मधुरा
मधुरा


गेल्या आठवड्यापासून मधुरा मुक्त निवांत आयुष्य जगत होती. कोणाचे बंधन नाही, कसले पाश नाही. तिला हवे तसे आता जगता येणार होते. सकाळी कामवाली बाई यायची. घर झाडून पुसून जायची. मग स्वयंपाक करणाऱ्या काकू यायच्या. त्यांच्याकडूनच नाष्टा करून घेऊन मधुरा ऑफिसला जायला तयार व्हायची. काकू डबा करून द्यायच्या, ती ऑफिसला गेली की त्याही घरी जायच्या आणि पुन्हा संध्याकाळी यायच्या. मधुरा फक्त काम करायची.
ती एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या पदावर जॉबला होती. पैशाची कसलीच कमतरता नव्हती. आज पंधरा दिवस झाले तिचा घटस्फोट होऊन, तिला हवा होता घटस्फोट अबीरकडून. अबीरशी तिचे लग्न चार वर्षांपूर्वी झाले होते. अबीरही सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होता. विचाराने वागण्याने एकदम आधुनिक म्हणूनच मधुराच्या नोकरीचे त्याला वावगे नव्हते. दोघांनी एकमेकांना समजून घेऊन संसार करायचा असे ठरले होते. त्यामुळे अबीर कधीही मधुराला त्रास होईल असा वागत नसे. सगळ्या कामासाठी बाई होती. घरात मधुराला काहीही बघावं लागत नव्हतं.
आपल्या कामातल्या हुशारीमुळे तिने प्रमोशनही लवकर मिळवले होते. तिला आपल्या बुद्धीचा गर्व होता. आता लग्नाला चार वर्षे होत आली होती. एकदा अबीर म्हणाला, मधु आता आपण वेल सेटल्ड आहोत तेव्हा मुलाचा विचार करूयात.
नाही अबीर मला इतक्यात मूल नको आणि हे बघ हे मूल वगैरे जन्माला घालणं म्हणजे नवऱ्याची गुलामी करण्यासारखं आहे. मी नाही अजून विचार केला याचा.
अगं मधु गुलामी काय म्हणतेस आपल्या दोघांचं मूल असेल ते.
नाही अबीर मला या फ़ंदात नाही पडायचं, मुलाला मोठं करा त्याच्याकडे लक्ष द्या, त्याचं आजारपण मला नाही जमणार... मी एक कॉर्पोरेट वूमन आहे. आज पुरुषासोबत किंबहुना जास्तच काम करते मी आणि पैसाही मिळवते. मला माझं करियर स्पॉइल नाही करायचं. यावर अबीर गप्प बसला.
मधुला हे समजत नव्हतं की स्त्री-पुरुष समानता आहे. म्हणून तिने स्वतःला कमी लेखून घर आणि मूल सांभाळावे असे अबीरचे म्हणणे नव्हतेच पण मधूने आत्मसन्मान, नारी स्वातंत्र्य, स्वावलंबन याचा चुकीचा अर्थ लावला होता.
अबीर तिला म्हणायचा, मधु तुझ्या हातचं काहीतरी बनव ना खायला तर तिला ते गुलामी वाटायचं. अबीर कधी आजारी असेल तर तिने सुट्टी घेऊन त्याची काळजी घ्यावी, इतकी माफक अपेक्षा अबीरची असायची. पण मधुला ते कमीपणाचे वाटायचे. आत्मसन्मान आणि अहंकार यामधला फरक ती विसरली होती. भरपूर पगार आणि अधिकार यामुळे तिचा अहंकार वाढतच चालला होता मात्र अबीर शांतपणे सगळं सहन करायचा. त्याला वाटायचे आज ना उद्या मधुरा बदलेल, तिला माझी घराची किंमत कळेल. बायकोने नवऱ्यासाठी काही गोष्टी करणे म्हणजे ते प्रेम असतं याची तिला जाणीव होईल. त्याचं गप्प राहणं तिला सहन होत नव्हतं. मग तिचा राग आणि अहंकार अजून वाढायचा.
कधी अबीर प्रेमाने तिला जवळ घ्यायचा तेव्हा तिला वाटायचे मी याची बायको म्हणून हा मला कधीही जवळ घेणार आणि स्वतःची भूक भागवणार... तेव्हा ती म्हणायची अबीर मी तुझी प्रॉपर्टी नाही की केव्हाही तू मला युज करावं. अबीर बेडरूममध्येही हा अपमान चुपचाप सहन करायचा. प्रेमालासुद्धा ती गुलामीच समजायची. त्यात भर म्हणजे तिच्या मैत्रिणी तिला जास्त भडकवायच्या.
म्हणायच्या, मधुरा आपण काय पुरुषाची दासी नाही आहोत त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला. आपल्यालाही समान हक्क आहे. कायदा आपल्या बाजूने आहे. समान अधिकार आहे मग का म्हणून या पुरुषांची मक्तेदारी सहन करायची. आपण स्वतंत्र देशातील स्वतंत्र आर्थिकदृष्टया स्वतंत्र स्त्रिया आहोत, आपली किंमत त्यांना करावीच लागणार. मैत्रिणीचे ऐकून मधुरा अजूनच अग्रेसिव बनायची.
ऑफिस पार्टी पिकनिक कुठेही जायला अबीर तिला अडवत नसे. कारण तोही स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कर्ता होता. त्याला माहित होते आजची स्त्री स्वतंत्र आहे. तिलाही मनासारखं जगण्याचा अधिकार आहे. एका रविवारी अबीर तिला म्हणाला, मधु तुला वाटत नाही का गं की आपण आई व्हावं, कधीतरी सुट्टी दिवशी स्वतः काहीतरी बनवावं. हे स्त्रीचे उपजत गुण आहेत गं, प्रेमाने काही गोष्टी कराव्यात असं नाही वाटत तुला.
तशी मधुरा चिडली म्हणाली, अबीर तुला काय म्हणायचे मी तुझ्या मुलाची आई व्हावं... घर सांभाळावं, म्हणजे एकाअर्थी तुझ्या ताब्यात राहणं. मी बायको तुझी म्हणून तू मला मनात येईल तेव्हा माझा उपभोग घेणार.
अगं मधु मला असं नाही म्हणायचं तू चुकीचा अर्थ घेतेस. अबीर शांतच बोलला.
पण मधुराला राग आलेला ती म्हणाली, अबीर हे सगळं करणं मला कदापि जमणार नाही. मी मूल जन्माला घालून माझी फिगर खराब नाही करणार ना ही घरची कामं करणार, तुला खायला बनवून घालणार, समजलं... कारण मी एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करते, शाळेत शिक्षिका नाही मी!
आता मात्र अबीर चिडला म्हणाला, मी काय बोलतो समजते का तुला मधुरा... अगं आई होणं, नवऱ्याला त्याच्या आवडीचं खायला बनवून देणं याला गुलामी म्हणत नाही हे तुझ्या अहंकारी बुद्धी ला समजतच नाहिये. स्त्री स्वातंत्र्य अधिकार हे मी कधीही नाकारले नाही. पण एकमेकांच्या काही अपेक्षा शरीराच्या काही गरजा असतात ज्या नैसर्गिक असतात हे ही तू विसरून गेलीस. तुला तुझ्या कामापुढे यशापुढे काहीही दिसत नाही. असेच वागायचे होते तर लग्न का केलेस मग?
तशी मधुरापण चिडली म्हणाली, वा रे पुरुष आता जागा झाला ना तुझ्यातला खरा पुरुष जो बाईला फक्त वस्तू समजतो. कुठे गेला तो अबीर जो समानतेच्या स्त्री अधिकाराच्या गप्पा मारायचा. मधुरा तुला हवा तो जॉब कर घरकामाला बाई ठेव, मी कायम सोबत आहे तुझ्या हे तूच बोलला होतास, म्हणून लग्न केले मी समजले. पण मला नाही वाटले त्या वेळी की तू या स्वातंत्र्याचा असा अर्थ लावशील.
तुझ्या अहंकारापुढे तुला माझं प्रेमही दिसेनासे झाले आहे, अबीर म्हणाला.
आता मला नाही राहायचे तुझ्यासोबत अबीर, मी स्वतंत्र आहे, मला मुक्त जगायचे आहे, तुझ्या अपेक्षा पूर्ण करणं मला जमणार नाही. कारण मी सो कॉल्ड टिपिकल बायको नाही बनणार. मला घटस्फोट हवा आहे. आणि त्यानंतर अबीर-मधुरा वेगळे झाले.
मधुरा एकटी राहात होती. आज सुट्टी होती. तिने तिच्या मैत्रिणींना फोन लावला कारण घरी बसून ती बोअर झाली होती. कुठेतरी फिरायला जाऊ असे म्हणत होती पण कोणी यायला तयार नव्हतं. कोण नवऱ्यासोबत शॉपिंगला चालली होती. कोण सिनेमाला चालली होती. कोण मुलासोबत पिकनिकला जाणार होती. मधुराला आश्चर्य वाटले की याच का त्या मैत्रिणी तिच्या ज्या तिला सांगायच्या नवऱ्याचं काम नको करू गुलामी नको करू आणि स्वतः काय करत आहेत? मधुरा स्वतःवरच चिडली. हे एकटेपण तिला खायला उठले होते. ती सरळ आईकडे आली.
आई म्हणाली कशी आहेस मधु?
मी आहे बरी.
का काय झाले तुझा मूड ठीक नाही आज.
मधु म्हणाली, आई अगं हे एकटेपण खायला उठते. ऑफिसवरून घरी गेले की एकटीच जेवायचे. सुट्टी दिवशी कोणी मैत्रिणी माझ्यासोबत न येता त्याच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करतात. आणि अलीकडे पाहतेय मी ऑफिसमधले कलीग्ज माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात. बॉसही घाणेरडया नजरेने बघत असतो. सोसायटीमधले लोक बळेच बोलतात, घरी येतात.
मधु हे सगळं का होतंय कळतंय का तुला? अगं घटस्फोटीत बाई म्हणजे सगळ्यांसाठी अवेलेबल तिचं चारित्र्य चांगले नसेल म्हणून नवरा सोडून गेला असा समज आपला समाज करतो. एकटी बाई मग तिला आपल्या जाळ्यात ओढायला हे पुरुष तयारच असतात आणि आता तुला अबीरचं सुरक्षा कवचसुद्धा नाही. मग जो तो हात मारायला बघणारच.
म्हणजे काय आई, ती बोलली.
मधु नवरा सोबत असला ना तर हे बाहेरचे लोक मान वर करून बघत नाहीत बाईकडे. तिचा नवरा हा तिला ही सुरक्षितता देत असतो तेच जर तो सोबत नसेल तर हे वासनेने वखवखलेले लोक तुझ्या आजूबाजूला भटकणारच. तू अबीरला नाही ओळखू शकलीस मधु, त्याला तुझा अभिमान वाटत होता त्याने तुला कधी बांधून नाही ठेवले ना त्याची कामे सांगून तुला अडकवून ठेवले पण तू मात्र स्त्री समानता हक्क या लेबलपायी नाहक त्याला चुकीचा ठरवलेस. अगं स्त्रीला आत्मसन्मान हक्क अधिकार सगळं आहे पण त्याला एक मर्यादा पण आहे. आपल्या स्वातंत्र्याचा किती फायदा घ्यायचा याला ही मर्यादा आहे पण याचा अर्थ पुरुषांची गुलामी करणे नाही. तुझ्या बाबांनी मला कधी या घरात कमी दर्जा दिला का, मी आवडीने सगळं घरचे काम करते म्हणून माझी किंमत कमी झाली आहे का? तूच विचार करून बघ, मधु अबीरच्या सहवासात तू अधिक स्वतंत्र आणि मुक्त पणे आयुष्य जगत होतीस. त्याचं प्रेम तुला पायातली बेडी वाटत होती. तू भरपूर पैसा कमवशील, प्रतिष्ठाही मिळेल तुला पण जर तुझ्या आनंदात कोणी सोबत नसेल, हसणारा बोलणारा कोणी सोबत नसेल तर त्या पैशाला काय अर्थ उरणार आहे. तुला अबीर सोबत असताना भीती किंवा असुरक्षितता कधी वाटली का, तू त्याचं प्रेम ओळखू नाही शकलीस. अजूनही वेळ गेली नाही मधु तू अबीरची माफी माग, यात कोणताही कमीपणा नाही. जीवनाची सार्थकता जोडण्यात आहे तोडण्यात नाही.
मधुला आईचे म्हणणे पटले. ती म्हणाली, आई माझं खरंच चुकलं मी अबीरला ओळखू नाही शकले. स्वातंत्र्य,समानता या नावाखाली मी चुकीची वागत आले. मी कायम माझा अहंकार जपत आले.
आई म्हणाली मग अबीरची माफी माग तो खूप मोठ्या मनाचा आहे तुला जरूर माफ करेल आणि समजूनही घेईल.
हो आई मी आताच जाते अबीरकडे आणि माफी मागतो त्याची. आणि मधुरा तडक अबीरला भेटायला गेली...
स्त्रीवाद म्हणजे केवळ पुरुषांना कमी लेखणं नव्हे. स्त्रियांना पुरूषांच्या बरोबरीचे समान हक्क मिळावेत, किंबहुना मी असं म्हणेन, की पुरूषांना स्त्रियांच्या बरोबरीचे समान हक्क मिळावेत यासाठी ही चळवळ आहे. फेमिनिस्ट म्हणजे पुरुषांना विरोध असं अजिबातच नाही. योग्यता, पात्रता पाहून सर्वांना समान संधी मिळायला हवी. हेच खरं 'फेमिनिझम' आहे.