लॉकडाऊन दिवस 20
लॉकडाऊन दिवस 20


प्रिय डायरी,
सकाळीच हातात चहाचा कप घेऊन गॅलरीतून खाली संवेदनाशून्य झालेल्या रस्त्याकडे पाहत होतो, एखादा खाकी वर्दीतला अधिकारी क्वचित फिरताना दिसत होता, चहा पिऊन आकाशाकडे दोन्ही हात उंचावून आळस दिला आणि घरात आलो.
कामाची नवीन यादी आली होती, तिचा आजपासून शुभमुहूर्त होता, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज भारताचे पंतप्रधान सन्माननीय श्री नरेंद्र मोदी सकाळी 10 वाजता देशाला संबोधित करणार होते, दोन दिवसांअगोदरच लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत वाढवला होता, आणि आज मोदी संबोधित करणार...... आपल्या भाषणानंतर त्यांनी लॉकडाऊन 3 मे पर्यंत असल्याचे जाहीर केले. कंटाळून मी बातम्या बंद केल्या, आज भारताच्या एका रत्नाची जयंती, डॉ बाबासाहेब आंबेडकर, पण कोरोनामुळे गेल्यावर्षीप्रमाणे झगमगाट नव्हता. सर्वांनी आपल्याला घरीच या महामानवाला मानवंदना देत कायदा व सुव्यवस्थेपुढे आदर्श निर्माण केला.
वेळ ही आज हूल देत होती, घड्याळाचे काटे जणू घोड्यावर स्वार होऊन दौडत होते. 11 वाजत आले होते, पण अजूनही माझ्या कामाला सुरुवात झाली नव्हती. पुन्हा एकदा चहा घेत मी कामात गुंतलो, आज नव्या स्लॉट चा पाहिलाच दिवस होता, त्यामुळे दोन वाजेपर्यंत काम आटोपले, रेशनच्या सोबत सुट्टे पैसे नाहीत म्हणून गळ्यात पडलेल्या बिस्किटची चव चाखत पडलो, कधी नव्हे ती आज दुपारी झोप लागली.
वातावरणातल्या उष्णतेमुळे कमालीची अस्वस्थता जाणवत होती. झोपही जास्त वेळ लागली नाही, चार सव्वा चारला उठून चहा ठेवत सुधीरला बोलावलं. दोघांनी एकत्र चहा घेतला. आज संध्याकाळी आमची पत्त्यांची मैफिल सजणार ह
ोती, कारण मंगळवार असल्याने काका घरीच होते. काही वेळाने सुधीर निघून गेला, आणि मी काही वेळ पुस्तकांच्या पानांत माझ मन रमवलं. हातात मुंबईतला कधीकाळचा डॉन दाऊद इब्राहिम कासकरवरचं एस. हुसैन झैदी यांच पुस्तक वाचत होतो. अगदी अप्रतिम शब्दरचना, वाक्यांची सांगड आणि आढावा घेतलेल्या माहितीचंही कौशल्यपूर्ण लिखाण, मी वाचतच राहिलो. 70 च्या दशकातल्या बर्याच चित्रपटांचे चित्रीकरण त्यातून परावर्तित होताना मला जाणवले. काही प्रसंगातील क्रुरता भयानक होती, आणि ती अश्या प्रकारे मांडली होती की वाचतानाही डोळ्यासमोर ते दृष्य उभे राहून अंगावर रोमांच येत होते.
सात वाजता डोंगराच्या माफियांच्या जगातून मी माझ्या घरी परतलो, पुस्तक बंद केल्यावर डोक्याला जणू मुंग्यां आल्यासारखं वाटत राहीलं. दहा मिनिटं मी बसल्या जागी खिळून होतो. कानावर काही आघात झाल्यासारखा किणण... असा आवाज होत होता, कंबर उजवीकडे डावीकडे फिरवत कडकड आवाज करत मोकळी करून सुधीरचं घर गाठलं. जेवण बनवता बनवता त्याला वाचलेले दोन एक किस्से ऐकवले. जेवण उरकल्यावर नेहमीप्रमाणे भांडी सिंकमध्ये ठेवत काकांना आवाज दिला, बारा वाजेपर्यंत आमची पत्त्यांची मैफिल सुरू होती, "तुम्हाला जुगाराचा शाप सांगतो" अस म्हणत काकांनी काहीस घड्याळाकडे पाहत म्हटलं. घड्याळाच्या काट्यांनी दाखवलेल्या दिशा पाहून "उद्या सांगतो" इतकं म्हणत काकांनी डाव आटोपता घेतला. बराच वेळ झाला होता, काकांना सकाळी आठ वाजता निघायला लागतं ते ही पारंपरिक सायकल वरून, त्यामुळे पुरेशी झोप पाहिजेच, आमचं काय आम्ही 3 मे पर्यंत घराच्या कुलूपासारखेच.... डाव आटोपला अन दिवसही आटोपला........