क्षण हे जगू दे...
क्षण हे जगू दे...


लग्नाचा २५ वा वाढदिवस. पहिल्यांदा आज दोघेच घरात एकटे होते. दोघे मुले मुंबईत असल्याने आज इतक्या वर्षांनंतर त्याला आवडणारा एकांत पहिल्यांदा या lockdown मुळे मिळाला होता. आज त्याला, तिला संपूर्ण वेळ द्यायचा होता. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सतत धावणारे दोघांचे पाय, कष्ट करणारे हात, आज सगळ्यांना आराम होता.
त्याला सगळं बाजूला ठेवून फक्त तिच्यासाठी आज जगायचं होतं. धकाधकीच्या जीवनातल्या इतक्या वर्षात स्वतःला विसरलेली, त्याला आज पुन्हा नव्याने तिच्या स्वतःशी ओळख करून द्यायची होती. तिच्या अपूर्ण इच्छा जाणून घ्यायच्या होत्या. मागे सरलेले दिवस आज त्याला पुन्हा परत आणायचे होते. झोपाळ्यावर बसून हळूहळू झोके घेत मागच्या साऱ्या आठवणींना उजाळा देत होते. आज तीही शांतपणे त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून त्या क्षणाला जगत होती.
त्याची आणि तिची पहिली भेट, कांद्या-पोह्यांच्या कार्यक्रमात झालेली नजरानजर, डोळ्यांतून कळलेला होकार, पहिल्यांदा झालेली प्रेमाची ती जाणीव, लग्नाची सप्तपदी, आज पुन्हा नव्याने अनुभवत होती. हळूच बाहेर डोकावणारे दोघांचे पांढरे केस, आज ठरवून त्यांना डाय न करताच दोघे त्यांच्या वयाचा टप्पा न्याहाळत होते. त्यांना त्याची पर्वा नव्हती. मनाने आजही दोघे पहिल्या भेटीच्या दिवशी जसे होते तसेच होते. फक्त आज तो दिवस ते साजरा करणार होते.
लग्नातली साडी घालून अगदी त्याला आवडतो तसा साजेसा मेकअप करून ती तयार झाली होती. आजही तितकीच सुंदर दिसतेस जितकी आधी दिसायची किंबहुना, जास्तच. असं बोलून त्याने केलेली तारीफ ऐकून आधीच ब्लश लावलेल्या तिच्या गालावर गुलाबी लाली चढली. तिची झुकलेली नजर त्याने वर करताच तिला त्याच्या डोळ्यांच्या कडा ओल्या दिसल्या. नेहमी झाडासारखं तटस्थ राहून सर्वांना सावली देणारा, आज तिला त्याची ही बाजू नवी होती. ती काही बोलायला जाणार तितक्यात त्याने हळूच तिच्या माथ्यावर आपले ओठ टेकवून त्याने तिला क्षण हे जगू दे म्हणत शांत राहण्यास खुणावले. त्या स्पर्शात तिला काळजी, प्रेम, ओथंबून वाहत असल्याच्या जाणवल्या.
आज त्याला फक्त हा पूर्ण दिवस तिच्या सहवासात मनमुरादपणे जगायचा होता. तिच्या डोळ्यात हरवून जायचे होते. तो क्षण खरच खूप सुंदर होता...