माझा नाट्यानुभव
माझा नाट्यानुभव


माझा नाट्यानुभव मला अगदी लहानपणापासून नाटक ,सिनेमा, नृत्य या सगळ्याची मनापासून आवड, स्टेज डेरिंग हे माझ्याकडे जन्मापासूनच होते. पण गाव अत्यंत मागास खेडेगाव ,शाळा दहावीपर्यंत होती पण ,कित्येक वर्ष शाळेचे गॅदरिंग म्हणजे अगदी नावालाच गॅदरिंग व्हायचं . ना कोणी कधी प्रॅक्टिस घ्यायचं, ना कधी काय करायचं हे कोणी सांगायचं. पण तरी आस्मादिक त्यात कायम असायचे. आम्हीच रायटर, आम्हीच ऍक्टर ,आणि आम्हीच दिग्दर्शक सगळं काही ऑल-इन-वन😃 घरात विठ्ठलाचे देऊळ मग विठ्ठल रुक्मिणीला नेसवायचे कपडे ,दागिने , मुकुट सगळं मी ग्यादरिंग मध्ये घेऊन जायची. भाषण स्पर्धेत मी कधीच नंबर सोडला नाही. गावातील विठ्ठलाच्या देवळात माझ्या दोन-चार मैत्रिणींबरोबर मी अनेक छोटी छोटी नाटके बसवली आहेत, आता काय त्यातला आठवत नाही ,पण काहीतरी खेळ असे चालायचे. मला पहिल्यांदा स्टेजवर चान्स मिळाला तो जेजे येथे परिचारिका शिक्षणासाठी आल्यानंतर, काय करायचं माहित नव्हतं! पण अंगात उर्मी जबरदस्त बाकीच्या मुली शहरात राहणाऱ्या, त्यांचे भाऊ नातेवाईक मग अगदी त्यांना वाजंत्री म्युझिक पासून सगळं काही पुरवलं गेलं ,बर! सुरुवातीला गावाकडच्या म्हणून कोणी आम्हाला त्यामध्ये घेतच नव्हतं. तेव्हापासून मला सोलो परफॉर्मन्स करायची सवय लागली. ऐनवेळी मी अंगात आलेल्या बाईचा रोल केला. त्यासाठी त्यांना जबरदस्ती म्युझिक द्यायला लावलं. आता स्टेजवर एन्ट्री केल्यावर नाही कोण म्हणणार? गावाकडे अगदी बारीक ऑब्झर्वेशन केलेलं होतं. नंतर आम्ही बहिणी बहिणींनी, ती मांत्रिक आणि मी भूत लागलेली बाई असं स्किट केलं होतं. अगदी ॲनाटोमीच्या मॅडमकडून खरीखुरी कवटी आणि हाडकं मागून घेऊन केलेले ते पहिले स्किट. त्यानंतर आम्ही सहा जणीनी मिळून एक डान्स बसवला. प्रत्येकीची शिफ्ट वेगळी वेगळी त्यातून वेळ काढून आमच्याच होस्टेलच्या वर वरांड्यामध्ये प्रॅक्टिस सुरू. "सासो की ताल पर धडकन की ताल पर दिल की पुकार का रंग भरे प्यार का गीत गाया पत्थरोने याच्यावरती नाच बसवला, नंतर आमच्या लक्षात आलं की प्रॅक्टिसच्या वेळी अनेक रुग्णाचे नातेवाईक तिकडे येऊन बघत असतात. मग आम्ही ती जागा बदलली . ज्या दिवशी प्रत्यक्ष कार्यक्रम त्या दिवशी आम्ही बहिणी जास्तच उत्साही. माझी सख्खी बहीण आणि मी आम्ही रूम पार्टनर होतो. जेवलो खाल्लो नाही, मॉर्निंग ड्युटी फोर पीएम घेऊन त्यानंतर तसंच भुलेश्वर ला जाऊन डान्स साठी लागणारी ड्रेपरी आणली. नंतर रामायणासाठी (रामानंद सागर यांची टीव्ही सिरीयल )ड्रेपरी पुरवणारा मगनला ड्रेस वाला तेव्हा खूप छोटा होता आम्ही सर्रास त्याच्याकडूनच ड्रेपरी घेऊन यायचो. त्या सगळ्या उत्साहाच्या भरात खरंतर दोघींच्याही पोटात काही नव्हतं. जेवण असून प्रॅक्टिस म्हणून जेवायला गेलो नव्हतो, पण भूक लागल्याचे जाणवलं पण नाही . आणि बरोबर स्टेजवर डान्सच्या आधी माझी मोठी बहीण स्टेजवरून पडली, तिच्या डोक्याला लागलं पण तेव्हा ते टाके पडण्या एवढं गंभीर आहे असं कळलं नाही . त्यामुळे आपोआप त्या डान्स मधून आम्ही दोघी बाजूला झालो. त्याच्या पाठोपाठ एक छोटं वेड्यांवरती नाटक बसवलं होतं, अर्थात लिहिणारी मीच . तेव्हापासून वेड्यांवरती जास्तच प्रेम होतं, किंवा वेड्यांचे वेड मला होतं. त्यात माझ्या बहिणीचा शिक्षिकेचा रोल होता. म्हणजे सगळेच वेडे एक शाळा मास्तरीन, एक पुढारी, (धोतर नेसून टोपी व मिशा वगैरे लावून तो पुढारी मी झाले होते.) एक टीसी, एक नृत्यांगना एक व्यापारी, असं ते स्किट होतं. बहिणीला शॉर्ट मेमरी लॉस झाला . म्हणजे शरीरातील साखर अत्यंत कमी झाल्यावर हे होतं. पण तेव्हा काय समजत नव्हतं. तिला म्हणाले अग कुंदा आपण नाटक बसवलंय चल आता तुझा रोल आहे. तर ती मला कसलं नाटक? कधी बसवलं? त्याच्या आधी डान्सला पण तिने कसला डान्स? कधी बसवला? हे विचारल्यामुळेच आम्ही डान्स मधून बाजूला झालो. आता नाटक वेड्यांचं असल्यामुळे काहीही केलं तरी चाललं असतं ,त्यामुळे मी तिला स्टेजवर ओढलं .आमचा तो ड्रामा व्यवस्थित झाला. आणि तिचे डायलॉग देखील तिने बरोबर म्हटले पण नंतर खाली उतरल्यावर कुठे लागलं म्हणून तिच्या डोक्याला हात लावला तर हाताला सगळं रक्त लागलं होतं. मग तशीच तिला घेऊन चार नंबरला कॅज्युअलटी मध्ये गेले. त्यांनी आधी टाके बिके घातले. शुगर वगैरे आता कशी अर्जंट पाहिली जाते तसं काही कोणी पाहिलं नाही .पण सलाईन लावल्यामुळे कदाचित ती कव्हर आली. मग बाहेर जाऊन मी मसाले डोसा पार्सल घेऊन आले. विचार केला होता दोघी बहिणी बहिणी अर्धा अर्धा खाऊ, कारण तेव्हा आम्हाला फक्त 52 रुपये वगैरे स्टायपेंड मिळायचं, आले तर ही एकदम गाढ झोपेत किंवा डीप स्लिप अशी होती. मग मी विचार केला की कधीतरी उठेल तेव्हा खाईल, म्हणून तिच्या उशाला मी तो मसाले डोसा ठेवला आणि मी हॉस्टेलला परत आले. तेव्हा साडेनऊला आमचा रोल कॉल असायचा. जर सांगितलं असतं माझी बहिण ऍडमिट आहे तर कदाचित मला कन्सेशन मिळालं असतं, पण तेवढं डोकं ही नव्हतं आणि भीती वाटायची. मी हॉस्टेलवर आले एरवी आमच्या चार-पाच जणी मैत्रिणीकडे कोणाकडे तरी ब्रेड, केळ , सकाळची चपाती असं काहीतरी असायचं . पण यावेळी दोघी तिघींकडे विचारलं तर कुणाकडेच काही नाही . एकीकडे कालची चपाती मिळाली, ती साखरेबरोबर खाऊन मी त्या दिवसाची भूक भागवली. सकाळी गेले तर तिच्या उशाला मसाले डोसा तसाच पडलेला, तिला काही आठवतच नव्हतं. तो फेकूनच द्यावा लागला ना तिच्या नशिबात! ना माझ्या नशिबात. खरच तेव्हा वेळ चांगली होती कारण एवढी मोठा शुगर लॉस झाल्यावर माणसाच्या ब्रेनमध्ये आत पडझड होते, किंवा काहीही होऊ शकते पण त्यातून सही सलामत बहीण बाहेर पडली. म्हणून काय नाटकात काम करण्याचा किडा मात्र वळवळतच होता. त्यानंतरही शिकलेल्या नवरा आणि अडाणी गावरान बायको हे तिच्यापेक्षा सीनियर असणाऱ्या मनु सोजे नावाच्या ब्रदर बरोबर एक नाटक मी बसवलं होतं. हे झालं सगळं ट्रेनिंग मधलं नंतर मेंटल हॉस्पिटल ला आल्यावर मला खरोखरी व्यवसायिक नाटकांमध्ये काम मिळालं होतं. गाढवाच्या लग्नामध्ये मला गंगीचा रोल मिळाला होता. त्यांची अशी अट होती की शहरातील प्रयोग, मुंबई पुण्यामध्ये प्रयोग यांची दुसरी एक्ट्रेस करणार, आणि जिकडे दौरा असेल तिकडे मी जायचे. त्यानुसार मी भरपूर प्रॅक्टिस केली त्याबाबतीत मला नवऱ्याचा भरपूर सपोर्ट होता . तो म्हणाला तु जा मी मुलांना बघेन! मुलं तेव्हा लहान लहान होती. मग आमच्या बहिणाबाईंची एन्ट्री झाली. दुसरी ललिता पवार काय रे दीपक! सोन्यासारखा संसार असताना कशाला तिला नाटक दौऱ्यावर पाठवतोस? तुला काय कळतं का नाही? वगैरे वगैरे झालं प्रॅक्टिस करून देखील ऐनवेळी कॅन्सल तरी गाढवाच्या लग्नाचे छोट्या छोट्या संस्थेमध्ये दोन-तीन प्रयोग केले होते. मला लेखन आणि दिग्दर्शन या प्रकारात मेंटल हॉस्पिटलमध्ये भरपूर स्कोप मिळाला, तिथे मी अनेक पथनाट्य लिहिली ,बसवली, आणि सादर केली सुद्धा. त्यात एका पथनाट्यात मी तीन तीन रोल करायची, फिट आलेल्या पेशंटचा, दारुड्या नवऱ्याच्या बायकोचा, आणि अंगात आलेला बाईचा . त्यात दारुड्याची बायको करताना मला त्याला बदकावयचा चान्स मिळायचा. तो आमचा शिपाई होता. कारण दारुड्या नवऱ्याला बायकोने बदकवलं की पब्लिकला मजा यायची ,लोकांची करमणूक व्हायची, आणि तो नंतर म्हणायचा "ओ सिस्टर हळू मारत जा ना ,तुमचे हात लागतात. त्यानंतर माझ्याकडे मनोरुग्णालयाचा रेक्रिएशन हॉल तीन वर्ष होता . तिथे 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, रक्षाबंधन आणि वार्षिक गॅदरिंग यात मला रुग्णांचे कार्यक्रम बसवण्याचा भरपूर चान्स मिळाला. तेव्हा मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा ही लावणी खूप प्रसिद्ध होती . आमच्या एका स्त्री मनोरुग्णाने अगदी हुबेहूब ती लावणी केली होती. की तिला पाहुण्यांनी पुढे बोलावून हातातले फुल दिले होते. तेव्हाच मला सूत्रसंचालन करण्याची देखील संधी मिळाली. एक कार्यक्रम मनोरुग्णांचा एक कार्यक्रम कर्मचाऱ्यांचा अशा दोन्हीमध्येही सूत्रसंचालन करायला मिळायचे. पुढे नीलपुष्पला उपाध्यक्ष म्हणून काम केल्यानंतर तिथेही मला महिन्यातून एकदा भरणाऱ्या काव्य संमेलनाचे सूत्रसंचालन करायला मिळायचे. तरी आमच्यातील एक्टिंगचा चावलेला किडा अजूनही वळवळ करतो. गप्प बसवत नाही म्हणून, तर कधी सरुआजी कर, कधी बेट्टी महमूद वर कीर्तन कर, कधी डान्स मध्ये भाग घे, तर कधी ग्रुपने वैशाख वणवा कर असे सिद्धलेखिकेच्या कार्यक्रमात उद्योग चालू असतातच. म्हणतात ना 😃जित्याची खोड😃