लॉकडाऊन दिवस 14
लॉकडाऊन दिवस 14


प्रिय डायरी,
सकाळी काहीसं आभाळ भरून आलं होतं, काहीश्या अनपेक्षित भीतीचं सावट. आजच्या वार्तांकनाच्या मुखपृष्ठावर कालच्या दिवसांत मुंबईत 100 कोरोना रुग्ण सापडल्याची बातमी झळकत होती. नैराश्याचे शुष्क उसासे टाकत चहा घेतला. एकीकडे पाहता लॉकडाऊनचे फक्त 7 दिवस बाकी होते. पण लॉकडाऊन च्या काळातही रुग्णसंख्या वाढतच होती, निसर्गाचा कोप झाला नव्हता ही माणसाच्याच कर्माची मुक्ताफळं जी पक्व होऊन आज मानवाच्या डोक्यावर अक्षरशः आदळत होती.
तसे पाहता मी घरातून बाहेर न पडणेच पसंत करायचो, आजही सकाळपासून माझ्या गादीसोबत गप्पा मारताना, लॅपटॉपसह कुजबुज सुरू होती. काल रात्रीपर्यंत आलेल्या मेल्सना आज उत्तरे पाठवत होतो, एकीकडे मला उद्योजक क्षेत्रात काही करायचे होते, पण या महामारीच्या सावटाखाली हातावर हात घेऊन बसण्याखेरीज कोणताच उपाय उरला नव्हता, बँकेच्या हप्त्यासाठी आज पैसे पाठवायचे होते. तिकडे अमेरिकेतील काही कंपन्या चीनवर दावा ठोकण्याचा तयारीत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. मलाही मनातून वाटते एखादा दावा ठोकून द्यावा चीनवर लाख दोन लाखांचा आपलीही तितकीच वसुली.
तसे पाहता एरवी बेशिस्तपणे वागणाऱ्या भारतीयांनी कोरोनाचा यशस्वी मुकाबला केला होता, तिकडे शिस्तीचे भोक्ते समजल्या जाणार्या अमेरिका, इटली, स्पेनसारख्या देशात कोरोनाने हाहाकार माजवला होता, तरी भारतात अजूनही त्याला 5000 रुग्ण गाठता आले नव्हते. ही चार अंकी आकडेवारी काही समाजकंटकांनी आपल्याला दिलेला घरचा आहेरच होता. मेल्स संपवता संपवता झोप लागली, उठलो तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते, मनात विचार आला, आता जेवण काय बनवणार, कप्पाळ!!! सुधीरला फोन करून जेवायला येतोय म्हणून सांगितले, रात्रीच्या जेवणाची सोय झाली, उरलेल्या रात्रीचा एकेक क्षण आमच्यात रमलेल्या गप्पांमध्ये हरवून गेला........