरवलंच होतं. त्याच्या हट्टापुढे नमुन देवाने त्याला एका दिवसासाठी गुलाब होण्याचं वर दिलं आणि अदृश्य झाले.
दुसऱ्या क्षणि गवत-फुलाचं रूपांतर एका मोठ्या आणि सुंदर लाल भडक गुलाबात झालं. सूर्य-किरणांची उभ... फुलपाखरांचा स्पर्श... हवेची हळुवार झुळूक... अशा अनेक गोष्टी त्याने पहिल्यांदाच अनुभवल्या... या सगळ्यात संध्याकाळ केव्हा झाली त्याला कळालं देखिल नाही. संध्याकाळ झाली तशी गवत-फुलाची वेळ ही संपत आली... सूर्यास्त होताच तो आपल्या मूळ स्वरूपात आला. पण आता त्याला त्याचं दुःख वाटत नव्हतं. कोणाबद्दलही द्वेष त्याच्या मनात आता शिल्लक राहिला नव्हता... होती ती केवळ एक स्थिर आणि शांततेची समाधी अवस्था... इतक्यात...
मोकळ्या आकाशी जागा काळ्याभोर ढगांनी व्यापली... शांत झुळूक आता वादळाला साथ देत सगळ्यांना दम देऊ लागली... आणि त्याच बरोबर पडणाऱ्या मुसळधार पावसाने सगळ्या गुलाबांचा शीर-च्छेद केला... प्रकृतीच्या या महा-संग्रामात, बळी गेला तो केवळ गुलाबांचा... गवत-फुलांना त्या वादळाचा स्पर्श देखील झाला नव्हता... पाऊस थांबला, आणि पसारली ती शांतता... घनदाट शांतता... त्या शांततेचा भंग करत आपले अंतिम श्वास मोजत असणारा एक गुलाब त्या गवत-फुलाला उद्देशून म्हणाला, " बघ मित्रा!!! आज तू गवत-फूल आहेस, म्हणून वाचलास... तुझ्या नम्रते-रुपी लहान आकारमुळे तुला वादळाची झळही लागली नाही... आम्ही मात्र आमच्या गर्वीष्ठ सौंदर्याला घेऊन आज काळाआड जातोय...
"नाही मित्रा!!!" गवत-फूल जीवाच्या आकांतानं ओरडून म्हणाला, " तुझ्या सौंदर्याला गर्वाचे काटे कधीच नव्हते... ते तर तुझ्या सुरक्षे-साठी होते... आणि माझ्या... किंबहुना माझ्या सारख्यांच्या नम्रते बाबत बोलतोयस, तर आज ती जागा घेतली आहे भ्रमित अहंकाराने... 'आम्ही गुलाब नाही आहोत तेच बरं !' अशा दुबळ्या विचारांच्या गवत-फुलांनो, माझ्या एका प्रश्नाच्या उत्तराचा विचार मात्र नक्की करा... उद्या जेव्हा थंडीमुळे संपूर्ण भूमी बर्फाने झाकली जाईल, तेव्हा तुम्ही या गुलाबांप्रमाणेच लाचार आणि हतबळ नसणार का? आपण सगळेच कधी ना कधी काळाआड जाणार आहोत... आज गुलाबांना सामोरं जावं लागलं इतकच...
आज मी जगलो... खऱ्या अर्थाने जगलो... तो फुलपाखरांचा स्पर्श... ती वाऱ्याची झुळूक... तो मोकळा आसमंत... आजचा एक दिवस मरे पर्यंत माझ्या लक्ष्यात राहिल... आणि याच दिवसामुळे मी हसत-हसत मरणाला सामोरं जाईन !!!"
गुलाबाने श्वास सोडला होता... पण त्याच्या चेहऱ्यावर एक गोड स्मित हास्य फुललेलं स्पष्ट दिसत होतं...