Archana Krishna Dagani

Drama

3  

Archana Krishna Dagani

Drama

बाबा

बाबा

6 mins
228


सात वर्षाची छोटी केतकी आपल्या बाबां बरोबर बसून टीव्ही वर कार्टून बघत होती. मध्येच दोघेही मोठमोठ्याने हसत होते आणि कार्टून बघण्याची मज्जा घेत होते. तेवढ्यात केतकीची आई चाहा घेऊन आली आणि तिने केतकीलाही दूध दिले. दूध पिऊन झाल्यावर केतकी बोलू लागली बाबा तुला माहित आहे का रोज दूध पिऊन मला फार ताकत येणार आहे, मग मी फार मोठी होईन. केतकीचे आई बाबा दोघे ही तिच्या या गोड बोलण्यावर हसू लागले. चहा पीत पीत बाबा ने केतकीला विचारले बरं तू मोठी झाल्यावर काय होशील ग ??. केतकी ने लगेच उत्तर दिले डॉक्टर, पण बाबा डॉक्टर होण्यासाठी खूप पैसे लागतात असे आमच्या शाळेतल्या बाई सांगत होत्या. तुझ्याकडे आहेत का रे भरपूर पैसे?


मुलीच्या ह्या अचानक आलेल्या प्रश्नावर तो थोडा अस्वस्थ झाला, पण चेहऱ्यावर खोटे हसू आणून म्हणाला हो आहेत ना बाळा. पण पैशांच्या गोष्टी करायला तू फार लहान आहेस म्हणुन तु भरपूर अभ्यास कर तुझ्या बाबाकडे तुला डॉक्टर बनवायला भरपूर पैसे आहेत. केतकीच्या आईने आपल्या नवऱ्याचा अचानक पडलेला चेहरा टिपला होता, ती काही बोलेल तेवढ्यात त्याने तिला डोळ्यानेच इशारा करून थांबवलं होतं.


माधव आणि संगीता पाटील हे दोघे आपल्या मुली बरोबर कोल्हापूर मध्ये भाड्याने एका छोट्याश्या खोलीत राहत होते. माधवचा मोठा भाऊ साताऱ्याला गावी राहायचा. माधव एका खाजगी कंपनीत छोटीशी कारकुनाची नोकरी करीत होता. पोटापूर्ता कमवत होता. नोकरी निमित्ताने तो साताऱ्याहून कोल्हापूरला आला होता. गावी त्याचा मोठा भाऊ त्याच्या परीवारासोबत राहत होता. गावी घर होते. एक छोटासा तुकडा जमिनीचा होता पण जमिनीतून हवे तसे पीक काढता येत नव्हते. पीक कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती होती, म्हणून त्याचा मोठा भाऊ पण फावल्या वेळात मजुरी करून कसेबसे संसाराचा गाडा ढकलत होता. त्याची मुलगी आता वयात आली होती. मागणी यायला सुरुवात झाली होती पण त्याच्याकडे मुलीच्या लग्नासाठी पैसे नव्हते. एकूण केतकीचा बाबा गरीब होता, पण केतकी साठी तो तिचा हिरो होता.


माधवच्या डोक्यात सारखा केतकिने विचारलेला प्रश्न फिरत होता, तूझ्याकडे आहेत का रे भरपूर पैसे बाबा? रात्री पण तो सारखा कुस बदलत होता. झोप येत नव्हती. संगीताला सगळा प्रकार समजला होता पण या विषयावर बोलण्याची तिची हिम्मत होत नव्हती. पहाटे कधीतरी त्याला झोप लागली. सकाळी उठताच तो संगीताला म्हणाला मी गावी जाऊन येतो, तुम्ही दोघी सांभाळून राहा मी लवकर परत येईन. आपल्या लहान भावाला असे अचानक आलेला पाहून त्याचा मोठा भाऊ शरद आश्चर्यचकित झाला. काय रे माधव अचानक कसा काय ?? आणि वहिनी आणि केतकी, त्यांना नाही आणले, सर्व ठीक आहे ना ??


आरे दादा सर्व ठीक आहे. गावाची आठवण आली म्हणून सहजच आलो. दुपारी जेवताना माधवचा मोठा भाऊ बोलला माधव बरं झालं तू आलास, आपल्या जमिनीला गिराईक आला आहे. जास्त नाही पण तीन लाख द्यायला तैयार झाले आहेत. आपलं गाव हे खोपट्यात गिराईकच यायला तयार नाहीत. मलाही या वर्षी मुलीचे लग्न करायचे आहे म्हणून जमीन विकण्याशिवय पर्याय नाही. ठीक आहे दादा म्हणून माधव ने होकार दिला. माधव पण ह्याच विषयावर बोलायला गावी आला होता पण न बोलतच त्याचा प्रश्न सुटला होता.


एका आठवड्यात जमीन विकून स्वतःच्या हिस्याचे दिड लाख रुपये घेऊन तो घरी आला. येतांना बस मध्ये दोन माणसांना त्याने बोलताना ऐकले होते, नोकरीत कमाई नाही राव कमाई फक्त व्यवसायात आहे. घरी आल्यावर त्याने सर्व हकीकत आपल्या बायकोला सांगितली. एवढे पैसे बघून ती फार खुश झाली. पण जेव्हा तो म्हणाला की या पैशांनी नोकरी सोडून तो व्यवसाय करणार आहे, तिला धक्काच बसला. हातात असलेली नोकरी सोडायची आणि कधीही न केलेला व्यवसाय करायचा आणि तो नाही चालला मग ?? नोकरी आणि आलेले पैसे दोन्ही हातातून जातील. हा तर निव्वळ मूर्खपणा आहे. एक प्रकारचा जुगार.तीने त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याचा डोक्यात जणू श्रीमंत व्हायचा भूतच शिरला होता.


त्याने नोकरी सोडली व हातात असलेल्या पैशांनी एक गाळा भाड्याने घेतला. तिथे किराणामालाचे छोटेसे दुकान सुरू केले. बरोबरच काही भाज्याही विकू लागला. माधव फार मेहनती होता, त्याला कामाचे व्यसन होते. त्याचे या क्षणाला खुपसारे पैसे कमविणे हेच एक मात्र ध्येय होते. सकाळी सात ते रात्री अकरा, असे त्याचे दिनक्रम सुरू झाले. केतकीची आणि बाबाची भेट कमी होऊ लागली. कधी कधी ती आई कडे हट्ट करायची मला बाबाकडे जायचे आहे मग ती तिला दुकानावर बाबा बरोबर नेऊन बसवायची.केतकीला दुकानात बाबा बरोबर बसायला फार आवडायचे, पण रोज असे करता येत नसे.


दुकानाच्या आसपासचे लोक माधवला ओळखू लागले होते. माधव प्रामाणिक, मेहनती व हसतमुख होता. थोड्याच दिवसात दुकानाच्या परिसरात तो माधव किराणा वाला म्हणून प्रसिद्ध झाला होता. त्याचे ग्राहक पण वाढत चालले होते. भावाच्या मुलीच्या लग्नालाही तो गावी गेला नाही. बायको व मुलीला त्याने काही दिवस गावी पाठवले पण स्वतः मात्र काम करीत होता.


माधव आत्ता पूर्वीपेक्षा अधिक पैसे कमवायला लागला होता. नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय त्याच्या मेहनती मुळे अचुक ठरला होता.त्याच्या बायकोला त्याचे कष्ट दिसत होते, त्याला मदत म्हणून तिनेही घरघुती पापड, लोणचे, कुरडया, पापड्या वैगेरे बनवून विकणे सुरू केले. हळू हळू तिचा ही व्यवसाय वाढीस लागला.


असेच पंधरा-सोळा वर्ष अविरत श्रमाचे उलटून गेले. केतकीचा बाबा स्वतःच्या हिमतीवर खूप श्रीमंत झाला होता. इतक्या वर्षात माधवने स्वतःचे दुमजली घर बांधले होते, एक छोटीशी चारचाकी पण घेतली होती. आता त्याने होलसेल आणि रिटेल किरणामालाचे स्वतः चे दुकान सुरू केले होते. केतकीला डॉक्टर बनवण्यात त्याला यश आले होते. केतकी पण आपल्या बाबंसारखीच गुणी, हुषार, जिद्दी आणि मेहनती होती. तिनेही तिच्या बाबांचे स्वप्नं पुर्ण करण्यास कोणतीच उणीव ठेवली नव्हती.


माधवने मुलगी डॉक्टर झाली म्हणून जवळच्या नातेवाईकांना बोलवून छोटेसे स्नेहभोजन आयोजित केले होते. सगळेच खुश होते. केतकी वर शुभेच्छांचा वर्षाव होत होता. केतकिला तिच्या बाबांना काहीतरी सांगायचे होते पण सर्वांसमोर, म्हणून तीने माइक घेतला व बोलू लागली. बाबा, मला माफ करा. केतकीचे शब्द कानावर पडताच माधव गोंधळला. माधव आणि संगीता एकमेकांकडे बघु लागले व लगेच केतकी कडे गेले. काय झालं बाळा?? कसली माफी मागतेस तू?


केतकी म्हणाली बाबा जेव्हा मी लहान होते तेव्हा मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, आहेत का रे बाबा तुझ्याकडे भरपूर पैसे मला डॉक्टर बनवायला? तेव्हा आपण फार गरीब होतो. मी नको विचारायला हवा होता असा प्रश्न तुम्हाला. मी लहान होते तेव्हा, पण तेव्हापासून मनात कुठेतरी नेहमी वाटत राहिले, आपण चुकलो आपल्या बाबांना पैशानंबद्दल नको होते विचारायला. नेहमी तुमची माफी मागू असे वाटायचे पण कधी हिंमतच झाली नाही. मला माफ करा बाबा बोलून केतकी आपल्या बाबाला मिठी मारून रडू लागली.


माधव आणि संगीता दोघांचेही डोळे भरून आले. माधव बोलू लागला, बेटा आज तुझा बाबा जे काही आहे ते तुझ्या याच प्रश्ना मुळे आहे. त्या दिवशी मी तुला खोटे सांगितले होते की तुझ्या बाबाकडे भरपूर पैसे आहेत. मला तुला ते खरं करून दाखवायचे होते नाहीतर मी खोटा ठरलो असतो पोरी. म्हणून आज दहा-बारा वर्ष मी अविरत परिश्रम घेत आहे, फक्त आणि फक्त तुझ्यासाठी. टाळ्यांचा एकच गडगडाट झाला आणि बापलेकीचे जगावेगळे प्रेम पाहून सर्वांचेच डोळे भरून आले.


जगात वडलांना नेहमी कडक, शिस्त बद्ध, रागीट दाखवला जातो पण त्या रागात पण प्रेम असते. कडक शिस्त पण आपल्याच भल्यासाठी असते. बाबा कितीही बाहेरून कडक वाटला तरी तो आतून फार मायाळू असतो. मुलगा असो वा मुलगी बच्चेकंपनीसाठी तो दिवरात्र मेहनत घेत असतो. त्यात पण मुलगी असेल तर ती तर बाबाची परीच असते.


बाबाची जागा जगात कोणताही नवरा, मित्र किंवा भाऊ घेऊच शकत नाही. कारण बाकी सर्व नात्यांमध्ये एका हाताने घे आणि दुसऱ्या हाताने दे हीच अपेक्षा असते. पण आई वडलांचे नाते आपल्या मुलांबरोबर निस्वार्थ असते. त्यात पण बाप लेकीचं नात खूप स्पेशल असते. बाबा कधी मस्त गप्पा मारणारा मित्र असतो तर कधी चिडवून सोडणारा भाऊ.


वडिल हे घराचे प्राण असतात म्हणून नेहमी त्यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपल्यापेक्षा अधिक जग फार जवळून त्यांनी पाहिले असते म्हणून तुम्ही त्यांच्यावर खूप प्रेम करता व त्यांच्याशिवाय तुमचे आयुष्य अर्धवट आहे हे कधीच त्यांना सांगायला विसरू नका.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama