AKSHAY KUMBHAR

Comedy Romance Fantasy

4  

AKSHAY KUMBHAR

Comedy Romance Fantasy

क्षणभंगूर सुख

क्षणभंगूर सुख

4 mins
510


लग्नाचं वय झालं कि आकर्षणाचे पक्षी गावभर फेऱ्या मारू लागतात. पण ते पक्षी गिधाड नसले पाहिजेत. तस लग्न करायचं कि नाही यावर अजून मी विचारच करत होतो. दररोज ऑफिसला जातो म्हणजे युद्ध करायला जातोय असच वाटत. निघताना आई, बाबांच्या, देवाच्या पाया पडायचं आणि निघायचं. युद्ध म्हणजे घरी परत जिवंत येणं कि नाही याची काही खात्री नाही. कामाला मी मुलुंडला असल्यामुळे दोन प्रकारचे प्रवासाचा अंदाज मला चांगलाच आलाय. एक म्हणजे लोकल, बेलापूर ते ठाणे मी कसा तरी गर्दीत जाऊन पोहचतो पण ठाणे ते मुलुंड हा एक स्थानकाचा आणि तीन मिनिटाचा प्रवास मला जीव घेणाच वाटतो. दुसरं म्हणजे दुचाकी प्रवास, हा प्रवास तर लोकल पेक्षा खतरनाक आहे. लोकल मध्ये बसायला जागा नसते आणि दुचाकीवरून ट्राफिक मध्ये घुसायला जागा नसते. सगळ्या जगाला घाईच असते. दोन वेळा बेस्ट बस च्या खाली येता येता वाचलो. एक दिवस तर एका पुलावर अपघात झाला होता. एक चारचाकी गाडी ट्रक च्या खाली घुसली होती. ड्राइव्हरच प्रेत आतच होत. ते बघता बघता मी दुसऱ्या लाईन मध्ये जाऊन गाडी खाली अडकलो. वडील ओरडतात ते खरच बरोबर आहे. दोनचाकी वर कितीही हुशार अनुभवी माणूस असला तरी त्याची दोनचाकी कधी साथ सोडेल सांगता येत नाही. अशा कसरतीमध्ये आकर्षण नावाचा पक्षी कुठे तरी मनातच हरवून जातो. पण कधी एकटा विचार करत असलो किंवा जोडपी पहिली कि वाटतच कोण तरी सोबत असावं.

असाच एक गोड अनुभव मला त्यादिवशी आला.

रविवारचा दिवस. बाहेर पडायची माझी इच्छाच नव्हती पण ऑफिसचा एक चेक मला आमच्या राजेश सरांना द्याचा होता. मला मुलुंड ला जावं लागणार होत.

सुंदर गुलाबी सकाळ सुरु झाली आणि मी लोकल मधून आरामात चौथ्या सीट वर बसून जीवंत मुलुंड स्थानकावर पोहचलो. मला मुलुंड स्थानकाच्या बाहेरच एकाला भेटायचं होत. बाहेर भेटून चेक देऊन मी परत घरी जाणार होतो. मुलुंड स्थानकावर मी राजेश सरांची वाट पाहत होतो. आणि तेव्हाच मला एक अप्सरा दिसली ती म्हणजे निकिता.

निकिता म्हणजे

माझ्या शाळेतली बालपणीची हुशार, सुंदर,

लपून पेन्सिल आणि खडू खाणारी,

कधी न रडणारी गोड मुलगी.

माझी खास मैत्रीण. आज १७ वर्षानंतर मी तिला पाहिलं होत. मी पाहतच राहिलो होतो इतकी ती सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचं तेज तीच हसणं तसेच होत. इयत्ता पहिली ते चौथी आम्ही एकाच वर्गात एकाच बाकड्यावर बसायचो. खरतर मी चौथीत असल्यापासून तिच्यावर लाईन मारायचो पण विचार केला कि मोठं झालो कि बोलू. त्यानंतर १७ वर्ष झाली आणि तो विषय तसाच मनाच्या कोपऱ्यात पडून राहिला होता.आज चक्क तिला बघून तेच विचार डोक्यात फिरायला लागले. परत त्याच आठवणी आठवू लागल्या.

माझा मोबाईल वाजला


मी: हॅलो राजेश सर मी मुलुंडला स्थानकाच्या बाहेरच उभा आहे.


राजेश सर. मी पण येतोय. ट्राफिक मध्ये फसलोय ५ मिनटात पोहचतो.


मोबाईल खिशात गेला. परत मी तिच्याकडे पाहिलं ती तिच्या मैत्रिणीसोबत होती. पाहिलं तिच्या गळ्याकडे पाहिलं. मंगलसूत्र तर नाही ना याची खात्री करून घेतली. मंगलसूत्र नव्हतं. चला सरांना चेक देऊन कटवतो आणि तिला भेटायला जातो.

आता माझं लक्ष तिच्याकडे आणि सर येण्याच्या वाटेकडे होत. मी पाहिलं तर ती आणि तिची मैत्रीण एका लेडीज मटेरियल च्या दुकानात घुसले. सरांचे पाच मिनिट १५ मिनटात झाले तरी सर आले नव्हते. मला तर तिकडून हलता पण येत नव्हतं कारण डायरेक्ट तिच्याकडे गेलो कि सर मधेच आले तर. मी थांबलो.

२० मिनिटानंतर सरांची गाडी येताना दिसली. ती गाडी सरळ माझ्या समोरून निघून गेली. ती सरांची नव्हती. लगेच सर माझ्या बाजूला येऊन थांबले.


राजेश सर: तिकडे काय बघतोय ?


मी: तुमची गाडी कुठाय ?


राजेश सर: मी दुचाकी वर आलोय


मी: बरं


सरांना चेक देऊन मी कटवलं आणि धावत त्या लेडीज मटेरियल च्या दुकानात गेलो. आणि ती तिथे नव्हती. थोडं मन उदास झालं. त्या भैयाला विचारलं तर तो बोलला आताच बाहेर गेले. मी दुकानातून बाहेर पडून सगळीकडे नजर फिरवली. मला कुठेच ती दिसली नाही. माझं लक्ष अचानक एका रिक्षाकडे गेलं तर तिच्यासोबत आलेली मैत्रीण रिक्षात बसत होती . धावत त्या रिक्षावाल्याकडे पळालो पण तिथे पोहचेपर्यंत रिक्षा निघाली. मी तसाच धापा टाकत तिथे रिक्षाकडे पाहत थांबलो. ती रिक्षा समोरच्या सिग्नल वर अडकली. मी परत धावू लागलो. ३५ सेकंद सिग्नल सुटायला होते. मी २० सेकंदात रिक्षाजवळ पोहचलो. आणि रिक्षात हळूच पाहिलं आणि परत फिरलो. एका बाजूला उभा राहून दम धरला. शांत झाल्यावर परत मुलुंड स्थानकावर जायला निघालो.


रिक्षात

तिची मैत्रीण, ती आणि तिच्या बाजूला एक मुलगा तिच्या खांद्यावर हात टाकून बसला होता. मला खात्री होती कि तो तिचा भाऊ नव्हता, कारण तिला भाऊ नव्हताच.


तो

हुशार

तरुण

सरकारी नोकरीवाला

६०,००० पगार असणारा

स्वतःच मुंबईत घर असलेला

समजूतदार

माझाच कॉलेजचा माझा चांगला मित्र

होता.

आणि त्याचा साखरपुडा झाला होता त्या मुलीचं नाव निकिता होत.


एक गोष्ट सुरु होण्याआधीच संपली होती. खरचं स्वप्न एकाच सेकंदात तुटली कि वाईट वाटतच. मला प्रत्येक ठिकाणी पोहचायला उशीर का होतो तेच कळत नाही. जाऊ दे. चला वाईट मानून मी घेणारच नाही कारण ती अपूर्ण थांबलेली कथा होती जी पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करत होतो. आणि माझ्या जीवनाची कथा अजून चालू आहे. आता मित्राने लग्नाला बोलावलं तर जायची हिंमत होणार नाही. पण मनाला सुख या गोष्टीच आहे कि माझ्या चांगल्या मित्राला चांगली बायको मिळाली आणि चांगल्या मैत्रिणीला चांगला नवरा मिळाला. कदाचित कोणती तरी अप्सरा माझीच वाट पाहत कुठे तरी बसली असेल आणि मी तिला पाहिलं नसून चुकून मी दुसऱ्याच अप्सरेच्या मागे पळत असेन.


जीवन असच क्षणभंगुर सुखाचं आहे. रडत बसलात तर पुढचं पण सुख मिळणार नाही.

त्यामुळे कुणासाठी थांबू नका आणि कुणाला थांबवू नका.

आपण सुखाच्या मागे पाळायचं नाही सुखाला आपल्या मागे पळवायचं.     


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy