कटू गोड आठवणीच्या हिंदोळ्यावर!
कटू गोड आठवणीच्या हिंदोळ्यावर!
एक प्रसन्न सकाळ. वैधेहिने सकाळीच उठून घर स्वच्छ पुसून घेतलं होतं, केर काढला होता, अंघोळ करून पूजा आवरली होती. घरात छान अगरबत्तीचा मंद सुगंध दरवळत होता. गोड तूपांतल्या शिऱ्याचा सुगंध घरभर पसरला होता. ती पटापट सकाळची कामे आवरत होती. तेवढ्यात मंदरचा आवाज आला नाशत्यासाठी, आणि समोर खमंग शिरा बघताच तो फार खुश झाला. शिरा मंदारला खूप आवडायचा. नाश्ता करून तोही ऑफिस साठी आवरायला लागला. मध्ये मध्ये सारखा त्याला खोकला येत होता, वैदेहीला त्याच्या आवाजावरून त्याला कफ आहे असे वाटले होते, पण तिनं गडबडीत लक्ष दिले नाही कारण आज तिच्या दोन्ही मुलांच्या ऑनलाइन परिक्षा होत्या म्हणून ती त्यांच्या तयारीत व्यस्त होती.
तेवढ्यात दारावरची बेल वाजली. मंदारने जाऊन दार उघडला. दोन नगरपालिकेची माणसे होती. तुमच्या सोसायटी मध्ये तीन कुटुंबानमध्ये कोरोना पेशंट भेटले आहेत. खाली सोसायटीच्या आवारात नगरपलिकेचे डॉक्टर व त्यांची टीम सर्वांचे स्वाब टेस्ट घ्यायला आले आहेत. घरतल्या सर्वांनी आप आप आपले आधारकार्ड घेऊन खाली टेस्टिंग साठी या म्हणून सांगून गेले.
वैदेही आणि मंदार यांचे हस्ते खेळते चौकोनी कुटुंब होते. कोणाचीही दृष्ट लागावी असेच. दोघेही हसतमुख. नेहमी मोठ्यांचा आदर करणारे व छोट्याना प्रेम देणारे, एक सुशिक्षित व प्रतिष्ठित कुटुंब. त्यांची दोन्ही मुलेही खूप हुशार, मनमिळाऊ आणि सर्वांचा आदर करणारी.
मंदारने वैदेहीला विचारले काय ग आपल्या सोसायटीत कोरोना पेशंट, कस काय शक्य आहे ?? वैधेहीला पण काही कल्पना नव्हती. ते सर्वजण जाऊन स्वाब टेस्ट करून आले. मंदार कामाला निघून गेला व वैदेही घरातल्या कामांमध्ये व्यस्त झाली.
संध्याकाळी मंदार घरी आला तेव्हा त्याला थोडी कणकण वाटत होती पण जेवून तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा ऑफिसला निघून गेला. पण दुपारी घरी आला तो जरा घाबरलेलाच.
काय झालं रे मंदार आज दुपारीच घरी, तब्बेत बरी आहे ना तुझी, वैदेहीने विचारताच त्याचे डोळे भरून आले व त्याने नुकताच नगरपालिकेचा त्याला आलेला पीडीएफ तिच्या फोन वर फॉरवर्ड केला. रिपोर्ट्स पॉझीटिव होते त्याचे. देवाच्या कृपेने बाकीच्यांचे नेगेटीव.
वैदेही तर सोफ्यावर मटकन खालीच बसली. मंदारही फार डिस्टर्ब झाला होता. तेवढ्यात नगरपालिके मधून फोन आला. तुमचे रिपोर्ट्स पॉझीटिव आहेत, तुमचे कोणी फॅमिली डॉक्टर तुमचा इलाज करणार असतील व उपचाराची हामी घेणार असतील, होम क्वारंनटाईन होण्या साठी तुमच्याकडे वेगळी खोली असेल तर तुम्ही होम क्वारंनटाईन होऊ शकता नाहीतर आंबुलेन्स पाठवतो, हॉस्पिटल मध्ये अडमिट व्हा. मंदार म्हणाला थोड्यावेळात फोन करून सांगतो.
तेवढ्यात मंदारच्या आईचा फोन आला. हॅलो मंदार संध्याकाळी ऑफिस मधून सुटल्यावर बाबांची औषधे घरी आणून द्यालला विसरू नकोस. आईचा आवाज ऐकताच मंदार लहान मुलासारखा रडायलाच लागला. वैदेही पण त्याचे रडणे बघून रडू लगली. मंदार ने फोन स्पीकर वर ठेवला. मांदरच्या आईलाही थोड्या वेळासाठी कळले नाही दोघेही का रडत आहेत. ती पण घाबरलीच.
मंदारची आई एक सेवानिवृत्त शिक्षिका होती. तीने मंदारला आधी शांत होण्यास सांगितले व सर्व हकीकत वैदेही कडून ऐकून घेतली. मंदरची आई दोघांना समजावू लागली. तुम्ही दोघे सुशिक्षित तरीही आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायचे सोडून रडत काय बसलात?? घरात तुम्ही दोघेच मोठे व सज्ञ तरीही लहान मुलांसारखे रडत बसलात, काय शिकवण देताय तुम्ही तुमच्या मुलांना ??? संकटं आली की रडत बसायचं ???
आईचे बोलणे एकून दोघेही शांत झाले, दोघानाही थोडा धीर आला. आपले फॅमिली डॉक्टर देशपांडे आहेत, मी त्यांना फोन करते व तुझ्या तब्बेती बद्दल सांगते ते तुला व्हिडिओ कॉल करून सगळी परिस्थिती समजून घेतील. काय औषधे घायची ते ही सांगतील. धीर सोडू नकोस बाळ सर्व ठीक होईल. आई बोलतच होती, वैदेही तुमचा फ्लॅट दोन बेडरूमचा आहे म्हणून एका रूम मध्ये मंदारची सोय कर. मुलांना त्याच्या जवळ जाऊन देऊ नकोस. तू पण त्याची मदत लांबूनच कर. घरात सर्वांनी मास्कचा वापर करा.
अरे कोरोना झाला म्हणून काही जग संपत नाही. सर्व प्रथम कोरोनाची भिती मनातून काढून टाका. जसे इतर वैरल इन्फेक्शन तसाच कोरोना. कोणाला इन्फेक्शनचे प्रमाण जास्त तर कोणाला कमी, पण एक गोष्ट लक्षात ठेवा मुलांनो हा आजार बरा होतो, गरज आहे दक्ष राहण्याची.
वैदेही, डॉक्टर तर त्यांची औषधे देतीलच पण तू घरातला काढा म्हणजे सुंठ, काळी मिरी, लवंग, दालचिनी, वेलची, मध घालून गरम गरम काढा करून दिवसातून दोन ते तीन वेळा त्याला देत जा. घरतले बाकी तुम्ही पण हा काढा पिऊ शकता. गरम सूप, गरम पाणी, आणि गरम पाण्याची वाफ त्याला दे. खूप बरं वाटेल त्याला.
घाबरु नकोस पोरी, मी आणि तुमचे बाबा आम्ही ही काही लांब राहत नाही , गरज असेल तसा फोन करत जा. आम्ही आहोत, काळजी करण्या सारखे काहीच नाही. आईशी बोलून दोघेही आता आलेल्या संकटाला सामोरे जायला सज्ज झाले. दोघां मध्येही आता आत्मविश्वास वाढला होता. मंदारला एका बेडरूम मध्ये होम क्वारंनटाईन करण्यात आले.
देशपांडे डॉक्टरांनी औषधे सुरू केली. मंदारला कोरोना झाला होता पण अगदी सौम्य स्वरूपाचा. आईने सांगितलेले घरघुती उपाय पण वैदेही करतच होती. औषधे सुरू करून आता आठ दिवस झाले होते. मंदारच्या तब्येतीत खूप सुधार होता. डॉक्टरांनी मंदारला सिटी स्कॅन करण्यास सांगितले. सिटी स्कॅनचे रिपोर्ट्स नेगेटीव आले होते. वैदेहीने देवापुढे साखर ठेवली. सर्वांनी मिळून देवाला नमस्कार केला.
डॉक्टरांनी सांगितले होते, रिपोर्ट्स नेगेटीव आले असले तरीही गरम पाणीच सर्वांनी प्यायचे आहे, थोडे दिवस तरी घरात पण मस्कचा वापर करायचा व एकमेकांपासून लांबच राहायचे. पुन्हा आठवडाभर सर्वांनी कडक नियम पाळले आणि सर्व पुन्हा एकदा पूर्व पदावर आले.
वैदेही आणि मंदार असेच एका शांत संध्याकाळी चहा घेत बसले होते. मंदार बोलू लागला, किती घाबरलो होतो वैदेही आपण मला कोरोना झाला म्हणून. वैदेही म्हणाली हो ना, आईने आपल्याला वेळीच सावरलं. कोरोनाच्या आठवणी कटू तर आहेत पण ह्या कटू गोष्टी, कटू आठवणीच आपल्याला जगण्याचे खरे मंत्र सांगून गेले. सुदृड शरीर हीच खरी श्रीमंती हे गोड सत्य नव्याने आपल्याला उमगले .
मंदार म्हणाला टीव्ही वरच्या नकारात्मक बातम्या, लोकांची मते, जाहिराती या सर्व गोष्टीनमुळे आपल्या सारखा सामान्य माणूस खूप घाबरून जातो आणि संकटांना तोंड देण्याची हिंमंतच गमावून बसतो. कोरोना आला आणि गेलासुद्धा, आरोग्यं धन संपदा हे सांगून गेला.
कोरोनामुळे कटू आठवणी नक्कीच अनुभवल्या, पण कटू आणि गोड आठवणीतले हेच क्षण नक्कीच मनाच्या हिंदोळ्यावर झोका घेत राहतील व कठीण प्रसंगी खंबीर रहाण्यास मदत करतील.
