Sakharam Aachrekar

Others

4.9  

Sakharam Aachrekar

Others

लॉकडाऊन दिवस 18

लॉकडाऊन दिवस 18

2 mins
385


प्रिय डायरी,


आज रविवार असल्याने काही काम नव्हतं, आणि अगदी पहिल्यापासून जेव्हा काम नसेल तेव्हा मला लवकर जाग येते स्वतःवर काहीसा चरफडत मी उठलो. दिवसाच्या सुरुवातीला चहा उकळत ठेवला, आंघोळ आणि गावच्या फोनची औपचारिकता आटोपून मी चहा घेत लॅपटॉपसह बिछान्यावर पहुडलो.


गूगलवर एका जुन्या घटनेची सूचना झळकत होती, आजच्या दिवशी चार वर्षांपूर्वी आमचं दहावीचे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले होते. त्या फोटोसनी बर्‍याच जुन्या आठवणींना उजाळा दिला. मी केलेल्या एकेक खोड्या पुन्हा पुनरुज्जीवित होऊन मला खडसावू पाहत होत्या. हलकाच हसून मी आरश्यासमोर आलो. आपल्याच फोटोतल्या भूतकाळाला आजच्या वास्तव रूपाशी काही वेळ तोलत उभा राहिलो. समोर अख्खा दिवस होता, पण करायला काहीच नव्हते, एरवी रविवार असला की दुपारी 12 - 1 वाजेपर्यंत माझ्या डोळ्याची कडाही हलायची नाही अन आता झोप येत नव्हती. मग माझ्या कवितांची वही घेऊन, स्वतःच स्वतःच्या कवितांचे कौतुक करत काही वेळ दवडण्याचा निष्फळ प्रयत्न केला. कधीतरी जिच्यावर त्या कविता लिहिल्या होत्या, तिला त्या कधीच समजल्या नाहीत त्याचं शल्य मनात ठेऊन मी जास्त माझ्या कवितांना वाचायचो नाही. पण या कवितांच्या पानांतून माझ्या भूतकाळाशी संबंधित एकूण एक जण अगदी व्यक्तिशः जिवंत झाला होता.


काहीश्या पाणावलेल्या डोळ्यांतून मी छताकडे फिरणार्‍या पंख्याकडे पाहत राहिलो. काहीस स्वतःला सावरत पुन्हा चहा ठेवला, कॉम्प्युटरवर दिलीप कुमारची उदास्याने भरलेली गाणी लावली. तेवढ्यात सुधीरही आलाच. अगोदर दोघांनी एकत्र चहा घेतला मग सुधीरही काही वेळ माझी कवितांची वही चाळत बसला,"कधीतरी माझ्या कविता वाचण्याचा पहिला मान तुझा असायचा" मी सुधीर ला म्हणालो, हो.... असेही काही दिवस होते...... सुधीरने अस म्हणताक्षणी दोघेही हसू लागलो. आमच्यासह चालणार्‍या वेळेने आम्हाला अगदी अलगद उचलून या अनोळखी वाटांवर एकटे सोडले होते. तर या लॉकडाऊनच्या निमित्ताने हा देह मागे वळून त्या जुन्या वाटा हुडकू पाहत होता.


घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे आम्हा दोघांनाही ऐन तारुण्यात सुटाबुटांचा वेश घ्यावा लागला होता, पण आता या वेषभूषेमागे दडलेली दोन निरागस माणसे एकमेकांशी संवाद साधत होती. संध्याकाळ होईपर्यंत दोघानाही भूक लागली नाही, कामाला काम कराव म्हणून दोघांनी आमच्या लहानपणाचे, शाळेतले जेवढे काही फोटोस मिळाले त्यांचा एक गूगल फोल्डर बनवून ठेवला.


पुन्हा संध्याकाळी चहा घेत सरत्या वेळेत आमच्या काही ओझरत्या गप्पा झाल्या, सुधीर कालच बाजारात गेल्याने बरीचशी लॉकडाऊन खरेदी करून आला होता, आज रात्री आम्ही वांग- बटाट्याचा बेत पक्का केला, जेवण झाल्यावर सुधीरने काईट्स मधलं "जिंदगी दो पल की" गाणं गिटारवर वाजवलं, आज लवकरच झोपायचं होतं. आमच्या कालच्या कामगिरीचं गुणपत्रक उद्याच्या वेबिनारवर समजणार होतं, त्यामुळे मी ही लवकरच घरी आलो. असा होता आजचा दिवस तस पाहता आम्ही लॉकडाऊनच्या प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या कारणाने हरवून जात होतो, पण आजचा दिवस मात्र आमच्यातल्या आमच्यातच हरवून गेला. इतका आपलेपणात गेलेला मुंबईतला बहुधा हा पहिलाच रविवार........


Rate this content
Log in