कोकणातील भ्रमंती भाग - 1
कोकणातील भ्रमंती भाग - 1


निसर्गाने जन्मतः स्वर्ग निर्माण केलेल्या भूमींपैकी एक म्हणजे कोकण, अगदी काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत सगळी सुखं इथे ओसंडून वाहतात. फक्त काश्मीरसारखा बर्फ तेवढा पडत नाही. कोकणातील आकर्षक गोष्ट म्हणजे इथे आपापसातील व्यक्तिगत तेढी जाणवत असल्या तरीही सामाजिक बांधिलकीची धुरा वाहण्यात कोकण संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल आहे. उगीच नाही तर महाराष्ट्रातल्या सात भारतरत्नांपैकी चार कोकणातले आहेत. तश्या बर्याचश्या बाजूंत कोकण उजवं आहे, दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात गावी गेलो होतो, एसटीने, त्याच प्रवासाला हा आढावा.
मी वेंगुर्ल्याचा, तस पाहता गावी जायला रेल्वेचा पर्याय उत्तम, यावेळी एकटाच जात होतो, आणि पावसाळी हंगाम म्हणून एसटी चा पर्याय निवडला. सकाळी 4 ची एसटी होती, कुर्ला आगार ते शिरोडा. अगोदर सीट नोंदवल्याने मला जास्त त्रास होणार नव्हता. फोटोग्राफीच्या मोहापायी पाय कोकणाकडे वळले होते, प्रवास सुरू झाला, सकाळच्या रिमझिम पावसात.... माझी सीट चालकाला समांतर असल्याने मला समोरचं दृश्य अगदी स्पष्ट दिसत होत, वाहतुकीची वर्दळ जास्त नसल्याने चालक अगदी भरधाव वेगाने वाहन दौडवत होता. एक दोन विनंती थांब्यांवर स्थानिक प्रवासी घेतल्यावर, पहिला मुख्य थांबा मिळाला तो पनवेल आगारात. 10 मिनिटाच्या त्या थांब्यावर पावसाच्या सरीआड मी एक कप चहा घेतला, इथे आगारात तसं पैशाला मोल होईल अस काही मिळत नाहीच म्हणा, आणि हा चहा देखील त्याला अपवाद नव्हता. मी पाच सात मिनिटांत गाडीत जाऊन बसलो, चालक अजूनही आगारातच होते, गाडी अर्धीअधिक रिकामीच होती. पावसाचा जोर वाढल्याने समोरच्या काचेवर असंख्य जलबिंदू जमा होऊन समोरचं दृश्य अंधूक झाल होतं. चालक गाडीत दाखल झाले, वाहकाने एकदा प्रवाश्यांवर एक नजर टाकून घंटी वाजवून चालकाला गाडी सुरू करण्याचा इशारा दिला. पनवेल पासून पुढे तसा परिसर एकदम निसर्गरम्य, माणसांची दाटीवाटी तशी कमीच.
चिंचोळ्या घाटाघाटातूंन वाट काढताना काही फोटो क्लिक करत होतो, तसा पावसाचा व्यत्यय होताच. चिपळूण यायला काही अवकाश बाकी राहिला आणि गाडी अचानक बंद पडली. पाऊस सुरू असल्याने गाडीतून कोणी बाहेर पडले नाही, चालकाने दोन तीन वेळा गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला पण निष्फळ, चिपळूण आगार अद्याप 12 किमी दूर होते, आगारात फोन केला. त्यांचे दुरुस्ती पथक येईपर्यंत वाट पाहणे अपरिहार्य होते. चालकाला सांगून छत्री आणि कॅमेरा घेऊन मी खाली उतरलो. समोरच्या घाटमाथ्यावरून पाणी ओघळत खाली येताना दिसत होते, दुरुस्ती पथक यायला अर्धा तास लागणार हे निश्चित होते, म्हणून मी त्या दिशेला वळलो, धुकं इतकं होतं की तिथे पोहोचल्यावर मला एसटी दिसेनाशी झाली, चालकाला फोन करून खबरबात विचारली आणि गाडी दुरुस्त झाली की फोन करण्याची विनंती केली, चालक माझ्याच गावातला असल्याने त्याने होकार दिला.
बर्याच सुंदर क्लिक्स सोबत घेऊन मी अर्ध्या तासाने एसटी कडे आलो दुरुस्ती पथकाने एसटी दुरुस्त केली होती, सुट्टीच्या या हंगामी काळात जादा एसटी उपलब्ध नसल्याने आम्हाला पुढचा प्रवास त्याच एसटी मधून करायला लागणार होता. गाडीसोबत पावसाने देखील वेग घेतला, चिपळूण आगार म्हणजे मोठा थांबा, आताच गाडी जवळपास पाउण तास उभी होती, आणि पुन्हा अर्धा तास थांबणार, बरं पाऊस नसता तर काही फोटो काढले असते, पावसात कॅमेरा घेऊन खाली उतरायचं एका हाताने छत्री धरायची, कॅमेरा दुसर्या हातात, तेवढ्यात चालकाने गाडी 20 मिनिटं थांबणार असल्याचं सांगितलं. पावसामुळे थंड झालेल्या पोटोबाला ऊब द्यावी म्हणून खाली उतरलो. पण यावेळी आगाराबाहेर काही मिळत का ते पाहू लागलो. एका स्टॉलवर लोकांची झुंबड पाहायला मिळाली, त्या स्टॉलवरुन मीही एक वडापाव विकत घेऊन खाल्ला, मन तृप्त झालं पण पोटाची भूक अजून सलत होती. एक वडा आणि भजी पाव असे जिन्नस घेऊन मी एसटी गाठली.
ठरल्या वेळेत गाडीने पुढचा प्रवास सुरू केला, चालकासह गप्पा मारत मी भज्यांचा फडशा पाडला. चिपळूण च्या पुढच्या भागात पावसाचा जोर अधिक होता, गाडीला उशीर झाला असल्याने चालक वेगाची परिसीमा गाठून गाडी हाकत होता. पुढे बराच वेळ उंचावरून पडणार्या हंगामी धबधब्यांनी माझे मनोरंजन केले. मोबाईल मध्ये पहिले तर 11:30 झाले होते, पण मी मोबाईलमध्ये रमण्याच्या बेतात नव्हतो. आकाशात बर्यापैकी ढग दाटून आले होते, थांबलेला हा पाऊस काही वेळानंतर जोरदार पुनरागमन करणार हे नक्की होत. प्रवासात थोडासा डोळा लागला, बाहेरचं वातावरण गालाला गुदगुल्या करत कानात अंगाई गीत गात होतं, पावसाच्या झडीने बाहेरचं पाणी तोंडावर उडाल्याने जाग आली, दहा पंधरा मिनिटांत गाडी संगमेश्वर आगारात दाखल झाली. आता चालक बदलला जाणार होता. चालकाने बर्याच आपुलकीने मला अलविदा करत, माझा फोन नंबरही घेतला, अशी ही अनोळखी पण हवीहवीशी आपुलकीही फक्त कोंकणातच सापडते.
जवळपास 12:30 झाले होते. गाडीने पुन्हा एकदा वेग घेतला, मी सुद्धा माझ्या कॅमेराची लेन्स बदलून आसपासच्या विहंगम दृश्याचे चित्रीकरण सुरू केले. सोबत लॅपटॉप, दोन टीबीची हार्ड डिस्क आणि तीन राखीव मेमरी होत्या, त्यामुळे वेगवेगळे कट घेऊन मी चित्रीकरणात व्यस्त होतो, नवीन चालक अधूनमधून माझ्याकडे पहात होते, मृगाच्या त्या आडदांड पावसाच्या सरी सावकाश झेलणाऱ्या या निसर्गाचे चित्रीकरण म्हणजे वेगळी मौज होती. दुपारच्या तीन वाजेपर्यंत सूर्यदर्शन झाले नव्हते. विविध घाटांना सर्पाकार वेटोळे घालत 03:30 ला गाडी राजापूर आगारात पोहोचली. पावसामुळे रस्त्यावरल्या फेरीवाल्यांची पांगापांग झाली होती. मलाही काहीतरी खाण्याची इच्छा खूप उफाळून येत होती. इथेही मला चाखायला वडापावच मिळाला. अजून तीन साडे तीन तासांचा प्रवास उरला होता. गाडी मजल दरमजल करत पुढे जात होती, संध्याकाळच्या वाढत्या अंधारात कोंकणातल्या निबिड वनातल्या नीरवतेमध्ये भर पडत होती.
अंधारामुळे फोटो क्लिअर येत नव्हते, काही वेळ त्या संध्याकाळच्या मृगाच्या पावसात कडाडणाऱ्या वीजांना पाहत काही वेळ गेला, संध्याकाळी 6 वाजता मी शिरोडा एसटी बस स्थानकात उतरलो. पावसाचा जोर काहीसा ओसरला होता, त्यातून मला जवळपास 15 मिनिटे वाट चालायची होती. आमच्या गावी तशी रस्त्यावरील दिव्यांची सोय कमीच. एका हातात मोबाईलचा उजेड, आणि डाव्या हातात छत्री पाठीवर ट्रेकिंग बॅग घेऊन भिजलेल्या पानांवरून करकर आवाज करत मी वाट तुडवत होतो. उन्हाळ्यातील मीठागरांत पाणी भरून गेले होते, स्थानिकांनी त्यात मत्स्यपालन केले होते, या सगळ्या ठिकाणी मला दिवसा येऊन क्लिक्स घ्यायचे होते. पाहिल्या पावसाने सुगंधित झालेल्या मातीवरुन घराची वाट सापडली. आता पुढचा महिनाभर याच मातीत रमायचं होत. घरी आल्यावर आंघोळ आटोपली, तोपर्यंत आत्येने जेवण वाढले होते, प्रवासाच्या थकव्याने झोप केव्हा लागली हे समजलंच नाही.