Sakharam Aachrekar

Others

4.9  

Sakharam Aachrekar

Others

लॉकडाऊन दिवस 15

लॉकडाऊन दिवस 15

2 mins
495


प्रिय डायरी,


आने वाला पल जाने वाला है, गुलजार साहेबांच्या उक्तीवर आज सगळ्यांच मार्गक्रमण सुरू होतं. मी सकाळीच खाली गेलो, दूध आणायला. बाजारात दुधाची पावडर आली होती तीच घेऊन आलो, चहा तापत ठेवला, आज पावडरच्या दुधाचा चहा प्यायचा... आधी गावी शाळेत असताना पोषक आहार म्हणून आम्हाला असं पावडरचं दूध मिळायचं. आणि गाव सोडून मुंबईत आल्यावर आज पहिल्यांदाच पावडरचा चहा पीत होतो. जरा विचित्र लागला, कदाचित चहाला आवश्यक तेवढी पावडर पडली नव्हती, त्यामुळे चहाला थोडासा कडवटपणा होता.


चहा होताच माझं स्टडी टेबल साफ केलं, जे कालच्या दिवसाच्या नाश्ताच्या भांड्याचं अनावश्‍यक ओझं वाहत होतं. त्यानंतर गावच्या मंडळींशी काहीवेळ हितगुज झाली. नकोश्या वाटणार्‍या कामाला रोजच्या प्रमाणे सुरुवात केली. पाण्याच्या खट्याळ सरोवरात उनाड भटकणार्‍या स्वैर मुलाने राजरोसपणे दगड मारून जसे तरंग उठतात तसेच माझ्या व्हॉटस्अँपमध्ये मेसेज तरंगत होते. माझे मित्र त्या मेसेजेसनी मला गुदगुल्या करून वेगळ्या विश्वात नेण्यास सज्ज होते. बराच वेळ मी कोणत्याही मेसेज ला काहीच प्रतिसाद दिला नाही. शेवटी एका मित्राने फोन करून मला सांगितले, आज आपल्या मधुरा टिचरांचा वाढदिवस आहे, आणि तो आपल्याला 10 मिनिटानंतर ऑनलाईन साजरा करायचा आहे, अस म्हणत त्याने मला वेबिनारची लिंक पाठवली, तश्या मधुरा टीचर आमच्या सातवी पासून वर्गशिक्षिका... शाळेनंतर त्यांचा वाढदिवस आम्ही पहिल्यांदाच साजरा करणार होतो, ते ही लॉकडाऊन मुळे.


टीचरच्या घराजवळ हर्षदाचं घर होतं, तिने टीचरांकडे केक बनवून नेला, ज्यावर लिहिलं होतं, "थँक्स लॉकडाऊन " कधीकाळचे हे तुटलेले दुवे आज पुन्हा अंधारातले लखलखते दिवे होऊन उजळू लागले होते. अचानकपणे समाजाबद्दल एक ओढ निर्माण झाली होती. प्रत्येक व्यक्तीचं स्थान या लॉकडाऊनने अगदी नकळत आम्हाला शिकवले होते, वेबिनारला अर्थातच मी आणि सुधीर आम्ही एकत्रच हजेरी लावली. बर्‍याच गप्पा रंगल्या, शरीराने जवळ नसलो तरी हृदयांनी कव घेतली होती. तब्बल तीन तास.... तीन तास चालला आमच्या गप्पांचा ओघ, नंतर हळूहळू ओसरला. भिंतीवर घड्याळ सव्वा चार ची वेळ दाखवत होतं.


सर्वांचा निरोप घेऊन आम्ही काही वेळ आमच्या शाळेचे जुने फोटोस पाहत बसलो, आमचं लहान वय त्यानिमित्ताने आमच्या पुन्हा भेटीला आलं होतं.


पुन्हा एकदा तो पावडर चा चहा तापत ठेऊन मी आणि सुधीर थोड्या गप्पांत हरवलो. आमच्या गप्पांच्या फुंकरीने चहा केव्हा थंड झाला कळायलाच नाही, शेवटी तसाच कोमट चहा प्याला, आजचं कामाचं टार्गेट पूर्ण व्हायच होतं, नव्या तक्रारींना उत्तर देऊन शेवटी 6 वाजता लॅपटॉप बंद केला. आज रात्री आम्ही दोघांनी शेंग आणि बटाट्याचं कालवण केलं, जे आमची रात्रीची भूक भागवण्यासाठी पुरेसं होतं. घरातल्या झीरोच्या बल्बच्या मिणमिणत्या प्रकाशात मी आणि सुधीर जुन्या वाटा पाहत होतो, आज सकाळच्या वेबिनारमुळे बर्‍याच जुन्या आठवणी उजळून आल्या होत्या, थांबलेल्या या जगात माणसाने बनवलेल्या वस्तू पैकी घड्याळ एकच होत जे लॉकडाऊन मध्येही अविरत सुरू होतं, डोळ्यांच्या पापण्यांवर गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव जाणवू लागला होता, झोपायची वेळ झाली होती..... काहीसं मिश्किल हसून भविष्याची स्वप्ने बघण्याची वेळ आली होती..... लवकरच माझ्या रोजनिशीच्या पानांत आणखी एक स्वप्नवत दिवस कैद होणार होता...................


Rate this content
Log in