लॉकडाऊन दिवस 16
लॉकडाऊन दिवस 16


प्रिय डायरी,
इतर दिवसाच्या नित्यकर्मावर आचमन करून पाणी सोडल्यागत अवस्था झाली होती. आरश्यासमोर उभा राहून विद्रुपपणे वाढलेल्या केसांकडे न्याहळत उभा राहिलो, त्यांना एक हात मारून नीट केलं. दाढीच्या वाढलेल्या केसांना वस्तरा लावत चहा ठेवला. कंपनीमुळे जिभेला लागलेली चहाची चटक बर्याच अंशी कमी झाली होती, दिवसातून दोनदा फारफार तर तीनदा चहा व्हायचा, नाहीतर कंपनीत मी लॅपटॉप समोर कमी अन कॉफीमशीनसमोरच जास्त असायचो.चहा घेऊन मेलबॉक्स तपासला, कोणतेच नवीन मेल नव्हते, कदाचित सर्व्हर नीट काम करत नव्हता. एकंदर आजच्या कामावर पाणी पडले असे मला वाटले, कारण क्रिया करण्यासाठी डेटा उपलब्ध नव्हता. काय कराव या विचारात आळसावून मी पुन्हा अंथरुणावर पडलो.
तेवढ्या वेळात मी भारत श्रीलंका 2011 चा क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना सुरू केला. एक वेगळच जग आहे क्रिकेट, खरंच. सामना जवळपास 3 तासांचा होता भारताची फलंदाजी बघायची बाकी ठेऊन मी माझ्या सह कर्मचाऱ्याला फोन केला, त्याला सर्व्हर च्या बिघाडाबद्दल सांगितले, तसं कंपनीत कोणी नसल्याने आजच काम रद्द झालं. आता विरंगुळा काय.... तर पटकन सुधीर चा चेहरा डोळ्यांसमोर आला, मी निघणार तोवर सुधीरनेच बेल वाजवली. कदाचित त्याच्याही डोळ्यांसमोर माझाच चेहरा आला असावा. सोबत नाश्त्यासाठी फ्रेंच फ्राईज् बनवले, आणि उरलेली भारताची फलंदाजी पाहायला सुरुवात केली. सुधीरला श्रीलंकेच्या फलंदाजीत काही रस नव्हता, नाहीतर मला पुन्हा एकदा श्रीलंकेची फलंदाजी पहावी लागली असती, तसा 2011 चा विश्वचषकाचा अंतिम सामना आम्ही स्टेडियम मधून पहिला होता पण वेड म्हणतात ना ते ह्यालाच.... भारतीय संघा
ला पुन्हा एकदा विश्वचषक उंचावताना पाहण्याची मौज काही वेगळीच.
थोड्या वेळात बॉसने मेसेज केला, की आजच्या कामासाठी नवा सर्व्हर तात्पुरत्या वेळेसाठी सुरू केला आहे, तरी सर्वांनी आपलं आजचं टार्गेट पूर्ण करा. आम्ही पटापट मेल हाताळले, आणि चार वाजेपर्यंत काम पूर्ण केले. लॉकडाऊन मुळे कधी कधी सकाळी अंघोळ व्हायची नाही, उशीरा उठल्यावर मी रात्री झोपताना अंघोळ करायचो, आजही तसच झालं होतं, म्हणजे उठायला उशीर झाला नव्हता, पण अंतिम सामन्याच्या नादात सूर्य डोक्यावर आला होता. आणि उन्हाळ्यात अस भर दुपारी कोणी अंघोळ करतं का? म्हणून आंघोळीची मोहीम रात्रीसाठी ठेवली, रात्री अंघोळ केली की झोप चांगली लागते. संध्याकाळी मी आणि सुधीरने काकांसोबत चहा घेतला, त्यांच्याकडे अमिताभचा काला पत्थर सुरू होता, आम्हीही काहीवेळ पहिला. चहा नंतर काही वेळ आम्ही एकत्र इमारतीच्या गच्चीवर उभे होतो. पण आज सुधीर सावध होता, मला दोघांचा एकही फोटो काढायला मिळाला नाही. पण अस एकत्र मलाही छान वाटायचं.
आमच्या इमारतीतल्या सर्व रहिवाश्यांचे तपासणीचे रीपोर्ट आले होते, आणि सगळे अपेक्षेप्रमाणे नॉर्मल होते. फार हायसे वाटले. कितीही वाटंल तरी हा जल्लोष आम्ही साजरा करू शकणार नव्हतो. सुधीरला रात्रीच्या जेवणाची कल्पना देऊन मी घरी आलो. रात्रीसाठी साधी बटाट्याची भाजी करायची असे ठरले होते. काही अवकाश होता, म्हणून थोडं मन वाळिंबेंच्या हिटलर सह घालवला, नंतर सुधीरच्या घरी जाऊन जेवण बनवले, जेवण वेळेत आटोपलं. मग आमची वेळ, एकत्र. टार्गेट पूर्ण करायला दोन दिवस आमच्या हातात होते, त्या संदर्भात आम्ही बराच वेळ बोलत होतो. काचेत गोठलेल्या मदिरेप्रमाणे रात्र थिजून जात होती....