कोकणातील भ्रमंती
कोकणातील भ्रमंती


कोकणातली पर्यटन स्थळं, पंचक्रोशीतील देवालयं, रहाणीमान बाजार, वेषभूषा आणि बाकीच्या गंमती जमती माझ्या कॅमेरात कैद करण्यासाठी, दुसर्या दिवशीच्या पहाटेच बाहेर पडलो. सोबत दोन पाण्याच्या बाटल्या, एक चहाचा थर्मास, छत्री, माझा लॅपटॉप आणि अतिरिक्त लेन्स आणि मेमोरी चिप्स एवढं सामान. सहाच्या एसटीने वेंगुर्ला बंदर गाठले, कोकणवासी असून मी अजून सिंधुदुर्ग किल्ला पहिला नव्हता, आणि पावसाळा असल्याने किल्ल्याकडे जाणार्या बोटी बंद होत्या, बंदरापासून वाट तुडवत मी तेरेखोल च्या दिशेने चालायला सुरुवात केली. तेरेखोल लहानसे गाव, प्रवास तसा दीड तासांचा, कारण मला चालत जायचे होते. गळ्यात कॅमेरा लटकावून एखाद्या विदेशी पर्यटकाप्रमाणे प्रत्येक गोष्ट न्याहळत मी निघालो.
पावसाची रिमझिम सुरू झाली होती. पावसाच्या पाण्यामुळे तयार झालेल्या एका तात्पुरत्या ओढ्यात मला जीवनाची वाट काढणार्या एका सापाचे दर्शन झाले. पावसाच्या सरींच्या ओघामुळे मला त्याचा फोटो क्लिक करता आला नाही. पुढे एक चहाची टपरी पाहताच मी थांबलो. त्याकडून एक सिगार घेऊन माझ्या थर्मास मधल्या चहाचे दोन झुरके घेतले.
पुढच्या प्रवासात पावसाचा जोर काहीसा कमी होता. एक विलक्षण सत्य मला या प्रवासात उमगत होते, इथे पावलापावलावर मंदिरे होती, आणि आजच्या एकविसाव्या शतकातही इथले गावकरी उत्कट श्रद्धेने पूजापाठ करतात, हेच इथल्या स
मृद्धीचे कारण असावे असे क्षणभर मला वाटून गेले. तेरेखोलला पोहोचलो, पहिला किल्ला पहिला, पठारी किल्ल्यांच्या आणि डोंगराळ किल्ल्यांच्या विश्लेषणासाठी आलेली बरीचशी मंडळी माझ्या अगोदर तिथे हजर होती. मला त्यांच्याकडून तिथल्या वाटा, पळवाटांची जुजबी माहिती मिळाली. पाऊस पुन्हा सुरू व्हायच्या आधी मी भराभर किल्ला उतरलो. खाली उतरताना काही मुंगूसाच्या पिलांचे फोटो काढायला मिळाले.
ट्रेकचा आनंद लुटत लुटत, पायाला गुदगुल्या करणार्या पाण्यावर स्वार होऊन मी दुपारी एसटी ने राजापूरला आलो. तिथलं विशेष आकर्षण म्हणजे राजापूरची गंगा.... तिथल्या ठिकाणाचा आढावा घेऊन, काही वेळ तिथे रमलो, काही अंतरावर प्रसिद्ध देवस्थान श्री क्षेत्र गणपतीपुळे माझी वाट पाहत होते. राजापूरच्या हवामानात मला सिंधुदुर्गातल्या हवामानाईतकी आर्द्रता जाणवली नाही, पण मुंबईपेक्षा ती कैक पटींनी जास्त होती. मनाला ओढणाऱ्या देखाव्यांकडे मी ओढला जात होतो. संध्याकाळी सात वाजता माझी संगमेश्वर वरुन ट्रेन होती. तोवर मला माझा कार्यभाग उरकायचा होता. सकाळपासूनच्या उद्योगात माझ्या कॅमेराच्या हाती बराच ऐवज लागला होता. फिरत फिरत मी गणपतीपुळे येथे आलो. वेळ कमी उरला होता त्यामुळे केवळ देवदर्शन करून रिक्षा पकडली. सात वाजत आले होते. पावसामुळे मला माझ्या गाडीच्या अगोदरची गाडी मिळाली. तिच्यातून मग पुन्हा मी काँक्रीटच्या जंगलात परतलो.