कविताबाई, लेखकराव, वाचकभाई
कविताबाई, लेखकराव, वाचकभाई


आटपाट नगरात एक जोडपं राहत होत. नाव त्यांचं सौ. कविताबाई आणि श्री. लेखकराव. सौ. कविताबाई साक्षात रणचंडी तर श्री. लेखकराव भलतेच घमेंडी . दिवसामागून दिवस जात होते. रोजच वादविवाद व्हायचे, खटके उडायचे. कविताबाई,अहो मी आहे म्हणून तुमचा संसार आहे नाही तर तुम्हाला कोण विचारत होत. एखादी असती तर गेली असती पळून मी म्हणून टिकली. लेखकराव, तर तर इंदिरा गांधी गेल्या म्हणून देश बुडाला नाही काही. म्हणे मी म्हणून निभावलं . कट -कट नुसती. द्या कि मग घटस्फोट अन आणा एखादी भटकभवानी मग कळेल तुम्हाला. असे वाद विकोपाला गेले.
दोघांनी मग घटस्फोट घेण्याचं ठरवले ही बातमी गावचे सरपंच वाचकभाईला समजली. त्यांना फार वाईट वाटले. त्यांनी तातडीनं पंचायतीची बैठक बोलावली . अन सौ. कविताबाई व श्री. लेखकराव याना बोलावून घेतलं. दोघांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेत वाचकभाई म्हणाले , हे पहा लेखकराव तुम्ही आमच्या गावाचे एक आदर्श जोडपं आहे. आम्ही समद्या गावासनी तुमच्या सुखी संसाराचं उदाहरण देतो आणि तुम्हाला म्हातारपणी हे काय खूळ सुचलं? आणि काय वो कविताबाई तुम्ही सुद्धा असं वागायला लागल्या तर आम्ही कुणाच्या तोंडाकडं पहायचं. आमच्या गावाला समाजाला तुमची गरज आहे. अन कुठल्या घरात वाद नाही होत हो? अहो संसार म्हटलं कि भांड्याला भांड लागायचंच. म्हून कुणी फारकत घेत होय. काय तुम्ही? तसे दोघेही वरमले, लेखकराव म्हणाले , वाचक भाई तुम्ही आमचे डोळे उघडले आता पुन्हा आम्ही अशी चूक कधीच करणार नाही. सौ. कविताबाई ,व्हय व्हय वाचकभाई अशी चूक पुन्हयांदी कधीच होणार नाही आमच्याकडून. तसा सगळं गाव वाचक भाईंचा विजय असो! वाचकभाईंचा विजय असो! गर्जना करू लागले. एवढयात फोन च्या बेलने मला जाग आली .माझं स्वप्न भंगले .