Pandit Warade

Drama Tragedy

2  

Pandit Warade

Drama Tragedy

कुणाचं काय चुकलं?

कुणाचं काय चुकलं?

8 mins
103


   "डॉक्टर, आता लोक तुमचं लय आयकलं. आता आमचं बी थोडंसं आयकावं. दोनाचे चार होऊन जाऊं द्या आता." संपतराव स्वप्नीलला, आपल्या डॉक्टर मुलाला म्हणत होते. 


  "व्हय बाळा, आता किती दिस चुलीपाशी खुपायला लावतो या म्हतारीला? लवकर मह्या हाताखाली सून आण बाबा एखादी." सुशिला बाईनी आपल्या पतीच्या म्हणण्याला दुजोरा देत मुलाकडे साकडे घातले.


  "आई, तुला मी किती दिवसाचा सांगतोय, एखादी बाई लावून घे घरकामाला. पण तू ऐकायलाच तयार नाहीस." स्वप्नील म्हणाला.


  "आरं बाळा, आता या वयात कुठं दुसऱ्या बाईच्या हातचं खायला लावतु? रोजमजुरी घेणारी बाय काय काळजी घ्येणार मह्यावाली? आपलं माणूस, आपलं माणूसच ऱ्हातंय. सारं कसं त्याला हाक्कानं सांगता येतं." सुशीलाबाईचं म्हणणं होतं.


  "आई, अगं तुझी सून काय घरकाम करणारी असेल का आता? ती एक डॉक्टरच असेल ना? तिला काय दवाखाना सोडून भाजीपोळी करायला लावणार का? माझी बायको म्हणून जरी इथे आली तरी दवाखानाच करणार. धुणं, भांडी, भाजी पोळी, घरकाम इत्यादीं साठी बाईच ठेवावी लागणार, मग आताच ठेवली तर बरं नाही का?" स्वप्नीलनं खुलासा केला.


  "बरं बाबा, तुह्या मनासारखं व्हऊंदे. आमचं काय त्वा आयिकणार हाईस व्हय." संपतराव युक्तिवादापुढं हार घेत म्हणाले.


  स्वप्नील त्यांचा एकुलता एक मुलगा. दोघांनी खूप काबाड कष्ट सोसून, वेळ प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन त्याला खूप शिकवलं. तो आता डॉक्टर झाला. त्याचं एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण झालं. एक छोटीशी खोली भाड्याने घेऊन त्याने स्वतःचा दवाखानाही थाटला. मात्र 'दोनाचे चार व्हावेत' ही माफक अपेक्षा मुलगा पूर्ण करायला तयार होत नव्हता. त्याला आणखी पुढं शिकायचं होतं, एमडी करायचं होतं. तोवर स्वप्नालीचं एम बी बी एस पूर्ण होणार होतं. म्हणून, 'दवाखाना चांगला चालल्यावरच लग्न करायचं' हा बहाणा होता. 


  वैद्यकीय शिक्षण सुरू असतांना त्याच कॉलेज मध्ये त्याच्या पेक्षा दोन वर्षांनी मागे असलेल्या स्वप्नालीच्या प्रेमात तो पडला होता. परंतु तिच्या करियरवर काही परिणाम होऊ नये म्हणून त्याने कधी तिला तसे बोलून दाखवले नव्हते. मात्र त्याचं आपल्या वर प्रेम बसलंय हे स्वप्नालीनं ओळखलं होतं. 'एमबीबीएस पूर्ण झाल्या वर प्रेम आणि लग्न दोन्ही सोबतच करू.' असं मनाशी ठरवत तिने अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं होतं.


  स्वप्नालीचं एम बी बी एस आणि स्वप्नीलचं एमडी सोबतच पूर्ण झालं. स्वप्नाली विद्यापीठात सर्वप्रथम आली. तिच्या सत्कार समारंभाला स्वप्नील जातीनं हजर होता. त्याने केलेली धावपळ स्वप्नालीच्या आणि तिच्या आई वडिलांच्या नजरेतून सुटली नव्हती. तिने आईला सर्वकाही सांगितलेले असल्यामुळे तिची आई स्वप्नीलच्या सर्व धावपळी कडे लक्षपूर्वक न्याहाळत होती. तो तिलाही आवडला होता. 


  स्वप्नालीच्या आईने तिच्या वडिलांना स्वप्नील आणि स्वप्नालीच्या प्रेमाबद्दल सांगितले. दोघे जुन्या नात्यातले असल्या मुळे विरोध करण्याचे काहीच कारण नव्हते. एक दिवस स्वप्नीलच्या घरी जाऊन रीतसर लग्नासाठी साकडं घातलं. संपतराव स्वप्नीलच्या होकारा नंतर लगेच तयार झाले. धुमधडाक्यात लग्न पार पडले. स्वप्नील स्वप्नालीच्या आयुष्यातील संसार नावाच्या नव्या अध्यायाला सुरुवात झाली. एक महिनाभर गोवा, उटी, मनाली, सिंगापूर इत्यादी ठिकाणी फिरून झाल्यावर दोघांनीही दवाखान्यात आपापल्या कार्याला सुरुवात केली. 'सुनेच्या हातचं खायचं' हे सुशीलाबाईचं स्वप्न मात्र अधूरंच राहिलं. 


  दोघांचा दवाखाना एकाच इमारतीत असला तरी क्षेत्र वेगवेगळे होते, खोल्या वेगवेगळ्या होत्या. ती स्त्रीरोग, प्रसूती आणि बालरोग तज्ञ होती, तर तो सर्जन होता. आपापल्या क्षेत्रात दोघेही तरबेज होते. दोघांचाही व्यवसाय चांगला सुरू होता. घरात भरपूर पैसे येत होते. घरात घरकामासाठी स्वप्नालीने तिच्या दूरच्या गरीब, विधवा मावस बहिणीला, कुसुमला बोलावून घेतलेले होते. 


  स्वप्नालीचा व्यवसाय स्वप्नील पेक्षा जास्त जोमात सुरू होता. तिच्याकडे खूप गर्दी असायची. तुलनेने स्वप्नील मात्र बराच वेळ रिकामाच असायचा. हळूहळू कौतुकाची जागा मत्सराने केव्हा घ्यायला सुरुवात केली, ते त्यालाही कळलेच नाही. तो आतल्या आत जळत राहू लागला. तिला घरी यायला उशीर व्हायला लागला. तसा याचा जळफळाट होऊ लागला. त्याची चिडचिड वाढली. कधी कधी त्यांच्यात कुरबुरही व्हायला लागली.


  दिवसेंदिवस दोघांमधली दरी वाढतच गेली. बेडरूम मध्येही आपसातला अबोला वाढत गेला. होता होता लग्नाला दहा वर्षे होत आली. दुसऱ्या बायकांचे बाळंतपण करणाऱ्या स्वप्नालीची कूस अजून उजवली नव्हती. उजवणार तरी कशी? सुरुवातीची पाच वर्षे त्यांनी व्यवसायात अडचण नको म्हणून प्रतिबंधात्मक नियोजन केलेले होते. नंतर दोघां मधल्या विसंवादा मुळे त्यांचे शारीरिक मिलन मानसिकते मुळे असफल होऊ लागले. सुशीलाबाई आणि संपतराव नातवाचं तोंड पाहण्या साठी तरसू लागले. संपतरावांचे काही नाही पण सुशिलाबाईंचे घालून पाडून होत असलेले बोलणे तिला जगण्यास त्रासदायक ठरू लागले. याचा परिणाम म्हणून ती दवाखान्यात जास्तीत जास्त वेळ घालवू लागली. तिने दवाखान्यातच एक खोली नीटनेटकी करून घेतली. आणि बऱ्याच वेळी ती तिथेच रात्री मुक्कामास राहू लागली. मात्र रात्री तिला त्याचा विरह सहन व्हायचा नाही. 'सहन होत नाही आणि सांगताही येत नाही' अशी तिची अवस्था झाली होती. आपलंच काही तरी चुकतं असंही कधीतरी तिला वाटायचं. द्विधा अवस्थेत ती रात्रभर तळमळत रहायची. कधी तरी हा अबोला मिटवला पाहिजे असं तिला वाटायचं. त्यासाठी लग्नाचा वाढदिवस हा मुहूर्ताचा दिवस तिने ठरवला होता. 


  पत्नी प्रेमाचा भुकेला स्वप्नील तळमळत रात्री काढू लागला. अन् एक दिवस त्याची नजर कुसुम कडे वळली. तरुणपणीच विधवा झालेली कुसुम खूप सुंदर नसली तरी नीटनेटकी होती, नाकी डोळी छान होती. इथे आल्या पासून व्यवस्थित खाण्या पिण्या मुळे शरीरानेही व्यवस्थित झाली होती. स्वप्नील काही न काही कारण काढून तिला आपल्या आसपास ठेऊ लागला. आई बाबा घरी नसतांना तिला आपल्या खोलीत काम करायला सांगू लागला. ती एका डॉक्टरच्या घरी कामाला आहे, तिच्या अंगावर भारी कपडे असायला पाहिजे म्हणून त्याने तिच्या साठी एक भारीची सुंदर मोरपंखी पदराची साडीही आणली.


  त्यांच्या लग्नाच्या दहाव्या वर्धापन दिनाच्या दिवशी त्याने एक सुंदर विणकाम केलेली जरीची साडी, मेकअपचे सामान, मोगऱ्याचा गजरा, मिठाई, फुगे, फुलांचे हार आणले. लग्नाचा सोहळा त्याला आज आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा होता. हे सारं सामान आईबाबांना दाखवण्या साठी होतं. आज हे हार कुसुमच्या गळ्यात टाकून स्वप्नालीची मस्ती जिरवायची होती. ती घरी नाही आली तर फारच बरे असे त्याला वाटत होते, आणि झालेही तसेच. स्वप्नाली आजही घरी आली नाही. स्वप्नीलला हा तिचा मुजोरपणा वाटला. त्याने आणलेला फुलांचा हार आई बाबांच्या समक्ष कुसुमच्या गळ्यात घातला. आणि 'आज पासून आम्ही पतिपत्नी आहोत' असे आई बाबांना सांगितले. 


  स्वप्नाली आज घरी जाणार होती. तिच्या लग्नाचा दहावा वर्धापन दिन होता. आज तिला आपसातला विसंवाद मोडून काढायचा होता. त्यासाठी स्वतः कमीपणा स्वीकारायचीही तिच्या मनाने तयारी केली होती. तो एक पुरुष आहे, त्याचा इगो दुखावला गेला असेल तर आपण माफी मागावी असे तिने ठरवले होते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. 


  स्वप्नाली दवाखान्यातून निघणारच होती. तेवढ्यात एका जुन्या मित्राची, राहुलची पत्नी उषा, रुग्ण म्हणून तिच्या दवाखान्यात दाखल झाली होती. तिची देखभाल करायला सोबत कुणी स्त्री नव्हती. केस फारच गुंतागुंतीची होती. अकरा वर्षानंतर उषाला दिवस गेले होते. नऊ महिने पूर्ण होत आलेले होते. तिला खूप त्रास होत होता. तिने ताबडतोब सोनोग्राफी करून घेतली. त्यात तिला दिसलं, पोटात बाळाच्या गळ्याला नाळेचा फास बसलेला होता. आणि बाळाने पोटात घाण केली होती. सीझर करणे आवश्यक होते. राहुलचे उषावर किती प्रेम आहे हे त्याच्या चेहऱ्या वरून दिसत होते. 'काहीही करा पण उषाला वाचवा.' असे तो वारंवार विनवत होता. तिने स्वप्नीलला दोन तीन वेळा फोन केला पण त्याने उचललाच नाही. मग तिने दुसऱ्या डॉक्टरला बोलावून सीझर करून घेतले आणि त्याच्या मदतीने उषाला मोकळे केले. बाळ पोटातच गेलेले होते. उषा बेशुद्धच होती. उषा शुद्धीवर येण्यासाठी राहुलची तगमग होत होती. त्याच्या सोबत गप्पा मारत तिने त्याची सर्व कहाणी ऐकली. उषा व राहुल एकमेकांवर खूप प्रेम करत होते. एवढे तिला त्यातून कळले होते. 


  स्वप्नाली आपल्या केबिन मध्ये बसून राहुलची मनातच स्वप्नीलशी तुलना करत होती. 'माझी एवढी काळजी वाटते का माझ्या नवऱ्याला? मी घरी का आले नाही हे फोन करून तरी विचारले का? मी फोन केला तर फोनही घेतला नाही.' ती विचार करत होती. तो करत असलेले दुर्लक्ष तिला खटकत होते. आणि अचानक.... 


   "डॉक्टर sssss, लवकर या. उषा बघा कशी करत आहे?" राहुलचा रडवेला आवाज आला. तशी ती उठली. धावतच उषाकडे गेली. उषा खूप अत्यवस्थ झालेली होती, तळमळत होती. तिला ताबडतोब ऑक्सिजन लावले. पुन्हा एकदा स्वप्नीलला फोन केला, परत तेच. त्याने फोन उचललाच नाही. तिने पुन्हा दुसरे दोन डॉक्टर बोलावले. सर्वांनी शर्थीचे प्रयत्न करूनही ते उषाला वाचवू शकले नाही. राहुल अगदीच लहान मुलांसारखा ओक्साबोक्शी रडत होता. त्याला कसे शांत करावे? हे कुणालाही समजत नव्हते. रडून रडून तो अत्यवस्थ व्हायची वेळ आली होती. रडून शांत झाल्यावर त्यालाही सलाईन चढवावे लागले. एक दोन तासानंतर सर्व सोपस्कार पूर्ण करून सकाळी सकाळी उषाचा मृतदेह राहुलच्या ताब्यात देण्यात आला. 


  आज प्रथमच स्वप्नाली रुग्णाला वाचवण्यात अयशस्वी झाली होती. शरीरा बरोबरच ती मनानेही खूप खचली होती. तिने दवाखाना बँड केला आणि थकलेल्या अवस्थेत ती घरी पोहोचली. घरात तिला बराच काही बदल झालेला दिसला. कुसुमच्या अंगावर भरजरी साडी होती. रात्री साजरा केलेल्या लग्नाच्या वाढदिवसाचे सारे अवशेष, फुटलेले तसेच काही भिंतीला चिकटवलेले फुगे,खाऊन उरलेला अर्धवट केक, कुसुमच्या, स्वप्नीलच्या गालावर लागलेली मलई, सासू सासऱ्याचे मौन. हे सारे तिच्यासाठी अकल्पित आणि अनपेक्षीत असे होते. ती बावरली, तिने त्याला विचारायचा प्रयत्न केला पण त्याचा निर्विकार प्रतिसाद तिला आणखीच खचवून गेला. लग्नाचा वाढदिवस असतांनाही ती घरी आली नाही म्हणून कुसुमच्या गळ्यात हार घालून वाढदिवस साजरा केल्याचे त्याने सांगितले. त्यावर तिने घरी न येण्याचे कारण सविस्तरपणे सांगितले, परंतु त्या बद्दल त्याने फारशी उत्सुकता दाखवली नाही.


  दोघांमध्ये बरीच खडाजंगी झाली. वाद विकोपाला गेला. ऐकून घ्यायला दोघंही तयार नव्हते. त्याने तिला सरळ घरातून निघून जायला सांगितले. 


  "तुझ्यासोबत राहण्यात मलाही काही रस नाही. मलाही काही मानसन्मान आहे की नाही? मी काही फुकट बसून खात नाही या घरात. मीही चार पैसे कमावते. मलाही तुझ्या बंधनातून मुक्त व्हायचे आहे." असं म्हणत ती पाय आपटत आपल्या खोलीत निघून गेली. 


  स्वप्नील आणि स्वप्नालीच्या नाजूक नात्यातील वीण उसवत गेली. पतीपत्नीचं नातं हे एखाद्या काचेच्या भांड्याप्रमाणं असतं, एकदा तडा गेला की जोडणी करणं अवघड होतं. यांचंही तसंच झालं. दोघांचाही अहम दुखावला गेला होता. दवाखान्याची इमारत तिला बहाल करून तिला काडीमोड देण्यात आला. इकडे रीतसरपणे कुसुम सोबत स्वप्नीलचे लग्न झाले. स्वप्नालीनेही दवाखान्याच्या इमारतीत एक स्वतंत्र खोलीत स्वतःचा संसार थाटला. पण जास्तीत जास्त वेळ दवाखान्यात आणि खूप कमी वेळ खोलीत राहू लागली. 


  स्वप्नालीचा दिवस कसा तरी जायचा पण रात्र वैरीण व्हायची. ती तळमळत रहायची, कधी कधी उठून ती दवाखान्यात दाखल असलेल्या रुग्णांना पहायलाही जायची. अशातच एक दिवस जुन्या फाईली चाळत असतांना तिला उषाची केस फाईल हाताला लागली. तिच्या आठवणी नव्याने चाळवल्या गेल्या. त्या फाईलवरच्या राहुलच्या संपर्क क्रमांकावर तिने संपर्क साधला असता, तो अजूनही दुःखातून सावरलेला नव्हता. त्याने नोकरीही सोडली होती. जगण्यातला रस संपला होता. या जगातून निघून जायची इच्छा होत असल्याचं तो बोलत होता. तिने त्याचे सांत्वन केले. वरचेवर त्यांचे बोलणे व्हायला लागले. आणि एक दिवस स्वप्नालीने राहुल समोर लग्नाचा प्रस्ताव मांडला. राहुलने खूप आढेवेढे घेतले पण तिच्या खूप अग्रहांतर तोही तयार झाला. 


  राहुल सोबत लग्न झाल्यानंतर स्वप्नाली पुन्हा पुन्हा पूर्ववत कमला लागली. तिला भक्कम आधार मिळाला होता. दवाखाना पुन्हा जोरात चालायला लागला आणि पुन्हा एक अफवा उठली, 'मित्रासोबत लग्न करण्यासाठीच हिने मित्राची पत्नी मारली.' ही अफवा कुणी उठवली हे माहीत असूनही स्वप्नालीला फारसे काही करता आले नाही. तिच्या मनाची घुसमट कायमच राहिली.

*****


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama