Sakharam Aachrekar

Drama

4.8  

Sakharam Aachrekar

Drama

लॉकडाऊन दिवस 19

लॉकडाऊन दिवस 19

2 mins
423


प्रिय डायरी,


सकाळी सातच्या सुमारास इमारतीखालच्या कुत्र्यांच्या कर्कश भुंकण्याने डोळे उघडले, पाहतो तर सात वाजायलादेखील काही अवकाश बाकी होता. डोळे चोळत, सकाळची नेहमीची कामं उरकली, आणि पोह्याची न्याहारी तयार करत गावी फोन केला. पोहे तयार झाले त्यांच्यासोबत पोटाला काही ऊब देणार तोवर कोणीतरी धडाssम करून दरवाजा वाजवला. बघितलं तर सुधीर होता, त्याने वेबिनार सुरू झाल्याचं सांगितलं, नाईलाजाने पोहे बाजूला ठेवून मीही जॉईन झालो.


या प्रोजेक्टसाठी नेमलेल्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या एका समितीने आमच्या दोघांशी या प्रोजेक्टबद्दल आणि आमच्या सहकर्मचाऱ्यांबद्दल काही विचारणा केली, या प्रश्नसत्रावर बरंच काही अवलंबून होतं, हे जाणून आम्ही त्याला अगदी मुरब्बीपणे तोंड देत होतो. अखेर तीन तासांनी ही प्रश्नमाला संपली, आमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत या वेबिनारची सांगता झाली. पुन्हा पोहे गरम करत ठेवले आणि सुधीरला चहा दिला. पोहे परत गरम केल्याने तडतडून काहीसे कडक झाले होते. बॉसने पुन्हा फोन करून आमच्या यशस्वी कामगिरीची वाहवा केली होती. हे चाकरमानी हृदय अगदी सद्गद झालं होतं. आम्हीही लगेचच आमच्या सर्व सहकर्मचाऱ्यांचे त्यांच्या या कामाबद्दल अभिनंदन केले.


नेहमी कोणत्या ना कोणत्या वाचनात बुडालेले काका आज सकाळीच माझ्या घरी आले, त्यांना उरलेला शोले पाहायचा होता. अजून आजच्या कामाचा काही मेल आला नव्हता, त्यामुळे शोले पाहणे हा आमच्यासाठीही उत्तम पर्याय होता. दोन दिवसांपूर्वी केलेली अगदी तशीच मांडणी करून ऑफिस प्रोजेक्टरवर मध्यंतरानंतरचा शोले लावला. प्रोजेक्शनमुळे सगळी दृश्य अगदी वास्तव वाटत होती. धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांच्या "कोई हसीना जब रुठ जाती है तो" या द्वंद्वगीताला आमच्यासह काकांनीही शीळ घालत प्रतिसाद दिला. दिल्लीत असताना मी एकदा मेट्रो सिनेमामध्ये एक सिनेमा बघितला होता, मला त्या दृश्याची अतीवतेने आठवण झाली.


अखेर दुपारी दोन वाजता चित्रपट संपला. मला शेवट इतका खास रुचला नाही. अमिताभच्या गंभीर पात्राला कदाचित पूर्ण न्याय न मिळाल्याची भावना माझ्या मनात येत राहिली. थोड्या वेळात तळलेल्या कुरडयांसोबत हलक्या फुलक्या गप्पा मारत आम्ही काम केले. आजचं काम म्हणजे फक्त गेल्या संपूर्ण आठवड्याभरात आमच्या संघातल्या प्रत्येक व्यक्तीने बजावलेली भूमिका सविस्तरपणे नोंदवणे आणि एकूण प्रोजेक्टमध्ये त्याने केलेल्या कामाचा कसा फायदा झाला हे सांगणे, सगळं रीपोर्टिंग मेल केल्यावर सुधीरने चहा बनवला. अधूनमधून बाकीच्या सदस्यांचे कित्येक फोन येणे चालू होते. शेवटी हा कामाचा पसारा सात वाजता आवरला आणि मग आम्ही पुढच्या तयारीला लागलो.


आमच्या घराच्या मागे वाशी भागातलं खारफुटीचं जंगल आहे, पण माझी खोली पाचव्या मजल्यावर असल्याने डासांचा तसा त्रास नव्हता, पण आज आम्ही खिडकीतून रातकिड्यांच्या आवाज अगदी स्पष्ट अनुभवत होतो, या खोलीत आल्यापासून बहुधा पहिल्यांदाच! रातकिड्यांच्या त्या संगीतमय मनोरंजनासह आम्ही जेवण बनवले, अस्सल महाराष्ट्रीयन झुणका भाकरी.... नाही नाही, झुणका भाकर... चण्याच्या पीठाचा झणझणीत झुणका, थोडा कांदा आणि भाकर बस्स.... दोघांनी अगदी मिटक्या मारून सगळं फस्त केलं. पोट इतकं भरलं होतं की जेवलेली भांडीदेखील सिंकमध्ये तशीच पाणी ओतून ठेऊन आम्ही अंथरूणं अंथरली. थकवा नव्हता, पण समाधान होतं, त्यानेच बहुतेक झोप लवकर लागली असावी...


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama